12 December 2017

News Flash

व्हायरलची साथ : ‘रंग’ माझा वेगळा..

‘रंग माझा वेगळा’ म्हणत वाईटपणा पत्करणाऱ्या अभय देओलचा आता कोणताही सिनेमा येत नाहीये

पराग फाटक | Updated: April 21, 2017 12:35 AM

अभय देओल

 

विचारी अभिनेत्यांमध्ये गणना होणारा अभय देओल सध्या रंगलढाईत उतरला आहे. भूमिका साकारणं आणि भूमिका घेणं या दोन निसरडय़ा दगडय़ांवर पाय रोवून उभं राहण्याचा त्याचा प्रयत्न व्हायरल झालाय.

सनी आणि बॉबी देओल त्याची भावंडं आहेत. हातोडाछाप मारधाड चित्रपटांचा हिरो किंवा मठ्ठ (चेहऱ्याचा आणि डोक्याचाही) नायक होण्याचे बाळकडू घरातूनच मिळालेले. मात्र हे बाळकडू घ्यायचं सोडून काहीतरी आशयघन, समांतर, फेस्टिव्हलवाले चित्रपट केले की असे विचार सुचतात. तिकीटबारीवर शंभर कोटींचा गल्ला करणारे सिंघम, दबंग यांच्याकडून प्रेरणा घ्यावी की माणसानं. याचे चित्रपट थेट्रात येतात कधी, जातात कधी डोअरकीपरलादेखील कळत नाही. साक्षेपी समीक्षक याच्या कामाची आवर्जून दखल घेतात म्हणे. दखल घेऊन जगरहाटी चालत असती तर आयुष्य बरंच सोपं झालं असतं. बरं चित्रपटांची नाव काय तर म्हणे- ‘देव डी’, देवडी नव्हे. ‘मनोरमा सिक्स फीट डाऊन अंडर’- पिक्चर हिंदी का इंग्लिश तेही कळेना. ‘ओय लकी, लकी ओय’- म्हणजे चित्रपट बघणारे लकी की याला काम मिळालं म्हणून हा लकी. बरं वर्षांला एक पिक्चर करून आमिरदादांचं भागतं. सगळ्यांना हा फंडा जमतोय का? इतकी वर्ष इंडस्ट्रीत आहेत- नावावर किती पिक्चर- १७. नाव ‘अभय’ म्हणून कोणालाच डरायचं नाही असं म्हणून चालतं का? दारू, डिओ, हाऊसिंग प्रोजेक्ट अशा कुठल्याच जाहिरातीत दादा दिसत नाहीत. आयपीएलमध्ये टीमपण नाही मालकीची. तृतीयपर्णी विश्व अर्थात पेजथ्री सर्कलमध्येही जेमतेमच दिसतात. सोशल अपीअरन्सच नाही. आपली बातमी छापावी, टीव्हीवर दिसावी यासाठी लोक पीआर नेमतात. दादांचं इथंही उलटंच. मीडियाला दूर लोटतात. ब्रँड बिल्डिंगसाठी सिक्स पॅक वगैरे तर तसलंही काही नाही. घरकर्ज हप्ता आणि तत्सम असंख्य समस्यांनी वेढलेले मध्यमवर्गीय असतात ना तसे दिसतात. हिरो मटेरियलच नाही. बरं दादा इश्क, मोहब्बतवाली गाणी गात झाडांमागे पळत नाहीत. मॅरेथॉनमध्ये धावत नाहीत, गावभर बोभाटा करून चॅरिटी डोनेशन प्रोग्रॅममध्येही नसतात. आणि वरती भूमिका घेतात. मोजकं काम करतात त्या भूमिका नव्हे. भूमिका म्हणजे स्टँड घेणं (सोप्या मराठीत सांगितल्याशिवाय कळतच नाही हल्ली).

