वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या आणि नव्या पिढीच्या अस्सल भाषेत कल्लाकरणाऱ्या कलाकारांशी गप्पांचं हे सदर. प्रिन्सेस पीअसं नाव धारण करणाऱ्या मनस्वी कलाकाराशी बातचीत..

आपल्या प्रत्येकाच्या घरात किंवा किमान भोवतालच्या विश्वात असते ‘ती’. ही ‘ती सध्या काय करते’वाली रोमँटिक ‘ती’ नाहीये. या सामान्य ‘ती’ला रोजच्या जगण्याची लढाई लढावी लागते आहे. ‘त्या’च्या दृष्टिकोनाला सामोरी जावं लागतं आहे. तिची होणारी घुसमट अनेकदा व्यक्त होते कलेतून. मग ती शिल्पकला असो, त्यातून साकारलेलं कलात्मक खेळणं असो, फोटोग्राफ असो किंवा अन्य काही.. ते व्यक्त होणं महत्त्वाचं ठरतं. हे व्यक्त करणारी ती आहे चारचौघांसारखी. फक्त तिचं मन आहे संवेदनशील. त्या संवेदनशील मनानं माणूस म्हणून केलेले विचार आणि मतं व्यक्त होतात ती कलेद्वारे. ‘प्रिन्सेस पी’ असं नाव धारण करून ही कलावंत आता मुंबईत दाखल झाली आहे. ‘सनराइज सेरेमनी’ या कलाप्रदर्शनाद्वारे तिच्या कलाविष्काराचा अनुभव मुंबईकरांना कुलाब्याच्या साक्षी आर्ट गॅलरीमध्ये २३ जानेवारीपर्यंत घेता येऊ  शकेल.

तिचं खरं नाव कुणालाच माहिती नाही. कलाप्रेमींच्या जगात ती ओळखली जाते ‘प्रिन्सेस पी’ म्हणून. मटारदाण्याचा भलाथोरला मास्क लेवूनच ती वावरते या जगात. त्या अगडबंब वाटाण्याच्या मुखवटय़ावरचे भलेमोठे टपोरे डोळे खुणावतात तुम्हाला. ही कलावंत चित्र काढते, खेळशिल्प तयार करते आणि या सगळ्यातून खूप काही शोधू पाहते, सांगू पाहते. तिचं ते वाटाण्याचं भलंमोठं डोकं कुतूहल निर्माण करतं. कोण आहे ही ‘प्रिन्सेस पी’? काय आहे तिची गोष्ट? कधी जन्मली प्रिन्सेस पी आणि कशातून? हे जाणून घेण्यासाठी तिच्याशी गप्पा मारल्या.. अर्थात ई-मेलच्या माध्यमातून.

फिरोझपूरमध्ये जन्मलेल्या ‘तिनं’ दिल्लीच्या कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतलंय. दिल्ली आणि लंडनमध्ये ‘तिची’ एकल प्रदर्शनं भरली आहेत. ‘प्रिन्सेस पी’ म्हणून आजवर ‘तिनं’ अनेकांशी साधलेल्या संवादापैकी काही बोलकी छायाचित्रं मुंबईतील प्रदर्शनात पाहता येतील. ‘सोल सिस्टर्स’ या तिनं घडवलेल्या तिसऱ्या खेळशिल्पाचं अनावरण होणार आहे.

