रंगांविषयी आपल्याकडच्या सर्व भाषिक गीते लिहिताना फार निवडक रंगांचा वापर झालेला आहे. बडबडगीतांमध्ये ओळख करून देण्यासाठी सर्व रंग एकत्रित आले असतील. मात्र लोकप्रिय सिनेसंगीत अथवा सुगम संगीताच्या आघाडीमध्ये गुलाबी-लाल-हिरव्यापलीकडे रंगांची बरसात गाण्यांमध्ये फारशी आढळत नाही. याउलट पाश्चिमात्य संगीतात बालगीतांसोबत सर्वच संगीतातील गीतलेखनात रंग उधळण झालेली दिसते. एकटय़ा प्रेमविषयक भावनांसाठी नाही, तर विविधांगी गोष्टींविषयी गीतकाराकडून रंगप्रेम व्यक्त झालेले दिसते.

‘ब्रेकिंग बॅड’ नावाची अमेरिकी मालिका २००८ पासून २०१३ इतक्या मोठय़ा कालावधीत जगभरच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवत होती. अमेरिकेतील ड्रग उद्योगावर प्रकाश टाकतानाच या मालिकेने त्यातील व्यक्तिरेखांना नवा आयाम दिला होता. यातील रसायनशास्त्राचा प्राध्यापक उच्च प्रतीचे अमली पदार्थ बनविताना दाखविला आहे. अन् एका निर्णायक प्रसंगी त्याच्या उत्कर्ष-अपकर्षांच्या केंद्रबिंदूला दर्शविण्यासाठी ‘क्रिस्टल ब्लू पस्र्युवेशन’ हे गाणे वापरण्यात आले आहे. हे वेस्टर्न-रॉकचा अंतर्भाव असलेले हे गाणे नवे नव्हते. पण त्या प्रसंगाचा परिणाम इतका वाढविणारे होते की आता यूटय़ूबवर त्याची दोन व्हर्शन्स आहेत. एक ब्रेकिंग बॅडमधले आणि दुसरे मूळचे टॉमी जेम्स आणि शॉण्डेल्स या बॅण्डने १९६८ साली तयार केलेले. टॉमी जेम्स आणि शॉण्डेल्स या बॅण्डने साठच्या हिप्पी युगात भरपूर गाणी दिली. त्या काळातील अमली पदार्थ आणि मुक्त लैंगिक जीवनाच्या प्रभावात असलेल्या पिढीचे हे गाणे सहा दशकांनंतर एका टीव्ही मालिकेमुळे पुनर्जीवित झाले. ब्रेकिंग बॅडमधील अमली पदार्थाच्या निळाईशी एकरूप झालेल्या या गाण्यातील प्रदीर्घ काळ चालणारा गिटार तुकडा प्रचंड कानवेधी आहे. किंग ऑफ पॉप हे बिरुद हयातभर मिरविणाऱ्या आणि भारतातील एमटीव्हीपूर्व पिढीचे एकमेव आकर्षण असलेला मायकेल जॅक्सन याने १९९१ साली जागतिक अडचणींची चिंता करणारे ‘ब्लॅक ऑर व्हाइट’ हे गाणे तयार केले. या गाण्यातून ऐक्याचे महत्त्व पटवून देणारा संदेश वगैरेही देण्यात आला होता. या गाण्याची आणखी एक गंमत म्हणजे आपल्याकडे एका टीव्ही कंपनीने याच गाण्याची चाल घेऊन हिंदीजिंगल तयार केली होती. तेव्हाचे सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या रेडिओवर ती जाहिरात प्रचंड लोकप्रिय होती. गाण्याच्या व्हिडीओमध्ये मायकल जॅक्सनने जगभरच्या सर्व वंशाची आणि रंगांची लोक एकत्र केली होती.

नील डायमंड या गायकाने साठच्या दशकात दु:खाचा उतारा म्हणून मद्याचे महत्त्व पटवून देणारे ‘रेड रेड वाइन’ हे गीत तयार केले होते. ब्रिटनमधील तरुणाईवर ऐंशीच्या दशकात रॅगे संगीताचा प्रभाव होता. यूबी फोर्टी नावाच्या बॅण्डने या गाण्यामध्ये रॅगे संगीताचा अंतर्भाव करून त्याचा वेग वाढविला आणि बिलबोर्ड यादी गाजविणारे गाणे तयार झाले. मूळ गाण्यापेक्षाही यूबी फोर्टीचे व्हर्जन आज अधिक प्रचलित आहे.

ऐंशीच्या दशकामध्ये तीनेक अल्बम आणि प्रसिद्धीपासून कमालीच्या अलिप्त राहिलेल्या नीक ड्रेक याच्या पिंक मुन या गाण्याचे वलय अद्यापही विरलेले नाही. चार-एक दशकांपूर्वी निव्वळ आकुस्टिक गिटार आणि धारदार शब्दांच्या आधारे गाणी बनविणाऱ्या या गायकाच्या संगीताचे अजूनही आस्वाद आणि आकलन केले जात आहे. काळापुढचे संगीत ऐकायचे असेल, तर या गायकाची सगळीच गाणी अनुभवता येतील. गिटारवरूनच आणखी एक रंगांवरचे एक सुंदर गाणे आठवते. पण ते गाणे रंगांधळेपणाविषयीचे आहे. डॅरिएस कॅम्पबल याच्या ‘कलरब्लाइंड’ या गाण्यातील सुरुवातीपासून गाण्याभर राहणाऱ्या गिटार कॉर्र्ड्समध्ये बहुतांश रंगांचा वापर करण्यात आला आहे. दोन हजारोत्तर काळातील भारतीय एमटीव्ही पिढीला या गाण्याचा सुंदर व्हिडीओही आठवू शकेल.

गेल्या वर्षी आपल्याकडे आलेल्या कोल्ड प्ले या बॅण्डची अनेक गाणी प्रसिद्ध आहे. पिवळ्या रंगांवर अनेक बॅण्ड्सनी उत्तम गाणी तयार केली आहेत. पण कोल्ड प्ले बॅण्डचे ‘येलो’ हे त्याची चाल आणि हळुवार आवाजासाठी या रंगावरचे सर्वात गाजलेले गाणे आहे. टेलर स्विफ्टचे रेड गाणे अलीकडचे सर्वात गाजलेले रंगगीत. लॉर्ड या गायिकेचे ग्रीन लाइट या गाण्याचाही अंतर्भाव करता येईल. या गाण्याची रचना सहज आवडू शकेल इतके बदल स्वत:त घेऊन आहे. लाल आणि निळ्या रंगावर शेकडो गाणी सापडू शकतील. तुम्हाला कोणता रंग आवडतो, त्यावरचे एकेक प्रचंड लोकप्रिय गाणे सहज ऐकता येऊ शकतील.

म्युझिक बॉक्स

  • Tommy James & The Shondells – Crystal Blue Persuasion
  • Michael Jackson – Black Or White
  • UB40 – Red Red Wine
  • Lorde – Green Light
  • Taylor Swift – Red
  • Nick Drake – Pink Moon
  • Colourblind – Darius Campbell

viva@expressindia.com