लग्नच नकोअसं म्हणणारा मुलींचा एक गटही आहेच. नवरा-सासर आता कितीही प्रगत झालं तरी सासर नको त्यामुळे लग्नच नकोअसं म्हणणारा स्त्रीवर्ग उदयास येत आहे. साधारण ऐंशी-नव्वदच्या दशकात स्वखुशीने लग्न न करता आजन्म अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी होती; मात्र आता या संख्येने कमालीचं रूप धारण केलं आहे. सिने अभिनेत्रींसारखं उशिरा लग्न करणं अशी एके काळी फॅशन होती पण आता तेसुद्धा मागे पडून लग्न या विषयालाच मुली टाटा बाय बायकरताना दिसत आहेत.

लग्न! प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला एक असा प्रसंग ज्याची तयारी आपल्याकडे फार लहानपणापासून सुरू होते. मुलगा असेल तर त्याने चांगलं शिक्षण घ्यायचं, मोठय़ा पगाराची नोकरी करायची, समाजात आपलं एक स्थान निर्माण करायचं आणि मुलगी असेल तर लहानपणापासूनच तिला कुटुंब सांभाळण्याचं प्रशिक्षण द्यायचं, अभ्यासासोबत घर सांभाळत घरातली कामं शिकवायची, सासर म्हणजे सर्वस्व असे धडे द्यायचे. मुलींच्या बाबतीतला बदल एवढाच की त्यांनी करिअरही घडवायची आणि संसाराचं प्रशिक्षणही घ्यायचं. मुलगा असो वा मुलगी.. त्यांना लग्नानंतर कोणत्याही अडचणी येऊ  नयेत म्हणून लहानपणापासूनच कळत-नकळत लग्नाचे विचार त्यांच्या मनावर बिंबवले जातात. लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे पण आपण आपलेच नियम लावत पूर्वीपासून त्याला नवनवीन रूप देत गेलो. पूर्वी मुलींनी सासरी जाणं, मुलांकडून हुंडय़ाची मागणी होणं, लग्नानंतर मुलींनी नोकरी न करणं, चूल आणि मूल असं आयुष्यभर करत राहणं असे बरेच नियम आणि अटी लग्नासोबत आपसूकच प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येत होते. साधारणपणे मागच्या दोन पिढीपर्यंत या गोष्टींना फार महत्त्व दिलं जात होतं पण आता काळानुसार लग्नाच्या बाबतीतलं हे चित्र पालटू लागलंय. पूर्वी बऱ्याच गोष्टी मुलींच्या मनाविरुद्ध घडत होत्या किंवा त्यांना न विचारता ठरवल्या जात होत्या, पण काळानुसार स्त्रिया शिक्षित आणि स्वावलंबित होत गेल्या आणि आता त्या समाजाच्या या नियमांना आपल्या पद्धतीने वळवून त्यांच्या बदललेल्या विचारांना, निर्णयांना समाजात स्थान देऊ  पाहत आहेत. महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात होणारे बदल त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलणार नाहीत यासाठी तर मुली आपापल्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसतात. पण या सगळ्यातही ‘लग्नंच नको’ असं म्हणणारा मुलींचा एक गटही आहेच. नवरा-सासर आता कितीही प्रगत झालं तरी ‘सासर नको त्यामुळे लग्नच नको’ असं म्हणणारा स्त्रीवर्ग उदयास येत आहे. साधारण ऐंशी-नव्वदच्या दशकात स्वखुशीने लग्न न करता आजन्म अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी होती, मात्र आता या संख्येने कमालीचं रूप धारण केलं आहे. सिने अभिनेत्रींसारखं उशिरा लग्न करणं अशी एके काळी फॅशन होती पण आता तेसुद्धा मागे पडून लग्न या विषयालाच मुली ‘टाटा बाय बाय’ करताना दिसत आहेत.

