गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

भारतामध्ये पॉप संगीताची आणि त्या अनुषंगाने म्युझिक व्हिडीओची लाट आली ती एम.टीव्ही आणि व्ही चॅनलच्या आगमनानंतर. सुरुवातीच्या काळात लकी अली, सिल्क रूट, धूम, आलिशा चेनॉय, रेमो फर्नाडिस, दलेर मेहंदी या कलाकार-बँड्सनी घराघरांतली म्युझिक सिस्टिम काबीज केली. आठेक वर्षांत रिमिक्स आणि त्यानंतर पाकिस्तानी पॉपबॅण्डच्या लाटेमध्ये इथली पॉप म्युझिकची चळवळ थंडावली. एमटीव्ही-व्ही चॅनल्सही संगीतबाह्य़ किंवा संगीतपूरक रिअ‍ॅलिटी शोजमध्ये अडकली. नेमके इथल्या पॉप चळवळीसारखेच एमटीव्ही-व्ही चॅनल्स तिसऱ्या जगांतील राष्ट्रांत गेल्यानंतर झाले.

आफ्रिकेतील नायजेरियाच्या संगीतजगतात गेल्या दशकभरामध्ये कमालीचा बदल झाला आहे. दहशतवाद आणि दहशतवादी संघटना बोको हरामची कर्मभूमी असलेले हे राष्ट्र चित्रपट आणि साहित्याच्या दृष्टीनेही कमालीचेही प्रगत आहे. चित्रनिर्मितीमध्ये हॉलीवूडला मागे टाकून या राष्ट्राने भारतानंतर वर्षांला सर्वाधिक चित्रपट बनवणारा देश असा लौकिक कमावला आहे. गेल्या काही वर्षांत येथील तरुणाईचे संगीत स्वर आणि नृत्यश्रीमंत दिसते. अमेरिकेत कृष्णवंशीयांची संगीत जगतावर चलती आहे. त्यांच्या वरताण इथले पॉपस्टार चकचकीत म्युझिक व्हीडिओज बनवत आहेत. आफ्रिकी-अमेरिकी उद्योगपतीचा व्यवसायासाठी वाह्य़ात ठरलेल्या एका मुलाने घरच्या श्रीमंतीला टाकून मित्रांसोबत संगीत आणि ध्वनिसंकलनामध्ये अपारंपरिक शिक्षण घेतले. डेव्हिडो नावाचा हा गायक-संगीतकार सध्या नायजेरियाचा सुपर ‘पॉप’स्टार आहे. या गायकाच्या व्हीडिओमध्ये उंची कार्स, विमान, पॅरेशूट्स यांसोबत नायजेरियातील श्रीमंत तरुणाईचे ऐश-आरामी जगणे दिसते. तेलामुळे आफ्रिकेतील आर्थिकदृष्टय़ा सर्वाधिक संपन्न असल्याने इथले कलाकार, त्यांचा पेहराव आणि त्यांचे नृत्य यांच्यामधील समृद्धी या गाण्यांमध्ये पाहायला मिळते. डेव्हिडोच्या गाण्यांमध्ये गँगस्टरच्या गोष्टी येतात, दहशतवादाने कातावलेल्या लोकांचे दु:ख येते आणि सर्वात महत्त्वाच्या प्रेमगप्पा येतात. यातल्या प्रत्येक गाण्याच्या ध्वनिसंकलनातील गंमत, नृत्यातील सफाईदारपणा आकर्षून घेणारा आहे.

