व्यक्त होणे ही मानवाची आंतरिक गरज आहे. हे व्यक्त होण्याचे मार्ग प्रत्येकाचे निरनिराळे असू शकतात; कुणी कवितेतून व्यक्त होते, कुणी कथेतून, कुणी चित्रातून, तर कुणी पत्रातून. साठलेल्या, दाटलेल्या भावनांना वाट करून रिकामे होणे आणि पुन्हा नवीन अनुभवांना सामोरे जाणे हे कुठल्याही संवेदनशील व्यक्तीचे लक्षण आहे. आज भावना तीच असली तरी व्यक्त होण्याची माध्यमं आणि या माध्यमांसोबतच व्यक्त होण्याची साधनं बदलत आहेत. पूर्वी जो मजकूर कागदावर वाचला जायचा तोच आज काचेवर वाचला जातो. पूर्वी जे जाहीर कार्यक्रमातून व्यक्त होत होते, ते सहज आज पॉडकास्ट या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.

फेसबुक, ट्विटर ही माध्यमे आता अगदी घरातल्या जवळच्या व्यक्तीप्रमाणे समाजात रुजली आहेत, रुळली आहेत. आपल्या परिचयात अनेक जण असतील जे दिवसभरात त्यांच्या मनाचे अनेक कवडसे फेसबुकच्या ‘स्टेटस’ या पर्यायाचा वापर करून व्यक्त होताना दिसतात. उत्स्फूर्त लेखकांसाठी ब्लॉगिंगचा उत्तम पर्याय आज उपलब्ध झाला आहे. स्वत:च्या आवडीचे लिखाण करता करता अनेकांचा तो व्यवसाय बनला आहे. भटकंती, खाद्य, उद्योग, साहित्य या विषयांवर पूर्ण वेळ लिखाण करणाऱ्या ब्लॉगर्सना संपर्क करून, योग्य ते मानधन देऊन संबंधित विषयांवर लिहायला सांगितले जाते आणि यातूनच त्यांना प्रसिद्धी, अधिक उत्पन्न  दोन्हीही पुरेपूर मिळते, म्हणूनच लेखनाकडे आज अनेक जण व्यवसाय म्हणून पाहात आहेत ही एक सकारात्मक बाब आहे. या माध्यमांतराचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा की तुमच्यामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये कुठलाही अडथळा उरत नाही. तुमचे नाणे खणखणीत असेल तर सहज तुम्ही लोकांचे लाडके होऊ शकता.

What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

आज लोकांचे व्यक्त होणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हे फेसबुकसारख्या माध्यमांचे देखील उत्पन्नाचे साधन बनले आहे. तुम्हाला तुमचा संपर्क वाढवायचा असेल तर तुम्ही फेसबुकला योग्य ती किंमत देऊन तुमचा हेतू साध्य करू शकता. डिजिटल मार्केटिंग ही संकल्पना आज तेजीने वाढते आहे. तुमचे अस्तित्व आणि वावर या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये असणे आज काळाची गरज बनले आहे. आपण व्यक्त होण्याच्या माध्यमांतील घडलेला बदल पाहिला, पण हे व्यक्त होणे ज्या साधनांमुळे शक्य होते त्या साधनांवर प्रकाश टाकणेदेखील गरजेचे वाटते. साधेच उदाहरण घ्यायचे झाले तर आजच्या तरुण पिढीतील कवीचे घेता येईल. कवीला कविता किंवा कवितेची ओळ ही विजेसारखी अचानक सुचून जाते. ही सुचलेली ओळ त्याक्षणी निसटली तर एखाद्याकडून कदाचित त्याची होऊ  शकली असती अशी आयुष्यातील उत्तम दर्जाची कविता हरवून जाऊ  शकते. आज मोबाइल हे साधन त्याचा गाभ्यातील वापराव्यतिरिक्त इतर कारणांकरिताच जास्त वापरले जाते. अशा वेळी कवीला सुचलेली ओळ जर त्याला तत्क्षणी मोबाइलच्या एखाद्या ‘नोट’सारख्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये लिहून ठेवता आली आणि तेव्हा वेळ नसल्यास नंतर त्यावर चिंतन करून संपूर्ण कविता लिहिली, तर त्यासारखी आनंदाची गोष्ट त्याच्यासाठी दुसरी कुठलीही नसेल. तेव्हा ज्या काळात मोबाइलसारखे अनेकोपयोगी साधन उपलब्ध नसताना थोरामोठय़ांच्या अशा कित्येक कविता, कथा, विचार, संकल्पना निसटून गेल्या असतील याचा विचार संवेदनशील माणूस आज करू शकतो.

