News Flash

‘जग’ते रहो : फिट अ‍ॅण्ड फाइन

मी आणि माझा नवरा करण साडेतीन वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्ताने सिअ‍ॅटलमध्ये आलो,

सिअ‍ॅटल, यू.एस.ए.

शारदा आचार्य-मतनानी (सिअ‍ॅटल, यू.एस.ए. )

सिअ‍ॅटल हे अमेरिकेच्या वायव्य कोपऱ्यातील आत्ताआत्तापर्यंत दुर्लक्षित असलेलं शहर. डोंगराळ भाग, समुद्रकिनारा आणि त्यामुळे वर्षांतील जवळजवळ सहा महिने पाऊस, घनदाट जंगल यामुळे मासेमार आणि लाकूडतोडे सोडून इथे एके काळी फारसं कुणी फिरकत नसे. हेच शहर सध्या ‘टेक हब’ म्हणून नवीन ओळख मिरवत आहे. त्याची सुरुवात झाली ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘बोइंग’ या दोन कंपन्यांमुळे! आता हेच ‘टेक हब’ अ‍ॅमेझॉन, गुगल, फेसबुक या सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांना आकर्षित करतं आहे.

सिअ‍ॅटल हे अमेरिकेच्या वायव्य कोपऱ्यातील आत्ताआत्तापर्यंत दुर्लक्षित असलेलं शहर. डोंगराळ भाग, समुद्रकिनारा आणि त्यामुळे वर्षांतील जवळजवळ सहा महिने पाऊस, घनदाट जंगल यामुळे मासेमार आणि लाकूडतोडे सोडून इथे एके काळी फारसं कुणी फिरकत नसे. हेच शहर सध्या ‘टेक हब’ म्हणून नवीन ओळख मिरवत आहे. त्याची सुरुवात झाली ‘मायक्रोसॉफ्ट’आणि ‘बोइंग’ या दोन कंपन्यांमुळे! आता हेच ‘टेक हब’ अ‍ॅमेझॉन, गुगल, फेसबुक या सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांना आकर्षित करतं आहे.

मी आणि माझा नवरा करण साडेतीन वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्ताने सिअ‍ॅटलमध्ये आलो, ते न्यूयॉर्कमधून. त्याआधी न्यूयॉर्क सिटीमधील ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी’मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयात शिक्षण घेत होतो. न्यूयॉर्कसारख्या गजबजलेल्या शहरातून सिअ‍ॅटलमध्ये आल्यावर करमेल का, अशी शंका मनात होती; पण सहा महिन्यांतच आम्ही दोघं या शहराच्या प्रेमात पडलो. पहिलं कारण होतं इथली फ्रेण्डली माणसं! लिफ्टमध्ये, दुकानात लोक कायम विचारपूस करतात, हसतात. त्यांना बोलायला आवडतं. न्यूयॉर्कमध्ये शेजारच्याचा कधी चेहराही पाहिला नसल्यामुळे इथल्या शेजाऱ्यांनी घरी जेवायला बोलावलेलं पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. नुसतंच जेवण नव्हे, तर पदार्थ आवडले म्हणून ते डब्यात घालून घरी पाठवले. हा शेजारधर्म कमी म्हणून की काय म्हणून गावाला गेल्यावर एकमेकांची पत्रं, पेपर गोळा करून घरी ठेवणं, कधी बोटिंगला नेणं असं सुरू झालं.

