मासिक पाळी दरम्यान स्वच्छता पाळण्यासाठी आणि अधिकाधिक आरोग्यदायी सवयींसाठी महत्त्वाचे असते ते स्वच्छ पॅड वापरणे. मग हे पॅड तुम्ही घरच्या घरी कापडापासून तयार केलेले असू शकते किंवा बाजारातून विकत आणलेले. या विषयावर गेल्या काही महिन्यांत बरेच काही बोलले गेले. त्यामुळे अनेक जणी सॅनिटरी पॅडचा वापर करण्याचा विचार करू लागल्या. परंतु  या पॅडची विल्हेवाट कशी लावावी, याचा फारसा विचार होताना दिसत नाही. अनेकदा ही पॅड  कचऱ्यात टाकून दिली जातात. काही ठिकाणी ही पॅड्स नष्ट करण्यासाठी मशीन लावलेले असते. त्यात ती जाळली जातात. पण अनेक तज्ज्ञांच्या मते, त्यातून येणारा वायू पर्यावरणाला अनुकूल नाही त्यामुळेच या पॅड्सना पर्याय म्हणून मेन्स्ट्रअल कप्स ही गोष्ट पुढे येत आहे.

आपल्याला मेन्स्ट्रअल कप्स फारसे माहिती नसतात. कधी तरी सोशल मीडियावर जाहिरात किंवा वृत्तपत्रांतील लेखांतून आपल्याला त्यांची ओळख झालेली आहे. हे कप  अगदी ५ ते १० वर्षे वापरता येतात. ते विकत घेताना थोडे महाग पडतात परंतु त्यांचा वापर पाहता ही रक्कम वसूल होण्याची खात्रीच असते. हे कप वापरल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवायचे असतात. परंतु या कप्सच्या वापराला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे काही आजार होतील का, काही संसर्ग तर होणार नाही ना असे अनेक प्रश्न मुलींना भेडसावत असतात. याविषयी  अक्षय सोशल ग्रुप आणि ऋतू कपच्या डिझायनर सीमा परदेशी-खंडाळे सांगतात, ‘हे कप्स १०० टक्के सिलिकॉनने बनवलेले असतात. त्यामुळे ते शरीरात दीर्घकाळ राहिले तरी त्रास होत नाही. पुन्हा पुन्हा धुवून कप सहज वापरता येतो. शिवाय हे कप हाताळण्यासाठीही सोपे असतात. प्रत्येक मासिक पाळीनंतर गरम पाण्यात तो कप उकळून घेतला की पुन्हा तो स्वच्छ होऊन वापरण्यायोग्य होतो. शिवाय या कपमुळे त्वचेचे त्रास, डागांची भीती नाहीशी होते. कप वापरून आपण पोहू शकतो, योगासने करू शकतो, पावसात भिजू शकतो. त्यामुळे हे हानिकारक नसून उपकारकच आहेत.’