पुन्हा एकदा फेसबुक या माध्यमातून ‘लाइव्ह’ जाणे आज मोबाइलसारख्या साधनामुळे शक्य झाले आहे. केवळ मोबाइलच नव्हे तर जास्तीत जास्त स्पष्टता चित्रात यावी याकरिता नवनवीन व्यावसायिक कॅमेरांचा वापर साधन म्हणून केला जातो. पूर्वी लिखाणकाम झाल्यानंतर तो प्रकाशकाकडे पोहचेपर्यंत लेखकाच्या मनात धाकधूक असायची. आज गुगल इनपुट टूल्ससारख्या साधनामुळे तुमच्या स्वत:च्या मातृभाषेतून लॅपटॉपवर तुम्ही मजकूर लिहू शकता आणि क्षणार्धात ई-मेलच्या साहाय्याने तो अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकता. तुमच्या घरातील भला मोठा कोपरा व्यापणारे पुस्तकांचे कपाट आज ‘किंडल’ नामक वीतभर साधनामध्ये सुरक्षित राहते.

साधन आणि माध्यमं आज बदललेली आहेत, पण माणसाची व्यक्त व्हायची ओढ बदललेली नाही. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या ओढीने आपआपले माध्यम जवळ केले आहे. त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य प्रकारे दिशा देण्याची संधीही आज त्यामुळे प्राप्त झाली आहे. एकीकडे बदलत्या माध्यमांमुळे हरवत चाललेला पुस्तक-पत्रांचा वास्तव स्पर्श, लिहिणाऱ्याचं हस्ताक्षर, त्यातून व्यक्त झालेल्या भावना, पुस्तकात जपून ठेवलेली एखादी खूण यामुळे काळजात जिवंत होणाऱ्या कोपऱ्याचे स्मरणरंजन आहे. तर दुसरीकडे या माध्यमांतराचा फायदाही नाकारता येत नसल्याने अभिव्यक्तीचे हे शस्त्र जास्तीत जास्त प्रभावीपणे वापरून पुढे जाण्याशिवाय मार्ग नाही हे वास्तवही नाकारता येणारे नाही.

माध्यमातील बदल ह्य़ा प्रक्रियेकडे मी फार सकारात्मकदृष्टय़ा बघतो. पूर्वी जाहिरातक्षेत्रात प्रिंट आणि टीव्ही कमर्शियल्सचा पगडा सर्वाधिक होता. पण आता इंटरनेट आल्यापासून अ‍ॅडव्हर्टायझिंगमध्ये विविध शाखांचा उगम झाला आहे. फक्त मार्केटिंग नव्हे तर डिजिटल मार्केटिंग अशी नवी शाखा जन्माला आली आहे जिचे वेगळे नियम आहेत. आज फॉरमॅटसुद्धा बदलले आहेत. म्हणजे इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हिडीओज जाहिरातरूपाने आज बनवले जातात. सोशल मीडिया हा जाहिरातींसाठी सर्वाधिक वापरलं जाणारं माध्यम आहे.

संकेत म्हात्रे, ठाणे

कविता कधीही, कुठेही सुचू शकते. प्रत्येक वेळी आपल्याकडे कागद, पेन असेलच असे नाही, परंतु खिशात स्मार्ट फोन असतो. त्यामुळे त्याक्षणी सुचलेल्या ओळी नोंदवता येतात वा त्यात आपल्या सवडीनुसार एडिटच्या पर्यायाने हवे ते बदलसुद्धा करता येतात. फोनमध्ये कट पेस्टच्या माध्यमातून तुम्ही खाडाखोड न करता कितीही वेळा बदल करू  शकता. तसेच या नोट्स गुगलशी सिंक केल्यास त्या गुगल ड्राइव्हवर सुरक्षित राहतात. त्यामुळे कवितेचा कागद वा वही गहाळ होण्याचा धोका संभवत नाही. त्यामुळे कागदाचा अपव्यय टाळण्याचे हे इकोफ्रेंडली माध्यम नक्कीच महत्त्वाचे आहे.

गीतेश गजानन शिंदे, ठाणे

मी काही वर्षांपूर्वी माझा छंद जोपासण्यासाठी ब्लॉगिंग सुरू केले, परंतु आज याच ब्लॉगिंगमुळे मला स्वत:ची अशी वेगळी ओळख मिळाली आहे. माझे इतिहासावरील लेख आज अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात. त्यांच्या प्रतिक्रिया मला अधिक लेखन करण्याचे बळ देतात.

कौस्तुभ कस्तुरे, बदलापूर

viva@expressindia.com