मितेश जोशी

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे चहा, मका व तळलेल्या पदार्थाची चलती सध्या जिभेवर सुरू आहे. स्वीट कॉर्नच्या सोललेल्या दाण्यांवर पारंपरिक पद्धतीने कांदा, टोमॅटो, चाट मसाला व भुरभुरणारी शेव घातली की कोणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटतं. पण नेहमीच्या या स्वीट कॉर्नच्या सोललेल्या दाण्यांवर पारंपरिक मसाला घालत त्यावर कोणी एक तरुण बक्कळ चीज, मेयो व वेगवेगळ्या सॉसचा वर्षांव करतो. तर कोणी हे तयार चटपटीत स्वीट कॉर्न पुरीत घालून त्याची शेवपुरीसारखी कॉर्न-पुरी करतो. पदार्थ तेच कृतीदेखील तीच परंतु त्यात स्वत:च्या शैलीने आणखी काही वेगळे पदार्थ घालत तो पदार्थ ताटात वेगळा ठरवण्याचा अट्टहास आजची तरुणाई करताना दिसते आहे. ज्याचं मनापासून स्वागत ‘खवय्या’ समाज करतो आहे. पाच वर्षांपूर्वी हॉटेलला गेल्यावर मेनूकार्ड पाहिल्यावर वेटरला ‘तुमच्या हॉटेलची स्पेशल डिश कोणती?’, असा प्रश्न विचारला जायचा, परंतु आता हॉटेलला गेल्यावर वेटरला तरुण टोळी ‘तुमच्या हॉटेलची आऊट ऑफ द बॉक्स डिश कोणती?’, असा प्रश्न उपस्थित केला जातो. यावरूनच त्यांना नवीच काही निराळी चव चाखायची आहे हे लक्षात येतं..

पाच वर्षांपूर्वी ‘शेफ विश्वात’ खवय्यांना फ्युजन चवी फार कमी खिलवल्या जायच्या. कारण तेव्हाचे दिवस फ्युजन चव चाखण्याचे नव्हते. परंतु आता हे दिवस गेले आहेत. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील ‘रॉयल पंजाब’ या हॉटेलचं आपण  एक उदाहरण घेऊ. पंजाबी पदार्थाना फ्युजनचा तडका देणार हे हॉटेल शेफ प्रसन्न घवी व त्याच्या मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलं. जिथे शेफ प्रसन्नने त्याच्या स्वत:च्या पोतडीतला ‘चुरचुर नान’ हा पदार्थ भलताच प्रसिद्ध केला. चुरचुर नान म्हणजे कुस्करलेले पंजाबी कुलचे. हे कुलचे छोले मसाला व दह्याच्या साथीने खाल्ले जातात. पुण्यातील पारंपरिक मिसळ व अन्य पदार्थासोबतच हा आगळावेगळा चुरचुर नानदेखील पुण्यातील खवय्यांच्या जिभेवर राज्य करतो आहे.

सर्वानाच हवाहवासा वाटणारा, काळ-वेळ-स्थळ याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला ‘चहा’. या चहात कोणी लिंबू पिळतं, कोणी आलं तर कोणी बदामाचे तुकडे घालतात. ‘चहा एक परंतु त्याच्या बनवण्याच्या पद्धती हजार’. सध्या ज्या चहासाठी खवय्ये पुण्यात आवूर्जन येतात तो आहे ‘तंदूर चहा’. पुण्यातील खराडी भागात अमोल राचदेव आणि प्रमोद बानकर या उच्चशिक्षित तरुण मित्रांनी एकत्र येऊन ‘चायला’ या नावाने आगळावेगळा चहाचा ठेला थाटला आहे. एका मोठय़ा तंदूरमध्ये विशिष्ट प्रकारची मातीची मडकी गरम केली जातात. त्यानंतर तयार केलेला चहा त्यात ओतला जातो. त्यामुळे त्याला एक मातीचा सुगंध आणि स्मोकी फ्लेवर येतो. मग तो वाफळता चहा एका भांडय़ात ओतून तो पुढे मातीच्याच कुल्हडमध्ये दिला जातो. ही चहा तयार करण्याची पद्धतच जगावेगळी असल्याने येथे चहा तयार करण्याची पद्धत पाहण्यासाठीही आवर्जून गर्दी केली जाते. ग्राहकांच्या हाती सुपूर्द केलेला तंदूर चहाचा कुल्हड धुऊन परत परत वापरला जात नाही. कारण कोऱ्या कुल्हडमधून दरवळणारा माती व चहाचा सुगंध पुन्हा एकदा ग्राहक अनुभवू शकत नाहीत. या तंदूर चहाने पुण्यातील खवय्यांच्या जिभेवर धुमाकूळ घातलेला आहेच. जगभरातून वाढती मागणी पाहता हा मराठमोळा तंदूर चहा लवकरच मुंबापुरीत आणि सप्टेंबरच्या अखेरीस दुबईतदेखील उपलब्ध होणार आहे.

लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वाच्याच जिव्हेला तृप्ती देणारा गारेगार पदार्थ म्हणजे ‘आइसक्रीम’. सन्मिश मराठे आणि पराग चाफेकर या तरुण मित्रांनी हटके फ्लेवर आइसक्रीममध्ये उपलब्ध केले आहेत. हॉटेल मॅनेजमेंटची पदवी प्राप्त असलेला सन्मिश तर सिव्हिल इंजिनीयर असलेला पराग हे दोघही खाबूप्रेमी. दोघांनी मिळून ‘द आइस्टसी प्रोजेक्ट्स’ची स्थापना केली. दादरच्या हॉटेल ‘आस्वाद’मधील पुरणपोळी आइसक्रीमचे हे जन्मदाते आहेत. पुरणपोळी आइसक्रीमबरोबरच संक्रांतीला तिळगूळ आइसक्रीम, दिवाळीच्या काळात जिलेबी आइसक्रीम, गणेशोत्सवाच्या काळात मोदक आइसक्रीमचा थंडगार ठसका ते खवय्यांना देतात. सध्या दोघेही चकली, गरम मसाला आणि गुळपोळी आइसक्रीमवर प्रयोग करत आहेत.

सणावाराला, व्रतवैकल्यांना पुरणपोळी ही हवीच. त्यात दुसऱ्या दिवशी शिळी पुरणपोळी तूप किंवा दुधाबरोबर खाण्याची मजाच काही और. काही हौशी तरुण खवय्ये ही पुरणपोळी चीज किंवा शेजवान चटणी बरोबरदेखील खाताना दिसतात. डोंबिवलीचा सौरभ दहिवदकर पुरणपोळ्यांच्या चवीने एक आऊट ऑफ द बॉक्स काम करतोय. सौरभने मराठमोळ्या पुरणपोळ्या ३५ चवींत बनवण्याचा घाट घातला आहे. ‘पुरणपोळी डॉट कॉम’ या वेबसाइटच्या माध्यमातून आपण घरबसल्या पुरणपोळ्या मागवू शकतो. अगदी सुरुवातीच्या काळात सर्व फळांच्या फ्लेवर्स असलेल्या पुरणपोळ्या सौरभ विकत असे. परंतु आता खवय्यांची वाढती मागणी पाहता त्याने बदाम-पिस्ता, स्ट्रॉबेरी, चीज, पान मसाला, पान शॉट, शेझवान पुरणपोळ्याही उपलब्ध के ल्या आहेत. या सर्व फ्लेवर्सची फूड लायसन्स त्याच्याकडे आहेत. पेशाने इंजिनीअर असलेल्या सौरभला फूड इंडस्ट्रीमध्येच काही तरी वेगळं करण्याचा मानस होता. तो या हटके पुरणपोळ्यांच्या मदतीने साध्य केला आहे.

काळाची गती ओळखून पावले टाकणारी व्यक्ती जगाच्या प्रवासात कधीच मागे पडत नाही. हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेलच. फॅशन व लाइफस्टाइल बरोबरच खाणं, पदार्थाच्या निरनिराळ्या चवी तसंच हॉटेलमध्ये पदार्थ सव्‍‌र्ह करण्याची पद्धत, पदार्थ बनवण्याची पद्धतही तरुणाईला रोजच्यापेक्षा काही तरी भन्नाट हवी आहे. त्यातून त्यांना अशी निराळी चव देणारे प्रयोगशील शेफही पुढे येतायेत!

viva@expressindia.com