16 January 2019

News Flash

‘पॉप्यु’लिस्ट : कानस्नेही प्रेमगीत पर्वणी

गेल्या तीस-चाळीस वर्षांमधील सुश्राव्य संगीत पुन्हा नव्याने ऐकणारी पिढी तयार झाली.

आंतरराष्ट्रीय संगीत जगताशी समांतर राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे बिलबोर्ड यादीची तपासणी. मात्र या सर्व याद्यांमधील आठवडी पुनरावृत्ती केवळ गाण्यांच्या क्रमांमध्ये बदल करताना सापडते. अगदी दशकभरापूर्वीपर्यंत बिलबोर्ड यादीनुसारच आपली संगीतचव घडविणारे इंग्रजी गाण्यांचे कट्टर श्रोते होते. पण अलीकडेच मनोरंजन उद्योगामध्ये झालेला बदल, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गाण्यांच्या निवडीमुळे त्यात बरेच बदल झाले. त्यामुळे गेल्या तीस-चाळीस वर्षांमधील सुश्राव्य संगीत पुन्हा नव्याने ऐकणारी पिढी तयार झाली. म्हणजे ऐंशी/नव्वदीच्या दशकात तितकी चालली न गेलेली गाणी या सिनेमा आणि टीव्ही सीरियलच्या प्रवाहामुळे श्रोत्यांच्या यादीत आणि मोबाइल लिस्टमध्ये शिरायला लागली. दृश्यांची परिणामकारकता वाढविणारी गाणी वापरण्याचा प्रकार आत्ता कुठे आपल्या हिंदी मालिकांमध्ये थोडय़ा प्रमाणात होत आहे. इंग्रजी मालिकांमध्ये मात्र दृश्याशी समरस करणारी गाणी वापरण्यासाठी संगीतचव तीव्र असणाऱ्यांची फौज असते. सध्या कॅनडामधील रॅप गायक ड्रेक याचे ‘गॉड्स प्लान’ हे पॉप गाणे बिलबोर्ड यादीत अग्रस्थानावर आहे. टीव्ही कलाकार म्हणून आधी समोर आलेल्या या गायकाने ग्रॅमीवर नाममुद्रा कोरत गेल्या दहा वर्षांमध्ये कानस्नेही रॅप गाणी दिली. आपल्या समांतर आफ्रिकी-अमेरिकी गाण्यांहून भिन्न असा त्याच्या गाण्यांचा प्रकार आहे. ‘आय अ‍ॅम युवर्स’, ‘व्हॉट यू वॉण्ट’ या गाण्यांसोबत जानेवरीची अखेर गाजविणाऱ्या स्वप्रेमावर बेतलेल्या ‘गॉड्स प्लान’ या गाण्याला अनुभवले, तर मुद्दा लक्षात येईल. बिलबोर्ड यादी बाहेर डोकावल्यास सध्या खूप छान पर्याय पाहायला मिळत आहेत. गेला संपूर्ण महिना ‘एण्ड ऑफ फकिंग वर्ल्ड’ नावाची ब्रिटिश मालिका नेटफ्लिक्समुळे जगभर गाजत आहे. त्यातले प्रत्येक गाणे आपल्या म्युझिक प्लेअरवर खणखणून वाजवून घ्यावे असे आहे. त्यातले ग्रॅहम कॉक्झन या गायकाचे ‘वॉकिंग ऑल डे’ हे गाणे तर यंदाचे व्हॅलेण्टाइन साँग ठरू शकते. याच मालिकेत साठच्या दशकातील एन्जल्स या बॅण्डचे ‘लाफिंग ऑन द आऊटसाइड, क्राईंग इन इनसाइड’ या प्रेमगीताचा अत्यंत सुरेख वापर करण्यात आला आहे. आपल्याकडच्या मुझे प्यार हुवा है, दिल मेरा चुराया क्यू, घडी घडी मेरा दिल धडके आदी शब्दछटांनी व्यापलेले हे गाणेही यादीत असायला हवे. ‘ब्रेकिंग बॅड’ ही या शतकातील सर्वोत्तम मालिकांमध्ये गणली जाते. या मालिकेच्या प्रत्येक भागात सुंदर गाणी आहेत. पण ‘ख्रिस्टल ब्लू’ हे टॉमी जोन्स अ‍ॅण्ड  शॉन्डेल्स या बॅण्डचे गाणे त्या मालिकेशी एकरूप झाले आहे. ड्रग्ज आणि पैसा यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेले १९६९ सालातील गाणे ब्रेकिंग बॅड मालिकेमुळे पुन्हा श्रोत्यांच्या कानांना तृप्त करणारे ठरले आहे. हार्ट ऑफ डिक्सी नावाच्या अमेरिकी मालिकेमध्ये कण्ट्री संगीतातील सर्वोत्तम पाश्र्वसंगीतासाठी वापरण्यात आले आहे. त्यातले द लुमिनिअर बॅण्डचे ‘हे हो’ हे निव्वळ गिटार आणि थोडक्या वाद्यांसह तयार करण्यात आलेले शांत गाणे भरपूर वेळा ऐकले तरी कर्णतहान भागणार नाही. याच मालिकेतील डॅरिअस रकर या गायकाने गायलेले ‘धिस’ नावाचे गाणे सार्वकालिक तरुणाईची भाषा बोलणारे गाणे आहे. प्रत्येक गाण्यातील सारे शब्द मिळवायचे असतील तर गूगलवर लिरिक्स सापडतात. पण या गाण्यांचे वैशिष्टय़ म्हणजे ती शब्दांपलीकडे जाऊन कशावर लिहिली गेली आहेत, हे समजायला वेळ लागत नाही.

आपल्या लाडक्या सिनेमातील किंवा टीव्ही मालिकेमधील एखादे दृश्य आपल्याला का आवडते, याचा धांडोळा त्या दृश्यासाठी वापरण्यात आलेल्या संगीतातून घेता येऊ शकतो. यू टय़ूबवर ही गाणी सहज उपलब्ध होतात आणि यू टय़ूब टू एमपीथ्री या ऑनलाइन कन्व्हर्टरद्वारे आपल्या प्लेलिस्टमध्ये जोडता येतात. मिस्टर रोबो नावाच्या आत्ता बऱ्याच लांबलेल्या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये वापरण्यात आलेले फिल कॉलिन्सचे ‘टेक मी होम’ असो किंवा थर्टीन रिझन्स व्हायच्या एका भागात चपखलपणे वापरण्यात आलेले जॉय डिव्हिजनचे ‘लव्ह विल टिअर अस अपार्ट.’ आपण काही काळ या गाण्यांमध्ये हरवून जाऊ शकतो. ऑकवर्र्ड ही तरुणाईवरची नावाची मालिकाही गेले सहा-सात वर्षे सुरू आहे. संगीत वाहिनीसाठी तयार झालेली असल्याने यात सुंदर प्रेमगाण्यांचा पाऊस पाडण्यात आला आहे. नेकेड अ‍ॅण्ड फेमस या बॅण्डचे ‘यंग ब्लड’ हे यात वापरण्यात आलेले कान आणि हृदयस्नेही गाणे देखील येत्या आठवडय़ातील उत्सवासाठी लिस्टमस्ट आहे.

  • Graham Coxon – Walking All Day
  • bernadette carrol – laughing on the outside
  • Joy Division – Love Will Tear Us Apart
  • The Lumineers – Ho Hey
  • Darius Rucker – This
  • The Naked And Famous – Young Blood
  • Drake – God’s Plan

viva@expressindia.com

First Published on February 9, 2018 12:35 am

Web Title: pop songs billboard