23 January 2018

News Flash

Watchलेले काही : हे करून पाहा!

बॅग्ज आणि पेपरबास्केट्सचे व्हिडीओ आवर्जून पाहावेत.

पंकज भोसले | Updated: August 11, 2017 1:09 AM

गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

साधारणत: नव्वदीच्या दशकात आलेल्या ‘ठकठक’ नावाच्या बालमासिकामध्ये बाळगोपाळांना घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येण्याजोग्या हस्तकलेच्या विविध कलाकृती सांगितल्या जात. केवळ सुट्टीत नाही, तर वर्षभरामध्ये मुलांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या विविध गोष्टी तयार करण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन दिले जाई. दूरदर्शन याच काळात चोवीस तास सुरू झाले आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांनाही तेथे सुरुवात झाली. कागदी खेळणी, पुठ्ठय़ाची विमाने, टूथपेस्टच्या खोक्यातून आकर्षक फुलदाणी किंवा लक्षवेधी पेनबॉक्स तयार करण्याची कला लहान मुलांना अवगत करणारे कार्यक्रम या काळात लोकप्रिय होते. व्हिडीओ गेमने एका पिढीला वेड लावण्याआधी सुरू असलेली लहान मुलांची हस्तकला एका मर्यादित तरीही बऱ्यापैकी ओरिगामी आणि शोभेच्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये गुंतलेली होती. चीन आणि जपानमध्ये मूळं असलेल्या ओरिगामी कलेविषयी आपण फक्त ऐकून असतो. आपल्याला निव्वळ कागद दुमडून तत्काळ बनवायचे विमान, शिडाची होडी अथवा साधी होडी बनविता येत असते. त्याविषयीची पुस्तके पाहिली, तर कागद दुमडण्याच्या पद्धतीत थोडासा बदल केल्यास किती आकर्षक गोष्टी तयार होऊ शकतील हे कळते. तरी या विषयीच्या ग्रंथातील वाचून कागद दुमडण्याची कला तंतोतंत हस्तगत करता येत नाही. यूटय़ूबच्या सुरुवातीच्या काळामध्ये ओरिगामी दाखवून देणारे व्हिडीओज कमी होते. जपान आणि युरोपमधील ओरिगामी कलावंतांनी अगदी सुरुवातीचे व्हिडीओ अपलोड केलेले दिसतात. लहान मुलांनीच नाही तर बहुतांशी मोठय़ा माणसांनीच कराव्यात अशा ओरिगामीच्या वस्तूंनी सजलेले व्हिडीओज सध्या यूटय़ूबवर लोकप्रिय आहेत. सध्या भारतात कोणत्याही महागडय़ा क्लासमध्ये जाऊनही शिकता येऊ शकणार नाहीत, इतकी बारीक कलाकुसरीची वैविध्यपूर्ण ओरिगामी प्रात्याक्षिकांसह येथे सोपी करून सांगितली गेली आहे. एका छोटय़ा आयताकृती कागदापासून अंगठी बनविण्याच्या व्हिडीओपासून पाहण्यास आणि करण्यास सुरुवात केली, तर आपणही त्यात नव्या कल्पना जोडून आणखी आकार देऊ शकतो, याची जाणीव होईल. सुरुवातीला कागद दुमडण्यापासून ते कात्री सोबत घेऊन भेटकार्डाचे नवनवे प्रकार पाहता येतील. ओरिगामीद्वारे ड्रेसही तयार करता येतील. चपला आणि ससेदेखील बनविण्याच्या अत्यंत सोप्या आणि आकर्षक पद्धती व्हिडीओजमध्ये दाखविण्यात आल्या आहेत. हे व्हिडीओ वृक्षपणे माहिती सांगत नाहीत, तर त्यासोबत उत्तम पाश्र्वसंगीतही देतात. कागदापासून त्रिमितीय  वस्तूू बनविण्याची सूक्ष्म कारागिरी येथे विषद करण्यात आली आहे. दर्शकांना अधिकाधिक सहज ओरिगामीद्वारे वस्तू बनविता याव्यात यासाठी त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. बॅग्ज आणि पेपरबास्केट्सचे व्हिडीओ आवर्जून पाहावेत. निव्वळ दहा मिनिटांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या या व्हिडीओजमध्ये मूलभूत संकल्पनांची शिकवणी आहे. त्यात असलेल्या साहित्यातील एखादे कमी असल्यास वा एखादे अधिक असल्यास काही बिघडणार नाही. या ओरिगामीमध्ये हात बसला, तर शिवानी क्रिएशन या नावाखाली सादर झालेल्या हस्तकलेच्या वस्तू पाहाच. सायकलपासून ते अत्यंत सुबक खेळणी घरी बनविण्याच्या नव्या पद्धती मिळतील.

कोकाकोलाच्या रिकाम्या प्लास्टिक बाटलीपासून कंदील बनविण्याची पद्धत खूशच करेल. अगदी गिफ्ट पॅकच्या खोक्यापासूनही कंदील बनविणारा एक व्हिडीओ लोकप्रिय आहे. या व्हिडीओवरील हिट्स आणि प्रतिक्रिया वाचणेही आनंददायी अनुभव असू शकतो. जगभरामध्ये कित्येक लोक या वस्तूू करून त्यांनी त्यात अवघड वाटणाऱ्या गोष्टीतून सोपी वाट कशी काढली, त्याची माहिती मिळेल. येत्या गणपती आणि दिवाळसणामध्ये घरी शोभेच्या वस्तू तयार करून त्यांची सजावट करणार असाल, तर शेकडो पर्याय यूटय़ूबवर पाहायला मिळतील. बाजारात मिळणार नाहीत, इतक्या सुंदर वस्तू हाताने करता येतील.

एकदा यातील एखादी वस्तू यशस्वीरीत्या करून पाहिली, तर हे लक्षात येईल की ही वेळ घालविण्यासाठी केली जाणारी गोष्ट नसून वेळ सुंदर करण्याची बाब आहे. आपल्यातल्या कलात्मक क्षमता आजमविण्याचे हे व्हिडीओज शिकवितात. हे करून पाहिलेत, की मिळणारा आत्मविश्वासही थोडा थोडका नसतो. आपण शाळेत कार्यानुभावाच्या तासात किती कमी शिकतो, याची नुसती झलक पाहायची असली, तरी या व्हिडीओजची एकभेट अत्यावश्यक आहे.

viva@expressindia.com

First Published on August 11, 2017 1:09 am

Web Title: origami art videos hand craft video paper art video
  1. No Comments.