खरं तर, या मुद्दय़ाचे अनेक पैलू आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या अर्थाने घेतलं जाणारं फेमिनिझम. आम्हा स्त्रियांना आयुष्य जगण्यासाठी पुरुषांची गरज नाही, अशी भावना घेऊन अनेक मुली लग्नापासून पाठ फिरवताना दिसतायेत. मात्र यामागे अर्धवट ज्ञान आणि सोशल मीडियावरून मिळणारी अपुरी माहिती यामुळे असा विचार करणं म्हणजे ‘फेमिनिझम’ या न्यायाने वागणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. आज मोठमोठय़ा हुद्दय़ावर आणि चांगल्या ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रिया आम्हाला जगण्यासाठी कोणाची गरज नाही आणि आम्ही एकटय़ाच मस्त राहू शकू या भावनेने लग्नसंस्थेला राम राम ठोकताना दिसतायेत. तर काही जणींना सोबती हवा असतो मात्र लाइफ पार्टनर नको असतो. किंवा मग लाइफ पार्टनर हवा असेल तरी त्यासाठी लग्नाची काय गरज आहे?, अशीही एक भूमिका दिसते. लग्न नको पण ‘लिव्ह इन’ चालेल हा सुद्धा याच आग्रहाचा एक भाग आहे. मुलींनी लग्नाला नापसंती दर्शवण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण जे वारंवार दिसून येतं ते म्हणजे स्वत:वर असणारं ‘अतिप्रेम’ ज्याला इंग्रजीत ‘सेल्फ ऑब्सेशन’ म्हटलं जातं. स्वत:च्या आयुष्यात स्वत:पेक्षा जास्त महत्त्व कोणालाच न देणं किंवा मीच काय ती वरचढ अशी भावना या पैलूचं महत्त्वाचं लक्षण आहे. मुळात लग्न म्हणजे केवळ समर्पण आणि त्याग असंच अनेक जणींना वाटतं आणि त्यामुळेच या लग्न नावाच्या प्रकरणापासून कित्येक मुली लांब राहणं पसंत करतात.

मुली आजच्या काळात आपल्या घरात फारच लाडात आणि आनंदात वाढतात. पण हे झालं ७० टक्के मुलींच्या बाबतीतलं विधान. काही मुली लहानपणापासूनच ‘मस्त मौला’ म्हणजे बेफिकीर आणि अल्लड या प्रकारात मोडणाऱ्या पद्धतीने वाढलेल्या असतात. त्यामुळे नवरा, सासर, तिथल्या लोकांच्या जबाबदाऱ्या नको म्हणून ‘मी भली आणि माझं आयुष्य भलं’, असं म्हणत लग्न करत नाहीत. कित्येकदा यामागे घरातील लहानपणापासून पाहिलेले आई-वडील यांच्यातील भांडणांसारखी मानसिक कारणंही असतात.

स्त्रियांनी सगळ्याच क्षेत्रात प्रगती केली आहे, हे जगजाहीर आहे त्यामुळे पूर्वी जसं केवळ नवरा कमवत होता आणि बायको घर सांभाळत होती तशी परिस्थिती आता राहिली नाही. दोघंही सक्षमपणे संसाराला आर्थिक दृष्टिकोनातून उत्तमरीत्या सांभाळू शकतात. मात्र लग्नानंतर करिअर, नोकरी आणि त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य या सगळ्यावर गदा येईल आणि कदाचित लहानपणापासूनची खूप शिकून भरारी घेण्याची स्वप्नं स्वप्नंच राहतील की काय या भीतीपोटी लग्न म्हणजे दुरून डोंगर साजरे होऊन बसतं. नोकरीचाच मुद्दा लक्षात घेता, हल्ली शिक्षण संपलं की आयटी किंवा तत्सम क्षेत्रातील नोकरीसाठी दुसऱ्या शहरात आई-बाबा, कुटुंब यांपासून अनेक मुलींना लांब राहावं लागतं. त्यामुळे अर्थात कामानंतर विरंगुळा म्हणून त्या शहरातील नाइट लाइफ, एकटं राहणं, मित्र-मैत्रिणी या गोष्टी आयुष्याचा भाग बनून जातात. मात्र अनेक जणींना या कोषातून बाहेर येऊन स्वत:च्या लग्नानंतरच्या बदलणाऱ्या आयुष्याची कल्पनाच बहुतेकदा इतकी भयावह करून सोडते की त्यांच्यासाठी ‘लग्न इज नॉट माय कप ऑफ टी’ हे बिरुद होऊन बसतं.

