सर्जनशीलतेला वाव मिळण्यासाठी सातत्यानं केलेली धडपड आणि आवडीच्या विषयांचं अधिकाधिक ज्ञान मिळवून त्यांचे धागे गुंफायच्या प्रयत्नांविषयी सांगतेय, राजस्थानातील वनस्थली विद्यापीठातील प्रियम गोंदकर.

हाय फ्रेण्ड्स! आजचं हे काम नेहमीच्या कामापेक्षा थोडं वेगळं आहे. खरं तर हे कामही नाही म्हणता येणार.. किंवा खरं तर हे ‘स्वगत’ म्हणावं लागेल, रंगभूमीच्या भाषेत बोलायचं झालं तर. मी जयपूरजवळच्या वनस्थली विद्यापीठात बी. ए. सेकंड इयरला आहे. माझे विषय आहेत – टेक्स्टाइल डिझायनिंग, ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंग, ड्रामा अ‍ॅण्ड थिएटर आर्ट्स. इथं येण्याआधी माटुंग्याच्या एस.एन.डी.टी.मधून मी होम सायन्स केलं. मला पहिल्यापासूनच डिझायनिंगची आवड होती. इथल्या बी. डिझायनिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घ्यायच्या वेळी आलेल्या काही तांत्रिक अडीअडचणींमुळं मला बी.ए.ला प्रवेश घ्यावा लागला. मुंबईत असताना मी प्रोफेशनल डान्स, अ‍ॅक्टिंग, ड्रामा वगैरेंत सहभागी होत असे. ड्रॉइंगचीही आवड होतीच. त्यामुळं सगळे माझे आवडते विषय शिक्षणात एकत्र निवडता आलेत.

इथल्या म्हणजे वनस्थली विद्यापीठातल्या आणि आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीत खूपच फरक आहे. इथं थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही इक्वली इंपर्ॉटट असतं. मी ते एन्जॉय करतेय, कारण सगळे विषय माझ्या आवडीचेच आहेत. इथं हिंदीला जास्ती महत्त्व दिलं जातं. नोट्स वगैरे अस्खलित हिंदीतल्या असल्यानं त्या समजून घेताना कधी कधी तारांबळ उडते. या नोट्सचं परीक्षेआधी भाषांतर करावं लागतं. त्यामुळं मी दोन विषय इंग्रजीत आणि एक विषय हिंदीतच लिहिते. हिंदी तेवढं चांगलं नसल्यानं पटकन काही वेळा चुकीचं बोलून जाते नि हसं होतं. मला थिएटरमध्ये अधिक रस वाटतो. सुरुवातीला आम्हाला ग्रीक थिएटरचा इतिहास होता. थोडासा विचार करत भारतीय रंगभूमीच्या इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत डोकावल्यास सर्वाधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय तो मराठी रंगभूमीला. त्यामुळं मराठी नाटक टिकावं, असं मला मनापासून वाटतं. ड्रॉइंगमध्ये आम्हाला प्राचीन लेणी, मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीतील शैली आणि काही प्रमाणात राजस्थानी लोकसंस्कृतीचा अभ्यास आहे. दहावीपासूनच डिझायनिंग करायचं ठरवल्यानं टेक्स्टाइल डिझायनिंगमध्येच करिअर करायचा विचार आहे. या टेक्स्टाइल डिझायनिंगमध्ये कपडे नव्हे, तर कापड तयार केलं जातं. यंदा मी व्हिविंग करायला शिकतेय. कापड विणायला. त्यात मला खूप रस वाटत असला तरी या कामात मेहनत खूप असल्यानं त्याचा काही वेळा ताणही येतो. क्वचित असं वाटतं की, दुसरा काही पर्याय शोधावा की काय.. कारण थिएटरमध्येही आर्ट डिरेक्शन, कॉश्चुम डिझायनिंग असं वेगळं क्रिएटिव्ह काम करता येऊ शकेल.. त्यावर अजून विचार चाललाय.

वनस्थली विद्यापीठाच्या स्थापनेची गोष्ट इंटरेस्टिंग आहे. वनस्थली गावातल्या मुलींना शिकायला म्हणून गावकऱ्यांनी शाळा सुरू केली. शाळेचं पुढं महाविद्यालय आणि महाविद्यालयाचं विद्यापीठ झालं. हे पूर्णपणे रेसिडेन्शिअल युनिव्हर्सिटी म्हणजे निवासी विद्यापीठ आहे. आम्हाला कॅम्पसबाहेर जायला परवानगी नाहीये. फक्त सुट्टीत घरी येतो-जातो तेवढं बाहेर जाणं होतं. इथली प्रसिद्ध ठिकाणं मलाही ऐकूनच माहिती आहेत. कॅम्पसमध्ये एकूण तिसेक हॉस्टेल्स असून दरवर्षांनुसार आमचं हॉस्टेल बदलतं. मुलींचंच विद्यापीठ असल्यानं अगदी सेफ वाटतं. आमच्या विषयांव्यतिरिक्त आम्हाला हॉबी क्लास घ्यावा लागतो. गेल्या वर्षी मी कथक आणि यंदा व्हायोलिन घेतलंय. माझ्या विषयांचे सगळे प्राध्यापक हसतखेळत शिकवतात. त्यामुळं शिकायलाही मजा येते. इतरांचे काही प्राध्यापक मात्र थोडीशी पार्शलिटी करतात, असं जाणवतं. इथला सगळा स्टाफ, डिपार्टमेंटमधले हेल्पिंग हॅण्ड्स खूप चांगले आहेत. लॅब असिस्टंट स्त्रियांना ‘भाभ’, पुरुषांना ‘भय्याजी’, वॉर्डनना ‘जिजी’, साफसफाई करणाऱ्यांना ‘बाईजी’ असं संबोधावं लागतं. तेही आम्हाला कायम ‘जिजी’ अशी हाक मारतात. मैत्रिणींव्यतिरिक्त सगळ्यांना कटाक्षानं ‘आप’ म्हटलं जातं.

