News Flash

आऊट ऑफ फॅशन : प्रिंट्रींग मॅटर्स

आपल्या आजूबाजूला रोज आपण कपड्यांवरच्या प्रिंट्र्सचे कितीतरी प्रकार पहात असतो.

आऊट ऑफ फॅशन : प्रिंट्रींग मॅटर्स
इस्त्री करणारा ‘आयर्नमॅन’.. सुपरहिरोजना सामान्य करणारे हे टी-शर्ट तरूणाईचे आकर्षण ठरले आहेत.

‘डिओर’ जगभरातील जुन्या आणि प्रसिद्ध ब्रँड्सपकी एक. मागच्या वर्षी मारिया ग्राझिया च्युरीच्या रूपाने या ब्रँडच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर पदी पहिल्यांदा एक स्त्री विराजमान झाली. ‘िस्प्रग २०१७’चं या ब्रँडसोबतचं तिचं पहिलंच कलेक्शन प्रसिद्ध झालं ते एका टीशर्टमुळे. आज ते टीशर्ट तब्बल ७०० डॉलर्स म्हणजेच ४४ हजार रुपये किमतीत या ब्रँडच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या टीशर्टची बनावट आवृत्तीसुद्धा ऑनलाईनला तब्बल अडीच हजार रुपयांची आहे. साधं कॉटनचं हाफस्लिव्ह, सफेद रंगाचं हे टीशर्ट. ना त्यावर महागडी, भरजरी एम्ब्रोयडरी आहे, ना कोणतं उंची कापड. मग काय आहे असं या टीशर्टमध्ये? तर ही किंमत आहे, या टीशर्टवरील प्रिंट्रची. ‘वुई शुड ऑल बी फेमिनिस्ट’ हे ठळक अक्षरांमध्ये या टीशर्टवर लिहिलंय. ‘फेमिनिझम’ या विषयावर आज जगभरात दोन गट झाले आहेत. दोघांमध्ये टोकाची मतमतांतरे आहेत. मुळात या चळवळीची मुख्य मागणी आहे ती स्त्रियांना पुरूषांसोबत मुख्य प्रवाहात जोडून घेण्याची.. ‘आमचं शरीर तुमच्या कामेच्छा जागवतं. आमची महत्वाकांक्षा ऑफिसमध्ये तुमच्यासमोर आव्हानं निर्माण करते, अशी कारणं देऊन आम्हाला अडवू नका. मुलींची कामं वेगळी, लग्न आणि मुलं यांच्यानंतर स्त्रियांचं आयुष्य संपतं या समजूतीतूनआता तरी बाहेर पडा’, असं आवाहन करणारी ही चळवळ आहे. एकमेकांपेक्षा वरचढ होण्याची ही स्पर्धा सोडून आता एकमेकांच्या हातात हात घालून चालूयात, या मागणीचा पुरस्कार च्युरीच्या या टीशर्टवर छापलेल्या विचाराच्या माध्यमातून होतो आहे. एका टीशर्टवरचं एक साधंसं प्रिंट्र पण त्यातून एका चळवळीने जन्म घेतला आणि त्यामुळे ते टीशर्ट मौल्यवान ठरलं आहे.

आपल्या आजूबाजूला रोज आपण कपड्यांवरच्या प्रिंट्र्सचे कितीतरी प्रकार पहात असतो. आपल्या कपाटातसुध्दा प्रिंटचे नानाविध प्रकार सापडतील. फ्लोरल, भौमितिक, पारंपरिक प्रिंट्र्स, अ‍ॅबस्ट्रॅक्ट असे कितीतरी प्रकार प्रिंट्र्समध्ये पहायला मिळतात. त्यात दरवर्षी नवनव्या प्रकारांची भरती होतच असते. कधी कोणी विचार केला होता की मोठय़ा आईसक्रीम कँडीचं प्रिंट्र असलेला ड्रेस किंवा साडी आपण नेसू? पण डिझायनर मसाबा गुप्ताने ही कल्पना सत्यात आणली. राजाराणीच्या गोष्टीतील सगळ्या शूर व्यक्तिरेखा या नेहमीच उंच, देखण्या असल्याचं आपण ऐकत आला आहोत. त्यामुळे आपल्या मनात त्यांचं चित्रही तसंच असतं. पण याच व्यक्तिरेखा छोट्या, गोड बाहुल्यांच्या प्रिंट्र्समध्ये कशा दिसतील, हे ‘क्वर्क बॉक्स’ने दाखवलं. जुन्या काळात लोकांच्या मनातील देवांच्या छबी कशा होत्या, त्यांचं समाजजीवन कसं होतं, यांचं उत्तम उदाहरण कलमकारीसारख्या प्रिंट्र्समधून पहायला मिळेल. अगदी ब्लॉक प्रिंट्रपासून ते आजच्या डिजिटल प्रिंट्रींगच्या काळापर्यंतच्या या प्रवासात प्रिंट्र्समध्ये असंख्य बदल झालेत. पण या बदलांमधूनही त्या त्या काळातील समाजाचं प्रतििबब नेहमीच दिसत आलंय.