प्रिन्सेस पी कशी जन्माला आली? ‘ती’ सांगते, ‘रोजच्या रोज मिनिटामिनिटाला ‘प्रिन्सेस पी’चा पुन्हा नव्यानं जन्म होतो. ती तू आहेस, मी आहे आणि आपण सगळ्याच जणी आहोत. अपमानाच्या तळपत्या ज्वालांतून ती जन्म घेते. मनात उडालेल्या क्रोधाग्नीतही तिचा जन्म होतो. तिला मारण्यात आलेल्या टोमण्यांतून, करण्यात आलेल्या धक्काबुक्कीतून आणि छेडाछेडीतूनही ती साऱ्यांना पुरून उरते. असे स्त्रीवादी धडे गिरवत ‘प्रिन्सेस पी’चं आयुष्य आकारतं आहे. कायमच पुरुषांच्या नजरेतून न्याहाळल्या गेलेल्या ‘ती’च्याविषयी सिमोन दी बोव्हा या लेखिकेनं वेळोवेळी प्रतिपादन केलेलं दिसतं. स्त्री ही कायमच ‘इतर’ किंवा ‘गौण’ लेखली गेलेय. तो प्रमुख ती इतर. कारण तो दृष्टिकोन पुरुषी होता. तो कर्ता, ती कर्म. ‘ती’ त्याच्या हुकमाची ताबेदार. असं कायम ‘त्याच्या’ दृष्टिकोनातून स्वत:कडं पाहिल्यावर स्वत:विषयी नकारार्थी भावनाच न उमटल्या तर नवल. ही गौणत्वाची भावना मुलगी म्हणून जन्मापासून ते ती बाई होण्याच्या प्रवासापर्यंत कायमच ‘तिच्या’ सोबतीला असते. अनेकदा ही भावना एकमेकींकडं एखादा वसा द्यावा तशी अनाहूतपणं सोपवली जाते. तिच्याबद्दल सतत काही तरी वादविवाद उत्पन्न होतंच असतात. आपलं नेमकं स्थान मिळवण्यासाठी, आपल्या स्वत्वासाठी झगडण्याची तिची धडपड अविरतपणं चालूच आहे. अजूनही तिच्या स्त्रीत्वाचा गैरफायदा घेतला जातो, धक्काबुक्की केली जाते, तिची छेडछाड केली जाते. यासाठी पुरुषाला नव्हे स्त्रीलाच दोषी ठरवलं जातं. या दुष्टचक्रातून तिची सुटका व्हायलाच हवी. अशी जाणीव एका कलावंत मनाला झाली आणि ‘प्रिन्सेस पी’चा जन्म झाला.’

प्रिन्सेस पी हे नाव ऐकल्यावर हॅन्स अ‍ॅण्डरसनच्या परिकथा वाचून मोठं झालेल्यांना त्या ‘नाजूक’ राजकन्येची आठवण नक्की झाली असणार.. जिला सात गाद्यांच्या थराखाली ठेवलेला वाटाणादेखील टोचत होता, खुपत होता. या प्रिन्सेस पीचा त्या हॅन्स अ‍ॅण्डरसनच्या कथेशी काही संबंध आहे का? यावर ही कलाकार म्हणते, ‘या परीकथांच्या राज्यात रमता रमता मी मोठी झालेय. खरं तर कल्पनेच्या जगातून मी बाहेर पडूच शकलेले नाही.’

जादूई ठरू शकणाऱ्या कल्पनेवर नितांत प्रेम करायला मला कायमच आवडतं.’ अ‍ॅण्डरसनच्या त्या प्रसिद्ध परीकथेमधला वाटाणा अर्थात ‘पी’ हे तिनं प्रतीक मानलं ते व्यथांचं आणि हा मुखवटा इतरांसमोर आणला, त्यांना ‘ती’च्या खुपण्याची, क्लेशांची आणि दु:खाची जाणीव करून देण्यासाठी. त्यांना ते दु:ख सहवेदनेतून आणि संवेदनेतून जाणवून देण्यासाठी..

ही अनामिक स्त्री कलावंत वाटाण्याचा मुखवटा घालते. हे मुखवटा घालणं फारसं सुखावह नाही. उलट ती त्यात अधिक अस्वस्थच होते. कारण तिच्या संवेदनशील मनाला अनेक गोष्टींची साक्ष पटते. तिच्या संवेदनशीलतेबद्दल ज्येष्ठ कलावंत रणबीर कालेका यांनी प्रिन्सेस पीला लेखाच्या माध्यमातून जाहीर पत्र लिहिलं. कलावंत म्हणून दुसऱ्यांच्या भावना जाणून घेऊन, त्यांना सहानुभूती दर्शवत रोजच्या जगण्यात एक निव्वळ वेडेपणा ठरू शकेल अशी कृती करणं हे केवळ एक कलावंतच जाणून घेऊ  शकतो. त्या अर्थाने ‘पी’चं महत्त्व लक्षात घ्यायला हवं. त्या वागण्यात दडलाय एक मानवतावादी दृष्टिकोन, एका कलाकाराची सहानुभूती.. हा मुखवटा वागवताना त्या कलाकाराला जाणवतात ते इतरांचे क्लेश.. मग ‘पी’च्या मुखवटय़ाची काल्पनिक गोष्ट सुरूच राहते.. ती कलावंत स्त्री इतरांच्या विशेषत: स्त्रियांच्या वेदना अधिक सखोलपणं समजून घेऊ  शकते.. त्यासाठी ‘पी’चा मुखवटा तिची मदत करतो..

