फॅशन ट्रेण्ड कोणते, याची माहिती तर हल्ली अनेक माध्यमांतून आपल्यापर्यंत पोचत असते; पण बडे स्टाइल गुरू सांगतात – ट्रेण्ड फॉलो करू नका, ट्रेण्ड निर्माण करा.. आंधळेपणाने फॅशन ट्रेण्ड फॉलो करण्यापेक्षा स्वत:ची खास फॅशन शैली निर्माण करण्यासाठी थोडं आऊट ऑफ फॅशनजावं लागतं. त्यासाठीच हे सदर.. तुमची स्वत:ची फॅशन शोधण्याच्या टिप्स देण्यासाठी! पहिल्या भागात फ्युचरिस्टिक फॅशनविषयी.

स्टेजच्या समोरच्या भागावर एक मोठा प्रोजेक्टर आहे. खालच्या बाजूला जुन्या कॅमेऱ्यासारखी दिसणारी सहा टेबल्स ठेवली आहेत. प्रत्येकाला एक रीळ लावलंय आणि त्या रिळाला एक फुगा लावलाय. फुगे सरळ रेषेत वर उडतात आणि करकर आवाज करत खाली येतात. परत वर जातात आणि तोच आवाज करत खाली येतात. इतका वेळ या फुग्यांचं नियंत्रण करणारा पांढराशुभ्र सूट घातलेला माणूस आता जवळच्या पियानोवर बसतो आणि एक धून वाजवायला लागतो; पण त्या संगीतातसुद्धा खाली येणाऱ्या फुग्यांचा करकर आवाज स्पष्ट जाणवतो. आता त्या संगीताच्या ठोक्यात मॉडेल्सचा रॅम्पवॉक सुरू होतो..

जपानी फॅशन डिझायनर इसे मियाकेचा स्प्रिंग-समर २००५चा शो. मुळात नव्या वर्षांच्या नव्या विषयाकडे जाताना एका अवघड नावाच्या अनोळखी डिझायनरच्या शोचा विषय का काढला? तर या शोची गंमत आहे. याने स्मॉकिंग पद्धतीचा वापर करून ड्रेस बनवले होते. स्मॉकिंग ही कपडय़ांना टेक्श्चर द्यायची पद्धती आहे. त्यामुळे ड्रेस त्या मॉडेलच्या शरीराचा आकार घेई. म्हणजेच तुम्ही जाडे असा वा बारीक तुम्हाला एकच ड्रेस वापरता येऊ  शकतो. साइजची चिंता करायची गरजच नाही. अगदी गरोदरपणातसुद्धा हा ड्रेस वापरता येईल आणि त्यानंतर स्लिम झाल्यावरसुद्धा. उसविण्याची गरज नाहीच. इसेने अकरा वर्षांपूर्वी मांडलेल्या या त्रोटक कल्पनेचं आजचं पाऊल म्हणजे ‘कंफर्ट फॅशन’ असू शकतं. वर्तमानातून एक पाऊल पुढे टाकत भविष्यकाळाचा मागोवा घेत बांधलेली अंदाजपत्रिका. डिझायनिंगच्या या संकल्पनेला ‘फ्युचरिस्टिक फॅशन’ म्हणतात. आपण बांधतोय ते अंदाज खरे होतील का? योग्य असतील का? चुकलो तर? या प्रश्नांचा विचार न करता एखाद्या कल्पनेचा, गोष्टीचा किंवा प्रश्नाचा मागोवा घेत त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या प्रयोगांमधून डिझायनर्स करत असतात. मग त्यातून जे कपडे तयार होतात, ते कदाचित त्या क्षणाला वापरताजोगे नसतील, पण पुढच्या कित्येक कलेक्शन्सना प्रेरणा देणारे असतात, हे नक्की.

