‘टिपिकल’ वाटणाऱ्या आणि म्हणून न वापरता पडून राहिलेल्या कितीतरी गोष्टींचा वापर आधुनिक फॅशनसह कलात्मकतेने करता येईल. नवरात्रीच्या फॅशनची रंगत अशा फ्यूजन फॅशननेच रंगणार आहे. पारंपरिक दागिने आणि कपडे लेटेस्ट फॅशनमध्ये कसे वापरता येतील याची झलक.

नवरात्रीत आपल्या घरी असलेल्या आईच्या कपाटातल्या अनेक वस्तू किंवा आजीच्या ट्रंकेतला खजिना थोडा बाहेर काढू या. पारंपरिक म्हणजे टिपिकल असं गणित डोक्यात असतं आपल्या. पण या टिपिकल गोष्टींमधूनसुद्धा आपण देसी कूल लुक देऊ शकतो. आजीच्या पारंपरिक नथ किंवा मुरण्या/नथन्या याचा वापर फ्यूजन लुकसाठी आवर्जून करू शकतो. नथ ठसठशीत असेल कर भारी कपडय़ांबरोबर आणि नाजूक मुरण्या असतील तर चक्क वेस्टर्न वेअरबरोबर त्या घालता येतील.

पारंपरिक साडय़ा कधीच आउटडेटेड होत नाहीत, मग ती आजीची हातमागावर विणलेली सुती साडी असेल किंवा आईची सिल्कची ‘नारायणपेठ’ किंवा ‘पैठणी’ असेल. या साडय़ांचा वापर करून जॅकेट किंवा टॉप शिवला तर छान कंटेम्पररी लुक मिळेल. या साडीबरोबर स्टायलिश ब्लाउज वापरलं तर नेहमीच्या लुकपेक्षा वेगळा लुक मिळेल आणि त्या साडीला चांगला न्याय देता येईल. साडीपासून तयार केलेले ड्रेस, कुर्ते आणि जॅकेट या गोष्टी आपण सहज वापरू शकतो.

पारंपरिक साडय़ांमध्ये हाताने भरलेली साडी, वारली पेंटिंगसारख्या डिझाइन्सनं रंगवलेली साडी, बांधणीची साडी किंवा ओढण्या ठेवून ठेवून खराब होतात किंवा विरतात. अशा साडय़ा टाकून देण्याऐवजी त्याचे छान पॅचेस आधुनिक पद्धतीच्या ब्लाउज किंवा जॅकेटवर वापरू शकाल. असे पॅचवर्क केलेले कुर्ते, टॉप्स किंवा टीशर्टही या फेस्टिव्ह सीझनमध्ये अगदी वेगळी फॅशन म्हणून तुम्ही मिरवू शकता.

अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलायचं तर – तोरडय़ा किंवा पायातले छुमछुम आधुनिक फॅशनच्या नादात पार हद्दपार झालेला दागिना आहे. मात्र या नवरात्रीत या दागिन्याचा छान वापर करता येईल. जोडवी किंवा टो रिंगबरोबर तोरडय़ा चांगल्या दिसतात आणि अगदी जीन्सवरदेखील त्या वापरता येतील. या तोरडय़ा हेड अ‍ॅक्सेसरीज म्हणून वापरून बघा. या केसांत माळल्या किंवा हेअरस्टाइल या तोरडय़ांच्या साहाय्याने सजवली तर खूप छान दिसेल.

या नवरात्रीत प्रत्येक दिवशी अशा वेगवेगळ्या, न वापरलेल्या किंवा कमी वापरलेल्या गोष्टींचा आपण अगदी आधुनिक फॅशन म्हणून वापर करू शकतो. आश्चर्य वाटेल एवढय़ा फॅशन अ‍ॅक्सेसरीज आपल्या घरीच सापडतील. मात्र टिपिकल वस्तूंचा वापर वेगळ्या पद्धतीने करणं महत्त्वाचं. जुन्या पारंपरिक गोष्टींना नव्या आणि आधुनिक फॅशनमध्ये असलेल्या गोष्टींबरोबर कल्पकतेने वापरणं हीच तर गंमत आहे! हेअर स्टाइल आणि इतर अ‍ॅक्सेसरीजबाबत हाच फ्युजन फंडा कसा वापरायचा याबद्दल पुढच्या लेखात.

(लेखिका फॅशन डिझायनर आणि फॅशन स्टुडिओच्या संचालक आहेत.)

मृण्मयी अवचट