वरवर पाहता सध्या तरी अनेक मुलींच्या यंदा कर्तव्य नाही या म्हणण्यामागे हीच कारणं थोडय़ाफार फरकाने दिसून येतात. फार कमी जणी आपल्याला लग्न का नको आहे किंवा एकटं राहण्याच्या निर्णयामागे काहीएक सारासार विचार करून तो अमलात आणताना दिसतात. यात सगळ्यात सुंदर आणि वेगळा विचार म्हणजे ‘मला लग्न करायचं नाही, त्यापेक्षा मी छानसं गोंडस बाळ दत्तक घेऊन त्याला वाढवीन. माझं आयुष्य आनंदाने जगेन.’ आणि पुरेशा गांभीर्याने हा विचार करून त्याप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या मुली आजूबाजूला दिसतायेत. बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल.

मुळात प्रत्येक मुलगी लग्नाला नको म्हणते किंवा आता मुली सगळं मिळाल्याने, स्वावलंबी झाल्याने आता असा विचार करू लागल्या आहेत असं मुळीच नाही. कारण आजही नव्वद टक्क्य़ांपेक्षा जास्त मुलींचा लग्नसंस्थेवर ठाम विश्वास आहे, निदान पाच टक्के मुली सध्या लग्नसंस्था नको या मतावर ठाम उभ्या असतात. प्रत्येकीची या निर्णयामागची कारणं वेगळी असली तरी हा बदल जाणवण्याइतपत मोठा आहे हे लक्षात घ्यायला हवं. यात चूक किंवा बरोबर असं सांगता येणार नाही, कारण लग्न करावं की नाही हा प्रत्येक स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे. पूर्वी लवकर लग्न होत, मग लग्नाचं वय मुलींसाठीही करिअरच्या कारणामुळे ३०-३५ पर्यंत गेलं. आता मात्र थेट लग्नाचं प्रकरण ‘नाही’ वर पोहोचतं आहे.

खरं तर प्रत्येक मुलीला आपल्या आई-वडिलांना, आपण लहानपणापासून ज्या वातावरणात वाढलो आहोत त्या सगळ्यांना सोडून जाणं कठीण वाटतं, जे फार स्वाभाविक आहे. ‘आम्हीच का जायचं घर सोडून’, ‘आडनाव आम्हीच का बदलायचं’, ‘मी सासू-सासऱ्यांची काळजी घ्यायची. मग ज्यांनी जन्म दिला त्यांची काळजी कोण घेणार’, ‘मी चांगलं कमावतेय, मला कोणाची गरज नाही’, असे एक ना अनेक प्रश्न बदललेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीमुळे मुलींच्या मनात धुमाकूळ घालतायेत. हे सगळे प्रश्न बरोबर आहेत पण या प्रश्नांची उत्तरंही आजच्या मुलांकडे आहेत. मात्र आज अनेक मुली आजच्या काळाप्रमाणे त्यांची लग्नाची बदललेली संकल्पना, त्यांच्या आईला किंवा बहिणीला न मिळालेली मोकळीक, स्वत:इतकाच मुलींच्या आयुष्याचा आणि स्वप्नांचा केला जाणारा विचार या सगळ्या कारणांमुळे मग लग्नालाच नकार दर्शवतात.