प्रत्येक डिझायनर एक आर्टिस्ट असतो आणि इतर आर्टिस्टप्रमाणे त्याचं व्यक्त होण्याचं माध्यम असतं कपडे, ज्वेलरी, स्टाइल. अर्थात डिझायनरच्या कलेक्शन्समागे एक मोठ्ठं अर्थकारण असलं, तरी त्यातून फुरसत काढून काही डिझायनर्स आपल्या पद्धतीने आजूबाजूच्या परिस्थितीचा, काही प्रश्नांचा मागोवा घेत असतात. मग त्यात भावभावनांचा खेळ असतो, तंत्रज्ञान, बदलत्या घडामोडी, राजकीय, सामाजिक परिस्थिती किंवा माणसाची वृत्ती टिपणं असो. रॅम्पच्या मधोमध गोल फिरणारी मॉडेल, चारही बाजूंनी तिच्या पांढऱ्याशुभ्र ड्रेसवर मशीनने उडणारे फवारे झेलून प्रेक्षकांपुढे उभी राहते, तेव्हा प्रेक्षकांच्या नजरेत फक्त ड्रेसवरची सुंदर कलाकृती राहत नाही. रोजच्या आयुष्यातसुद्धा फसवणूक, अपयश, दगाफटका, नकार सगळं झेलत जगणाऱ्या आणि तरीही वरवर आनंदी दिसणाऱ्या असाहाय्य सामान्य माणसाची अवस्था कदाचित अशीच असू शकते, असं सांगण्याचा प्रयत्न करणारा डिझायनर अलेक्झांडर मक्विन असो किंवा प्रत्येक कलेक्शनमध्ये कपडे आणि तंत्रज्ञान यांना जोडून काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणारा डिझायनर हुसेन शलायन असो, ते या कलेच्या माध्यमातून काही तरी सांगत असतात. आपल्याला ते डिझाइन फॅशनच्या दृष्टीने प्रॅक्टिकल वाटत नाहीत. डिझायनर्स एखादं कलेक्शन बनवताना, त्यांच्यासमोर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्नसुद्धा करत असतात. त्यातूनच कॉर्सेटचा जाच धुडकावल्यावर कोको शनेलसारखी डिझायनर कम्फर्टच्या शोधापायी मेन्स शर्ट्सना फेमिनाइन लुकदेते. हिल्सच्या तक्रारी ऐकल्यावर एलिगंट ड्रेससुद्धा स्नीकर्ससोबत कसा घालता येईल, याचं उत्तर एखादी स्टायलिस्ट शोधत असते. ट्रेण्ड नुसता फॉलो करण्यापेक्षा आपण निर्माण करण्याची प्रेरणा यातून मिळते.

फ्युचरिस्टिक कलेक्शन नुसतं बघून समजत नाहीत. ते वाचावं लागतं, समजून घ्यावं लागतं. हीच त्याची मजा असते; पण म्हणून त्यातून वापरण्याजोगं काही नसतं, असं मुळीच नाही. कदाचित मॉडेलचा संपूर्ण लुक तुम्ही घालू शकणार नाही, पण तिच्या अ‍ॅक्सेसरीज, शूज, बॅग काही तरी नक्कीच वापरता येईल. एखादवेळेस तो लुक पाहून तुमच्या वॉडरोबमधल्या काही कपडय़ांची सरमिसळ करून नवीन लुक तयार करता येईल. नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच फ्युचरिस्टिक फॅशनबद्दल बोलायचं कारण म्हणजे या वर्षी आपणही असाच प्रयोग करणार आहोत. रॅम्पवर, इंटरनेट, माध्यमांवर वर्षांकाठीला वेगवेगळे ट्रेण्ड्स येत असतात. कधी तरी ते विचित्र वाटतात, कधी आवडतात, पण वापरता येत नाहीत. दर आठवडय़ाला हेच ट्रेण्ड्स मोडून आपण त्यातून एखादी वेगळी स्टाइल तयार करणार आहोत. जी तुम्हाआम्हाला सहज कॅरी करता येईल. त्यासाठी प्रत्येक ट्रेण्डला आपल्या नजरेच्या स्कॅनरमधून आणि विचारांच्या भिंगाखालून जावं लागेल. त्यातूनच एखादी आऊट ऑफ फॅशन इन ट्रेण्ड होऊ  शकेल. तुमच्या रेग्युलर वेअरमध्येही सध्याच्या फ्युचरिस्टिक फॅशनचे काही प्रयोग करू शकता. त्यातून जगावेगळं काही तरी दिसेल.

