श्रेयस निक्ते, डेल्फ्ट, नेदरलँड्स

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नेदरलँड्समध्ये पोचलो तेव्हा बघावं तिथे लोक‘सन बाथ’चा आनंद घेत बसलेले दिसत होते. मुंबई एअरपोर्टच्या ३५ डिग्री तापमानाला विमानात चढलेल्या मला तेव्हा ही कल्पना पचायला जड गेली. आज उणे ३ डिग्रीमध्ये भर दुपारच्या वेळी ढगाळ वातावरणात बसून हा लेख लिहिताना मात्र त्या लोकांच्या आनंदाचं कारण जाणवतंय.

नेदरलँड्स हा पश्चिम युरोपमधला देश. अ‍ॅम्सटरडॅम त्याची राजधानी. तसं बघायला गेलं तर पश्चिम युरोपियन देशांमध्ये राजकीय शांतता आणि आर्थिक श्रीमंती भरपूर आहे. नेदरलँड्स हासुद्धा त्याला अपवाद नाही. आपण नेदरलँड्स आणि अ‍ॅम्सटरडॅम ही नावं कधीतरी बातम्यांमधून आणि टूर्सवाल्यांकडून ऐकलेली असतात, पण त्या दोन नावांपलिकडे या देशाची माहिती असलेले लोक फारच कमी असतील. इथे आल्यावर एका मध्यमवर्गीय भारतीय माणसाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पहिल्या नजरेत वाटतं जवळपास सगळं आहे या लोकांकडे.. मुबलक वीज, पाणी, अतिशय वक्तशीर सार्वजनिक वाहतूक, स्वच्छ रस्ते आणि ते स्वच्छ ठेवणारी सामान्य माणसं!

एवढं सगळं असूनदेखील अमेरिकेसारखी ‘मटेरिअलिस्टिक’ जीवनशैली अजिबात दिसत नाही. उदाहरणार्थ.. नेदरलँड्सची खासियत म्हणजे पवनचक्कय़ा आणि सायकलवर प्रवास करणारी सर्वसामान्य जनता (कधीतरी अगदी प्रधानमंत्रीसुद्धा!). सरासरीनुसार डच नागरिक वर्षांला १००० किलोमीटर सायकल चालवतात! आपल्या देशातील आधुनिकीकरणाच्या रूढ प्रमाणानुसार ‘माणसाची प्रतिष्ठा ही त्याच्या गाडीच्या किंमतीशी डिरेक्टली प्रपोर्शनल’ असल्यामुळे आपल्यासाठी सायकल हा ऑप्शन कधीच जुनाट आणि ‘लो स्टॅंडर्ड’ झालाय. रस्त्यावर एखादा माणूस सायकलवरून जात असताना पाठीमागून आलिशान गाडीमध्ये बसून हॉर्नचा ठणाणा करून रस्ता कोणाच्या वडिलांची संपत्ती आहे याची आठवण करून देणाऱ्या लोकांना नेदरलँड्स या देशात स्थान नाही (असल्यास फक्त पोलिस स्टेशनमध्येच). इथल्या लोकांच्या डोक्यात वाहतूकीचे प्राधान्यक्रम अगदी स्पष्ट आहेत- पहिले पादचारी, मग सायकल्स त्यानंतर चारचाकी. इथे अगदी हायवेवरदेखील सायकल्ससाठी वेगळा मार्ग राखून ठेवतात.

बरं, याचा अर्थ असा नाही की या देशाला आधुनिकतेचं वावडं आहे. आयएनजी फायनान्स, फिलिप्स आणि युनिलिव्हरसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या याच देशातल्या आहेत. रोजच्या जीवनात चलनी नोटांचा वापर जवळपास नाहीच. डेबिट कार्ड सगळ्या दुकानांमध्ये चालतं. कामगार परवडत नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कॅशलेस व्हेंडिंग मशीन उपयोगात आहेत, पण तुम्हाला नेदरलँड्सला येऊ न या देशाची खरी आधुनिकता बघायची असेल तर तुम्हाला त्यांची शेतं पाहायला लागतील. तसं बघायला गेलं तर या देशाला फार सुपीक माती आणि उत्तम हवामान मिळालेलं आहे अशातला भाग नाही. वर्षभर पाऊ स, छोटी-मोठी वादळं चालूच असतात. शेतीसाठी कामगारसुद्धा मिळणं कठीण आहे, पण या संकटांना आणि परिस्थितीला दोष देऊ न दरवर्षी कर्जमाफी द्यायचं आश्वासन ना कधी सरकारने दिलं, ना कधी शेतकऱ्याने मागितलं! त्याउलट सरकारने शेतीमध्ये संशोधन सुरू केलं. नेदरलँड्सच्या वातावरणाला साजेशी संकरित बियाणं तयार केली. आज जगातील नंबर एकचं कृषी विद्यापीठ नेदरलॅंड्समध्ये आहे. बरीचशी पूर्वीची पारंपरिक शेती आता ग्रीनहाऊ समध्ये केली जाते. आजकाल शेतीत रोबोटिक्सचा वापरही सुरू झालाय. त्यामुळेच की काय आकाराने आपल्या मराठवाडय़ाहून छोटा असलेला देश आज जगात अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा शेती निर्यातदार आहे.

