13 December 2018

News Flash

‘जग’ते रहो : लाइव्हली नॅशव्हील

निसर्गातली शांती आणि शहरातला गजबजाट या दोन्हीची मजा लुटता येते.

नेहा गांगल, नॅशव्हील, यूएसए

नॅशव्हीलमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करणं, दिवसभर कामात झोकून देणं आणि रात्री लवकर झोपणं, अशी आठवडय़ाभराची जीवनशैली भरपूर शिस्त-नियमांचं पालन करणारी असते. त्यामुळे वीकएण्ड एन्जॉय केला जातो.

टेनेसीची राजधानी आहे नॅशव्हील. २०१७चं ‘सदर्न बुमिंग टाऊन’ म्हणून ते ओळखलं जातं. इथं भरपूर विकास होत आहे. त्याचंही वैशिष्टय़ं असं की, विकास होत असला तरीही आपण निसर्ग आणि शहरापासून केवळ १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असतो. त्यामुळं संगीत-खाद्यंती असो किंवा हाइक्स-ट्रेक्स असोत अशा अनेक आवडीनिवडी जपता येतात. निसर्गातली शांती आणि शहरातला गजबजाट या दोन्हीची मजा लुटता येते.

अनेक म्युझिक बॅण्ड इथे परफॉर्म करीत असल्यामुळे नॅशव्हीलला ‘म्युझिक सिटी’ असं म्हटलं जातं. इथलं कंट्री म्युझिक खूपच प्रसिद्ध आहे. अनेक म्युझिशियन्सचे लाइव्ह परफॉर्मन्स होतात. रस्त्यावर किंवा अनेक रेस्तराँमध्ये लाइव्ह म्युझिक सुरू असतं आणि खाता खाता हे म्युझिक एन्जॉय करता येतं. इथे बऱ्याच प्रसिद्ध म्युझिशियन्सचे कॉन्सर्ट्स होतात. कॉर्पोरेट जॉब, हेल्थकेअर सेंटर्स, व्हॅनडर्बिल्ट युनिव्हर्सिटी अशा विविध संस्था इथे असल्यामुळे तरुणाईची संख्या अधिक आहे. इथले लोक  मनाने मोकळे, नवीन विचारांचे स्वागत करणारे आहेत. लाइव्ह म्युझिक अगदी इंटरेस्ट घेऊन ऐकतात. त्याबद्दल त्यांची मतं, आवडीनिवडी असतात आणि ते ती व्यक्त करतात. इथे फुटबॉल, हॉकी वगैरे विविध खेळांच्या स्पर्धाचा अगदी धूमधडाका असतो. त्या त्या खेळाच्या वेळी भोवतालचे सगळे त्या खेळाविषयी, त्या संघांविषयीच बोलत असतात. खेळ आवर्जून बघायलाही जातात. अशी खेळाची कुठलीही स्पर्धा असेल तर तो खेळणारे असतील किंवा नसतील तरीही सगळ्यांनाच त्याबद्दल खूप गोडी आणि कुतूहल वाटतं. कुठलाही खेळ असो किंवा अन्य काही इव्हेंट असो जवळपास संपूर्ण शहरच तिथे लोटलेलं असतं.