  • फ्युचरिस्टिक ट्रेण्ड म्हटला की, डोळ्यासमोर मोठाले अंतराळयान, तबकडय़ा, स्टार वॉर्स, एलियन्स येतात. मग ग्लिटर, सोनेरी, चंदेरी रंग, मेटॅलिक फिनिश हे सगळं ओघानं आलं; पण रोजच्या वापरात यात तुम्ही स्टील फिनिश टेक्श्चर टाकू शकता. स्टील फिनिशचे चोकर, पेंडंट, कडं किंवा इअरकफ्स बाजारात उपलब्ध आहेत. प्लेन वूलन स्वेटर- जीन्ससोबत हे कॅरी करू शकता.
  • एखाद्या पार्टीला लेदर पँट किंवा स्कर्ट ट्राय करायला हरकत नाही. जेट ब्लॅक डेनिम आणि फॉक्स लेदर टॉप घालू शकता. या लुकमध्ये कपडय़ाचा फ्लो आणि फ्लेअर टाळा. स्टीफ कापड वापरा. जकार्ड, कॉटन, वूल, फॉक्स लेदर, ब्रोकेड, ट्विल या प्रकारातील कापड वापरू शकता.
  • रंग डार्क किंवा न्यूट्रल शेडचा निवडा. संपूर्ण व्हाइट सूटसुद्धा या प्रकारात वापरू शकता. त्याच्यासोबत मोठय़ा डायलचं घडय़ाळ आणि स्टेटमेंट नेकपीस वापरा.
  • मस्त बोहो स्टाइल नेकपीस किंवा बंजारा ज्युलरी ट्राय करा. स्टोन वर्क केलेली कंटेम्पररी अँटिक गोल्ड ज्वेलरीसुद्धा मस्त दिसेल.
  • पॉइंटेड हिल्स किंवा किटन हिल्स शूज या लुकसाठी उत्तम. मेटॅलिक स्नीकर्ससुद्धा चालतील.
  • हा लुक एकूणच फ्युचर फॅशनचा आहे. त्यामुळे सध्याच्या स्टायलिंगचे नियम पाळायच्या फंदात नाही पडलात तरी हरकत नाही. फंकी प्रिंट, ओव्हरसाइज कपडे आणि ज्युलरी, ब्राइट कलर्स नक्कीच वापरा. फक्त त्यात समतोल हवा. ब्राइट शेडसोबत न्यूट्रल शेड्स वापरून लुकचा बॅलन्स ठेवा.
  • शोल्डर स्टाइल्स या लुकमध्ये महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे शोल्डर पॅड, बॉक्स शोल्डर, ड्रॉप शोल्डर नक्कीच वापरा.
  • घरातच सिम्पल टॉप किंवा टय़ुनिकला चेन्स किंवा ब्रोचेस, स्टड्स वापरून सजवता येईल. मल्टिपेंडंटसुद्धा वापरू शकता. झिपर्स, मेटॅलिक बटन्स, हूक्सचा वापर करा.

मेटॅलिक रंगाचा टॉप आणि स्कर्ट घालणार असाल, तर ब्लॅक बूट्स वापरून स्पोर्टी लुक देता येईल. शिवाय यामुळे मेटॅलिक ड्रेसचा भडकपणा कमी होईल. या लुकमध्ये जास्त अ‍ॅक्सेसरीज वापरणं टाळाच. स्टेटमेंट इअरिरगने एखाद्या रंगाचा टच देता येईल किंवा केसांचा हायबन बांधून स्टेटमेंट हेडअ‍ॅक्सेरीज किंवा हेडगिअर वापरता येऊ शकतात. नेहमीच्या एलिगंट पार्टीवेअरऐवजी हा ट्विस्टेड पण चकाचक लुक नक्कीच भाव खाऊन जाईल.

viva@expressindia.com