प्रशांत ननावरे

मुंबईत दाखल झालेला परदेशी पर्यटक हातात हमखास गाइड बुक घेऊन फिरताना दिसतो. दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसर हे त्यांचं आवडतं ठिकाण. या पर्यटकांचा दिवसरात्र पाहुणचार करण्यासाठी अनेक फॅन्सी कॅ फे, उंची रेस्टॉरंट असली तरी त्यांची पावलं सकाळी पहिल्यांदा गाइड बुकमध्ये नमूद केलेल्या एका विशिष्ट कॅ फेकडे वळतात. मुंबईतील सर्वोत्तम ब्रेकफास्ट ज्या ठिकाणी मिळतो तो हा ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस अ‍ॅण्ड स्टोर्स’ नावाचा कॅ फे. इथला सत्तर वर्ष जुना असलेला सुप्रसिद्ध खिमा-पाव खायचा असेल तर सकाळी दहा वाजण्याच्या आत तुम्हाला कॅ फे गाठावा लागतो.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मुंबईतील इराणी कॅफेच्या पंक्तीतील ‘ऑलिम्पिया’ या जुन्या आणि महत्त्वाच्या कॅ फेची मुहूर्तमेढ इराणी व्यक्तीनेच रोवली आहे. कॅफेची सुरुवात १९१८ मध्ये झाल्याची जुजबी माहिती मिळते. पण याचे मूळ मालक कोण होते याची सध्याच्या मालकांनाही कल्पना नाही. उत्तर गुजरातमधील सिद्धपूर-पालनपूर-पटानबेल्ट या भागातील गुजराती मुस्लिमांची ‘चिलिया मुस्लीम’ म्हणून ओळख आहे. १९४७ च्या फाळणीनंतर अनेक कुटुंबं पाकिस्तानातील कराचीमध्ये स्थलांतरित  झाली तर तरुण मुस्लिमांनी पोटापाण्यासाठी मुंबई गाठली. बहुसंख्य तरुण त्या वेळी काळी-पिवळी टॅक्सी चालवायला लागले. आजही या समाजाचे लोक मोठय़ा प्रमाणात या व्यवसायात आहेत. त्यातून कमावलेला पैसा नंतर अनेकांनी हॉटेल व्यवसायात गुंतवला आणि पन्नासच्या दशकात इराण्यांच्या बरोबरीनेच चिलिया मुस्लिमांचे कॅ फेहीनाक्यानाक्यावर दिसू लागले. ऑलिम्पिया त्यांपैकीच एक.

ए. रहिम चौधरी हादेखील पालनपूरहून मुंबईत दाखल झालेला तरुण. सुरुवातीला टॅक्सी व्यवसायात असलेल्या चौधरी यांनी काही मित्रांच्या साथीने १९५३ साली ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस अ‍ॅण्ड स्टोर्स’ विकत घेतलं. तेव्हापासून एकूण पाच पार्टनर्स मिळून हा कॅ फे चालवत आहेत. ए. रहिम यांच्यानंतर त्यांचा मुलगा इद्रिस आणि आता तिसऱ्या पिढीचे आमिर ऑलिम्पियाची धुरा सांभाळताहेत. कुलाब्यात ज्या कोपऱ्यावर रिगल सिनेमा आहे त्या शहिद भगतसिंग मार्गावर परदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेल्या ‘लिओपोल्कॅ फे’च्या समोरील फुटपाथवर ‘रहिम मॅन्शन’ या तीन मजल्यांच्या भक्कम दगडी इमारतीच्या तळमजल्यावर कोपऱ्याला ‘ऑलिम्पिया’ आहे.

फुटपाथवरच बाहेर डोकं काढलेलं छप्पर असल्यामुळे आणि त्याच्या तिन्ही बाजूंना कॅफेच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे तो लगेच नजरेत भरतो. आत शिरताच डाव्या हाताला मालकाची बसण्याची जागा आणि त्याच्या बाजूला लागूनच दरवाजा आहे. उजव्या हाताला असलेला लाकडी जिना वर वातानुकूलित सेक्शनमध्ये घेऊन जातो. पण या कॅ फेची खरी मजा खाली दर्शनी भागात बसण्यातच आहे. खाली प्रशस्त जागेत दोन्ही बाजूंना गोल टेबलांची रांगेत आणि सुटसुटीत मांडणी करण्यात आली आहे. डाव्या आणि उजव्या बाजूला लाकडी फ्रे ममध्ये सबंध भिंतीला काचा लावलेल्या आहेत. इराणी कॅ फेशी नातं सांगणारा हाच तो प्रमुख दुवा. बसण्याच्या खुच्र्या नवीन असल्या तरी कलाकुसर केलेल्या मोठय़ा खांबांचा आधार असलेली सत्तर र्वष जुनी लाकडी टेबल्स लक्ष वेधून घेतात. त्यावर अतिशय जाड पांढरं मार्बल आहे. सर्व टेबलांवर नेहमीच पाण्याने भरलेले काचेचे ग्लास आणि एका बशीत कच्च्या हिरव्या मिरच्या ठेवलेल्या दिसतील. सकाळी मिरच्यांच्या जोडीला खिम्यासाठी लिंबाच्या फोडीसुद्धा असतात. सर्व वेटर्सना पठाणी पद्धतीचा राखाडी रंगाचा पोशाख आहे. इथले जवळपास सर्वच कर्मचारी मुस्लीम आहेत.