सिअ‍ॅटलकरांची एक खासियत म्हणजे आऊ टडोअर आणि कॉफी लव्हर्स! कॅस्केड माऊंटन रेंजमधला सगळ्यात उंच पर्वत म्हणजे ‘माऊंट रेनीअर’ हा वॉशिंग्टन स्टेटमध्ये आहे. हा पर्वत म्हणजे सिअ‍ॅटलच्या स्कायलाइनचा दागिना. शेकडो गिर्यारोहक दरवर्षी हा पर्वत सर करण्यासाठी जगभरातून येतात. साहजिकच इथल्या तरुणाईला (तरुणाईचा वयोगट २०-६० वर्षे!) लहानपणापासून ट्रेकिंग, माऊंटन बायकिंग, बॅक पॅकिंग याची सवय आणि जबरदस्त हौस! बॅक पॅकिंग म्हणजे सकाळी ट्रेक करायचा, रात्री टेंटमध्ये झोपायचं, दुसऱ्या दिवशी परत नवीन ट्रेक करायचा. खाणं, पाणी, चूल हे सगळं बरोबर घेऊन जायचं. या बॅक पॅकर्सचं इथे वेगळंच विश्व आहे. रात्री टेंट उभा करण्यासाठी परमिट लागतं. त्यासाठी लोक तासन्तास लाइनमध्ये उभे असतात. वर्षभराची परमिट्स काही मिनिटांत ऑनलाइन बुक होतात. माझ्यावर आणि करणवर या आऊटडोअर संस्कृतीचा बराच प्रभाव पडला. गेल्या वर्षी आम्ही १३ माऊंटन पीक्स सर केली. दर महिन्याला एक असं आमचं टार्गेट असायचं. हिवाळ्यात बऱ्याचदा डोंगरावर बर्फ असतो. त्यासाठी स्पेशल काटेरी बूट मिळतात. ते घालून ‘स्नो हायकिंग’ करता येतं. दरवर्षी मे महिना ‘बाइक एव्हरीव्हेअर’ महिना असतो. बाइक म्हणजे सायकल, मोटर बाइक नव्हे. मे महिन्यात तुम्ही किती मैल सायकल चालवलीत, किती लोकांना सायकल चालवण्यासाठी उद्युक्त केलंत त्याप्रमाणे बक्षिसं मिळतात. मी मे महिन्यात सकाळी सायकल घेऊन ऑफिसला जायचे. लोक बाइक लेनशेजारी स्टॉल टाकून ठेवत. स्टॉलवर कधी कटलेट, बिस्किटं, चेरीज वगैरे ठेवत. काहीही मोबदल्याची अपेक्षा न करता.

एकदा मी आणि करण सायकल घेऊन बरेच दूर गेलो. अंधार पडल्यामुळे ठरवलं बसने परत जायचं. इथे बसच्या समोर ३ सायकल ठेवायची सोय असते. सायकल नसल्यास स्टॅण्ड फोल्ड केलेला असतो. आम्हाला स्टॅण्ड कसा वापरायचा ते माहिती नव्हतं. बस आली, आम्ही स्टॅण्ड उघडायचा प्रयत्न केला; पण तो काही आमच्याने उघडेना. बरं, न्यूयॉर्कच्या गर्दीमध्ये ड्रायव्हरला कुठलाही प्रश्न विचारल्यावर तो चिडणार, हे माहिती होतं नि तेच डोक्यात होतं. त्यामुळे आम्ही काही विचारायच्या नादाला लागलो नाही; पण आमचे प्रयत्न आणि धडपड पाहून ड्रायव्हरने बस पार्किंग मोडवर टाकली आणि तो खाली उतरला. त्याने आम्हाला स्टॅण्ड ओपन कसा करायचा ते दाखवलं. त्यावर सायकल कशी लोड करायची तेही सांगितलं. त्यानंतर दुसरी सायकल दाखवून म्हणाला की, ‘आता तुम्ही लोड करा बघू, बरं.’ हे सगळं झाल्यावर ‘फर्स्ट टाइम कॅन बी कन्फ्युसिंग,’ असं म्हणून आत बसला. हे सगळं होईपर्यंत बसमधले लोक शांतपणे बसले होते.

इथल्या खाद्यविश्वाबद्दल बोलायचं झालं, तर सुरुवात होते कॉफीपासून. सिअ‍ॅटलमधल्या ‘पाइक्स प्लेस मार्केट’मध्ये (इथली मंडई) जगातलं पहिलं ‘स्टारबक्स’ सुरू झालं. कॉफी हे फक्त पेय नसून एक कल्चर आहे. कॉफी शॉप्सचा उपयोग अभ्यास करणं, काम करणं, थेरपिस्टची अपॉइंटमेंट घेणं, क्वॉलिटी टाइम गप्पा मारणं अशा असंख्य गोष्टींसाठी केला जातो. फक्त ‘स्टारबक्स’ नव्हे, तर बाकी अनेक लोकल कॉफी शॉप्स जोरात चालतात. बाकीही तसं ‘लोकल’ गोष्टींचं महत्त्व ‘ग्लोबल’ किंवा ‘इम्पोर्टेड’ गोष्टींपेक्षा जास्त आहे. सध्या ‘व्हेजिटेरिअन’ लोकांचं प्रमाण वाढत आहे. बरीच ‘व्हेगन’ रेस्तराँ आहेत. ‘व्हेगन’ म्हणजे कुठलेही प्राणिजन्य पदार्थ (दूध, बटर किंवा तत्सम) खायचे नाहीत. रेस्तराँमध्ये ‘व्हेजिटेरिअन सेक्शन’ तर हमखास असतो. इतकंच काय तर ‘फुल टिल्ट’ नावाचं फेमस आइस्क्रीमचं दुकान आहे. तिथे व्हेगन आइस्क्रीम मिळतं. हे आइस्क्रीम सोयाबीन किंवा बदामाचं दूध वापरून तयार केलं जातं. ठरावीक भारतीय रेस्तराँ आढळतात, पण सी फूडच्या मुबलकतेमुळे जपानी, कोरीयन, चायनीज खाद्यसंस्कृती जास्त प्रचलित आहे.

