‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.

दहशतवादाला खतपाणी पुरविणाऱ्या राष्ट्रांमध्ये शांतताग्रही संगीत नांदण्याचा विरोधाभासी प्रकार तीव्रतेने पाहायला मिळतो. समुद्री चाच्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोमालीयामध्ये के’नान याची स्वातंत्र्यवादी गाणी निपजू शकतात. बोकोहराम या दहशतवादी संघटनेची मुळे असणाऱ्या नायजेरिया या देशात साहित्य-सिनेमासोबत संगीतामधील नव्या संकल्पना तयार होऊ शकतात. तसेच आपल्या शेजारच्या आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आद्यशत्रू असल्याची शिकवण दिल्या जाणाऱ्या पाकिस्तानमध्ये भारतीय संगीताचा पाया घेऊन उच्च दर्जाची पॉप गाणी बनू शकतात. अर्थात डोक्यातील आकस आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून या गाण्यांकडे पाहिल्यासच त्याचा प्रत्यय येणे शक्य. अन्यथा दुराभिमानाच्या गर्तेत या संगीताचा आणि त्यातील चित्रीकरणाचा आनंद घेता येणे अशक्य.

भारतीय पॉप चळवळ १९९५-९६ सालात एमटीव्ही आणि व्ही चॅनल यांच्या आगमनानंतर सुरू झाली. दहा ते बारा गाण्यांचा अल्बम आणि त्यातील दोन किंवा तीन गाण्यांचे चित्रीकरण हे साधारण कलाकारांचे सांगीतिक उत्पादन असे. हे उत्पादन संगीत वाहिन्यांवर प्रसारित करून या दशकात भारतातील पॉपस्टार निपजले. पाकिस्तानमध्ये नव्वदीच्या दशकात हे मॉडेल सुरू झाले. हसन जहाँगीरच्या ‘हवा हवा’ या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर पाकिस्तानमधील उच्च मध्यमवर्गामध्ये पॉप संगीताची फॅक्टरी तयार झाली. देशातील शास्त्रीय संगीतापासून लंडन स्कूल ऑफ म्यूझिकमध्ये वेस्टर्न क्लासिक शिक्षण घेऊन देशात गाणी बनविणारा कलावंतांचा ताफा नव्वदीच्या दशकात तयार झाला. पारंपरिक सुफी संगीत, आधुनिक संगीत आणि एमटीव्ही उत्तरकाळातील संगीतप्रवाह यांच्या एकत्रीकरणातून इथल्या पॉपप्रयोगांना सुरुवात झाली. ‘हवा हवा’ या गाण्याचा नव्वदीच्या दशकातील एक लाइव्ह परफॉर्मन्स या वर्षीच कुणीतरी यूटय़ूबवर अपलोड केला आहे. मूळ गाण्याच्या काही शब्दांत बदल करून हसन जहाँगीरने ते गाणे गायले आहे. त्या काऴात भारतातील नाक्या-नाक्यावर या गाण्याची कॅसेट वाजत असे. दोन दशकांपूर्वीचा हा पाकिस्तानी पॉपस्टार किती गरीब वेशात आणि आवेशात आहे, ते पाहायला मिळेल. इथल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील उत्साहाची अवस्थाही गमतीशीर भासेल.

पंधराएक वर्षांपूर्वी ‘स्ट्रींग’, ‘जल’ या बॅण्डनंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतात प्रसिद्धी मिळविली. मग त्यांच्या भारतातील संगीत जलशांवर बंदी आली. विचित्र प्रकारचे वाद निर्माण केले गेले. प्रत्यक्षात भारतात सादरीकरणासाठी आले, त्याहून कैक कलाकार तिथे पॉपप्रयोग राबवत आहेत. यूटय़ूबच्या व्यासपीठावरून त्यांची गाणी भारतच  नाही तर जगभरात ऐकली-पाहिली जात आहेत. अलीकडे जिमी खान नावाच्या एका कलाकाराची गाणी प्रचंड लोकप्रिय होत आहेत. ‘नदीया पार पार करके’, ‘बारीश’ किंवा ‘पेहला प्यार’ ही गाणी पाहिलीत तर सशक्त शब्दांनी हरविलेल्या आपल्या सिनेसंगीताशी तुलना चटकन होईल. त्यांच्या गाण्यांच्या चित्रीकरणामध्ये आधुनिकता आहेच, पण कल्पकताही उत्तम पाहायला मिळेल. ‘ऐसे कैसे’ हे गाणे आणि ‘पेहला प्यार’ हे उत्तम कल्पक चित्रीकरणाचे नमुने आहेत.

झोइ विकाजी नावाची सध्याची पाकिस्तानी सेलिब्रेटी गायिका अमेरिकी-ब्रिटिश कलावंतांना फिके पाडेल इतक्या ताकदीचे गाणे गाते. ‘जब कोई प्यार से बुलाएगा’ या जुन्या  गाण्याचे तिचे व्हर्शन पाहण्यासारखे आहे. नदीम-श्रवण या एकेकाळी भारतात शिखरावर असणाऱ्या संगीतकार जोडीतील नदीम यानेही हे गाणे भारतात असताना केले होते. ते तुलनेसाठी खास यूटय़ूबवर ऐका आणि पाहा. तिच्या ‘इश्क किनारा’ या गाण्याचा गमतीशीर व्हिडीओ उपलब्ध आहे. एक मोठीशी गोष्ट छोटय़ाशा गाण्याच्या चित्रीकरणामध्ये सांगितली गेली आहे. तिच्या अनेक लाइव्ह रेकॉर्डिग्जही पाहायला मिळतील. पाकिस्तानमधील राजकीय परिस्थितीवर टीका करणाऱ्या अर्शद भट्टी आणि त्याच्या बॅण्डचे ‘आलू अंडे’ आणि ‘सब पैसे की गेम है’ या गाण्यांना प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहायला हवे. त्याहून अधिक चांगले गाणे ‘स्ट्रींग’ या बॅण्डने पाकिस्तानच्या दुर्गम भागामध्ये जाऊन चित्रित केले आहे. ‘मै तो देखुंगा, तुम भी देखोगे, जब रोटी होगी सस्ती और मेहंगी होगी जान’ या अतिभावूक शब्दांनी तयार झालेल्या या गाण्यामध्ये त्यांचा रॉकस्टारचा पोशाख बदलला आहे. गिटारऐवजी पेटी हाती आली आहे अन् या संपूर्ण व्हिडीओमध्ये निरागस लहान मुलांचा जथा चित्रित झाला आहे. अत्यंत तळागाळातील आणि शिक्षणाची दारे खुली न झालेल्या भागातील हे धाडसी आणि सुंदर चित्रीकरण आहे. दहशतवादी वातावरणात आणि कलाकारविरोधी मूलतत्त्ववादी विचारांची गर्दी असलेल्या या देशात संगीतातून तयार होणारा आशावाद कौतुकास्पद आहे. पूर्वग्रह किंवा कुठलाही ग्रह टाळून या संगीतप्रयोगांना अनुभवलं तर आपल्या भारतप्रेमात कसलाही अडथळा येणार नाही.

viva@expressindia.com