ती आली, तिने पाहिलं आणि ती जिंकली.. अशी अवस्था मराठी संगीत नाटक ते ‘मुघल-ए-आझम : द म्युझिकल’ या भव्यदिव्य संगीत नाटकात अनारकली म्हणून लोकांची मनं जिंकणाऱ्या प्रियांका बर्वेला पाहून उपस्थित रसिकांची झाली होती. अंगभूत गुण असणं आणि त्या गुणांना जोखून, वाढवून आपली कला विकसित करत राहणं या दोन्ही गोष्टींचा उत्तम मिलाफ साधत एक गायिका अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेल्या प्रियांकाला भेटण्याची संधी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात मिळाली. चित्रपट, मालिकांसाठी पाश्र्वगायन करणाऱ्या प्रियांकाने ‘अनारकली’च्या रूपात केवळ मराठीच नव्हे तर बॉलीवूड जनांच्या मनातही स्वत:चं स्थान निर्माण केलं. तिच्याशी ‘व्हिवा लाऊं ज’च्या मंचावर संवाद साधला रेश्मा राईकवार आणि स्वाती केतकर-पंडित यांनी.

बीइंग अनारकली’..

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

एक दिवस माझ्या हातात स्क्रिप्ट आलं आणि ‘उद्या ते पाठ करून ये’ असं मला फिरोज सरांनी सांगितलं. त्यात माझे संवाद एखाद् दुसऱ्या ओळीचे दिसत होते. लगेच पाठ होतील अशा समजुतीने मी सरांना तोऱ्यात सांगितलं की मी आत्ताच थोडय़ा वेळात पाठ करते. संवाद वाचल्यावर लक्षात आलं की त्यातले बहुतांश शब्द उर्दू होते आणि मला त्यांचा साधा अर्थही लागत नव्हता. उर्दू उच्चारांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी कमाल अहमद यांच्याकडे माझी शिकवणी सुरू झाली. संपूर्ण नाटकात ‘फिटनेस’ महत्त्वाचा असल्याने दिवसाची सुरुवात योगाने व्हायची. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ अशी आमची नाटकाची रिहर्सल, संध्याकाळी ६ ते ८ डान्सची प्रॅक्टिस आणि त्यानंतर वेळ काढून गाण्याचा रियाज असं माझं त्या दिवसांचं शेडय़ूल होतं. या सगळ्यात उर्दूची शिकवणी आणि झोप या गोष्टीही सांभाळायच्या होत्या.बॉलीवूड प्रीमियरला पाच दिवस बाकी असताना सगळ्यांनाच खूप दडपण आलं होतं. मात्र ‘झीरो’ शोच्या वेळी, जिथे फक्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक असतात तिथे सगळं व्यवस्थित पार पडलं. त्या शोमध्ये मला माझ्यातली ‘अनारकली’ सापडली.

गाणारं घर

माझी आजी मालती पांडे-बर्वे मोठी गायिका होती आणि आजोबा पद्माकर बर्वे शास्त्रीय गायक होते. आजीची गाणी आणि आजोबा घेत असलेले शास्त्रीय संगीताचे क्लासेस यामुळे गाणं ऐकत-ऐकतच मी मोठी झाले. आजी तिच्या वयाच्या अठराव्या वर्षांपासून पाश्र्वगायन करत होती. तिच्यासारखं पाश्र्वगायन मलाही करायचं होतं. इयत्ता पाचवीत असल्यापासून माधुरी जोशी यांच्याकडे मी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. तेव्हाच मी ठरवलं, मला फग्र्युसन कॉलेजमध्ये जायचंय आणि आर्ट्स करायचंय; आणि मी तसंच केलं. आता माझ्या सासरीही सगळे संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत. माझा नवरा सारंग कुलकर्णी सरोदवादक आहे, त्याचे वडील पं. राजन कुलकर्णी हेसुद्धा सरोदवादक आहेत. त्या दोघांनी याच वर्षीच्या सवाई गंधर्व महोत्सवात सरोदवादन सादर केलं. गाणाऱ्याचं घर कसं असेल, अशी एक उत्सुकता नेहमी असते. आमच्या या घरात खरोखरच सकाळी वेगवेगळ्या खोलीतून वेगवेगळा तानपुरा ऐकू येत असतो. खऱ्या अर्थाने गाणारं घर असल्याने मला माझ्या करिअरसाठीही नेहमीच मदत झाली आहे.