कपडय़ावरच्या प्रिंट्सचे प्रकार आज बाजारात पहायला गेलो तर इतके मिळतील की त्यातून एकाची निवड करणं हे गोंधळाचंच काम होऊन बसतं. तरीही या प्रिंट्स गर्दीतून वाट काढत लोकप्रिय होतातच. सध्या तरुणाईमध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेला प्रकार म्हणजे जनमानसांत प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीची छबी आपल्या कपडय़ावर उतरवत त्यांचं उदात्तीकरण करण्याऐवजी त्यांना सर्वसामान्यांच्या पंक्तीत आणून बसवायचं.. म्हणजे वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या ‘फ्लॅश’ या सुपरहिरोला ट्रॅफिक पोलिसांनी वेगमर्यादा पार केल्याबद्दल दंड लावला तर? किंवा आयर्नमॅन हा कोणी सुपरहिरो नसून आपला इस्त्रीवाला आहे हे दाखवलं तर? स्पायडरमॅनच्या जाळ्यांचा वापर त्याची बायको कपडे वाळत घालण्यासाठी करत असेल तर?, अशा गंमतीदार कल्पना लढवत एकेकाळी नायकाचे बिरूद मिरवणाऱ्या या व्यक्तिरेखा प्रत्यक्ष आयुष्यात तुमच्याआमच्या सारख्या असत्या तर काय हल्लकल्लोळ झाला असता हे रंगवून सांगणाऱ्या या प्रिंट्र्स तरुणांच्या टीशर्ट्सवर आरूढ झालेल्या पहायला मिळतात. लहानपणी शाळेत शिक्षक वर्गात आल्यावर पहिल्यांदा रोज फळ्यावर वेगळा सुविचार लिहायचे. हल्ली टीशर्ट्स, बॅग्ज, मोबाईल कव्हर्सवर कित्येक कोट्स, गमतीशीर, उपरोधिक वाक्यं पहायला मिळतात. ‘एआयबी’, ‘इस्ट इंडिया कॉमेडी’,‘एसएनडी’, झाकीर खान, तन्मय भट, रोहन जोशी ही तरुणाईला भुरळ घालणाऱ्या विनोद वीरांची मांदियाळी. यांची ब्रीदवाक्यं किंवा कोट्सचे प्रिंट्र्स हमखास टीशर्ट्सवर अवतरतात. कित्येकदा त्यात अपशब्द, चावट विनोदांचाही समावेश असतो. ब्रो, चिल्ल मार, बाबाजी का ठुल्लू, असे कॉलेजच्या कट्ट्यावर सरार्स ऐकू येणारे शब्द सध्या कपड्यांवरही उमटू लागलेत. पिझ्झाप्रेम, संगीत, प्रवास, सिनेमा.. तुमची आवड कोणतीही असो, त्याच्याविषयी एखादं प्रिंट्र हमखास बाजारात पहायला मिळतं. कारण प्रिंट्र्स केवळ कपड्यांना देखणेपणा देत नाहीत. तर ते समाजाचं चित्रणसुद्धा करतात. ‘बलात्कार, खून या रोजच्या बातम्या वाचताना लक्षात येतं की आजची स्त्री सुरक्षित नाही. आज प्रत्येकीकडे स्व-संरक्षणासाठी एक बंदूक असलीच पाहिजे. हे अधोरेखित करण्यासाठी आम्ही ड्रेसेसवर बंदुकांचं प्रिंट्र्स प्रतीक म्हणून वापरले आहेत, असं डिझायनर प्रणव मिश्रा सांगतो. तेव्हा प्रिंट्र्समधून अधोरेखित होणारी समाजातील भीषणतासुद्धा जाणवते. त्यामुळेच प्रिंट्र्स निवडीबाबत थोडी काळजी घेणंसुद्धा गरजेचं असतं. कारण तुमची मतं, विचार नकळतपणे या प्रिंट्र्समधून उमटत असतात. रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीवर रोखलेल्या चावट नजरा हा आपल्यासाठी नवीन विषय नाही. पण तीच मुलगी ‘तुम्ही हे वाचू शकत नसाल, तर माझ्या खूप जवळ उभे आहात’, अशा आशयाचा टीशर्ट घालून आपल्याला जे बोलायचं आहे ते कपडय़ांच्या माध्यमातूनही थेट सांगताना दिसते. यातून फॅशनबरोबरच समाजाच्या दांभिकतेवर बोट ठेवणंही ती सहजसाध्य करते. ऑफिसवेअरमध्ये तुमच्या कपड्यांवरील प्रिंट्र्सची निवड जाणीवपूर्वक करणं गरजेचं असतं. त्यामुळे पुढच्यावेळेस खरेदीला जाताना कपड्यांवरील प्रिंट्र्सकडे नीट लक्ष द्या. काय माहीत तुमच्या मनातील भावना तुमच्यापेक्षा तुमचा ड्रेसच चांगल्या रीतीने व्यक्त करू शकेल.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 3:06 am

Web Title: printing matters on t shirt out of fashion
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : जिलेट
2 Watchलेले काही : मोठी झालेली मुले!
3 व्हायरलची साथ : सायबर गनिमी कावा..
Just Now!
X