हिंदू चित्रपटांमध्ये जी गाण्यांची बांधणी पूर्वी पटकथेला अनुसरून केली जाई, तीत माफीछटांना वाव हा नायक-नायिकेंच्या गैरसमज परिवर्तनासाठी असे. म्हणजे नायिका तोंड वेंगाडण्याचा उत्कृष्ट आविर्भाव चेहऱ्यावर आणि, नायक नृत्यादी कलेत आपण किती निपुण आहोत हे दाखवत तो गानकौशल्यातील तरबेजपणाही सादर करी. म्हणजे नायक पटकथेत नृत्यकार किंवा स्वरसाधक नसला तरी त्याच्या या गुणांचे अतिरिक्त दर्शन प्रेक्षकांना पाहायला मिळे. देव आनंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ते ‘खाना’वळीतील प्रत्येक नायकाला नायिकेसमोर गान-नतमस्तक करणारे एकतरी गाणे सहज सापडू शकेल. तर रागावलेल्या नायिकेला मनवण्यासाठी माफीनाम्याचा महोत्सव अनुभवलेल्या आपल्या कानांना ‘रुठ ना जाना तुमसे कहू तो’ या  ‘१९४७ ए लव्ह स्टोरी’तल्या किंवा ‘रूठ के हमसे कभी’ या ‘जो जिता वोही सिकंदर’मधील गाण्यातला फरक लक्षात येऊ शकेल. चाल आणि वाद्यसंगतीची विलक्षण सूरसंगती या गाण्यांमधून माफीचा आशय अधिक प्रखर करतात. इंग्रजी गाण्यांमधील माफीनामाही बॉलीवूड गीतांसारखा अधिकाधिक ‘शोबाजी’ करणारा असतो. पण या दिखाऊपणातून काही उत्तम गाणी झाली आहेत.

मॅडोना या गायिका आणि नायिका म्हणता येईल, अशा ललनेने ऐंशीच्या दशकात गानसामर्थ्यांसह आपल्या अंगच्या सर्व गुणांना वाव देत प्रसिद्धी मिळविली. ‘मटेरिअल गर्ल’ या गाण्यामुळे ते बिरूद कायम पुढच्या दोन पिढय़ांच्या गानशौकिनांपर्यंत मिरवणारी ही गायिका अद्याप गानसक्रिय आहे. निकी मिनाझ किंवा एम.आय.ए. यांच्याबरोबरची तिची गाणी ऐकावीच अशी खास आहेत. आपल्या कारकीर्दीविषयीचा, जगण्याविषयीचा, सेलिब्रेटीपदाविषयीचा माजयुक्त आविष्कार तिच्या गाण्यांमध्ये सातत्याने डोकावत असला, तरी तिची अद्याप तळपती राहिलेली गानप्रतिभा वाखाणण्याजोगी आहे. मध्येच एखादे गाणे हिट करून ती अजूनही चर्चेत राहते. २०१५ मध्ये तिने ‘रिबेल हर्ट’ हा तेरावा अल्बम काढून आपल्या उतार कारकीर्दीतील बंडखोरी स्पष्ट केली होती. तिने ‘कन्फेशन्स ऑन ए डान्स फ्लोअर’ या अल्बमसाठी ‘सॉरी’ हे गाणे तयार केले होते. गाणे अर्थातच डान्सबीटवाले होते. पण त्यात गंमत होती, ती भाषेची. या गाण्यात इंग्रजीसह फ्रेन्च, स्पॅनिश, इटालियन, डच, हिब्रू, पोलिश, जपानी आणि आपली सुपरिचित हिंदी भाषा माफी मागण्यासाठी वापरली आहे. ‘मुझे माफ कर दो’ बोलणारी मॅडोना ऐकायला हास्यास्पद वाटत असली, तरी तिचा प्रयत्न विलक्षण आहे. हे नृत्यगीत आहे आणि केलेल्या दृष्कृत्याचा किंवा कृत्याचा जबाब देण्याचा विचित्र प्रकार वाटू शकतो. याच प्रकारचे दुसरे एक गाणे म्हणजे जस्टिन बिबर या यू-टय़ुबने घडविलेल्या कलाकाराचे ‘सॉरी’. बिबरच्या गाण्याचे कैक नृत्यनिपुण व्हर्शन्स पाहिले की थक्क व्हायला होते. माफी मागणे, ही अत्यानंदाची बाब किंवा हर्षवायू झाल्याचे लक्षण आहे, असे बिबरचे माफीगीत स्पष्ट करते.