आणि मुघल-ए-आझममिळालं..

काही गोष्टी या तुमच्यासाठीच निश्चित असतात. जे ‘मुघल-ए-आझम’ आणि माझ्याबाबतीत खरं आहे. एवढं मोठं ‘म्युझिकल’ करण्याची संधी मराठी रंगभूमीनेच मला मिळवून दिली. या ‘मुघल-ए-आझम’चे दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांना क ोणी बॉलीवूड अभिनेत्री वगैरे नको होती. त्यांना संगीताची आणि नृत्याची तालीम घेतलेली अभिनेत्री हवी होती. संजय डावरा हा त्यांचा कास्टिंग डिरेक्टर होता आणि तो माझा मित्रही होता. त्याने परस्पर माझं नाव सुचवलं आणि दिग्दर्शकांनी मान्यता दिल्यावर त्याने मला भेटायला यायला सांगितलं. त्या वेळी मला फिरोज सरांबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे मी भेटायला जाताना थोडं सर्च करून गेले होते. भेटल्यावर त्यांनी प्रोजेक्टचं स्वरूप सांगितलं. सुरुवातीचे सहा महिने फक्त तालमीसाठी द्यावे लागणार होते. मला बाकी कोणत्याच गोष्टीची अडचण नव्हती, मात्र मला हिंदी लोकांबद्दल ‘फोबिया’ होता. त्यामुळे मी एक महिना काहीच उत्तर दिलं नाही. मला संजयचा पुन्हा फोन आला, नंतर पश्चात्ताप होईल असंही त्याने सांगितलं. मी पुन्हा भेटायला गेले. तेव्हा कळलं की हे खूप मोठं प्रकरण होतं. मयूरी उपाध्याय याची नृत्य दिग्दर्शिका, शापूरजी पालनजी आणि एनसीपीए यांचं जवळपास आठ ते दहा कोटींचं प्रॉडक्शन, मनीष मल्होत्राचे कॉस्च्युम्स असा सगळा ‘रॉयल कारभार’ होता. हे सगळं कळल्यावर मात्र त्यासाठी माझी निवड झाल्याचा मला खूप आनंद झाला आणि मी तयारीला लागले. (उर्वरित मजकूर पान ४ वर)

संगीत नाटकांशी नातं

शाळेत असताना मी सगळ्याच गोष्टीत भाग घ्यायचे. नाटकामुळे अभिव्यक्तीसाठी आणि नृत्याने तालाला मदत होईल, असा विचार करून आईनेही मला कधी थांबवलं नाही. कॉलेजमध्ये असताना किरण यज्ञोपवीत यांच्या ‘मळभ’ या नाटकात काम केलं. त्यात गार्गी फुले, शशांक शेंडे, मधुरा देव अशी छान टीम तयार झाली होती. त्याच सुमारास ‘रंगसंगीत प्रतिष्ठान’ची संगीत नाटकांची स्पर्धा होती आणि किरणदादाने त्यासाठी नाटक बसवायचं ठरवलं. त्यात आलोक राजवाडे, सिद्धार्थ मेनन यांच्यासोबत मी काम केलं. गंधार संगोराम याने त्याला संगीत दिलं होतं. त्यात मला सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री असं बक्षीस मिळालं. त्यानंतर मला राहुल देशपांडेच्या ‘संगीत संशयकल्लोळ’साठी विचारणा झाली. राहुलदादाने दर वर्षी एक संगीत नाटक पुनरुज्जीवित करायचं ठरवलं होतं. त्या वेळी मी केवळ वीस वर्षांची होते आणि ‘संशयकल्लोळ’मधली रेवतीही वीसच वर्षांची होती. नाटय़संगीत त्याआधी कधी गायलं नव्हतं. त्यामुळे हे आव्हान होतं. हे आव्हान पेलून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी राहुल दादाने एक-एक तान माझ्याकडून शंभर वेळा घोटून घेतली.

