11 December 2017

News Flash

‘ऑफलाइन’चे दिवस!

कॉलेजमधल्या सीनिअर्सची ओळख काढून त्यांच्याकडे सतत विचारणा केली जायची.

कोमल आचरेकर | Updated: June 16, 2017 12:39 AM

दहावीच्या यशाचे पेढे संपतात न संपतात तोपर्यंत प्रवेश प्रक्रियेची धावपळही सुरु होईल. पूर्वी कसं   दादाताई जातात ते किंवा आपल्या आवडीचं कॉलेज निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. पण ऑनलाइन प्रक्रियेत सगळंच बदललंय. आता सगळी भिस्त ऑनलाइन प्रोग्रॅमवर आहे. ऑफलाइन प्रवेशप्रक्रियेतल्या गमतीजमती..

‘‘अगं तुला सांगते, मी ना एकदा दादाच्या कॉलेजला गेलेले, कसलं भारी आहे सांगू त्याचं कॉलेज. मला पण त्याच्याच कॉलेजला जायचंय !’’

‘‘मी तर कधी कोणत्या कॉलेजच्या आतच गेले नाहीये! मग वेबसाईटवर पाहिलं ना शाळेपेक्षा खूपच भारी आहे !’’

‘‘ते कॉलेज आहे ना खूप फेमस आहे सायन्ससाठी. माझं तिथे अ‍ॅडमिशन झालं ना तर बरं होईल.’’

नुकत्याच दहावीच्या महादिव्यातून यशस्वीपणे बाहेर पडलेल्या आणि त्यातून कॉलेजला जायचं म्हणून स्वप्नवेल्हाळ झालेल्या तरुणांच्या तोंडून अशी वाक्य ऐकायला मिळतात. शाळा संपली. आता युनिफॉर्म नाही.. तशी कडक शिस्त नाही..नवीन मित्रमत्रिणी.. नवीन सगळं.. कॉलेजमध्ये जायचं या भावनेनेच हुरळून जायला होतं. कॉलेजलाईफ ज्याबद्दल सगळ्या ताई-दादांकडून ऐकलेलं असतं, सिनेमा-मालिकांमधून पाहिलेलं असतं आणि आता अ‍ॅडमिशन घ्यायचं म्हणून कॉलेजची माहिती घेण्यासाठी त्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवर डोकावूनदेखील पाहिलं जातं. कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल एकूणच एक उत्सुकता या अकरावीत प्रवेश घेणऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांसाठी गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी आपल्या आवडीचं कॉलेज निवडून तिथे प्रवेश मिळवण्यातील जी गंमत होती ती मात्र कमी झाली. कारण कॉलेजचा फॉर्म मिळवण्यासाठी मित्रांच्या घोळक्याने कॉलेजच्या वाऱ्या केल्या जायच्या. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कॉलेजला भेटी दिल्या जायच्या. कॉलेजला प्रवेश मिळण्याआधीच तिथल्या वातावरणाचा अंदाज यायचा. कॅन्टीन, कट्टा, नाका, इतर सोयीसुविधा पहिल्या थेट तिथे जाऊन पाहिल्या जायच्या. तिथल्या काही लोकांशी, विद्याथ्यार्ंशी ओळखी व्हायच्या. त्यामुळे वेगवेगळी कॉलेजेस केवळ बाहेरूनच नाही तर आतून कशी आहेत याची कल्पना यायची. या प्रवेश प्रक्रियेच्या निमित्ताने तिथली वास्तूही विद्यार्थ्यांना आपलंसं करून घ्यायची. अ‍ॅडमिशन एका कॉलेजला होणार हे जरी पक्कं असलं तरी या निमित्ताने भेट दिल्यावर एखादं कॉलेज उगाच आपलंसं वाटून मतपरिवर्तन व्हायचं. काही जणांनी घराजवळच्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा हे नक्की केलेलं असायचं पण तरीही इतर कॉलेजेसची तपासणी केली जायची. तर काहीजण मुद्दामच घराजवळचं कॉलेज नको म्हणून आपल्यापासून त्यातल्या त्यात जवळ असणाऱ्या उपनगरातील कॉलेजची निवड करायचे.