प्रिन्सेस पी या नावामागचं आणि त्या अगडबंब डोक्यामागचं आणखी एक कारण ही कलाकार सांगते. ‘माझी बहीण आणि मी आमच्या दोघींच्या अनुभवांतून ते आलंय. मी लहानपणापासून हडकुळी, अशक्त म्हणजे सौंदर्याच्या कल्पनेत न बसणारी आणि म्हणून सतत टोमणे ऐकणारी. माझी बहीण माझ्या उलट.. बाळसेदार आणि अर्थातच तीही स्त्रीसौंदर्याच्या साच्यात न मावणारी.. त्यामुळे तिलाही टोमणे. एखादी कलाकृती निर्माण करताना परफेक्शनच्या अगम्य राक्षसी कल्पनेबद्दल मी कायमच गोंधळायचे. त्याच ओघात साकारलं हे प्रिन्सेस पीचं अगडबंब डोकं, तिच्या कृश देहयष्टीच्या विरुद्ध जाणारं. लहानपणी आम्हाला चिडवलं जायचं – तिला -गोलमटोल भोपळा म्हणून आणि मला पिटुकला मटार म्हणून. आमचं आडनावही ‘पी’ या अक्षरापासून सुरू होणारं. त्यामुळे लोकांशी बोलताना, त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताना प्रिन्सेस पी हे नाव अगदी ओघातच नेमकं झालं.

‘प्रिन्सेस पी’च्या वाटय़ाला सौहार्दपूर्ण अनुभव आलेत आणि समाजात अजूनही चांगल्या गोष्टी घडायला वाव आहे, याचंच हे द्योतक आहे, असं या कलाकाराला वाटतं. ती सांगते की, ‘माझ्या आयुष्याचे दोन भाग आहेत, असं मला वाटतं. वास्तवात मीही एक सामान्य माणूस म्हणून जगते आहे. चारचौघांप्रमाणं माझंही जगण्यावर प्रेम आहे.’

या अवलिया कलावंतावर कुणाचा प्रभाव आहे? ‘योको ओनो आणि मारिया अब्रामोव्हिक यांच्या कलेचा प्रभाव आहे. माझी आई ही माझं प्रेरणास्थान आहे.’ कलाजगतात तिच्या कामाचं स्वागत झालं आहे. एक चालतं बोलतं खेळणं लोकांना नाना परीनं प्रश्न विचारतं. ‘पी’च्या मुखवटय़ाआडून ‘ती’ लोकांशी संवाद साधू शकते आणि जणू त्यांच्या कुटुंबीयांपैकीच एक होऊन जाते. मुलींवरून सुरू झालेली चर्चा अनेकदा त्याच त्या प्रथा, परंपरा, चालीरिती यांच्या संदर्भातल्या प्रश्नांशी येते. एक संवेदनशील कलाकार म्हणून अशा वेळी ती फार अस्वस्थ होते. तिला लोकांची मानसिकता बदलाविशी वाटते. पण काही वेळा शांत राहणं, हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. तिची अशा अनेक प्रसंगाना तोंड द्यायची तयारी आहे, पण लोकांनी अधिकाधिक विचार करणं फार फार गरजेचं आहे, असं तिला मनापासून वाटतं.

एक कलाकार म्हणून हा मुद्दा बाजूला ठेवला तर एक स्त्री म्हणून स्वत:च्या भावना व्यक्त करणं, हे तिच्यासाठी एक आव्हान ठरतं. पण ‘चालतं-बोलतं खेळणं’ असं स्वत:ला संबोधत ‘प्रिन्सेस पी’च्या ‘सनराईज सेरेमनी’मुळं अनेकांच्या आयुष्यात विचारांचा प्रकाश उजळून निघू दे आणि ‘ती’च्या व्यथा-कथा समजून घेणाऱ्या माणसांची संख्या वाढू दे.. ‘ती’चं आयुष्य खऱ्या अर्थानं समानतेचं होऊ  दे, या जगभरातील ‘मिळुनी सगळ्याजणीं’साठी वैश्विक शुभेच्छा.

viva@expressindia.com