तर असा आहे हा देश! बऱ्याच बाबतीत यांचे प्राधान्यक्रम, यांच्या आधुनिकतेच्या संकल्पना जगापेक्षा वेगळ्या, पण तेवढय़ाच विचार करायला लावणाऱ्या आहेत. माझ्या कॉलेजमध्ये बरेच डच विद्यार्थी हे वयाने २५ वर्षांच्या पुढचे आहेत. थोडी माहिती काढल्यावर कळलं की काहीजण एखादं वर्ष कॉलेजमधून ड्रॉप घेऊ न कॉलेजच्या कमिटीमध्ये काम करतात, काहीजण ड्रॉप घेऊ न नोकरी करतात आणि काहीजण तर चक्क परदेशात इंटर्नशिप करायला जातात! हे ऐकल्यावर मी ताडकन उडालोच. आपल्याकडे अकॅडमिक्सला केवढं प्रचंड महत्व दिलं जातं.  ‘केटी’ लागली तर वर्ष वाया जाऊ नये म्हणून मुलं दुसऱ्या प्रयत्नात नाही तर युद्धपातळीवर तयारी करून शेवटी तिसऱ्या प्रयत्नात विषय सोडवतात आणि इथे एका दर्जेदार युनिव्हर्सिटीमध्ये येऊ न, सगळ्या विषयांत पास होऊ न देखील इथली मुलं ड्रॉप कसले घेतात? शेवटी एका डच मित्राला या गोष्टीचं कारण विचारलं. त्याने सांगितले की, डच लोकांमध्ये वैयक्तिक आयुष्याला प्रचंड महत्व आहे. शाळा संपल्यावर डच सरकारकडून प्रत्येक मुलाला पदवीधर बनायला दहा वर्ष स्कॉलरशिप मिळते. म्हणजे पुढील दहा वर्षांत जे काही शिकाल त्याचा खर्च सरकार करेल. त्यामुळे विद्यार्थीदेखील या योजनेचा फायदा घेऊ न आयुष्यात नक्की काय करायचं आहे ते ठरवतात. पदवीधर होण्याआधी थोडंफार कॉलेज बाहेरील जग पाहून घेतात. त्यामुळे सो कॉल्ड करिअर थोडं उशिरा चालू झालं तरी उरलेल्या आयुष्यात हातासमोरच्या कामाला कंटाळून ‘मी दुसरं करिअर निवडलं असतं तर..’ असे विचार येत नाहीत. हे ऐकल्यावर वाटलं हा प्रयत्न आपल्याकडेदेखील व्हायला पाहिजे. बाकी काही सुधारलं नाही तरी हट्टी पालकांच्या इच्छेखातर प्रयत्न करूनही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल जमलं नाही तर पुढे काय या विचाराने नैराश्यात जाणाऱ्या मुलांची संख्या तरी कमी होईल.

