गेल्या दोन आठवडय़ांपासून जागतिक संगीत अनुभवणाऱ्या कानसेनांच्या श्रवणचवीत मोठा बदल झाला आहे. बिलबोर्ड यादीतील पहिली चारही गाणी ही रॅप किंवा हिपहॉप प्रकारातील आहेत. अमेरिकेतील कृष्णवंशीयांवर होणाऱ्या अन्यायाची रागयुक्त शब्दकळा मांडण्यातून लोकप्रिय झालेल्या या संगीत प्रकाराने आता अधिक व्यापक रूप धारण केले आहे. हा गानप्रकार आता एकटय़ा कृष्णवंशीय समुदायापर्यंत मर्यादित राहिला नसून, देश आणि जग पातळीपर्यंत त्याची व्याप्ती गेली आहे.

डोनाल्ड ग्लोव्हर नावाचा कृष्णवंशीय अभिनेता, गायक आणि डी.जे. याने गेल्या काही वर्षांत संगीत आणि अभिनय दोन्ही क्षेत्रांत दबदबा बनविला होता. चाइल्डिश गॅम्बिनो या टोपणनावाने त्याचा संगीतपटलावरील वावर ग्रॅमी पुरस्कारही पटकावून गेला होता. पण तीन लोकप्रिय अल्बमनंतर नुकतेच त्याने केलेले ‘दिस इज अमेरिका’ हे गाणे यूटय़ूबपासून सर्वच माध्यमांमध्ये एकदम चर्चेत आले आहे. बिलबोर्ड यादीमध्ये या गाण्याने सलग दुसऱ्या आठवडय़ात प्रथम स्थान पटकावून आपल्याकडे लक्ष वेधले आहे. गाण्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दर्जा मिळाला आहे. अमेरिकेतील माथेफिरू बंदुकस्वारांचा सातत्याने सुरू असणारा बेछूट गोळीबार, कृष्णवंशीय म्हणून अमेरिकेतील जगणे आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत असलेले कोलाहलाचे वातावरण या सगळ्यांचा कोलाज शब्दरूपांत मांडून हे गाणे बनले आहे. वर्तमान अमेरिकेचे जहरी शब्दांतील चित्रण असलेल्या या गाण्याची सुरुवात अत्यंत सुंदर अशा कोरसने झाली आहे. आता आपण एखादे सुंदर चालीचे गाणे ऐकणार आहोत याचा निर्माण करण्यात आलेला आभास एका क्षणात समाप्त होतो आणि भवतालावरील राग, चीड आणि अन्याय जाणिवांची वास्तव कहाणी या गाण्यातून सुरू होते. गाण्याचा व्हिडीओ एकाच वेळी देखणा आणि प्रक्षोभक असला, तरी नुसते गाणे ऐकायलाही हरकत नाही. ड्रेक या गायकाची नाइस फॉर व्हॉट आणि गॉड्स प्लान ही गाणी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असून चौथे स्थान पोस्ट मलोन या गायकाच्या ‘सायको’ या गाण्याने पटकावले आहे. ड्रेकचे नाइस फॉर व्हॉट हे स्त्रीवादाचे, स्त्री शक्तीचे रूप उग्र भाषेत मांडते. त्याच प्रकारे पोस्ट मलोनचे सायको हे गाणे स्वत:वरील रागाचा आविष्कार आहे. पॉप-रॉकस्टार एकदा प्रकाशझोतात आले की मग पैसा-प्रसिद्धी-ऐशोआराम-मदिरा-मदनिका यांचे सान्निध्य त्यांना लाभते. अमली पदार्थाचा अजगर त्यांना विळखा घालतो. या सगळ्याची बाधा प्रसिद्ध गायक झाल्यानंतर कशी होते, हा आत्मानुभवाचा भाग सायको या गाण्याचा विषय आहे. आत्मरागाचा हा भाग आजच्या तरुणाईला आवडणाऱ्या बिट्स पुरवितो. हिप-हॉप किंवा रॅप संगीतात अमेरिकेतर जगासाठीची श्रवणीय गाणी फार कमी असतात. यातील संदर्भ अमेरिकेतील घटना आणि भवतालाशी जोडणारे असल्यामुळे आपल्याला आकर्षक वाटत नाही. कार्डी बी, निकी मिनाझची गाणी म्हणूनच शकीरा,ब्रिटनीसारखी आपल्याकडे आवडीने ऐकली जात नाही.

२००३ साली ‘ब्लॅक आय्ड पीस’ या बॅण्डने तयार केलेले ‘व्हेअर इज द लव्ह?’ हे गाणे मात्र रागाची वैश्विक पाश्र्वभूमी मांडणारे होते. दहशतवादापासून मानवी जीवनाच्या घसरणीपर्यंत सर्वच गोष्टींचा अंतर्भाव असणारे हे गाणे सर्वाधिक श्रवणीय हीप-हॉप गाणे असल्याची जाणीव होईल. जस्टिन टिम्बरलेक याचे या गाण्यात सहलेखन होते आणि त्या वर्षीच्या सवरेत्कृष्ट गाण्यामध्ये व्हेअर इज द लव्ह गाण्याचा समावेश होता. एम.आय.ए. ही श्रीलंकेतील जन्मलेली आणि ब्रिटनमध्ये वाढलेली कलाकार हिपहॉप आणि जगातील सर्वच संगीत प्रकारांचे कडबोळे करून गाणी बनवते.

गाण्यांत दहशतवादापासून सारेच जागतिक विषय तिच्या खास रांगडय़ा आणि माजलेल्या शैलीत मांडले जातात. बॅड गर्ल्स, पेपर प्लेन, बॉर्डर्स ही गाणी नुसती ऐकली तरी या बाईच्या डोक्यात भवतालच्या परिस्थितीवरील राग किती आहे ते कळेल. या गायिकेचे ‘मटांगी’ हे गाणे खास ऐकावे. हे गाणे आहे की नुसता कोलाहल आणि किंचाळ्या याबाबत अनेकांची अनेक मते बनतील. तरी या गाण्याचे वैशिष्टय़ हे की ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाण्याच्या पारंपरिक रचनेशी फारकत घेते. शेवटाला जाताना ते दक्षिण भारतीय वाद्यांचा वापर करते. सगळेच शब्द कळत नाहीत. पण कळतो तो डोक्यातला राग. यातले पहिले कडवे फक्त देशांच्या नावांना एकत्र जमवून तयार करण्यात आले आहे. कुणालाही गाणी लिहिण्याची साधी क्लृप्ती वाटेल. पण तसे नाही. एम.आय.ए.ची सारी गाणी कसल्या ना कसल्या राजकीय पाश्र्वभूमीमुळे तयार झालेल्या समूहाच्या मानसिक उद्रेकाच्या खुणा दाखविणारी आहेत. हळुवार, भावविभोर अथवा मंत्रमुग्ध विशेषणांमध्ये आजची कोणतीही गाणी बसविता येणार नाहीत. ती ऐकून डोके शांत होण्याऐवजी खवळण्याची शक्यताच जास्त. प्रेमभावनांचा अतिआविष्कार अनुभवणाऱ्या कानांना अधिक सहिष्णू बनविण्यासाठी रागाच्या उद्रेकाची ही गाणीही ऐकविणे आवश्यकच आहे.

म्युझिक बॉक्स

Childish Gambino – This Is America

The Black Eyed Peas – Where Is The Love?

Post Malone – Psycho

Cardi B – Bodak Yellow

Nicki Minaj – Chun-Li

M.I.A. – MATANGI

M.I.A. – Borders