वेदवती चिपळूणकर

या तरुणाईत दोन प्रकारचे लोक असतात. खरं तर ते प्रत्येक पिढीतील तरुणाईच्या टप्प्यात अस्तित्वात होते; मात्र त्यांना विशेषनामं या पिढीने दिली. त्यांच्यासाठी वेगळ्या ‘टर्मिनॉलॉजी’ तयार केल्या, त्यांच्या व्याख्या तयार केल्या आणि त्यांना तरुणाईच्या समाजात एक वेगळं स्थानही दिलं गेलं. कोणत्याही विचारधारेच्या एका ‘लाइन’वर एका बाजूला एका टोकाचे विचारवंत असतात आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टोकाचे विचारवंत असतात. अधलेमधले मग काही वेळा थोडे जास्त या टोकाची किंवा थोडे जास्त त्या टोकाची भूमिका मांडत ‘न्यूट्रल’ असल्याचं म्हणवून घेतात. तसंच या दोन प्रकारचे लोक म्हणजे एका रेषेची दोन टोकं.. फरक इतकाच की, यात मधले कोणी थोडे इकडे किंवा थोडे तिकडे नसून मधले सगळे केवळ ‘बघे’ असतात.

तर हे दोन प्रकार- एक म्हणजे पुस्तकी किडे ज्यांना आजच्या भाषेत किंवा आजच्या टर्मिनॉलॉजीनुसार ‘नर्ड’ म्हटलं जातं आणि दुसरे म्हणजे जवळजवळ उधळलेली मुलं ज्यांना ‘स्टड’ म्हटलं जातं. तशी तर माणसांची ही दोन्ही टोकं इतरांना ताप देणारीच, पण दोन्ही प्रकारांकडून होणारा छळही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. हे ‘नर्ड’ लोक कधी त्यांच्या शब्दाच्या माऱ्याने आपल्याला गारद करतील सांगता येत नाही. सतत पुस्तकात डोकं खुपसून बसल्याने असेल कदाचित, पण त्यांच्या डोक्यात कायम जड-जड शब्दांचा साठा खच्चून भरलेला असतो आणि जो समोर भेटेल त्याच्या डोक्यावर हा साठा ते कायम रिकामा करत असतात. कदाचित पुलंनी कधीकाळी वर्णिलेल्या सखाराम गटणेला प्रत्यक्षात उतरवायचा यांनी जणू विडाच उचललेला असतो. त्यामुळे नेहमीच ‘प्राज्ञ परीक्षा’, ‘ज्ञानसाधना’, ‘स्वाध्याय’ इत्यादी धाटणीचे शब्द यांच्या मुखी ठाण मांडून बसलेले असतात. ज्या विषयाबद्दल त्यांना ‘जिज्ञासा’ असते त्यातला ते जणू विकिपीडिया असतात. मात्र अनेकदा हा विकिपीडिया नको असतानाही माहिती पुरवत राहतो आणि त्याचा खरा वैताग येतो.

याच्या बरोब्बर विरुद्ध टोक असलेले तरुण ज्यांना कोणत्याही ज्ञानाचा नावालाही गंध नसतो, मात्र दुनियादारीच्या सगळ्या गोष्टी त्यांना अचूक माहिती असतात. ‘आजचा दिवस माझा’ असा यांचा रोजचाच नारा असतो. ज्यांना कधीकाळी मराठीत ‘खुशालचेंडू’ म्हटलं जायचं, त्याच्या काहीशा जवळपास जाणारे म्हणजे हे ‘स्टड’ लोक! त्यांच्याशी बोलायला मुली नेहमी तयार असतात, त्यांची कोणतीच कामं कधीच कोणावाचून किंवा कोणत्या नियमामुळे अडत नाहीत. अगदी परीक्षेत एखादी ‘केटी’ लागली तर ‘अरे, एकच लागली? सगळ्यातच लागण्याची शक्यता होती’, असं म्हणून ते एकच केटी सेलेब्रेटही करून घेतात.

 ता.क. – विशेष म्हणजे ही दोन्ही विशेषणं केवळ पुल्लिंगी वापरली जातात, म्हणजेच केवळ मुलंच या व्याख्येत बसवलेली ऐकायला मिळतात!      

viva@expressindia.com