‘कट ऑफ लिस्ट’ ही या प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी. तेव्हा ती ऑनलाइन सहज उपलब्ध नव्हती. त्यामुळे कॉलेजमधल्या सीनिअर्सची ओळख काढून त्यांच्याकडे सतत विचारणा केली जायची. पहिली लिस्ट लागणार म्हटलं की धडधड वाढायची. पण कितीही भीती वाटत असली तरी आपलं नाव लागलं आहे की नाही हे पाहण्यासाठी खास कॉलेजपर्यंत जावंच लागायचं. तिथे गर्दीत पुढे जाऊन आपलं नाव आहे का हे तपासावं लागायचं. एकाच दिवशी सगळ्या कॉलेजला जाणं शक्य नसल्याने ‘एकमेकां साहाय्य करू..’ म्हणत एका कॉलेजमध्ये एकाने जाऊन त्यानुसार एकमेकांची नावं आहेत की नाहीत, याचा पडताळा केला जायचा. नाव लागलं असेल तर त्या कॉलेजमध्ये सगळी कागदपत्रं घेऊन अ‍ॅडमिशन घ्यायची. नसेल लागलं तर दुसऱ्या यादीची प्रतीक्षा केली जायची. दुसऱ्या यादीत हवं त्या कॉलेजला नाव लागलं की मग पुन्हा पहिल्या कॉलेजमध्ये भरलेली कागदपत्रं मिळवायची.

आता मात्र कॉलेजप्रवेशाचं हे प्रकरण ऑनलाइनमुळे सगळं कसं क्लिक्सवर आलंय. पाल्यापेक्षा पालकांनाच याचं जास्त टेन्शन असतं. उत्तम कॉलेज तर हवं, पण कुठल्या कुठे कॉलेज मिळेल याची चिंता त्यांना सतावत असते. सगळ्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेशासाठी फॉर्मचा खर्च होत नसल्यामुळे खिशाला कात्री कमी लागते. कॉलेजबद्दल सर्च करा.. आपला प्राधान्यक्रम नोंदवला की काम झालं. लिस्ट लागली की तीही क्लिकवर समजणार, थेट अ‍ॅडमिशन घ्यायलाच तिथे पोहोचायचं. यामुळे गोष्टी खरंच सोप्या झाल्या, पण आपलं कॉलेज निवडण्याच्या प्रक्रियेतील मज्जा हरवली हेही तितकंच खरं!

महाभयंकर

अ‍ॅडमिशनची प्रवेशप्रक्रिया म्हणजे महाभयंकर. हवं ते कॉलेज मिळणं राहिलं बाजूलाच. पण गरज नसतानाही दहा-वीस कॉलेजेसची नावं भरायची गरज काय? फक्त हा अ‍ॅडमिशन प्रक्रियेचा भाग आहे म्हणून? आणि यामुळे आपलं नाव यादीत कुठच्या कुठे येतं तो भाग वेगळाच आहे.

विशाल सपकाळ

 

भ्रष्टाचार कमी

खरं पाहता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चांगलीच आहे. त्यामुळे डोनेशनच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या कॉलेजना चाप बसू लागला आहे. त्यातून होणाऱ्या भ्रष्टाचाराचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. विद्यार्थ्यांना तितक्याच फीमध्ये शिक्षण मिळत आहे. हा दिलासाच आहे.

सचिन वाघुले

 

गुणवत्तेला प्राधान्य

ऑफलाइन अ‍ॅडमिशनमुळे बऱ्याचदा वशिल्यावर अ‍ॅडमिशन होताना आढळतात. पण ऑनलाइनमध्ये तसे होत नाही आणि टक्केवारीनुसार प्राधान्य मिळत असल्याने आपल्याला चांगल्या, आवडत्या महाविद्यालयात अ‍ॅडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थी आणखी मेहनत घेतात.

निशा भगत

 

ऑफलाइन अ‍ॅडमिशन प्रक्रियाच उत्तम

ऑफलाइन अ‍ॅडमिशन उत्तम. आपल्याला मेरिट लिस्टचा अंदाज कळतो. त्यामुळे आपण  आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रयत्न करू शकतो आणि त्यात जास्त अडचण येत नाही. त्यामुळे आपल्याला हवे असलेले महाविद्यालय आपल्याला नीट बघता येते.

केतन दावने

 

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी किचकट

ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया खूप किचकट आहे. त्यामुळे अनेकांची  तारांबळ उडते. बऱ्याचदा सव्‍‌र्हर प्रॉब्लेममुळे पुन्हा पुन्हा ही प्रोसेस करत बसावी लागते. हे खूप त्रासदायक आहे आणि गावांमध्ये सगळ्या सोयी उपलब्ध नसल्याने त्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात.

स्नेहल पुंड

  • संकलन साहाय्य : प्रियांका वाघुले

viva@expressindia.com

First Published on June 16, 2017 12:39 am

Web Title: prepare for admissions process after ssc results