संगीत नाटक अभिमानानेच पेश करायला हवं

जेव्हा वीस वर्षांच्या रेवतीची भूमिका वीस वर्षांचीच एक तरुणी साकारताना दिसली तेव्हा तरुणाईला ते बघण्यात रस वाटू लागला. हळूहळू संगीत नाटकाच्या प्रयोगांना तरुणाई चांगला प्रतिसाद देतायेत हे लक्षात येऊ लागलं. ‘संगीत संशयकल्लोळ’चा पन्नासावा प्रयोग फक्त ‘नाटक कंपनी’साठी करण्यात आला. त्या वेळी आम्हाला तरुणांचा मिळालेला प्रतिसाद पाहून नक्कीच समाधान वाटलं. संगीत नाटक ही आपली परंपरा आहे, आपलं वैभव आहे आणि ते अभिमान आणि गर्वानेच पेश केलं गेलं पाहिजे. पेश करताना क लाकाराला तो अभिमान असेल तर बघणाऱ्याला तो आपोआप भिडतो. मला स्वत:ला आधी अल्लड रेवती आवडत होती आणि आता विचारी भामिनी आवडते.

मी सध्या काय करते

मी ‘रमा माधव’, ‘मुंबई पुणे-मुंबई’, ‘डबल सीट’, ‘ऑनलाइन-बिनलाइन’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. काही मालिकांची शीर्षकगीतं मी गायली आहेत. ‘सागरिका म्युझिक कंपनी’ची तीन-चार गाणीही रेकॉर्ड केली आहेत. राहुल देशपांडेसोबत मी ‘शादाब’ हा गजलचा अल्बम रेकॉर्ड केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आणि सारंगने पाच महिन्यांपूर्वी ‘प्रियारंग प्रोजेक्ट’ या नावाने एक यूटय़ूब चॅनेल सुरू केलं आहे. त्यावर प्रकाशित केलेल्या ‘महागणपतीम्’ या पहिल्या गाण्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता तौफिक कुरेशी यांच्यासोबत माझ्या आजोबांची एक बंदिश रेकॉर्ड करून झाली आहे. लवकरच ती यूटय़ूब चॅनेलवर पाहायला आणि ऐकायला मिळेल.

रियाज हवाच

आपण कितीही व्यग्र असलो आणि कितीही वेळा एखादी भूमिका केलेली असली तरीही रियाज आणि तालीम यांच्याशिवाय पर्याय नाही. ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल की आपल्याला आता सगळं येतंय त्या क्षणापासून आपल्या चुका व्हायला सुरुवात होते. रंगभूमीला कधीही गृहीत धरू नका. जेव्हा आपल्यात अतिआत्मविश्वास वाढायला लागतो तेव्हा आपल्या आईसारखी रंगभूमीही आपल्याला बरोबर आपली चूक दाखवून देते.

गजलकथा

मी लहान असताना हरिहरन यांचा ‘काश’ हा गजलांचा अल्बम आला होता. तो इतका सतत घरात लावला जायचा की मी त्या काळात फक्त गजल ऐकत होते, कोणीही घरी आलं की गजल म्हणून दाखवत होते. आकाशवाणीची दर वर्षी गाण्याची स्पर्धा असते. त्यात अनेक वेगवेगळे प्रकार असतात. मला सुगम संगीत आणि गजल अशा दोन्हीत भाग घ्यायचा होता. पण फॉर्म भरायला जाताना मी एकच डी.डी. घेऊ न गेले होते. त्यामुळे मला एकाच प्रकारात भाग घ्यावा लागणार होता. माझ्यासोबत गंधार होता; त्याने मला आव्हानच दिलं की ‘गजल’मध्ये भाग घेऊ न दाखव आणि मीही तयार झाले. स्पर्धा झाली आणि मी अचानक भारतात पहिलीच आले!

कसं राहायचं, कसं बोलायचं..

