24 November 2017

News Flash

आऊट ऑफ फॅशन : एक  कुर्ता, हजार फॅशन..

तुम्हाला अपेक्षित लुकप्रमाणे त्याला स्टाइल करू शकता. त्यामुळे कुर्त्यांचा वापर हल्ली वाढला आहे.

मृणाल भगत | Updated: September 1, 2017 5:10 AM

गेल्या वर्षभरातील फॅशन शो, फोटो शूट, कलेक्शन्समधील फोटोज पाहिलेत तर कुर्त्यांचा वाढता प्रभाव आवर्जून पाहायला मिळेल

अजूनही टॉप्स आणि टय़ुनिक्सच्याच विश्वात असाल तर तुम्हाला तुमचा फॅशन शब्दकोश अद्ययावत करण्याची गरज आहे. कारण आपल्या परिचयाच्या किंबहुना जुनी फॅशन म्हणून अडगळीत पडलेल्या कपडय़ाचाच प्रकार फिरून पुन्हा फॅशनमध्ये आला आहे.

कपडय़ांच्या प्रकारांची उजळणी करताना टॉप, टय़ुनिक, क्रॅप टॉप, कुर्ता, ड्रेस, ब्लाऊ ज हे प्रकार येतात. मुळात ‘टॉप’ हा बोलीभाषेतील परवलीचा शब्द. एखादा फॅशन जाणकार हा शब्द कधीच उच्चारणार नाही. त्यांच्या कानाला हा शब्द टोचतोच. जसं ‘हॉलीवूड’च्या धर्तीवर हिंदी सिनेसृष्टीला ‘बॉलीवूड’ म्हणणं कित्येक कलाकाराला मंजूर नसतं तशीच ही बाब. त्यातही हा शब्द फक्त भारतातच (त्यातही मुंबईत) सर्रास वापरतात. त्याऐवजी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे ‘ब्लाऊज’. पण आपल्याकडे ब्लाऊज हा साडीशी निगडित असल्याने एरवी ब्लाऊज उच्चारणं अवघडलेपणाचं होतं. पण गेल्या वर्षीपासून एक कपडय़ाचा प्रकार जगभरातील फॅशनप्रेमींना दखल घ्यायला भाग पाडतो आहे आणि आपल्याकडे त्याचं प्रमाण इतकं आहे की टॉप, टय़ुनिक, ब्लाऊज या सगळ्यांना कवेत घेऊन आपली एक वेगळी ओळख त्याने तयार केली आहे. या प्रकाराचं नाव आहे ‘कुर्ता’.

गेल्या वर्षभरातील फॅशन शो, फोटो शूट, कलेक्शन्समधील फोटोज पाहिलेत तर कुर्त्यांचा वाढता प्रभाव आवर्जून पाहायला मिळेल. अर्थात ‘लव्ह आज कल’मधील दीपिका पदुकोणच्या लुकनंतर कुर्त्यांला ग्लॅमर मिळालं. काकुबाई इमेजमधून बाहेर पडत स्टेट्स सिम्बॉल म्हणून त्याला मान्यता मिळू लागली होती. पण सध्या एक स्वतंत्र कपडय़ांचा प्रकार म्हणून तो विकसित होतोय. ‘ऐ दिल है मुश्कील’मधील ‘ब्रेकअप साँग’वर थिरकलेली अनुष्का आठवतेय? स्टाइलमध्ये आल्यावरसुद्धा ऑफिस किंवा एरवी वापरण्याकरिता सोयीचा असलेला हा कुर्ता पार्टी किंवा डिस्कोमध्ये वापरला जाईल याची फारशी कल्पना कोणी केली नव्हती. पण सध्या एथनिक लुकसोबतच डिस्को, पार्टी, ट्रॅव्हल लुकमध्येही कुर्ता भाव खाऊन जातो आहे. टॉप, टय़ुनिकच्या वेगवेगळ्या प्रकारांची उजळणी करत राहण्यापेक्षा हाताशी कुर्त्यांचे वेगवेगळे प्रकार ठेवणं तरुणाई जास्त पसंत करू लागली आहे.

या बदलाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कुर्त्यांची सहजता. तुम्ही तो लेगिंग किंवा चुडीदारसोबत घालू शकताच पण जीन्स, पलाझो, पॅन्ट, स्कर्ट, शॉर्ट अशा इतर प्रकारांसोबतसुद्धा सहज घालता येतो. गरज पडल्यास नुसता कुर्तासुद्धा घालता येतो. परत त्यासोबत पारंपरिक मोजडी, चप्पल असायला हवी असंही नाही. हिल्स, शूज, स्निकर्स काहीही वापरू शकता. तुम्हाला अपेक्षित लुकप्रमाणे त्याला स्टाइल करू शकता. त्यामुळे कुर्त्यांचा वापर हल्ली वाढला आहे.

पूर्वी कुर्ता म्हटलं की कॉटन, सिल्क कापड, फेमिनीन प्रिंट्स डोळ्यासमोर यायच्या, पण सध्या कुर्त्यांमध्ये किती तरी प्रकार आले आहेत. शिफॉन, जॉर्जेट, लेससारख्या कापडाच्या वापरामुळे त्याला ग्लॅमर मिळालं. सुटसुटीतपणा हा कुर्त्यांचा मुख्य गुणही त्यात जपला गेलाय. प्रिंट्समध्येही कित्येक प्रयोग झाले आहेत. भौमितिक, फंकी, कॉमिक, पॉप प्रिंट्स सध्या कुर्त्यांवर आवर्जून पाहायला मिळतात. त्यात फ्रंट स्लिट, ए सिमेट्रिक, शर्ट ड्रेस, नेहरू कॉलर, लांब आणि घेरेदार, काफतान असे कित्येक प्रकार त्यात आले. त्यामुळे कुर्त्यांमध्ये असंख्य पर्याय मिळू लागले आहेत. साहजिकच त्याच्या स्टायलिंगसाठी वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा पुढे येऊ  लागल्या आहेत. त्यामुळे कुर्त्यांचं रूप दिवसेंदिवस देखणं होत चाललं आहे.

नव्या स्टाइलचा कुर्ता वापरायचा असेल तर त्याचं स्टायलिंगसुद्धा तितकंच हटके हवं. त्यासाठी काही खास टिप्स :

* रोजच्या वापरासाठी लेगिंग किंवा चुडीदारसोबत कुर्ता घातला जातोय, पण त्याऐवजी समोरून कट असलेला लांब कुर्ता फिटेड जीन्ससोबत घाला आणि लेदर शूजची जोड द्या. वाटल्यास छान जॅकेट त्यावर घालू शकता.

* लांब कुर्ता तुम्ही जीन्सवरसुद्धा घालू शकता. त्याला सफेद स्निकर्सची जोड द्या. हाय बन आणि लांब इअररिंग्जसोबत हा लुक छान दिसेल.

* प्रिंटेड कफ्तानसोबत जीन्स जॅकेट तुम्ही डिस्कोसाठी वापरू शकता. किंवा शॉर्ट कुर्ता लेदर स्कर्टमध्ये टक इन करून छान मोठा नेकपीस टीम करून बघा. डिस्को लुकला काय घालायचं, या प्रश्नाचं मस्त उत्तर सापडेल.

* शॉर्ट पॅन्ट आणि गंजीवर एखादा शॉर्ट ड्रेस कुर्ता जॅकेट म्हणून वापरता येईल किंवा जम्पसूटवरही असं जॅकेट वापरता येईल. कॉलेजला हा लुक उठून दिसेल.

* पावसाळ्यात लेगिंग भिजवायची नसेल तर सिल्कच्या लांब कुर्त्यांवर हॉट पॅन्ट घाला किंवा शॉर्ट ड्रेस कुर्ता ड्रेस म्हणून वापरता येईल.

मृणाल भगत viva@expressindia.com

First Published on September 1, 2017 5:09 am

Web Title: new ladies kurta design 2017 trends