News Flash

ब्रॅण्डनामा : नॅचरल आइस्क्रीम

 केवळ चार लाखांच्या भांडवलावर सुरु झालेला हा व्यवसाय आता ११५ करोडपर्यंत पोहोचला आहे.

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

कोणताही व्यवसाय उत्तम चालण्यासाठी कल्पकता हा गुण महत्त्वाचा आहे. या कल्पकतेला जिद्दीची, स्वत:वरील ठाम विश्वासाची जोड मिळते तेव्हा जन्माला येतो यशस्वी ब्रॅण्ड. पाडगावकर म्हणतात, ‘आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, गाण्यावर प्रेम करत तुम्ही म्हटलं पाहिजे.’ हीच गोष्ट व्यवसायातील प्रयोगांनासुद्धा लागू आहे. आपण जे काही वेगळं करतोय ते आपल्याला पटलं पाहिजे. रघुनंदन एस.कामथ यांनी असाच स्वत:च्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवला आणि त्यातुन साकारला ब्रॅण्ड ‘नॅचरल आइस्क्रीम’.

मूळचे मँगलोरी पण व्यवसायासाठी मुंबईत स्थायिक झालेल्या कामथ कुटुंबातील रघुनंदन एस.कामथ हे शेंडेफळ. सर्वसामान्य विद्यार्थी असणाऱ्या रघुनंदनचं दहावीपर्यंतचं शिक्षण मुंबईतल्या कन्नड माध्यमाच्या शाळेत झालं. त्यानंतर वडिलांना फळ व्यवसायात ते मदत करत होतेच. त्यातूनच फळांविषयी त्यांना विशेष चव, आवड निर्माण झाली. साधारण १९ वर्षांचे झाल्यावर मोठय़ा भावाच्या दाक्षिणात्य हॉटेलात रघुनंदन यांना चिकटवण्यात आलं. इथे काम करताना पहिल्यांदा रघुनंदन यांच्या मनात फळमिश्रीत आइस्क्रीम डेझर्टचा प्रयोग करून पाहण्याचा विचार आला. पण त्यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यानंतर दहा र्वष रघुनंदन यांनी भावाच्या हॉटेलमध्येच काम केलं. पण फळमिश्रित आइस्क्रीमची कल्पना त्यांच्या मनातून गेली नव्हती. अखेर तब्बल दहा वर्षांनंतर त्यांनी आपल्या स्वप्नाचा मागोवा घ्यायचा म्हणून भावाचं हॉटेल सोडलं.

नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं. पैशांची चणचण होती. पत्नीची साथ होतीच, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याकडून ४ लाख रुपये उसनवारी घेतले आणि १९८४ साली जुहू स्कीम येथे नॅचरल आइस्क्रीमची मुहूर्तमेढ रोवली गेली. अवघ्या २५० चौरस फुटांचे हे आइस्क्रीम पार्लर होतं. या सगळ्या परिसरात सिनेकलावंत तसंच अनेक टीव्हीवर काम करणारे कलावंत राहत. तो काळ असा होता की, उच्चभ्रू वर्ग सोडला तर सर्वसामान्य माणसं केवळ आइस्क्रीम खाण्यासाठी बाहेर पडण्याची संस्कृती निर्माण झाली नव्हती. याच कारणाने रघुनंदननी फळांच्या स्वादाचं आइस्क्रीम थेट विकण्याऐवजी सोबतीला पावभाजी विकायला ठेवली. त्यांचं  पहिल्या वर्षीचं उत्पन्न होतं केवळ एक लाख. हळूहळू पावभाजी बंद करून त्यांनी फक्त आइस्क्रीमवर लक्ष केंद्रित केलं. फळांचा वापर करत नैसर्गिक आइस्क्रीम बनवायचं प्रशिक्षण त्यांनी पाच- सहा माणसांना दिलं. हळूहळू नॅचरल आइस्क्रीमचा चाहता वर्ग तयार झाला. यामध्ये तोंडी प्रसिद्धीचा वाटा मोठा होता. दोन वर्षांतच सुप्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही कलावंत नॅचरल आइस्क्रीम खाण्यासाठी गर्दी करू लागले. त्यामुळे कलाकारांच्या चाहत्यांची गर्दीही इथे वळली. अशातच,  १९८६च्या दरम्यान टीव्हीवर क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘सनी डेज’ प्रसारित व्हायचा. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सची मुलाखत चालू होती. त्याला विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, ‘मी इथलं नॅचरल आइस्क्रीम खाल्लं आहे. त्यातले चिकू आणि सीताफळ हे स्वाद मला खरंच खूप आवडले.’ इतक्या मोठय़ा व्यक्तीने दिलेली ही पावती नॅचरल्सची मोठी जाहिरात होती. चांगल्या कामाचा दरवळ पसरतो तो असा!