हॉस्टेल लाइफमुळं सगळ्या प्रकारच्या मुली बघायला मिळतात. गेल्या वर्षीच्या रूममेट्सशी माझं फारसं पटलं नाही. कारण त्यांच्याकडं अ‍ॅडजस्टमेंट करायची वृत्ती नव्हती. काही समज-गैरसमज होत गेले आणि मी ते क्लीअर करत बसले नाही. विचार करताना जाणवलं की, आमच्या सांस्कृतिक प्रथा-परंपरांमध्ये फरक आहेत. उदाहरणार्थ, संक्रांतीला आपण काळ्या रंगाचे कपडे घालतो तर इथं पिवळ्या रंगाचे घातले जातात. त्यामुळं मी काळा रंग वापरल्यावर त्या बघतच राहिल्या होत्या. अशा अनेक गोष्टी घडल्या आणि त्या काळात मी एकटी पडले. फार ताण आला होता. घरच्यांनी मुंबईला परतण्याचा पर्यायही समोर ठेवला होता. दरम्यान समान आचारविचारांच्या दुसऱ्या ग्रुपमधल्या मुली माझ्याशी बोलायला लागल्या आणि आमची मैत्री झाली. यंदा त्या माझ्या रूममेट्स आहेत. मुंबईत असतानाही मी शोज वगैरेंसाठी बाहेर जात असल्यामुळं घरापासून थोडं लांब राहायची सवय आहे. आता घरच्यांशी फोन आणि व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून कॉण्टॅक्टमध्ये असते. तरीही काही वेळा घरची आठवण येतेच. अशा वेळी आम्ही रूममेट्स एकमेकींची काळजी घेतो. हळव्या झालेल्या मैत्रिणीचं मन जपायचा प्रयत्न करतो. जेवणातली मुख्य गोष्ट ही इथं कांदा-लसूण वापरत नाहीत आणि घरी माझं त्याच्याशिवाय पान हलत नाही. त्यामुळं ते फारसं आवडलं नाही. क्वचित कधी आम्हीच काहीबाही करून खातो. शिवाय घरून आणलेला मायेनं दिलेला खाऊ असतोच सोबत.. इथले ऋतू एक्स्ट्रिम आहेत. माझा लाडका पाऊस फारसा नसला तरी उन्हाळा आणि थंडी कडाक्याची असते. थंडी एवढी की २-३ स्वेटर, ग्लोव्हज घालूनही कुडकुडायला होतं.

मुंबईत असताना अभ्यासात फारशी रुची नव्हती. इथं माझ्या आवडीचे सगळे विषय असल्यानं अभ्यासात सहजता आलेय. आणखी एक म्हणजे मुंबईत मी टीचर्सशी बोलताना खूप ओपन होते, तसं इथं बोलणं योग्य नाहीये. त्यावरून लगेच चर्चा सुरू होते, असं जाणवलंय. पेंटिंग्जमध्ये माझे विचार रिफ्लेक्ट होतात. जयपूर इफेक्ट अजून त्यात फारसा जाणवत नाही. विषयानुरूप अभ्यास करताना ती शैली वापरावी लागते. इथं आल्यावर सगळ्यात मोठा बदल झाला, तो माझ्या कपडय़ांमध्ये. हॉस्टेलबाहेर फक्त खादीचा सलवारसूट कम्पलसरी घालावा लागतो.

मुंबईत असताना मी नृत्य-एकांकिका स्पर्धा करायचे. एक व्यावसायिक नाटकही केलं होतं. एका चित्रपटासाठीही ऑफर आली होती. इथं मुलींना प्रत्येक वेळी आठवण करून दिली जाते की, ‘तुम्ही टेक्स्टाइल शिकायला आला आहात’. ते दर वेळी मनापासून जाणवतं आणि त्यामुळं आणखीन मन लावून अभ्यास केला जातो. टीचर्सकडून अनेकदा अ‍ॅप्रिसिएशन मिळतं. एक छानशी स्मरणीय आठवण सांगते. ती आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. एकदा आम्ही सगळ्या रूममेट्स मिळून रात्रभर जागून जुनी गाणी शोधून शोधून ती गात राहिलो होतो. अर्थात दुसऱ्या दिवशी उठून लेक्चरला जावंच लागलं होतं. कदाचित ती गाणी म्हणता म्हणता, त्या सुरांच्या लडींमध्ये प्रत्येकीनं आपापली स्वप्नं अलगदपणं विणली असतील. रंगीबेरंगी स्वप्नांचे ते धागे भविष्यात पक्के होण्यासाठी दृढपणं गुंफायला हवाय एकेक धागा.. सातत्याचा.. जिद्दीचा.. आशांचा आणि स्वप्नांचादेखील.

– प्रियम गोंदकर टोंक, राजस्थान
(शब्दांकन – राधिका कुंटे )

‘ती’चं विश्व, ‘ती’चं अवकाश, ‘ती’चं करिअर, ‘ती’चा ध्यास.. त्यासाठी तिला घरापासून दूर जावं लागतं. देशी-परदेशी.. आपल्या अनुभवांची टिपिकल चौकट ओलांडताना कोणकोणते अनुभव बांधते ती गाठीशी? कशी वावरते, राहते परक्या प्रांतात.. कशी अ‍ॅडजस्ट करते त्या संस्कृतीत स्वत:ला.. काय काय जाणवतं तिला.. ते या सदरातून वाचायला मिळणार आहे.
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, जॉबच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल लिहिताना विषय म्हणून ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com