नॅशव्हील खूप आधुनिक आणि प्रगत विचारांचं शहर आहे. इथल्या खाद्यसंस्कृतीची खासियत म्हणजे बार्बेक्यू. मात्र बार्बेक्यू किंवा हॉट चिकन, हॉट फिश वगैरे पदार्थ केले जात असले तरी इतरही कु इझिन्स तेवढीच खाल्ली जातात. तसं पाहिलं तर सगळ्याच खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊन बघण्याची मानसिकता पूर्ण अमेरिकेतच पाहायला मिळते. शाकाहारींसाठीही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. सिनसिनाटीतली माझी मैत्रीण ब्रेण्डाला भारतीय पदार्थ खूप आवडत असल्याने तिने मला अनेक भारतीय रेस्तराँ दाखवले. काही वेळा नॅशव्हीलबाहेर एखाद्या गावात खाद्यपदार्थाचे थोडे कमी पर्याय उपलब्ध असू शकतात, पण नॅशव्हील किंवा सिनसिनाटीमध्ये ते मिळतात. चायनीज पदार्थ तर अमेरिकन जीवनशैलीचा बऱ्यापैकी भाग झाले आहेत. त्यांच्या चवीनुसार त्यात बदल केले आहेत. चिकन टिक्का मसाला, इंडियन करी वगैरे पदार्थ या लोकांना खूपच आवडतात. मात्र नॅशव्हील आणि सिनसिनाटीमध्ये अजूनही भारतीय पदार्थ म्हणजे पंजाबी पदार्थच बऱ्यापैकी माहिती आहेत. फारच कमी जणांना इतर पदार्थाची ओळख आहे. आमच्या घरी येणाऱ्या काही मित्रमैत्रिणींना मराठी पदार्थ माहिती झाले आहेत. पहिल्यांदा सिनसिनाटीत आले तेव्हा आईने दिवाळीचा फराळ पाठवला होता. त्या वेळी दोन चिनी मैत्रिणी आणि ब्रेण्डा अमेरिकन अशा माझ्या मैत्रिणी घरी आल्या होत्या. तो फराळ मी मांडून ठेवला होता. समोरच्या पदार्थाबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्या एकेक पदार्थ ट्राय करून पाहात होत्या आणि तेव्हाचा त्यांचा आविर्भाव पाहण्याजोगा होता. इथली तरुणाई बाहेरचे पदार्थ अधिक खाते. पण कुटुंबांमध्ये अनेक वेळा आणि बरेच जण आरोग्याविषयी जागृत असल्याने घरीच पदार्थ करण्याला प्राधान्य दिलं जातं. सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करणं, दिवसभर कामात झोकून देणं आणि रात्री लवकर झोपणं, अशी आठवडय़ाभराची जीवनशैली भरपूर शिस्त-नियमांचं पालन करणारी असते. त्यामुळे वीकएण्ड एन्जॉय केला जातो. मित्रमैत्रिणींसोबत भटकंती केली जाते किंवा अनेक कॉन्सर्ट किंवा गेम्सना हजेरी लागते. ब्रॉडवे स्ट्रीटवर चिक्कार गर्दी असते. छोटय़ा-छोटय़ा कॅफेजमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स दर शनिवारी-रविवारी होतात. प्रत्येक बार-रेस्तराँ हॉटेलच्या वेबसाइटवर वीकएण्डला कोण परफॉर्म करणार हे लिहिलेलं असतं. कारण इथले लोक अनेक म्युझिशियन्सचे फॉलोअर्स असतात आणि ड्रिंकिंग त्यांच्यासाठी खूप कॅज्युअल आहे. एकदा एके ठिकाणी एवढी गर्दी का?, म्हणून आम्ही सहज डोकावलो तर एका रेस्तराँमध्ये आजी-आजोबा छानपैकी एन्जॉय करताना दिसले. काही कपल्स डान्सही करीत होती. या वयातही ते आयुष्याचा आस्वाद घेत आहेत, हे पाहायला मस्त वाटत होतं. बहुधा ते स्वत:चे बॅरिअर्स विसरू पाहात होते..

फिटनेसबद्दल लोक खूपच जागरूक असल्याने नेमाने जिमला जातात. सगळ्या वयोगटातले लोक अगदी पासष्टीच्या आजीही येतात आणि फिटनेसला प्राधान्य देतात. ऑरगॅनिक फूड खाण्याला प्राधान्य दिलं जातं. इथल्या फार्मर्स मार्केटमध्ये जवळच्या गावातून भाज्या, फळं, पोल्ट्री, दूध वगैरे स्वत: पिकवलेले जिन्नस काही जण विकायला येतात. दर वीकएण्डला ते घ्यायला खूप गर्दी होते. या मार्केटजवळच विविध चवींचे पदार्थ उपलब्ध असणारे रेस्तराँ आहे. दुपापर्यंत खरेदी करून लोकांची पावलं या रेस्तराँकडे वळतात. वीकएण्डना छोटे हाइक्स किंवा ट्रेल्सना जाता येतं. त्या वेळी जंगलातून चालण्याचा अनुभव घेता येतो. फक्त दिशादर्शक खुणा केलेल्या असतात, कोणी हरवू नये म्हणून. इथे रॅण्डोर लेक हा खूप मोठा लेक आहे. त्याच्या बाजूने फेरी मारायला सव्वा तास लागतो. हा सरळ रस्ता असल्याने वयस्कर लोकही असतात. अनेक हायकिंगप्रेमी लोक आपल्या छोटय़ा बाळांनाही सोबत घेऊन येतात. साहजिकच मुलांनाही लहानपणापासून हिंडण्या-फिरण्याची गोडी लागते. इथे मोठाले पार्क आणि हिरवाईने नटलेला परिसरही खूप आहे.

