News Flash

ब्रॅण्डनामा : प्रेस्टिज

गुंतवणाऱ्या महिलावर्गाचा आवडता प्रेस्टिजिअस ब्रॅण्ड म्हणजे प्रेस्टिज किचनवेअर.

Prestige Kitchen Appliances
प्रेस्टिज किचनवेअर.

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

माणसाचं मन कशात गुंतेल, सांगता येत नाही. दिवसभर कामाचे ढीग उपसणाऱ्या स्त्रिया नवनवीन कामं हसतमुखाने करतील, पण त्यांच्या आवडीचं छोटंसं भांडं, अगदी चमचा इकडचा तिकडे झाला की विस्कटलेला मूड सरळ होणं कठीण. अशा छोटय़ा-छोटय़ा गोष्टीत मन गुंतवणाऱ्या महिलावर्गाचा आवडता प्रेस्टिजिअस ब्रॅण्ड म्हणजे प्रेस्टिज किचनवेअर.

१९२८ साली टीटीके ग्रुपची स्थापना झाली. भारताचे माजी केंद्रीय वित्तमंत्री टी.टी. कृष्णम्माचारी यांची टीटीके कंपनी विविध उत्पादनांची निर्मिती करीत होती. अशा काळात स्त्रियांच्या स्वयंपाकघरातील दैनंदिन संघर्षांला सुकर करण्यासाठी ‘प्रेस्टिज’ या नावाने प्रेशर कुकरचा ब्रॅण्ड बाजारात आला. १९४०-५० च्या दशकात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला जात असताना प्रेशर कुकरसारखी गोष्ट नवी होती. प्रेशर कुकरमध्ये पदार्थ शिजवणं कसं सुरक्षित आणि कमी वेळेचं आहे हे ग्राहकांना समजावून देण्यात प्रेस्टिज निश्चितच यशस्वी ठरलं आणि हा ब्रॅण्ड मोठा होत गेला.

कमी किमतीत आणि वेळेत अन्न शिजवण्याचा एक उत्तम पर्याय लोकांना मिळाला. पण सुरुवातीच्या काळात या ब्रॅण्डची दाक्षिणात्य ब्रॅण्ड ही प्रतिमा दूर करून भारतातील सर्व प्रांतांत त्याला पोहोचवणं आव्हानात्मक होतं. दाक्षिणात्य जेवणातील भाताचा मुबलक वापर उत्तरेकडे अगदीच निमित्त मात्र ठरतो. त्या प्रांतात प्रेशर कुकर विकणं हे कठीण होतं, पण प्रेस्टिजने फक्त प्रेशर कुकरपुरतं मर्यादित न राहता जे विविध पर्याय उपलब्ध करून दिले त्यामुळे या प्रांतिक अडचणीवर मात करता आली. प्रेस्टिजने प्रेशर कुकरसोबत प्रेशर पॅन, प्रेशर हंडी, प्रेशर कढई अशी वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध करून दिली.

प्रेशर कुकरसाठी प्रसिद्ध असलेला हा ब्रॅण्ड आज टोटल किचन सोल्युशन देत अनेकविध किचन उत्पादनांत विस्तारला आहे. भारतात दर ३० सेकंदाला प्रेस्टिजचं एखादं उत्पादन विकलं जातं ही माहिती कितपत खरी मानायची ठरवलं तरी किचनवेअरमध्ये हा ब्रॅण्ड भारतात अग्रगण्य नक्की आहे. १५ उत्पादन युनिटमधून ५,००० कर्मचाऱ्यांसह प्रेस्टिजने परदेशातही उडी मारली आहे. १९९० मध्ये पाश्चिमात्य देशांमधील आहार सवयीनुसार त्या मंडळींसाठी काही खास उत्पादनं निर्माण केली गेली आणि परदेशांतही या ब्रॅण्डने ‘प्रेस्टिज’ कमावलं.

प्रेस्टिजच्या नावावर अनेक गोष्टी पहिलेपणाशी जोडल्या गेल्या आहेत. भांडय़ांच्या बाबतीत ‘एक्स्चेंज स्कीम’ देणारा हा पहिला ब्रॅण्ड. कुकरवर १० वर्षांची वॉरंटी आणि मिक्सर ग्राइंडरवर आयुष्यभराची सेवा देणारा हा पहिला ब्रॅण्ड. आयएसओ मानांकन आणि आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारा हा पहिला किचनब्रॅण्ड. या अर्थाने अनेक पहिल्यावहिल्या गोष्टींचा मान प्रेस्टिजकडे जातो.

या उत्पादनाने पैशांचं अगदी योग्य मोल राखत भारतीय स्वयंपाकघरात मानाचं स्थान मिळवलंय. त्यात या उत्पादनाचा दर्जा जितका महत्त्वाचा आहे तितकाच प्रेस्टिजच्या जाहिरातींचा वाटाही मोठा आहे. प्रेस्टिजच्या अगदी जुन्या जाहिरातींची टॅगलाइन होती, जो बिवी से करे प्यार वो प्रेस्टिज से कैसे करें इन्कार? भांडीकुंडी हा स्त्रियांच्या आवडीचा विषय असला तरी या टॅगलाइनने पुरुष मंडळींनासुद्धा त्यात सामील करून घेतलं. खरेदीला गेल्यावर प्रेस्टिजला नकार कसा द्यायचा बरं? कारण बायकोवर प्रेम करणारा नवरा प्रेस्टिज घेऊन देणारच हे भावनिक आवाहन कमाल होतं. अगदी अलीकडच्या जाहिरातीत अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन यांनीदेखील ते मान्य केलं. २००१ पर्यंत भारतीय स्वयंपाकघराची कल्पना खूप बदलली तेव्हा स्मार्ट गृहिणीला प्रश्न विचारणारी टॅगलाइन आली. ‘आर यू रेडी फॉर स्मार्ट किचन?’

प्रेस्टिजच्या असंख्य उत्पादनांतील एक म्हणजे डय़ुप्लेक्स गॅस स्टोव्ह. त्याची ‘फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर’ जाहिरात इतकी गाजली की लोक दुकानात जाऊन फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरवाला गॅस स्टोव्ह मागू लागले. पन्नासच्या दशकात हेलिकॉप्टरमधून पत्रकं वाटणं असो किंवा हॅप्पी एक्स्चेंज स्कीम.. या उत्पादनाने अनोख्या मार्केटिंग तंत्रासह लोकांचा विश्वास संपादन केला आहे.

आजची गृहिणी फक्त स्वयंपाकघरात रमत नाही तरीही स्वयंपाक करताना तिची अशी खास आयुधं तिला लागतात. तिचं त्या भांडय़ाकुंडय़ांवर तितकंच प्रेम असतं. या प्रेमाचा ‘प्रेस्टिजिअस’ पर्याय म्हणजे प्रेस्टिज किचन वेअर. कामाचं प्रेशर कमी करणाऱ्या या ब्रॅण्डला इन्कार करण्याचा प्रश्न म्हणूनच नाही.

रश्मि वारंग -viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 1:07 am

Web Title: prestige kitchen appliances
Next Stories
1 Watch लेले काही : हरवलेले आणि सापडलेले!
2 ‘ताण’लेल्या गोष्टी : गरज की लोभ?
3 खाऊगल्ली खारघर : स्टेशनातच खाऊअड्डा
Just Now!
X