अजून एक गोष्ट माझ्यातल्या प्राणीप्रेमीला आल्याआल्या जाणवली ती म्हणजे इथे बरेच लोक कुत्रा मांजर पाळतात. माझ्या इमारतीत एका बाईकडे तीन कुत्रे आहेत. कधीतरी लिफ्टमध्ये त्या कुत्र्यांना थोडं गोंजारलेलं, तेव्हापासून त्या कुत्र्यांशी छान मैत्री झाली आहे. बिल्डिंगमध्ये असे अजून तीन-चार कुत्रेवाले आहेत (तिथेही ओळख काढायचे प्रयत्न सुरू आहेत). बाकी डेल्फ्टमध्ये कुटुंबं राहत असली तरी हे शहर ओळखलं जातं विद्यार्थ्यांंचे शहर म्हणूनच. अमेरिकेप्रमाणेच इथेही बरीच मुलं वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी ‘इंडिपेन्डन्टली’ राहायला सुरूवात करतात. माझ्याबरोबर शिकणारी बरीच डच मुलं-मुली डेल्फ्ट शहरामध्येच किंवा आसपासच्या शहरात रूम शेअर करून किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडबरोबर लिव्ह इनमध्ये राहतात. माझ्या बिल्डिंगमध्ये बहुसंख्य विद्यार्थी राहत असले तरी इथे आपल्याकडच्या कॉलेज हॉस्टेलसारखं मोकळं वातावरण नाही. अगदी शेजारच्या घरात राहणाऱ्यांचं तोंडसुद्धा येता-जाता फक्त लिफ्टमध्येच दिसतं.

गेल्या वर्षीचा ख्रिसमस आम्हा भारतीय विद्यर्थ्यांसाठीचा पहिला ख्रिसमस होता. इथे ख्रिसमसची तयारी आणि सेलिब्रेशन जवळपास एक महिना आधीपासून सुरू झालेलं. त्यामुळे उत्साहात आम्ही सर्व भारतीय मित्रांनी ख्रिसमसला संध्याकाळी सेलिब्रेशन बघायला जायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे २५ तारखेला संध्याकाळी भेटलो. कोणीतरी म्हणालं, सिटी स्क्वेअरमध्ये मोठा ख्रिसमस ट्री आहे. फिरतफिरत तिथे पोहोचलो तर छान सजवलेल्या ख्रिसमस ट्रीवर लायटिंग वगैरे होतं पण लोकांची वर्दळ फार कमी होती. ख्रिसमस हा तर कुटूंबाबरोबर साजरा करायचा सण. त्यामुळे आमच्याकडे वर्षभर ‘इंडिपेन्डन्ट’ राहणारी जनता २४ तारखेलाच त्यांच्या घरी नातेवाईकांना भेटायला, डिनर करायला गेली होती. त्यावेळी एक विचार डोक्यात आला की, आम्ही भारतीय मित्र परक्या देशात असलो तरी आजही एकमेकांच्या रूमवर न सांगता कधीही जाऊ न बसतो, टाईमपास करतो. पण या मुलांना घरी जायलादेखील सणाचं निमित्त लागतं! पाश्चात्य देशातील मुलांनी कितीही ‘इंडिपेन्डन्ट’ राहायचं म्हटलं तरीही या प्रायव्हसीच्या हव्यासापायी एकटं कसं राहता येणार? एखादा बेस्ट फ्रेंड  असला तरी त्याच्या घरी जायला फोनवरून ‘आलं तर चालेल का?’, अशी विनंतीवजा परवानगी मागावी लागते. या इंडिव्हिज्युअलिझममुळेच त्यांच्या आयुष्यात रिलेशनशिप्स आणि डेटिंगला एवढं महत्व आलाय का?, असा प्रश्न पडला.

पहिल्या नजरेत जे सर्वसुखी जग दिसलेलं ते खरं की हे विचार खरे हे त्या क्षणी कळेनास झालं. तेवढय़ात ती तीन कुत्रे फिरवायला घेऊ न जाणारी बाई आठवली. वयाने चाळीशीची असली तरी तिच्याबरोबर कधी कोणत्या व्यक्तीला पाहिल्याचं आठवत नव्हतं. मग ते पाळलेले कुत्रे भावनिक गरज पूर्ण करायला होते का? आणि असं असलं तर इथले बहुसंख्य कुत्रा-मांजर पाळणारे लोक आवड म्हणून पाळतात की गरज म्हणून? बरेच विचार डोक्यात येत होते. शेवटी सिटी स्क्वेअरमधून निघताना परत एकदा त्या ख्रिसमस ट्रीकडे पाहिलं, दुसऱ्यांदा पाहताना ते जरा वेगळं दिसलं. त्या शांत निर्मनुष्य चौकात अंगभर लायटिंग करून, झिरमिळ्यांनी सजून ते दिमाखात उभं होतं – ‘इंडिपेन्डन्टली’!

viva@expressindia.com