इथल्या कुटुंबसंस्थेला झटकन एखाद-दुसरं लेबल लावून टाकता येणार नाही. इथल्या लोकांना अरेंज मॅरेज ही कल्पनाच वेगळी वाटते. बरेच जण आधी डेटिंग करतात, मग लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतात. सेटल व्हायचं ठरवल्यावर लग्न करतात. अरेंज मॅरेज नसल्याने आयुष्याचा जोडीदार निवडताना लोक खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. काही जण आपल्या पालकांना महिन्यातून एक-दोनदा भेटायला जातात. मग ते एकत्र कुठे तरी फिरायला जातात. दरवर्षी थँक्स गिव्हिंग डे आणि ख्रिसमसच्या वेळीही सगळं कुटुंब आवर्जून एकत्र जमतं आणि एन्जॉय करतं. स्त्रियांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आवाज उठवून मोर्चे काढले जात आहेत. निर्वासितांच्या प्रश्नांवर चर्चा होत आहेत. ‘#मी टू’ या हॅशटॅगवर ट्वीट केलं जात आहे. अमेरिकेत मराठी संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने ‘बीएमएम’ अर्थात ‘बृहन्महाराष्ट्र मंडळा’तर्फे गेल्या वर्षी डेट्रॉइटला अधिवेशन भरवण्यात आलं होतं. दर दोन वर्षांनी हे अधिवेशन भरतं. स्थानिक मंडळांचे कार्यक्रमही होतात. त्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रित केलं जातं. भारतापेक्षा इथेच मी बरेच सणवार साजरे केले आहेत. मात्र मराठी तरुणाईचा या कार्यक्रमांतील सहभाग त्या त्या ठिकाणच्या अंतरावर अनेकदा अवलंबून असतो. कारण अभ्यास-करिअर सांभाळून या कार्यक्रमांना हजेरी लावणं दरवेळी शक्य नसतं. तुलनेने या कार्यक्रमांत तरुण जोडपी आणि स्थिरावलेली कुटुंबं अधिकांशी येतात. मराठी मंडळाच्या शिकागोच्या मराठी शाळेत मराठी शिकणाऱ्यांची संख्या जास्ती आहे. मध्यंतरी मंडळातर्फे वधूवर मेळावे आयोजित करण्यात आले होते.

इथल्या सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये पुस्तक, सीडीज उपलब्ध असून ते सगळ्यांना मोफत उपलब्ध असतात. त्यामुळे पुस्तक विकतच घ्यायला पाहिजे असं नाही, त्याचा फायदा विद्यर्थ्यांना जास्त होतो. संदर्भासाठी किंवा अभ्यासाच्या दृष्टीने विद्यापीठाचं ग्रंथालय वेगळं असतं. इथे ‘न्यूयॉर्क  टाइम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ अधिक वाचला जातो. ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंगही खूप केलं जातं. सेल, मिडनाइट सेलच्या वेळी लोक रांगा लावून उभे असतात. वाहतुकीचे नियम पाळण्यासारख्या अनेक गोष्टींमधून या लोकांचं नागरिक म्हणून जबाबदारीनं वागणं वाखाणण्यासारखं आहे. तितक्याच चांगल्या सोयी-सुविधा त्यांना पुरवल्या जातात. उदाहरणार्थ- पालकांना जिममध्ये जायचं असेल तर मुलांसाठी जिममध्ये डे केअर सेंटरही असतात. मुलांना खेळण्यासाठी बगिचे असतात. हेल्पलाइनची सोय आहे. स्वच्छता कमालीची आहे. मुलांना लहान वयातच या गोष्टी शिकवल्या जात असल्याने त्या त्यांच्या अंगवळणी पडतात. अर्थात या सगळ्या गोष्टी लोकसंख्या कमी, जागा अधिक यामुळे शक्य होतात. एकुणात नॅशव्हील सगळ्यांना सामावून घेणारं आणि खूप लाइव्हली शहर आहे.

viva@expressindia.com

First Published on March 2, 2018 12:37 am

Web Title: neha gangal experience in nashville usa