25 November 2017

News Flash

खाऊगल्ली ओडिशा : मथुरा केक आणि मच्छा झोल

मथुरा केक, हा इथला प्रसिद्ध पदार्थ. अनेक लहान ठेल्यांवर तो मिळतो.

सायली पाटील | Updated: July 7, 2017 12:31 AM

साधं राहणं आणि साधंच पण चवदार खाणं म्हणजे ओडिशाची खाद्यसंस्कृती. गेल्या काही वर्षांमध्ये ओडिशाकडचा पर्यटकांचा ओघ वाढतो आहे. याला कारण म्हणजे तिथलं निसर्गसौंदर्य आणि खाद्यसंस्कृती. इथे खाण्याचे प्रकार फार नाहीत. पण जे आहेत, ते नक्कीच खायला हवेत असे.

मथुरा केक, हा इथला प्रसिद्ध पदार्थ. अनेक लहान ठेल्यांवर तो मिळतो. मैदा, साखर यांचं मिश्रण असलेला हा केक मेदुवडय़ाप्रमाणे दिसतो, पण लागतो छानच. शिवाय ओडिशामध्ये समुद्रकिनाऱ्यालगत चौपाटय़ांनजीकच्या दुकानातून मस्त ताजे मासे तळलेले मिळतात. भरपूर मसाले लावलेले हे मासे समुद्रावरच खाणं हा एक मस्त अनुभव असतो. ओडिशामधील मच्छी बेसारा ही डिश मांसाहारींसाठी नव्या चवीची ठरते. कारण रोहू मासा आणि मोहरीच्या तेलात बनवलेला हा पदार्थ नक्कीच चवीला खास असतो. अर्थात मोहरीच्या तेलाची चव जिभेवर आधी घोळवावी लागते. ती ओळखीची झाल्याशिवाय हे समीकरण जुळणं कठीण. चिंगुडी कोस्सा हा कोलंबीचा पदार्थही झक्कास. कांदा, मिरची आणि काही ठरावीक मसाल्यांवर कोलंबी परतून चिंगुडी कोस्सा मिळतो. माशांसोबतच ओडिशामध्ये विशेष पसंती मिळते मटणाला. भुवनेश्वरजवळच्या शाहिदनगरमधल्या पथिक रेस्टॉरंटमध्ये मटण बिर्याणी, मटण कसा हे खास पदार्थ मिळतात.

इथली खासियत सांगायची झाली तर इथे हॉटेल उद्योगावर पंजाबी पदार्थाचा प्रभाव नाही. त्यामुळे खास ओडिशातील जेवण तुम्हाला अनेक ठिकाणी सहज मिळू शकतं. भुवनेश्वरमधीलच दालमा रेस्टॉरंटमध्ये ओडिशातली पारंपरिक थाळी मिळते. चट्ढ राय म्हणजे मोहरीच्या सॉसमध्ये घोळवलेले चविष्ट मश्रुम्स, तर हिल्सा मच्छा झोल हा हिल्सा माशापासून बनवलेला पदार्थ, इथे विशेष प्रसिद्ध आहे.

शाकाहारींसाठीही ओडिशामध्ये बरंच काही आहे. उदा. पखला, पोखल किंवा पोखलो हा भाताचा प्रकार. या पदार्थाच्या नावाचा उच्चार प्रत्येकजण वेगळ्या बाजात करतो. दहिवडा, खीर, छेना झिली हे इथले आवडीचे गोड पदार्थ. जागोजागी सायकलवर डबे घेऊन दहिवडे विकणारे विक्रेते इथे भेटतात. रानिहात आणि साबरमती स्टेडिअमजवळचे दहिवडा स्टॉल विशेष लोकप्रिय आहेत. तांदूळ, दूध, साखर याचा वापर करून खीरी म्हणजे खीर बनवली जाते. विवाहसोहळे, सणवार यात हीच खीर बनवली जाते. सोबतच गुलाबजामसारखा दिसणारा छेना झिली हा पदार्थही इथल्या लोकांच्या आवडीचा आहे. सोबतच इथला आणखी एक पदार्थ म्हणजे गुपचूप. नावात वेगळेपणा असलेला हा पदार्थ म्हणजे चक्क आपली पाणीपुरी होय.

ओडिशातील खाद्यपदार्थाचं वैशिष्टय़ं म्हणजे इथे अनेक प्रकारच्या चटण्या खायला मिळतात. मोहरीचं तेल आणि तूप यांचा वापर जास्त होतो. तसंच इतर ठिकाणांपेक्षा तुलनेने कमी तेलातील पदार्थ दिसतात. तसंच तिखटाचा लाल तवंगही फारसा दिसत नाही. अर्थात काही अपवाद आहेत. मंदिरांमधील अन्नछत्रामध्येही उत्तम जेवण मिळतं. ओडिशाचा निसर्ग रांगडा आहे, साधा आहे. त्याप्रमाणे इथलं खाणंही साधंसुधं, खिशाला फारसा त्रास न देणारं आहे. ब्रह्मपूर, पुरी, भुवनेश्वर या भागांत पर्यटकांची गजबज दिसते. ओडिशा पर्यटन विकास मंडळानेही इथे बरीच कामे केली आहेत. या सगळ्या कारणांमुळे बजेटमध्ये प्रवास करणाऱ्या अनेकांना ओडिशा खुणावत असतं. तुम्हीही एकदा जाऊन इथला साधा पण चविष्ट पाहुणचार घ्यायलाच हवा.

viva@expressindia.com

First Published on July 7, 2017 12:31 am

Web Title: odisha food odisha fish odisha khau galli