नावातील कॉफी आणि स्टोर्स या दोन शब्दांशी आता ऑलिम्पियाचं सख्य राहिलेलं नाही. पूर्वी इराण्यांच्या दुकानात मिळायच्या तशा सर्व गोष्टी इथेही मिळायच्या. आता कॉफी मिळते पण आवर्जून प्यावी या प्रकारात ती मोडत नाही. इराणी चहाच्या बरोबरीने चिलिया मुस्लीम रेस्टॉरंटमधला चहासुद्धा आवडीने प्यायला जातो. तो इथे चांगला मिळतो. सकाळी सात ते साडेसातपर्यंत नाश्त्याला खिमा-पाव आणि अंडय़ाचे पदार्थ मिळतात. दहा वाजता मटण रोस्ट सुरू होतं. जे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये संपतं. साडेदहा वाजल्यापासून पालकच्या भाजीत तयार केलेला भाजीगोष्त हा पदार्थ मिळतो. अकरा वाजता लंच टाइम सुरू होतो. चिकन-मटण बिर्याणी, मटण-चिकन मसाला, भेजा खिमा, मटण फ्राय हे इथले प्रसिद्ध पदार्थ आहेत. त्यांचंही वय हॉटेलइतकंच आहे. व्हेज पदार्थही आहेत पण नावाला. ऑर्डर दिल्यावर सर्वप्रथम काचेच्या एका बशीत चिरलेला कांदा, लिंबू आणि दुसऱ्या बशीत पातळ हिरवी चटणी आणून ठेवली जाते. नंतर लागलीच गरमागरम ऑर्डर सव्‍‌र्ह होते. मटण असो वा चिकन त्यांचा सुरवा थोडा पातळ आणि कमी तिखटच असतो. अधिक तिखट हवं असल्यास बाजूला हिरव्या मिरच्या असतातच. आजही हंडीमध्ये शिजवल्या जाणाऱ्या पदार्थाची चव जशीच्या तशी आहे. मऊ, लुसलुशीत गव्हाच्या पिठाच्या चपात्यादेखील ऑलम्पियाची ओळख आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून चिकन तंदुरी आणि चिकन टिक्कासारखे पदार्थही मेन्यूमध्ये दाखल झाले आहेत. बेकरीचे पदार्थ भायखळ्याच्या बेकरीतून येतात. इथले सर्व पदार्थ फार पूर्वीपासूनच पांढऱ्या रंगाच्या चिनीमातीच्या प्लेटमधून सव्‍‌र्ह केले जातात. त्यामुळे प्रत्येक पदार्थाचा रंग आणि पोत उठून दिसतो.

आजूबाजूला लिओपोल्ड, कॅ फेमाँडेगार, बगदादी, गोकूळ, बडेमियाँ, दिल्ली दरबार अशी नावाजलेली हॉटेल्स असतानाही ऑलिम्पिया आपली शान राखून आहे. आत्तासारखा हा परिसर पूर्वी गजबजलेला नसायचा. लोकही बाहेर क्वचितच जेवायला जात. १९५३ ते १९६८ सालापर्यंत रात्री ८ वाजता हॉटेल बंद होत असे. त्यानंतर हळूहळू वेळ वाढत गेली. १९८५ पर्यंतसुद्धा ऑलिम्पियाच्या दारात उभं राहून रिगल सिनेमा सहज दिसत असे. आता गर्दीत तेही मुश्कील झालंय. आम्ही रमजानच्या काळात ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या आतमध्ये जाऊन नमाज पढत असू, अशी आठवण इद्रिसभाई सांगतात.

इराण्यांप्रमाणेत चिलिया रेस्टॉरंटनेही मुंबईकरांना खूप प्रेमाने खाऊ  घातलंय. स्वस्त आणि चविष्ट मांसाहारी पदार्थ ही त्यांची ओळख आजही कायम आहे. पण अनेक चिलिया रेस्टॉरंट आता फक्त मुस्लीमबहुल भागातच शिल्लक असल्याचं दिसतं. शिवाय अस्वच्छतेमुळे कुटुंबं आणि इतर समाजाचे लोक तिथे जायला धजावत नाहीत. पण ऑलिम्पियाने आपली शान टिकवून ठेवलेली आहे. स्वच्छता, कुलाबासारख्या परिसरात असूनही माफक दर, मोगलाई पद्धतीचे पक्वान्न आणि गाठलेली शंभरी यामुळे ऑलिम्पियाची दखल घेणं महत्त्वाचं ठरतं.

viva@expressindia.com