News Flash

बॅण्ड बजा दे..

चौघांनी मिळून त्या गाण्यातली ‘हार्मोनी’ नरगुंडे याने हुबेहूब उचलली होती.

 

 

संगीतक्षेत्राला मान असला तरी बँड या प्रकाराला अजूनही लोकमान्यता मिळालेली नाही. तरुणाईने जर आपल्या सर्जनशील संगीतकलेला वाव देत बँडची वाट पक डायची ठरवली तर त्यांना घरापासूनच विरोधाची लय सुरू होते. पण या विरोधाला सामोरं जात तरुणाईने आपापल्या पद्धतीने संगीताचे प्रकार निवडत, कधी सादरीकरणात नावीन्य आणत स्वत:चे बँड निर्माण केले.

पाण्याला जशी एक लय असते, तशीच संगीतालाही असते. झऱ्याचं पाणी, नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी वेगवेगळंच वाहणार. म्हणून संगीताचे तरंगही वेगवेगळे. आता हे तरंग उमटवण्याचं ठिकाण कुणाचं एकांतात असेल. कुणाचं रसिकांनी भरगच्च सभागृहातील मंचावर असेल, तर कुणाचं तालावर उसळणाऱ्या, थिरकणाऱ्या तरुणाईने वेढा घातलेल्या स्टेजवर असेल. गळ्यातील फिरत, बोटांतली थिरक संथलयीतून द्रुतगतीवर आणत ‘संगीत सम्राट’सारख्या रिअ‍ॅलिटी शोजमधून अस्सल ठरलेल्या बॅण्डवाल्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला नादवेड लावलं. पण हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. बॅण्ड म्हणजे रॉक, पॉप. म्हणजेच शोर, स्वरकल्लोळ असा शिक्का मारणाऱ्या समाजाकडून काही अंशी विरोध आणि हेटाळणी वाटय़ाला आली. तर शिकून मोठं व्हायचं सोडून वाजवण्याचं खूळ कशासाठी, अशा अनेक ‘बेसुरां’नी अडथळे आणले. तरीही मैफल बिघडवणाऱ्या अशा वातावरणात मिरज, मुंबई आणि डोंबिवली-कल्याणमधील तरुणांनी सुरांचे बोट धरत साऱ्या नकारात्मकतेचा ‘बॅण्ड’ वाजवला आहे, त्याची ही कहाणी..

इमोशन बॅण्ड : उद्धव जाधव

मिरजेत आजोबांपासूनचा मिर्ची-मसाल्याचा व्यवसाय. वडीलही मसाल्याचं दुकान चालवत आले. पुढे आम्हीही ते चालवू, अशी स्वाभाविक त्यांची अपेक्षा. पण मी आठवीत आलो आणि माझ्या एका गोष्टीने त्यांना मोठाच ‘ठसका’ लागला. तो म्हणजे मी गिटार शिकण्यासाठी मास्तरकडे जाऊ लागलो. मग तो त्यांना कायमच लागू लागला. दहावीत आलो आणि गिटारची गोडी आणखीनच वाढली. मसाल्याचा व्यवसाय सुटलाच होता. आता संगीतातच रमून जायचं असं ठरवून ‘बेस आणि इलेक्ट्रिक गिटार’ वाजवण्याचं धडे अधिक मेहनतीने गिरवले. स्टेजवर गिटार वाजवायची पहिली वेळ खेडमध्ये आली. मग तिथून वर्षांतून एकदा आर. डी. बर्मन यांच्या गीतांवर कार्यक्रम करणारा ‘बॅण्ड’ आकारास आला. आम्ही सारे जण फारच हळवे आहोत. बॅण्डमधल्या कुठल्याही कृतीशी ‘इमोशनली अटॅचमेंट’ असल्याने मग ‘इमोशन’ हे नाव ‘बॅण्ड’ला द्यायचं ठरलं. ‘इमोशन बॅण्ड’मध्ये मी स्वत: ‘बेस गिटार’ वाजवतो. विजय नरगुंडे हा ‘कीबोर्ड’ वर असतो. रफिक पटेल लीड गिटारिस्ट आहेत. समर्थ कांबळे याची ढोलकी आणि ढोलकवरची थाप अप्रतिम आहे. याशिवाय सचिन देसाई ‘ऑक्टो पॅड’वर असतो. आमोश मोहिते गायक आहे. संदीप वाडेकर सहगायक आणि ‘पर्कशनिस्ट’ आहे. जाता जाता इतकंच सांगेन की स्पर्धेतलं ‘याड लागलं..’ या गीताने आम्हाला सर्वोच्च निर्मितीचा आनंद दिला. चौघांनी मिळून त्या गाण्यातली ‘हार्मोनी’ नरगुंडे याने हुबेहूब उचलली होती. भविष्यात ए. आर. रेहमानच्या गाण्यांवरील ‘कन्सेप्ट शो’ करायचा आहे. त्यासाठी कसून तयारी सुरू आहे.

