नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

काही गोष्टींचा आपण कधी फारसा विचारच करत नाही. अमुक गोष्टीचं नाव हेच का? किंवा या नावाचा या गोष्टीशी काय संबंध? असले प्रश्न आपल्यापैकी बऱ्याचजणांना पडत नाहीत किंवा आपल्याला त्या गोष्टीशीच मतलब असल्याने नावाशी काय देणंघेणं? असा सुज्ञ विचार आपण करतो. पॅराशूट आणि नारळ तेल या दोन गोष्टी नजरेसमोर आल्यावर नेमकं हेच होतं. म्हणजे वर्षांनुर्वष हा ब्रॅण्ड आपण वापरत असतो, पण नारळतेलाचा पॅराशूटशी काय संबंध? याचा विचार फारसा डोक्यात येत नाही.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

हेअर मसाज, हेअर ऑइलिंग या संज्ञा केसांच्या निगराणीबाबतीत आजकाल महत्त्वाच्या ठरल्या असल्या तरी त्या आधी हजारो वर्षांपासून भारतीय मंडळींना केसात तेल घालायचा सोपस्कार महत्त्वाचा वाटत आला आहे. केसांना तेल लावून चापूनचोपून केस बसवण्याची फॅशन आज प्रचलित नसली तरी केसांच्या आरोग्यासाठी केसांना तेल लावणारी मंडळी अनेक आहेत. त्यामुळेच पॅराशूट कोकोनट ऑइल आणि भारतीय केसांचं नातं अतूट आहे.

हर्ष मारीवाला हा तरुण १९७१ साली बॉम्बे ऑइल इंडस्ट्री या घरच्याच व्यवसायात सामील झाला. मात्र त्याला खूप मोठं मार्केट खुणावत होतं. त्याने नारळाच्या तेलाचा व्यवसाय म्हणून गांभीर्याने विचार करायचं ठरवलं. नारळ तेलाच्या व्यवसायात नवनवे प्रयोग करायला फारसा वाव मुळीच नव्हता. पण भारतासारख्या देशात या व्यवसायाला मरण नाही हे हर्ष मारीवाला यांनी अचूक ओळखलं. नारळाचं तेल विकणाऱ्या अनेक कंपन्या होत्या पण आपलं तेल ब्रॅण्ड म्हणून कसं वेगळं ठरेल याचा विचार हर्ष करू लागले. त्यात त्यांच्या लक्षात आलं की नारळाचं तेल, बऱ्याच अंशी धातूच्या टिनमधूनच विकलं जातं. ज्यात तेल ओतताना बऱ्याचदा सांडतं. हाच मुद्दा लक्षात घेऊन त्यांनी टिनऐवजी प्लास्टिक बाटल्यांतून तेल विकण्याचा निर्णय घेतला जो त्या काळात पूर्णत: नवा होता. त्या काळात तेलाच्या बाटल्या १०० टक्के धातूच्या किंवा काचेच्याच होत्या. प्लास्टिक बाटल्यांसाठी त्यांनी आपली संशोधन टीम कामाला लावली. या टीमने दिलेला अहवाल फारसा उत्साहवर्धक नव्हता. या टीमच्या म्हणण्यानुसार त्याआधी एका कंपनीने प्लॅस्टिकच्या बाटल्यांत नारळतेल विकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या चौकोनी बाटल्या अपयशी ठरल्या, कारण उंदरांना प्लास्टिक आणि नारळतेलाचं कॉम्बिनेशन आवडलं. त्यातून खूप नासधूस झाली आणि कंपनीला उत्पादन मागे घ्यावं लागलं. हर्ष मारीवाला आणि त्यांच्या टीमने यावर उपाय म्हणून गोलाकार प्लास्टिक बाटलीच्या पर्यायाचा विचार केला आणि पॅराशूटची निळी गोलसर प्लास्टिक बॉटल नारळतेलासह अवतरली, गोलाकारामुळे उंदरांना ती पकडणं शक्य नव्हतं. यातून हर्ष यांचा आत्मविश्वास दुणावला आणि तेलाचं संपूर्ण मार्केट पत्र्यांच्या बाटल्यांकडून प्लॅस्टिकच्या बाटलीकडे वळले.

एखादा ब्रॅण्ड स्वत:च्या रूपातून अख्ख्या व्यवसायाची दिशा बदलतो तेच पॅराशूटच्या बाबतीत घडलं. शिवाय टिनपेक्षा प्लास्टिकचा खर्च खूप कमी होता. हा वाचलेला खर्च हर्ष यांनी पॅराशूटच्या जाहिरातींवर खर्च केला. आज भारतातला हा सर्वात मोठा ब्रॅण्ड आहेच, पण ज्या ज्या देशात हेअरऑइलिंगचे महत्त्व ओळखले जाते तेथेदेखील हा महत्त्वाचा ब्रॅण्ड ठरला आहे. बांगलादेशात नारळाच्या तेलाचे ६० टक्के मार्केट पॅराशूटने काबीज केले आहे. हा तिथला सगळ्यात जास्त वापरला जाणारा मोठा भारतीय ब्रॅण्ड आहे.

१९९० साली हर्ष मारीवाला यांनी मारिको कंपनी स्थापन केली. या कंपनीमार्फत अनेक खाद्यतेलंदेखील बाजारात आली. पण पॅराशूट हा नेहमीच कंपनीचा मोठा ब्रॅण्ड ठरला. पॅराशूट हेच नाव या उत्पादनाला का दिले याचे ठोस कारण नाही, पण साधारण याच काळात भारत-पाक युद्धात तसंच भारत-चीन युद्धात पॅराशूट दलाचा खूपच बोलबाला होता. पॅराशूटची खूप चर्चा होती त्यामुळे तेच नाव स्वीकारलं असा ओझरता उल्लेख येतो, पण या उत्पादनाचं नाव काहीही असो, लोकांना त्याच्या उपयोगाशी मतलब होता. आजही तेलाचं नाव ‘स्विकार’ का? असा प्रश्न आपल्याला पडत नाही. आपण वापर करून मोकळे होतो. पॅराशूटच्या आकर्षक, निळ्या, गोल आणि मुख्य म्हणजे प्लास्टिक बाटलीने हेच सिद्ध केले. नावात काय असतेपेक्षाही नाव काही असो उत्पादन दमदार पाहिजे हे या ब्रॅण्डकडे पाहून पटतं. त्या निळ्या बाटलीला, त्यावरील नारळाच्या झाडाला लोगोच्या रूपात आपण पसंती दिली आहे.

खूप जवळ धरलं की वाचता येत नाही तसंच काही वेळा खूप जवळच्या वस्तूंचं असणं जाणवत नाही. पॅराशूटबाबतीत ते म्हणता येईल. वर्षांनुर्वष भारतीयांची तैलबुद्धी शाबूत ठेवताना या तेलानेही आपल्या मनात स्निग्ध भाव निर्माण केला आहे..अगदी कायमचा!

रश्मि वारंग

viva@expressindia.com