News Flash

‘पॉप्यु’लिस्ट : प्रवासाची गाणी

ट्रेसी चॅपमनच्या ‘फास्ट कार’ या गाण्याला उत्तम प्रवास गाणे म्हणून अनुभवता येऊ  शकते. १

(संग्रहित छायाचित्र)

भारतात पॉप म्युझिकची चळवळ जेव्हा काही वर्षांसाठी स्थिर झाली होती, तेव्हा त्यातील हिट गाण्यांत एक कमालीचे साम्य होते. त्या साऱ्या गाण्यांच्या चित्रिकरणापासून शब्दांपर्यंत प्रवासाचा संदर्भ ठासून भरलेला होता. यातील कलाकार मंडळी प्रवासाशी, नवे जग-नवी माणसे आणि नवे अनुभव यांच्याबाबत आसक्त असल्याचे तपशील त्यांच्या गाण्यांमधून उमटत होते. लकी अलीच्या सुनोपासून अक्सपर्यंतच्या सर्वच अल्बम्समध्ये प्रवास दिसतो. सिफरमधील त्याच्या ‘देखा है ऐसे भी’ गाण्यामध्ये अमेरिकेतील महामार्गामधील प्रसिद्ध ‘रुट सिक्स्टी सिक्स’चे कित्येक दृश्यदाखले सापडतात. अर्थात, या कलाकाराची सद्दी अक्सनंतरच्या सुमार अल्बम्सपर्यंत संपली असली, तरी तोवर भारतातील पॉप संगीताचा प्रवास थंडावला होता. तरी युफोरियाच्या ‘धूम’, ‘मायेरी’, सिल्क रूटच्या ‘जादूू-टोना’, मेहनाझच्या ‘मौसम’ आणि कित्येक कलाकारांच्या गाण्यामध्ये प्रवास सापडू शकेल.

मोबाइलयुग अवतरल्यानंतर आपल्या देशातील शहरगावांमध्ये सार्वजनिक वाहतूक यंत्रणांतून प्रवासाचा वेळ सुकर करण्यासाठी आबालवृद्धांमध्ये संगीतश्रवणाची सारखीच ओढ दिसते. उपनगरीय लोकलगाडय़ांमध्ये स्वस्तात मस्त हेडफोन्स विकणारी यंत्रणा या संगीतभक्तांमुळेच सुरू झाली. संतोषी मातेची आरती, गणपती नमन, गायत्रीमंत्रापासून ते सेहगल, तलत, रफी-मुकेश-किशोर-लता-आशा अशा अठरापगड श्रावकांच्या आपापल्या प्रवास संगीताची यादी मोबाइलमध्ये तयार असते. पण प्रवासात निव्वळ प्रवासावर तयार करण्यात आलेल्या गाण्यांचे जगभरामध्ये बरेच अभिजात पर्याय इंग्रजी गाणी ऐकणाऱ्यांना सापडू शकतात.

लकी अलीच्या ‘देखा है ऐसे भी’ गाण्यातील चित्रिकरणामध्ये रूट सिक्स्टी सिक्स सातत्याने का दिसते, त्याला या रस्त्याचा पूर्वेपासून पश्चिमेकडे जोडणारा इतिहास आहे. जवळजवळ १९ प्रदेशांना जोडणाऱ्या या ‘रूट सिक्स्टी सिक्स’ची निर्मितीच अमेरिकेच्या मंदीउत्तर काळात झाली. रोजगारासाठी पाहिल्या जाणाऱ्या या आशादायी रस्त्यावर नॅट किंग कोल या कृष्णवंशीय गायकाचे ‘रूट सिक्स्टी सिक्स’ हे गाणे प्रसिद्ध आहे. १९४६ साली तयार झालेल्या या गाण्याचे चक बेरीचे व्हर्शन आहे, तसेच अलीकडच्या जॉन मेयरचेही व्हर्शन उपलब्ध आहे. गिटार, पियानो यांच्या सुंदर मिश्रणासोबत या मार्गावरून जाताना लागणाऱ्या प्रदेशांची सारी नावे ऐकायला मिळतात.