तरुण मंडळी बहुतांश वेळा अठराव्या वर्षीच घराबाहेर पडतात. इथे राहणारे दुसऱ्या पिढीतील भारतीय आणि आशियायी लोकसुद्धा पालकांपासून दूर राहाणं पसंत करतात. तरुणांना स्वत:ची कणखर मतं आहेत. कितीही फ्रेण्डली असले, तरी पर्सनल स्पेसचं भान असतं आणि पालकांनीसुद्धा पर्सनल स्पेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आवडत नाही. तरुणवर्ग फिटनेसला खूप महत्त्व देतो. फॅशनपेक्षा फिटनेस आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता अधिक आहे. इथले बॅक पॅकर्स ‘लीव्ह नो ट्रेस’ नियम पाळतात. म्हणजे जाल तिथून निघताना ती जागा जशी होती तशी राहिली पाहिजे. गंमत म्हणजे ‘स्नो कॅम्पिंग’ करताना स्वत:चा मलसुद्धा स्वत:च्या बॅगेतून परत आणावा लागतो. हेल्थ कॉन्शिअस असल्यामुळे इथल्या रॅलीसुद्धा ‘कॅन्सर रीसर्च’साठी फंड रेझिंग, ‘केमिकल्सवाली द्राक्षं नकोत’, अशा स्वरूपाच्या असतात.

इथे दिवस लवकर सुरू होतो. सकाळी सात-आठ वाजता कामाला सुरुवात करून पाच वाजेपर्यंत घरी निघण्याकडे कल असतो. कामाबरोबर दिवस संपायच्या ऐवजी कामानंतर नाटक पाहाणं, जिमला जाणं, मुलांबरोबर वेळ घालवणं अशा दिनक्रमासाठी लोक प्रयत्न करतात. सिअ‍ॅटलमध्ये पॉप म्युझिक आणि जॅझ जास्त लोकप्रिय आहे. लोकल आर्टिस्ट्स कधी कॅ फे, कधी रेस्तराँ किंवा कधी स्वतंत्र शो करून आपली कला रसिकांपुढे सादर करतात. ‘कॅपीटॉल हिल’ नावाची जागा पार्टीप्लेस म्हणून मानली जाते. पब्स आणि बार रात्री दोन वाजेपर्यंत सुरू असतात. पब्स मुलींसाठी खूप सुरक्षित आहेत. रात्री उशिरापर्यंत मुली एकटय़ा हिंडत असल्या तरी कोणीही त्यांच्या वाटेला जात नाही.

सिअ‍ॅटलमध्ये अनेक लोक भेटले, ज्यांच्या एका भेटीमुळे काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. सायकल चालवताना एकाच रुटवर दिसणारे काका म्हणून जी ओळख झाली, त्यातून मायक्रोसॉफ्टच्या ‘बाइक टीम’चा भाग व्हायची संधी मिळाली. या काकांचं वय पन्नास. बॅक पॅकिंगला गेल्यावर आमच्या मागून येऊ न पुढे जाणारं जोडपं भेटलं. त्यांनी कुठल्या झऱ्याचं पाणी प्यावं याबद्दल सूचना दिल्या. त्याचं वय वर्ष होतं साठ. असं हे खऱ्या तरुणांचं शहर. तुमचं वय वर्ष काहीही असो, तुम्हालाही तरुण बनवेल!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 1:15 am

Web Title: place to visit in seattle city in america
Next Stories
1 हॅट्स ‘ऑन’
2 भाषेचा ‘नाद’खुळा!
3 मालिका, ती आणि फॅशन
Just Now!
X