नवरात्रीत मेरो घागरो जो घुमयोचा.. नाद कानाला सुखावणारा असला तरी फॅ शनचा विचार करता घागरा-चोलीचा ‘नाद’ सध्या तरी तरुणींनी सोडून दिला आहे असं लक्षात येईल. नवरात्रीत भले मोठे ऑक्सिडाइज्ड दागिने आणि पारंपरिक काम केलेले घेरेदार घागरा आणि चोली हे वर्षांनुर्वष चालत आलेलं समीकरण. मात्र सध्या हा पारंपरिक ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा सहज घालता येतील अशा इंडो-वेस्टर्न फ्युजनचा ट्रेंड सेट करण्यावर भर दिला जातो आहे.

जड दागिने, तेवढाच आरसे-बिल्लोरी काम केलेला वजनदार घागरा परिधान करून अवघडल्या पद्धतीने गरब्याचे विविध नृत्यप्रकार खेळायचे कसे? फॅशनचा सध्याचा ट्रेंडच मुळी फॅशन आणि स्टायलिंग हे ‘कम्फर्ट लेव्हल’ साधणारं असावं या विचाराचा आहे. साहिजकच त्याचा परिणाम नवरात्रीच्या वेशभूषेवरही झालेला दिसून येतो आहे. ट्रेण्ड ‘फॉलो’ करण्यापेक्षा ट्रेण्ड ‘सेट’ हाच सध्याचा ट्रेण्ड आहे. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्येदेखील पारंपरिकरीत्या कशावर काय चांगलं दिसतंय याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय आवडतंय आणि छान वाटतंय याचा विचार अधिक झालेला दिसला. त्यामुळे पारंपरिक वेशभूषाच करायला हवी अशी कोणतीही सक्ती नाही, असं बंधन नाही. वेस्टर्न कपडय़ांवर पारंपरिकतेची किनार असलेले दागिने घालून ‘इंडो-वेस्टर्न लुक’ सहज करून बघता येईल. कपडे निवडताना मात्र असे निवडायला हवेत ज्यांच्यावर आपल्याला स्मार्टपणे पारंपरिक दागिन्यांचा मोजकाच पण लक्षवेधी साज चढवता येईल.

क्रॅप टॉप आणि पलाझो ही नेहमीची सगळ्यांची आवडती जोडी. कॅ्रप टॉपवर लाइटवेट जॅकेट आणि त्याच्यासोबत किंवा त्याच्याशिवाय कंबरेला ओबी बेल्ट असं कॉम्बिनेशन करून आऊ टफिटमध्ये वेगळेपणा आणता येईल. त्याचसोबत ओबी बेल्टवर ऑक्सिडाइज्ड कंबरपट्टा लावून आणि तसेच झुमके कानात घालून तो लुक पूर्ण करता येईल. झुमक्यांचा असलेला ट्रेण्ड पाहता कानात घातलेल्या झुमक्यांच्या अनुषंगाने स्वत:चा संपूर्ण लुक ठरवता येईल. झुमके हे सध्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनलेले आहेत. त्यामुळे झुमके हे फक्त कानात न घालता नेकपीसऐवजी टॉपच्या गळ्याला ‘लटकन’ म्हणूनही लावू शकतो ज्याने लुकला वेगळा उठाव येईल. कंबरेला झुमका नुसता अडकवणं किंवा बांधलेल्या केसांच्या ‘बन’मध्ये किंवा वेणीमध्ये झुमका घालणं हा नवीन ट्रेण्ड ठरतोय. बाजारातही ऑक्सिडाइज्ड दागिने हे सध्या गोंडे किंवा रेशीम दोऱ्यांमध्ये गुंफून तयार केलेले आढळून येतायेत. नवरात्रीतील संपूर्ण लुकचा विचार करताना डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे गरबा खेळायला सगळ्यात सोयीच्या चपला म्हणजे फ्लॅट्स आणि पारंपरिक कोल्हापुरी किंवा मोजडी! मोजडी किंवा कोल्हापुरी चपला घालत असाल तर अँकलेट म्हणून एका पायात हेवी ऑक्सिडाइज्ड कडं किंवा भरीव पैंजण घालू शकता. झुमक्यांसोबतच ट्रेण्डमध्ये आहेत ते पॉम-पॉम्स अर्थात रंगीबेरंगी गोंडे. पायात घालण्याच्या अँकलेटमध्ये आणि कानातल्या रिंग्जमध्ये गोंडेही फ्रेश रंगाच्या किंवा काळ्या आऊ टफिटसोबत ट्राय करू शकता.

अनेक प्रकारची ज्वेलरी सांभाळणं कठीण वाटत असेल तर एखादा स्टेटमेंट पीस गळ्यात, कानात किंवा हातात घातला तरी संपूर्ण लुकला वेगळीच ग्रेस येईल. मात्र सगळे ट्रेण्ड्स फॉलो करताना एक गोष्ट लक्षात असू द्या ती म्हणजे गरबा खेळताना, नाचताना, फेर धरताना ज्याची अडचण होईल असं वाटतं अशा ट्रेण्ड्सच्या मागे उरापोटी लागू नका. आपल्याला सोयीचं जे आहे तीच आपली फॅशन आणि तोच आपला ट्रेण्ड, हा ‘स्टायलिंग मंत्र’ यावेळी लॅक्मेमधूनही दिला आहे. ‘बीइंग कम्फर्टेबल इज द न्यू ट्रेण्ड!’