गेल्या चारेक वर्षांत अमेरिकी संगीत कंपन्या नायजेरियामध्ये संगीत टॅलेण्ट शोधण्यासाठी उतरल्या आहेत. हौसा, इग्बो आणि येरूबा अशा तीन संगीत संस्कृती या देशात शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहेत.  ड्रम्स आणि स्थानिक वाद्यांच्या आधारे त्यांची स्वतंत्र ओळख आहे. डेव्हिडोच्या ‘नेक-उनेक’ नावाच्या व्हिडीओमध्ये पारंपरिक आणि आधुनिक  नायजेरियन संगीताचे सम्मीलन केल्याचे दिसते. हा व्हिडीओ बिट्स आणि त्यातील देखण्या नृत्यासाठी पाहावाच असा आहे. यात स्थानिक हौशा-नवशा-गवशांचा ताफा एकतालात नाचताना दिसतो. त्यांच्या पेहरावात प्रचंड भिन्नता आहे. पण नृत्यउत्साहात तितकाच सारखेपणा आहे. वीज कीड नावाचा इथला आणखी एक पॉपस्टार आहे. त्याच्याही गाण्यांत इथल्या बदलत्या समाजजीवनाचे चित्र दिसते. या गाण्यांचे वैशिष्टय़ म्हणजे ती इन्डोअर शूटिंगमध्ये अतिअद्ययावत वाटतात. आउटडोअर शूटिंग्जमध्ये गायक-नृत्यकलाकार यांचा ताफा स्थानिक वस्त्यांमध्ये चित्रीकरण करतात, तेव्हा त्या जागानिवडीबद्दल गंमत वाटायला लागते. झोपडय़ा किंवा जुनाट कौलारू घरांच्या पाश्र्वभूमीवर एकतालात नाचणारी आधुनिक तरुणाई, हे असे चित्रीकरण फक्त नायजेरियाई पॉपसाँग्जमध्ये दिसू शकेल. अशा ठिकाणी चित्रीकरण करण्याचे धाडस त्यांच्यात आहे. अनेक गाण्यांत उंची गाडय़ा आणि पाश्चिमात्य साहेबी थाटाचा शिष्टाचारी पोशाख यांचे आकर्षण कलाकारांना जडलेले दिसते. पैसे आणि ललना यांच्यावर केंद्रिभूत केलेली ही गाणी बदलत्या आफ्रिकी मानसिकतेची जाणीव करून देते.

डीबॅन्ज नावाच्या एका कलाकाराने २०१२ साली ‘ऑलिव्हर ट्विस्ट’ नावाचे गाणे तयार केले. कानये वेस्ट या आफ्रिकी-अमेरिकी पॉपस्टारला हे गाणे आवडले आणि गायकाची रवानगी नायजेरियातून अमेरिकेत झाली. नायजेरियाच्या गाण्यांमध्ये ऱ्हिदम ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे प्रत्येक गाण्यामध्ये नृत्यनीयता हा गुणधर्म सारखाच आढळतो. सध्याच्या गाणी संशोधनात सॅडसाँग शोधूनही सापडू शकत नाही. इथल्या कलाकारांमधली नृत्यऊर्जा तुफानी आहे. ओलेमाडे या गायकाने तयार केलेले ‘आय लव्ह लेगॉस’ हे या स्मार्ट शहराचे स्मार्ट चित्र दाखविणारे गाणे पाहिले, तर लेगॉसमधील सार्वजनिक वाहन व्यवस्थेपासून  शहराचा टापटीपपणा, सुंदर-लख्ख रस्ते आणि शहराचे सौंदर्य राखणाऱ्या प्रशासनातील प्रत्येक घटक दिसतात. आपल्या शहरांशी तत्काळ तुलना करायला लावणारे हे शहरगाणे आवर्जून बघाच. सेनेगलमधून आलेला अ‍ॅकॉन, सोमालियातून आलेला केनान यांना जगभरामध्ये आफाट प्रसिद्धी मिळाली. सध्या आफ्रिकेतील नायजेरिया हा अमेरिकी संगीत कंपन्यांना महत्त्वाचा देश वाटत असल्याने, पुढील काळात हे कलाकार अमेरिकी माध्यमातून जगप्रिय होण्याआधी त्यांना या व्हिडीओजमध्ये ऐकता-पाहता येणार आहे. संगीत आणि नृत्यवेडय़ांसाठी ही नव्या प्रकारची कान सुखावून टाकण्याची पर्वणी असेल.

काही मस्ट वॉच व्हिडीओ लिंक्स

viva@expressindia.com