एकंदरीतच काय तर लग्नाच्या मार्केटमध्ये आता मुलींचं प्रमाण कमी होऊ  लागलंय, मुली स्वबळावर उंच भरारी घेत आहेत जिथे त्यांना आयुष्यासाठी त्या जोडीदाराची गरज भासत नाहीये. वयाची विशिष्ट मर्यादा ओलांडल्यावर त्याची गरज भासेल की नाही माहीत नाही, पण सध्या तरी ‘स्टेटस सिंगल अ‍ॅण्ड डोन्ट वॉन्ट टू मिंगल’ यामध्ये आनंद मानला जातोय.

दिलखुलास जगणं महत्त्वाचं..

मला कधीच लग्न करायचं नव्हतं असं नाही, मात्र लग्नाच्या वयात कोणी पसंत पडलं नाही आणि मग कांदेपोह्य़ांच्या कार्यक्रमाला मी स्वत:हून व्यवस्थित विचार करून पूर्णविराम दिला. समाजातून लग्न झालं नाही म्हणून सतत विचारणा होत होती, अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत लग्नासाठी स्थळं येत होती, पण माझ्या मनाने मात्र त्या दिशेने विचार करायचं बंद केलं होतं. याचा अर्थ लग्नसंस्थेवर माझा विश्वास नाही असं नाही; मात्र मला ते माझ्यासाठी आता नकोय. एकटीनं राहण्याचं कसब आता मी शिकून घेतलंय आणि ते मला आवडतंय. आठवडाभर काम आणि शनिवार-रविवार आला की मी माझे छंद जोपासते. या जगात आणि आयुष्यात करण्यासाठी इतक्या गोष्टी आहेत की सोबत कोणी नाही याची जाणीवच सहसा होत नाही. आज वयाच्या ४५व्या वर्षी मी स्वच्छंदी जगतेय. अर्थात कधी तरी आयुष्यात दुसऱ्याकडे बघून तो क्षण येतोच जेव्हा अपल्यासोबतही कोणी तरी असायला हवं असं वाटतं. पण मग दुसऱ्याच क्षणी तो विचार हवेत विरून जातो. लग्न न करणं हा माझा निर्णय होता, जो मी भरभरून जगण्याचा प्रयत्न करतेय. भटकंतीची आवड, छंद, मित्रपरिवार, नातेवाईक हे सगळे माझ्या प्रवासात सोबत आहेतच, त्यामुळे आयुष्याची मजा घेता येतेय आणि लग्न झालं असो वा नसो आयुष्याची मजा घेता येणं आणि दिलखुलास जगणं जास्त महत्त्वाचं.

आनंदी पवार, आयटी क्षेत्र

शारीरिक सुखाचं काय?

माणूस म्हणून जगताना मानसिक शांतता आणि समाधान जितकं  महत्त्वाचं आहे तितकंच शारीरिक सुखही महत्त्वाचं. भारतासारख्या संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या देशात या नैसर्गिक गोष्टी होण्याचं प्रमाण म्हणजे लग्न. मात्र आता लग्नंच नाही म्हणजे या गोष्टींचा तिढा कसा सोडवायचा हा एक मुद्दा आहेच. कारण लग्न असो वा नसो शारीरिक-मानसिक गरजा भागवण्याला वैद्यकीयरीत्या दुजोरा दिला गेला आहे. आपल्याक डे लग्न झाले असो वा नसो, पुरुषांना या गोष्टींसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी स्त्रियांच्या बाबतीत तितकाच मोकळेपणा आहे हे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल. शहरांमधून तरुण वयात लग्नाआधी अनेकदा या गोष्टींचा अनुभव घेतला जातो, त्यामुळे त्या वयात याचा फारसा विचार केला जात नाही. मात्र ठरावीक वयानंतर लग्न न झालेल्या स्त्रियांना आपल्या या गरजांची उत्तरं आजही कुजबुजतच शोधावी लागतायेत.

viva@expressindia.com