रोजच्या टीव्ही सीरिअल्सचा मेलोड्रामा पाहून वैतागलेली बरीच गर्दी आता यूटय़ूबच्या स्टेशनवर थांबत आहे. सास- बहू ड्रामा, नणंदांचे तेचतेच व्हेरिएशन देऊन दाखवले जाणारे तालरंग आणि लग्नसोहळ्यांच्या भोवती घुटमळणाऱ्या कथांच्या या सीरिअल्स पाहून पाहून काही मंडळींची जवळपास पुढची ‘स्क्रीप्ट’ पाठ होते. अशी डेली सोपची फॅन मंडळी सोडली तर या साचेबंद करमणुकीला कंटाळून जाणाऱ्यांची संख्या वाढतेय. या साच्याला शह देत नवमाध्यमांवर अर्थात यूटय़ूबवर सध्याच्या घडीला असंख्य कलात्मक आणि मुख्य म्हणजे नवीन कन्सेप्ट्स असणाऱ्या काही मालिका गाजत आहेत. यूटय़ूबवर चॅनल्सवरच्या मालिकांच्यात प्रचंड व्हेरिएशन आहे. त्यातलीच एक गाजणारी हटके मालिका आहे ब्लश नामक यूटय़ूब चॅनेलवर. ‘बी ब्युटिफुल’ आणि ‘लॅक्मे’ प्रस्तुत अलिशा ही मालिका सौंदर्यसाधना, फॅशन, ग्लॅमर या सगळ्याला एका छानशा गोष्टीत बांधून केलेली आहे.
‘ब्लश’ या नावातच ग्लॅमर झळकत असलं, तरीही हे ग्लॅमर आणि मिस्ट्री यांचं आउट ऑफ द बॉक्स कॉम्बिनेशन आहे. या मालिकेची नायिका आहे ‘एल.ए’ला (लॉस एंजलिस ) एका फॅशन स्कूलमध्ये शिकणारी अॅली – म्हणजेच अलिशा लुना. काही कारणांमुळे तिला तिथून काढून टाकतात. मग तिची फ्लाइट लॅण्ड होते थेट भारतात.. बांद्रय़ाला. मॅगझिनमध्ये काम करण्याचे मनसुबे घेऊन मुंबईत आलेल्या अलिशाला इंटरव्ह्य़ूमध्ये अपयश येतं. तिथे फारसं काही जमत नाही म्हटल्यावर शेवटी आपली पारखी नजर आणि पावलोपावली साथ देणारी ‘बीएफएफ’ (बेस्ट फ्रेण्ड फॉरएव्हर) टॅनी यांच्या साथीने ती निर्णय घेते ‘फॅशन डिटेक्टिव्ह’ बनण्याचा.
फॅशन, डिटेक्टिव्ह, मिस्ट्री आणि अॅली.. भन्नाट कॉम्बिनेशन जमून आलंय. फॅशन जगतातली ‘एफबीआय’ अर्थात फॅशन ब्लंडर इन्व्हेस्टिगेटर. ‘अलिशा’ या नव्यानेच सुरू झालेल्या या सीरिअलचे पाच एपिसोड्स सध्या यूटय़ूब गाजवत आहेत. २० ते २५ मिनिटांच्या भागांत असणाऱ्या या फॅशन डिटेक्टिव्ह ‘अलिशा’च्या प्रवासाचं सुंदर व रिलोडेड विथ फॅशन असं चित्रीकरण केलं आहे.
रोजच्या बोलीभाषेच्या जवळ जाणारं तिचं, बहुधा सर्वाचंच बोलणं हा या अनरिअॅलिस्टिक सीरिअलमधला रिअॅलिझम. ‘नेवर लीव होम विदाउट काजल’ असा अॅटिटय़ूड जपणारी फॅशनेबल ‘अलिशा’ साकारणं मुळातच अॅक्टर आणि ब्लॉगर असणाऱ्या लिआन टेक्सरिया (lianne texeria ) हिला छान जमलंय. फॅशन हा बेस असल्यामुळे त्याच विश्वाभोवती चौकस फिरणारी अलिशा आणि तिचा ड्रेसिंग सेन्सही एकदम ‘एक नंबर’! हॉट शॉर्ट, पलाझो, क्रॉप टॉप किंवा साधी डेनिन्स – टी शर्ट कॅरी करण्यासोबतच हेअरस्टाइल आणि मेकअपही पाहणाऱ्यांना तेवढाच अपिलिंग वाटतो. नवी फॅशन कशासोबत व कशी कॅरी करावी याचं उदाहरण म्हणजे ‘अलिशा’ ही सीरिअल.
‘ कुछ तो गडबड है’चा चिरपरिचित सूर न लावताही ‘अलिशा’ कशा तऱ्हेने या रहस्य उलगडते हे पाहण्यासाठी ‘ब्लश’ची ‘अलिशा’ एकदा तरी बघायला हवी. तरुणाईला पटणारी भाषा हा आकांक्षा सेडाच्या दिग्दर्शनाचा प्लस पॉइंट. जोडीला बॅकग्राउंड म्युझिक, ग्राफिक्स हे सगळं आहेच. त्यामुळेच ही ‘अलिशा’ तरुणाईला भुरळ घालतेय. यूटय़ूबवर अॅलीच्या या हेरगिरीचे चाहतेही काही कमी नाहीत. ३४ हजारांपेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स आणि लाखांच्या घरात व्ह्यूअर्स मिळालेत. ल्ल

14अनब्लश्ड
‘अलिशा’सोबतच ‘अनब्लश्ड’ या टॅगअंतर्गत अभिनेत्री कल्की कोचलीन आणि निमरत कौर यांची ‘अनब्लश्ड’ रूपंसुद्धा या यूटय़ूब चॅनेलवर हिट आहेत. कल्कीने स्वत: लिहिलेली कविता ती स्वत:च सादर करतानाचा व्हिडीओ तर विशेष. निमरत कौरदेखील अगदी खुलून तिचे अनुभव सांगत आहे. ‘वुमनहूड’ अर्थात ‘स्त्री’ या विषयावरच भर देत बहुविध कथा, नवीन कल्पना, चौकटीबाहेरचे विचार या सर्व गोष्टींना वाट मोकळी करून देण्यासाठी ‘ब्लश’सारखं यूटय़ूब चॅनेल नक्कीच वेगळं आहे. स्त्रीचं सौंदर्य समाजमान्य संकेत, निकषांत तोलणाऱ्यांवर कल्कीनं तिच्या प्रिंटिंग मशीन या कवितेतून ताशेरे ओढले आहेत. या पाच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये स्त्रियांबद्दल छापणारी माध्यमं, सोशल प्लॅटफॉर्म्स या सगळ्याला लक्ष्य करणारं टोकदार भाष्य आहे. हा व्हिडिओ गेल्या आठवडय़ात टॉप ट्रेण्डिंग होता.