गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

एमटीव्हीने गाणी ऐकण्यासोबत पाहण्याची गोष्ट करून ठेवली, तेव्हा म्युझिक व्हिडीओंचा पाऊस पडायला लागला. आपल्याकडे एमटीव्ही, व्ही चॅनलवर सुरुवातीला आता इतक्या जाहिराती नव्हत्या त्यामुळे संगीत व्हिडीओंचा तिथला घाणा निर्वेध सुरूच असायचा . ‘ओरिजनल साऊण्डट्रॅक’ हा पुरस्कारांचा गट ऑस्कर पारितोषिकांमधील पूर्वीपासून होता. पण ‘टायटॅनिक’नंतर (१९९६) एमटीव्हीवर त्यातली गाणी दाखविताना ‘ओएसटी’ संबोधण्याचे सत्र सुरू झाले. याकाळात चित्रपटांसाठी खास विविध कलाकारांकडून गाणी बनवून किंवा त्यांची तयार गाणी रीतसर हक्क घेऊन प्रसिद्धीसाठी वापरली जाऊ लागली. एखाद्या चित्रपटासाठी घेण्यात आलेला नवा किंवा जुना साऊण्डट्रॅक म्युझिक चॅनलवर ‘ओरिजनल व्हिडीओट्रॅक’ म्हणून कार्यरत व्हायचा आणि त्यातील वैशिष्टय़ांमुळे लोकप्रियही ठरायचा. बिटल्स या प्रसिद्ध ब्रिटिश बॅण्डच्या ‘अ‍ॅक्रॉस द युनिव्हर्स’ या वैश्विक गाण्याचा ‘आय अ‍ॅम सॅम’ चित्रपटासाठी तयार करण्यात आलेला ‘ओरिजनल व्हिडीओट्रॅक’ म्हणूनच आवडीने पाहावा असा आहे.

या गाण्याची गीतबाह्य़ वैशिष्टय़े जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ‘अ‍ॅक्रॉस द युनिव्हर्स’ला वैश्विक म्हणण्याचे कारण काही वर्षांपूर्वी अंतराळातून त्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. जर पृथ्वीसारखी कुठे जीवसृष्टी असेल, तर त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचविण्यासाठी बिटल्सच्या या गाण्याचा वापर करण्यात आलेला होता. १९७० साली जन्मलेल्या गाण्याचे भारताशीही थेट नाते आहे. हा बँड भारतात आल्यानंतर येथील अध्यात्मिक गुरूंचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यातून या गाण्याच्या शब्दांत ‘जय गुरू देवा’ सहजपणे मिसळले गेले. बिटल्सच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये अ‍ॅक्रॉस द युनिव्हर्सचे प्रचंड महत्त्व आहे. त्याची कैक व्हर्शन्स अनेक गायकांनी गायली. रूफस वेनराइट या गायकाने गायलेला ‘आय अ‍ॅम सॅम’ चित्रपटासाठीचा ओरिजनल व्हिडीओट्रॅक व्हीएचवन, एमटीव्ही, व्ही चॅनलवर तातडीने लोकप्रिय झाला होता.  ‘आय अ‍ॅम सॅम’  हा चित्रपट बाप-लेकीचे अत्यंत हळवे नाते मांडणारा चित्रपट आहे. यात पाच-सहा वर्षांच्या डकोटा फॅनिंगने चुणूकदार अभिनयाचा आविष्कार सादर केला होता.  रूफूस वेनराइटच्या गाण्यामध्ये चित्रपटातील लहानगी डकोटा फॅनिंग हीच नायिका म्हणून सादर झाली आहे. तिच्या भावविश्वाचा किंवा स्वप्नाचा भाग म्हणून सादर झालेल्या या गाण्यामध्ये लाल फ्रॉकमध्ये फुगा घेऊन ती वावरली आहे. यातली गायक रूफसपासून उपस्थित सगळी माणसे दृश्यरूपात तरंगताना दिसतात. म्हणजे एकाही व्यक्तीचे पाय जमिनीला टेकलेले नाहीत, तर आकाशापर्यंत अनेक माणसे स्तब्धावस्थेत तरंगत आहेत. संगणकीय करामतीने ते साध्य झाले आहे. पण डकोटा फॅनिंगच्या चित्रपटातील व्यक्तिरेखेशी रुपक साधणारा हा व्हिडीओट्रॅक तिच्या निरागस वावरण्यामुळे आणि भवतालातील तरंगती माणसे पाहून हरखून जाण्यामुळे आणखी सुंदर झाला आहे. आता अ‍ॅक्रॉस द युनिव्हर्सचा रूफस वेनराइटचा व्हिडीओट्रॅक जितका निरागस आहे, त्याहून शेकडो पटींनी त्याच गाण्यावर विध्वसंक व्हिडीओ बनविण्यात आला आहे. फिओना अ‍ॅपल ही अमेरिकी गायिका आणि पियानोवादक आहे. तिने याच गाण्याचे आपल्या अल्बममधील व्हर्शन व्हिडीओट्रॅक बनवून आणले, तेव्हा त्यात एका भल्या मोठय़ा रेस्तराँची स्लो मोशनमध्ये मोडतोड चित्रित केली आहे. एखादा दंगलकाळ दर्शविणारी त्याची थिम आहे. या गाण्यांमध्ये फिओना अ‍ॅपल ३६० अंशात फिरताना दाखविली आहे. एखाद्या गाण्याकडे प्रत्येक कलाकार कोणत्या नजरेने पाहतो, त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बिटल्सच्या या डुप्लिकेट गाण्याची व्हर्शन्स आहेत. याच गाण्याचे स्कॉर्पिअन नावाच्या बॅण्डचे व्हर्शनही पाहावे. मुळात स्कॉर्पिअन हा बँड त्यांच्या हार्डरॉक गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडून हळव्या रुपात ‘जय गुरू देवा.,, ओम’ ही हाळी ऐकण्यासारखी खास जमली आहे. अमेरिकी भारतीय उच्चारांतील वैविध्यासाठी या गाण्याची तयार झालेली शेकडो रुपांतरे आवर्जून अभ्यासावीत काही बँड्सनी या एकल गाण्याला समुहगीतात रुपांतरित केले आणि काहींनी वाद्यांमध्ये प्रयोग करून त्याच्यांत आपला संगीतवकुब वापरून पाहिला. पण गंमत म्हणजे कुठल्याही आवृत्तीत हे गाणे सुंदर अनुभूती आहे. नुसता रूफस वेनराइट किंवा फिओना अ‍ॅपलच्या गाण्यांचा ओरिजनल व्हिडीओट्रॅक पाहिला, तर त्याची कल्पना येऊ शकते. अन्यथा ज्यांना नुसते ऐकायचे आहे, त्यांनी डोळे बंद करून आपल्या मनातला व्हिडीओट्रॅक तयार करता येईल. तितकी ताकद या गाण्यात नक्कीच आहे.

काही मस्ट वॉच लिंक्स

viva@expressindia.com