ब्रायन अ‍ॅडम्स नव्वदीच्या दशकात आपल्याकडच्या घराघरांत परिचित झाला, त्याला एमटीव्ही-व्ही चॅनल्स जितके कारणीभूत होते, तितकेच घराघरांत शिरलेल्या डेकस्टॉप कम्प्युटरही. या संगणकामध्ये विक्रेते ठरवून मोफत हिंदी-इंग्रजी गाणी भरत. अन् त्यात बोनी एम ते मायकेल जॅक्सन आणि आबा- केनी जी ते ब्रायन अ‍ॅडम्स यांच्या एमपीथ्रीजचा मोठा साठा असे. त्या संगणक हाताळणाऱ्या पहिल्या भारतीय पिढीला अ‍ॅडम्सचे समर ऑफ सिक्स्टी नाईनऐवजी ‘प्लीज फरगिव्ह मी’ आणि ‘एव्हरीथिंग आय डू’ ही संयत गाणी फार आवडत. या दोन्ही गाण्यांना सार्वकालिक प्रेमगीतांमध्ये स्थान आहे.

अडेल ही ब्रिटिश गायिका तिच्या ठाशीव आवाजासाठी आणि ग्रॅमीतील नामांकित झालेली बहुतांश पारितोषिके पटकावण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या ‘हेलो’ हे अलिकडचे गाणे तिच्या नित्यनियमित शैलीला किंचित बाजूला सारून तयार झाले आहे. पूर्वाश्रमीच्या प्रियकराला अनेक वर्षांनंतर संपर्क साधण्याचा आणि त्यात मधल्या वर्षांची गोळाबेरीज मांडण्याचा प्रकार या गीतामधून झालेला आहे.

टेलर स्वीफ्टच्या गेल्या काही वर्षांमधील दरेक गाण्यामध्ये आपल्या प्रेमभंगास जबाबदार प्रियकराची छुपी नालस्ती केलेली असते. ‘मीच कशी चांगली’ हा एकांगी सूरही त्यात असतो. मात्र ‘बॅक टू डिसेंबर’ या २०१० सालातील गाण्यामधून तिने स्वसमर्थनाऐवजी आपल्या प्रियकराकडे चक्क माफी मागून धक्का दिला होता. आपलेच वागणे कसे बेजबाबदार आणि किंमतशून्य होते, हे कबूल करून स्वीफ्टने दिलगिरी व्यक्त केली होती.

माफीनाम्याची गाणी आणि शोकगीत यांमध्ये फरक असला, तरी अलीकडच्या दशकांमध्ये या दोन्ही प्रकारांमधील सीमारेषा पुसत चालली आहे. माफी किंवा शोक गाण्यांमधून कोणत्या प्रकारे सादर होईल, याची कल्पना करता येत नाही. तूर्त माफीनाम्याला महोत्सवात परावर्तित करणाऱ्या या गाण्यांना अनुभवता येऊ शकेल.

म्युझिक बॉक्स

  • Madonna : “Sorry”
  • Bryan Adams : “Please Forgive Me”
  • Taylor Swift : “Back to December”
  • Justin Bieber : “Sorry”
  • Adele : “Hello”
  • Cher : “If I Could Turn Back Time”
  • Celine Dion : Sorry For Love

viva@expressindia.com