20 November 2017

News Flash

व्हायरलची साथ : इरजा खान जिवंत आहे

सोशल मीडियावर तरुण पाकिस्तानी महिला पत्रकाराचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.

प्रशांत ननावरे | Updated: July 14, 2017 12:33 AM

माणूस जिवंत असताना त्याला मृत घोषित करणं ही बाब नवीन राहिलेली नाही. सरकारी कार्यालयामध्ये स्वत:चं पेन्शन आणायला गेलेल्या व्यक्तींना त्यांच्या जिवंत असल्याचा पुरावा आणायला सांगितल्याची अनेक उदाहरणं आपण ऐकत आलो आहोत. पत्र, टेलिफोन, वर्तमानपत्र, रेडिओ आणि टीव्हीच्या जमान्यात अशा अफवा पसरायला निदान थोडा वेळ लागायचा, परंतु सोशल मीडियाच्या युगात कुठलीही खरी-खोटी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरते. कारण बहुतांशी लोक सोशल मीडियावरील संदेश न वाचताच किंवा न पाहता फॉरवर्ड करण्यातच समाजसेवा आहे असं मानतात. आम्ही आमचं काम केलं, त्याची शहनिशा करून घेण्याचं काम तुमचं आहे, असा अनेकांचा आव असतो. सामान्यांची ही वाईट सवय प्रसारमाध्यमांनीही काही प्रमाणात आत्मसात केली आहे कारण त्याचा संबंध थेट टीआरपीशी जोडलेला आहे. म्हणूनच सर्वात आधी बातमी कोण देणार याची स्पर्धा लागलेली असताना अनेकांना अशा काही घटना घडल्याच नाहीत किंवा वयोवृद्ध सेलिब्रेटींना आपण यात नसल्याचे सतत पुरावे द्यावे लागतात. काही अतिउत्साही पत्रकारांच्या अशा वागण्यामुळे ‘ब्रेक्रिंग न्यूज’ ही संज्ञाच आता काही प्रमाणात विनोदाचा बाब झाली आहे. परंतु नेहमी इतरांना मनस्ताप देणारा हा प्रसंग एखाद्या पत्रकाराच्याच बाबतीतच घडला तर?

सोशल मीडियावर तरुण पाकिस्तानी महिला पत्रकाराचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. विशेष म्हणजे अनेक पत्रकारांमार्फतच या व्हिडीओची शहानिशा न करता सोबत भावनिक संदेश बिनधास्तपणे पसरवला जात होता. इरजा खान ही तेवीस वर्षीय तरुण पत्रकार ‘९२ न्यूज’ या पाकिस्तानी वृत्तवाहिनीसाठी एका कार्यक्रमाचं लाइव्ह रिपोर्टिग करत असताना कशी मृत्युमुखी पडली असा तो व्हिडीओ आहे. इरजाचा हा व्हिडीओ २०१६ सालचा आहे. पाकिस्तानचे नेते इमरान खान यांच्या एका रॅलीचं रिपोर्टिग करत असताना इरजा भोवळ येऊन क्रेनवरून खाली कोसळली. त्यानंतर तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इरजाची प्रकृती सुधारल्यानंतर ती ‘एआरवाय’ पाकिस्तानी वृत्तवाहिनीसाठी कामदेखील करत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी कुणीतरी मागच्या वर्षीचा हा व्हिडीओ यूटय़ूबवर अपलोड केल्यानंतर इरजा खान आणि तिच्या कुटुंबीयांना मोठय़ा मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

इरजाने लागलीच आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा सर्व खुलासा केला आहे. पण सोशल मीडियामध्ये एकदा व्हायरल झालेल्या गोष्टींना ताबडतोब अटकाव घालणं जरा कठीणच असतं त्यामुळे आजही तो व्हिडीओ सगळीकडे फिरत आहे.

इरजाच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचं समोर आल्यानंतर #IrzaIsAlive आणि #IrzaZindaHai हे दोन हॅशटॅगदेखील सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आले. स्वत: इरजादेखील इतर वृत्तवाहिन्यांवरून लोकांच्या समोर गेली आणि आपण जिवंत असल्याचा पुरावा देत होती. आपला हा व्हिडीओ खरा असला तरी मृत्यूची बातमी खोटी असल्याचं सांगत, ‘मला आत्ताच माहिती झालंय की मी एका वर्षांपूर्वीच मृत्युमूखी पडलेय. पण, मग तुम्ही ज्या तरुणीला दररोज टीव्हीवर पाहताय ती कोण आहे?’, असं ट्वीट करून इरजानं आपल्या कुटुंबीयांना आणि हितचिंतकांनाही अफवेवर विश्वास न ठेवण्याचा संदेश दिलाय. एका मर्यादेनंतर अशा गोष्टींचा स्वत:ला त्रास करून घ्यायचा कीती गोष्ट सोडून द्ययची हे आपलं आपण ठरवायचं असतं. इरजानेही तेच केलं. तिने आपल्याच ट्विटर हँडलवरून ‘तुम्हाला काय वाटतं इरजा खान जिवंत आहे की नाही?’ असा कौल घेतला. सुदैवाने ऐंशी टक्के लोकांनी ‘जिवंत आहे’ या पर्यायाला दुजोरा दिला. इरजाची बातमी भारतातील जवळपास सर्वच प्रसारमाध्यमांनी ट्रेंडिंग न्यूज म्हणून चालवली आणि आपापल्या परीने त्यात मसाला भरला. प्रकरण एवढय़ावरच न थांबता विषयाला फाटे फुटले आणि दिसायला सुंदर असलेली इरजा खान बॉलीवूड सिनेमात सुपरगर्लची भूमिका साकारू शकते अशा चर्चानादेखील ऊत आला. पण व्हायरल व्हिडीओच्या मागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न फार कमी लोकांनी  केला.

समाजमाध्यमांवरील विनोदी संदेश आणि व्हिडीओ ठरावीक काळानंतर पुन्हा पुन्हा व्हायरल होत असतात. परंतु, अशा प्रकारचे अफवा पसरवणारे आणि मनस्ताप देणारे व्हिडीओ जेव्हा व्हायरल होतात तेव्हा त्याचं गांभीर्य आपण सर्वानीच समजून घेणं आवश्यक आहे. इथे नोंद घेण्याची बाब म्हणजे अनेक पत्रकारांतर्फेच हा व्हिडीओ अनेक व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर पसरवला जात होता. त्यांच्या माध्यमातून तो सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्याने अफवेला बळ मिळालं आणि इरजा खान २०१७ मध्ये पुन्हा एकदा मृत्युमुखी पडली. समाजमाध्यमं हाताळताना आपण ज्या क्षेत्राशी संबंधित आहोत निदान त्याविषयीचे संदेश पुढे पाठवताना तरी काळजी घ्यायला हवी. पत्रकारांना तर सर्वच विषयांमधलं कळतं. पडद्यावर दिसणारं आणि पडद्यामागचं नेमकं सत्य काय आहे याची त्यांना माहिती असते. त्यामुळे त्यांनी अफवा नव्हे तर सत्य व्हायरल करण्यामध्ये हातभार लावल्यास उत्तम.

viva@expressindia.com

First Published on July 14, 2017 12:33 am

Web Title: pakistani reporter live death 92 news channel pakistan female anchor irza khan