१९९४मध्ये त्यांच्याकडीलच काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनी नॅचरल आइस्क्रीम सोडलं आणि जवळच स्वतचं आइस्क्रीम पार्लर सुरु केलं. रघुनंदन कामथ विचलीत झाले नाहीत. त्यांनी सारस्वत बँकेकडून ६५ लाखांचं कर्ज घेतलं आणि मीरारोडमध्ये ५००० चौ.फू. जागा खरेदी केली. नॅचरल आइस्क्रीमची ती उत्पादन फॅक्टरीच होती. जागा विस्तारल्याने मग कर्मचारी संख्याही वाढवता आली. त्यांची उलाढाल तेव्हा ३ करोड रुपयांवर पोहोचली. या सगळ्या प्रवासाचं वैशिष्टय़ं म्हणजे त्यांनी जाहिरातींवर अत्यंत कमी म्हणजे १% इतकाच खर्च केला पण दर्जा कायम ठेवला. दहा स्वादांसह सूरु झालेल्या नॅचरल आइस्क्रीममध्ये आज १२५ हून अधिक स्वाद उपलब्ध आहेत. त्यातले २० कायम उपलब्ध असतात तर बाकीचे प्रसंगानुरुप मिळतात. मकरसंक्रांतीच्या काळात तिळाच्या लाडवांच्या स्वादात मिळणारं आइस्क्रीम, उन्हाळ्यात फणसाच्या स्वादातही मिळतं. त्यामुळे इथे गेल्यावर काहीतरी नवीन मिळणार याची खात्री असते. यामुळेच २०१४ साली ग्रेट इंडियन आइस्क्रीम काँटेस्टमध्ये नॅचरल आइस्क्रीमच्या काकडीच्या स्वादाच्या आइस्क्रीमला सर्वात कल्पक आइस्क्रीम म्हणून सुवर्णपदक प्राप्त झालं. याशिवायही अनेक पुरस्कार या ब्रॅण्डला मिळाले आहेत.

केवळ चार लाखांच्या भांडवलावर सुरु झालेला हा व्यवसाय आता ११५ करोडपर्यंत पोहोचला आहे. देशभरात १००हून अधिक शाखा उघडल्या आहेत. पण हा ब्रॅण्ड २५० चौरस फुटांचं जुहू स्कीमचं मूळ विसरलेला नाही. त्यांची टॅगलाईन आहे, आइस्क्रीम ऑफ जुहू स्कीम. त्यांचा लोगोसुद्धा जुहू चौपाटीची आठवण करून देतो.

फळांचा नैसर्गिक स्वाद जपणारा हा अनोखा ब्रॅण्ड म्हणजे रघुनंदन कामथ यांच्या स्वप्नांची शब्दश: ‘फलश्रुती’ आहे. आपण स्वप्नं पाहतो. काही पूर्ण होतात. काही अपूर्ण राहतात. अपूर्ण स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग करणारे शेकडय़ात एक टक्का असतात. रघुनंदन कामथ यांच्यासारखे! त्यामुळे तुम्हाला निर्माण करायचा असेल तुमचा ब्रॅण्ड, तर स्वप्न पहायला हवं, त्यावर विश्वस ठेवायला हवा आणि प्रेमही करायला हवं.. अगदी नॅचरली!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 12:49 am

Web Title: natural ice cream famous ice cream
Next Stories
1 Watchलेले काही : फॅशनमय जगत!
2 व्हायरलची साथ : रब ने बना दी जोडी
3 ‘ताण’लेल्या गोष्टी : अँग्री यंग मॅन
Just Now!
X