त्वचा उजळ करून देण्याचा दावा करणाऱ्या म्हणजेच पर्यायाने रंगभेदाला खतपाणी घालणाऱ्या क्रीम, लोशन्सविरुद्ध अभयदादांनी एल्गार पुकारला. काळ्यापासून सावळा, सावळ्यापासून गव्हाळ, गव्हाळपासून उजळ अशा संक्रमणाची हमी देणाऱ्या जाहिराती आणि त्यात काम करणारे बॉलीवूड कलाकार दादांच्या रडारवर आहेत. किंग खानपासून दीपिका पदुकोणपर्यंत सगळ्यांना दादांनी धारेवर धरलंय. निसर्गाने दिलेला कोणताही रंग चांगलाच असतो. प्रगती करायची असेल तर गोरंच असायला हवं हा अट्टहास का असा दादांचा सवाल आहे. बॉलीवूड अभिनेते-अभिनेत्रींना प्रचंड फॅनफॉलोइंग आहे. त्यांनी सांगितलं तर चाहते वेगळा मार्गही पत्करू शकतात. परंतु सगळेच भेदभाव वाढवत आहेत असा दादांचा आरोप आहे. फेसबुकवर एका प्रदीर्घ पोस्टद्वारे अभयरावांनी तथाकथित रंग उजळवणाऱ्या मंडळींना सोलून काढलं आहे. यापैकी कोणाविरुद्धही वैैयक्तिक शत्रुत्व नाही हे दादांनी आवर्जून स्पष्ट केलं आहे. अशी भूमिका घेणारे दादा पहिले नाहीत. पण दादांनी नावं घेऊन जाहिरातींच्या स्क्रीनशॉटसह टीका केली. बॉलीवूडमध्ये ऑलरेडी गटतट आहेत. प्रवाहाविरुद्धच्या मतामुळे अभयदादांना रोल न मिळण्याचीच शक्यता वाढली आहे. सोशल मीडियावर शेरास सव्वाशेर भेटतो. मसक्कली सोनम कपूरने इशा देओलच्या अर्थात अभयदादांच्या बहिणीचा अशाच क्रीमच्या जाहिरातीतला फोटो अपलोड केला. दादांनी तिचंही चुकलंच आहे असं सांगितलं.

सौंदर्य स्पर्धामध्ये गोरेपणा प्रमाण मानला जातो. आपले हिरोहिरॉइन प्रामुख्याने गोरेच असतात. चॅनेल्सवरचे अँकरही उजळवर्णाचेच असतात. हल्ली गायक-गायिकेचं दिसणं महत्त्वाचं झाल्याने त्यांनाही मेकअप करून सुसंगत केलं जातं. मॅट्रिमोनिअल कॉलम चाळले तर अतिशिक्षित आणि उच्चभ्रू वर्गात मोडणाऱ्या वराला गोरीच वधू हवी असते. लहान बाळांच्या जाहिरातीमधली मुलंही गोऱ्या रंगाचीच असतात. सत्ताधारी पक्षाचेच खासदार उत्तर आणि दक्षिण भारतीय वादावर बोलताना रंगावर घसरतात. राजधानी दिल्लीत आफ्रिकन देशांतील नागरिकांवर काळ्या रंगामुळे सशस्त्र हल्ले होतात. गोरा रंग प्रगतीचा, काळा-सावळा रंग न्यूनगंडाचा, पिछाडीवर पडण्याचा असे तट व्यवस्थेनेच पाडलेत तर कोणाकोणाविरुद्ध बंड करणार. बरं हे रंगांचं झालं. पेपरलेस, कॅशलेसच्या जमान्यातही शाळा, कॉलेजपासून कोणत्याही सरकारी फॉर्मपर्यंत सगळीकडे जातीचा रकाना भरावा लागतो. भक्तीचा बाजार झालेल्या देवळांमध्ये पैसावाइज रांगा असतात. शेतकऱ्याला कर्ज मिळेल की नाही याची शाश्वती नसते परंतु सुखवस्तू नोकरदार माणसाला गाडीकर्जासाठी बँकेकडून लकडा लावला जातो. समानतेचे वारे वाहत असतानाच महिलांना बेसिक हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो. तुम्ही काटेकोरपणे सीटबेल्ट, हेल्मेट फॉलो करत असताना एखादा धनदांडगा बेदरकारपणे गाडी चालवत तुम्हाला यमसदनी धाडू शकतो. समाजात विचारांकुर रुजवणाऱ्या धुरिणांची हत्या होते. मारेकरी मिळत नाहीत आणि त्याच वेळी झोलार बाबाबुवा राजकीय आशीर्वादाने सुशेगात असतात. आपल्याला तोडणाऱ्या उदाहरणांची मालगाडीच मांडू शकतो.

‘रंग माझा वेगळा’ म्हणत वाईटपणा पत्करणाऱ्या अभय देओलचा आता कोणताही सिनेमा येत नाहीये. त्यामुळे हे प्रमोशन गिमिक नाही. अभयदादांच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळतोय. मात्र रंग बदलून देणाऱ्या क्रीमच्या जाहिराती कमी झालेल्या नाहीत. तुम्ही कोणत्या रंगाचे? का रंगबदलू गिरगीट ऊर्फ सरडा हीच तुमची निशाणी!

viva@expressindia.com

First Published on April 21, 2017 12:35 am

Web Title: parag phatak article on actor abhay deol