जॉन मेयर या गायकाचे ‘युवर बॉडी इज वंडरलॅण्ड’ हे गाणे सर्वोत्तम असले, तरी त्याच्या ‘क्लेअरिटी’ या प्रवास गाण्याला आवर्जून पाहावे आणि ऐकावे. मेयरच्या प्रत्येक गाण्यात गिटारचा अत्यंत सुंदर वापर असतोच. गिटारच्या टय़ुनिंग्जमध्ये फेरफार करून तयार करण्यात आलेल्या फरकासोबत त्याने गाण्यात केलेला प्रयोगही या गाण्यात सुखावह अनुभव देतो.

ट्रेसी चॅपमनच्या ‘फास्ट कार’ या गाण्याला उत्तम प्रवास गाणे म्हणून अनुभवता येऊ  शकते. १९८८ च्या दरम्यान तयार झालेल्या या गाण्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. संपूर्ण गाणे आयुष्य नव्याने सुरू करण्याविषयी आहे. गाडीचा वेग वाढवत चांगल्या आयुष्याची स्वप्ने रचणाऱ्या या शब्दांना गिटारच्या एकाच तुकडय़ावर सातत्याने फिरवत जोमदार परिणाम साधला आहे. सुश्राव्य गाण्यांच्या शोधात असणाऱ्यांना हे गाणे पहिल्याच ऐकण्यात आकर्षून घेते.

आपल्या अंधत्वावर मात करीत साठच्या दशकात सुपरस्टार गायक बनलेल्या रे चार्ल्स याचे ‘हिट द रोड जॅक’ हे प्रवासगाणे आपल्याकडे टीव्हीवर लागणाऱ्या काही जाहिरातींमध्ये गेल्या दशकात उत्तमरीत्या वापरले गेले होते. या गाण्यातील महिला कोरस आणि चार्ल्सची उत्साहपूर्ण गायकी यांमुळे जगभरातील अभिजात गाण्यांच्या यादीत त्याला मानाचे स्थान आहे.

फिलिप फिलिप्स या गायकाला अमेरिकेतर देशात प्रसिद्धी मिळण्याचे फारसे कारण नाही. अमेरिकी आयडॉल वगैरे झाल्यानंतर त्याने काही गाणी तयार करून प्रकाशित केली. त्यातील ‘होम’ या प्रवासगाण्याने यूटय़ुबच्या माध्यमातून जगभरामध्ये लोकप्रियता मिळविली. त्याचे ‘गॉन गॉन गॉन’ हे गाणेही आवर्जून ऐकावे. दोन्ही गाणी उत्साहवर्धनाचे काम करू शकतील.

‘लिव्हिंग ऑन ए जेट प्लेन’ नावाचे पीटर-पॉल अ‍ॅण्ड मॅरी या त्रिकुटाचे जुने गाणे श्ॉण्टेल क्रेविअ‍ॅझूक या कॅनडियन गायिकेच्या व्हर्शनमध्ये ऐकणे म्हणजे कर्णसुख आहे. मूळ गाण्यातील चालीला अधिक आकर्षक आणि ध्वनीप्रयोगांनी सजवून हे गाणे गायले गेले आहे.

प्रत्येक मूड आणि प्रसंग एखाद्या गाण्याने सजविणाऱ्या भारतीय चित्रसंगीताने प्रभावित झालेल्या आपल्या आयुष्यात मर्यादित संगीतकप्पे आहेत. त्यांना अमर्याद करायचे असेल, तर आपण कधी काय ऐकतो, याचा नीट विचार करायला हवा. अन् यासाठी संगीतज्ज्ञ असण्याचीही गरज नाही. वैविध्यपूर्ण संगीताने कान परजून घेतला, तर आपला श्रवणप्रवास नेहमी सुखाचा होऊ शकतो.

म्युझिक बॉक्स

NAT KING COLE – ROUTE 66

John Mayer – Clarity

Fast Car- Tracy Chapman

Phillip Phillips – Home

Chantal Kreviazuk – Leaving On A Jet Plane

The Passenger- Iggy Pop

Take Me Home, Country Roads – John Denver

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 1:22 am

Web Title: pop music latest english songs hollywood best songs
Next Stories
1 ‘कट्टा’उवाच : ओओटीडी
2 ‘जग’ते रहो : फिट अ‍ॅण्ड फाइन
3 हॅट्स ‘ऑन’
Just Now!
X