अ‍ॅडेड नाइन.. : आशुतोष वाघमारे

‘कोरस’मध्ये गाणाऱ्यांवर एक शिक्का असतो. तो असा की ‘हे कोरसवाले बरं का!’. म्हणजे हे इथे घसा खरवडण्यासाठीच आलेत, असा तुच्छ भाव त्यांच्या या बोलण्यात तरंगत असतो. तरीही कित्येक दिवस आम्ही दोघे मिळून ‘कोरस’मध्येच गात होतो. बरेच महिने हे असं चालू होतं. भविष्यात आम्हाला ही छाप पुसून टाकायची होती. पण कशी, हा प्रश्न होता. विशिष्ट असंच संगीत वाजवायचं असं काही मनाशी पक्कं नव्हतं. आधी आम्ही दोघेच. म्हणजे माझ्याबरोबर पहिला शशांक मोहिते ‘अ‍ॅड’ झाला होता. मग प्रणिता थोरात ही कर्नाटकी संगीत शिकणारी मुलगी ‘अ‍ॅड’ झाली. असे ‘अ‍ॅड’ होत होत आम्ही सारे नऊ जण झालो. म्हणून ‘अ‍ॅडेड नाइन’ असं बॅण्डचं नाव ठरलं. आमच्या बॅण्डमध्ये कोणी ‘लीड’ म्हणून वावरत नाही. कारण संगीत आकारास येण्यात प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते. म्हणजे ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय..’ यात पारंपरिक ढंग होताच, पण त्यात वेस्टर्न आणि कर्नाटकी संगीताचा साज चढवून आम्ही हे गीत सादर केलं त्यात साऱ्यांचा रोल समान महत्त्वाचा होता. आमच्या ‘बॅण्ड’मध्ये गुरुशिष्य परंपरेतील दोघे जण आहेत. यातील चार्वाक जगताप हा तबलावादक आहे. त्याने डोंबिवलीतील दिवंगत तबलावादक सदाशिव पवार यांच्याकडून वादनाचे धडे घेतले आहेत. तर संतोष वाघमारे हा तुळशीदास बोरकर यांचा शिष्य आहे. याशिवाय बॅण्डमधील राकेश सावंत आणि राहुल सुतार हे दोघे इलेक्ट्रिक आणि बेस गिटारिस्ट आहेत. श्वेता अय्यर ही सहगायिका आहे.  यातील चार्वाकची कथा खरोखरच प्रेरणादायी आहे. चार्वाक ‘बॅण्ड’मध्ये आल्यानंतर काही महिन्यांनी त्याच्या पत्नीला कर्करोगाचे निदान झाले. तरीही तिने संगीतसाधना न सोडण्याचे चार्वाककडून वचन घेतले आणि चार्वाकनेही ते पाळले. भविष्यात चित्रपटाला संगीत देण्याची आमची इच्छा आहे.

दंगल गर्ल्स : रविराज कोलथरकर

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातून ‘दंगल गर्ल्स’मधील हिरे माझ्या हाती लागले. समूहगीत हा प्रकार अधिक ‘पॉप्युलर’ करण्याचा माझा विचार आहे. त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चिमात्य संगीताचा मेळ घालून समूहगीत सादर करणारा हा बहुधा भारतातील पहिलाच ‘बॅण्ड’ असावा. ‘एसएनडीटी’ हे दंगल गर्ल्सच्या रियाजाचं मुख्य ठिकाण. येथूनच त्यांच्या संगीतप्रवासाला सुरुवात होते. खरेतर आमच्या बॅण्डचे नाव ‘हुकमी बॅण्ड’ असे होते. परंतु परीक्षकांनी मुलींच्या अफलातून ‘परफॉर्मन्स’मुळे त्यांना दंगल गर्ल्स असे नाव दिले. यातील सर्वच जणी लहानपणापासूनच रियाजात आहेत. यातील हरगुन कौर ही शास्त्रीय संगीत गाते. याशिवाय अरुंधती तेंडुलकर, आरती सत्यपाल, दुहिता कुणकवळेकर, आराधना हेगडे, अदिती गराडे आणि स्नेहा आयरे या गायिका आहेत, तर मिताली विंचूरकर या तबलावादक आहेत. भविष्यात मला ‘म्युझिक अरेंजर’ म्हणून काम करायला आवडेल.

सोलकडी : डॉ. राजेश खाडे

मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूलाच कोपऱ्यात ‘बर्गर’चं छोटंसं माझं दुकान. कुणी तरी म्हणेल मी व्यवसायाने ‘बर्गरवाला’च आहे; पण तसे नाही. मी डॉक्टर आहे आणि माझ्यासोबत अन्य दोन महिला डॉक्टर आहेत. खरेतर डॉक्टर रुग्णाला पथ्ये पाळायला लावतो. पण मी ‘बर्गर’ खायला घालत होतो. हे करता करता संगीत ऐकवणंही आलंच. यातून आमच्या ‘बॅण्ड’चा जन्म झाला. अनेक ठिकाणी कार्यक्रमही सुरू झाले. पण जिथे जाऊ तिथे जेवणासोबत ‘सोलकढी’ पिण्यासाठी ‘ऑर्डर’ केली जायची. आपण गाणी म्हणतोय. वाजवतोय. पण ‘बॅण्ड’चे नाव काय असेल, हा मुद्दा मनात रेंगाळत होता. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ‘सोलकडी’ प्रसिद्ध आहे. म्हणजे ती सर्वाना ‘कनेक्ट’ करणारी आहे. म्हणून मग आमच्या ‘बॅण्ड’चे नाव ‘सोलकडी’ ठेवले, पण ती शब्दश: ‘सोलकडी’ नाही. आम्ही तिला वेगळं रूप दिलं. म्हणजे जीव ओतून गायलेलं गाणं म्हणून २स्र्४’ (आत्मा) ही संकल्पना त्यात आली. सुरुवातीला सोलकडीच्या कार्यक्रमांना समाजमान्यता मिळाली नाही. बॅण्ड म्हणजे रॉक-पॉप संगीत. हे संगीत म्हणजे नुसता गोंधळ, असा शिक्का मिरजेतील आणि इतर काही भागांतील लोकांकडून मारण्यात आला. हळूहळू  ‘सोलकडी’मधून आम्ही सादर केलेली गाणी अनेकांना आवडू लागली. ‘सोलकडी बॅण्ड’मध्ये डॉ. स्नेहा शर्मा, शास्त्रीय आणि बॉलीवूड गीतं सादर करतात. डॉ. ओजस्विनी त्रिवेदी या शास्त्रीय गायन आणि इंग्लिश गाण्यांमध्ये आपली कला सादर करतात. सुप्रिया कामत या आशा भोसले यांच्या गाण्यांमध्ये आपला जीव ओततात. याशिवाय अमोल घोंगडे हे असिस्टंट बँक मॅनेजर आहेत. कल्लोळकुमार हे इंग्रजी, हिंदी गाणी गातात. जुनैद गवंडी हे सोलो गिटारिस्ट आहेत, तर रमण पुजारी हे बेस गिटार वाजवतात.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 12:37 am

Web Title: music field musical band emotional band solkadhi band
Next Stories
1 आऊट ऑफ फॅशन : ‘बो’नामा!
2 ब्रॅण्डनामा : मोती साबण
3 Watchलेले काही : आयरिश नृत्यशास्त्रदर्शन!
Just Now!
X