मराठी प्रेक्षक हा कायमच घरच्यासारखा वाटत आला आहे, मात्र मला हिंदीचा आणि हिंदी लोकांचा फोबिया होता. अनारकली स्वीकारल्यानंतर मात्र तिथे तालमीला जाताना काय कपडे घालावेत इथपासून मला माझ्या सवयी थोडय़ाफार बदलाव्या लागल्या. मोठमोठय़ा लोकांमध्ये कसं वावरायचं, कसं वागायचं हे सगळं मी तिथे शिकत होते. व्यावसायिक शिस्त आणि रुटीन तिथे पाळावंच लागायचं. तुम्ही कसे बोलता, काय कपडे घालता हेही तिथे अनेकदा महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे माझं ‘ग्रूमिंग’ हे तिथे झालं असं म्हणायला हरकत नाही.

मुघल-ए-आझमन पाहणं पथ्यावर पडलं

ज्या वेळी मी अनारकलीसाठी हो म्हटलं तोपर्यंत मी एकदाही ‘मुघल-ए-आझम’ बघितलेला नव्हता. त्यामुळे माझ्यावर मधुबालाच्या अनारकलीचा प्रभाव नव्हता. मी ‘मुघल-ए-आझम’ पाहिलेलं नाही हे समजल्यावर काय करू मी तुझं़, असं फिरोज सरांचं झालं होतं. मात्र त्यांनी ‘आता बघूच नकोस’ असा सल्ला दिला आणि मी त्यांचं ऐकलं. मला माझ्यातल्या अनारकलीचा शोध घ्यायचा होता. मला माझी अनारकली सापडल्यानंतर मात्र मी तो पाहिला. आता मी म्हणते की मी पाहिला नव्हता तेच चांगलं होतं कारण मधुबाला एकच होती, तिची नक्कल करणं कोणालाच शक्य नाही.

संयम हवा

कलेच्या क्षेत्रात चांगलं काम मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. त्यासाठी संयम बाळगणं खूप गरजेचं असतं. मिळालेली प्रत्येक संधी तितकीच उत्तम असेल असं नाही, प्रत्येक टीम उत्तम असेल असं नाही. मात्र चांगल्या कामाचा शोध घेताना शांतपणा टिकवून ठेवणं महत्त्वाचं असतं. काही वेळा वाईट अनुभव येऊ  शकतात. अशा वेळी समोरच्या माणसाचा रंग ओळखून चांगल्या प्रकारे ‘नाही’ म्हणता आलं पाहिजे. अनेकदा सोशल मीडियावर इतरांची चाललेली कामं पाहून नैराश्य येऊ  शकतं. अशा वेळी आपण केलेल्या कामाने आपण स्वत: समाधानी असलं पाहिजे. घरच्यांचा पाठिंबा आणि आधारही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात.

जुनं ते सोनं आहेच, पण..

आताचं संगीत आणि जुनं संगीत ही तुलना नेहमीच सुरू असते आणि ती तशीच सुरू राहणार. प्रत्येक पिढी आपल्या काळाचा महिमा गाणारच. मात्र प्रत्येक पिढीसोबत काही ना काही नवं आणि चांगलं येत असतं. त्यामुळे जुनं की नवं हा वाद घालण्यापेक्षा प्रत्येक पिढीतलं चांगलं काय ते घेऊन त्याची मोट बांधली गेली पाहिजे. आताच्या पिढीकडे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर फक्त नवीन पिढीपुरता मर्यादित नाही तर सगळ्यांनीच त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. जुनं ते सोनं आहेच, पण प्रत्येक पिढीत सोन्याचा काही अंश असतो जो वेचून घेतला पाहिजे.

असे चाहते भेटती..

एकदा आम्ही यूएसमध्ये बृहन्महाराष्ट्र मराठी संघात ‘संगीत मानापमान’चा प्रयोग केला होता, त्याला जवळपास चार ते पाच हजार प्रेक्षकवर्ग होता. प्रयोग संपल्यानंतर एका आजींनी स्टेजच्या मागे भेटायला येऊ न चक्क माझी दृष्ट काढली. एकदा ‘पृथ्वी फेस्टिव्हल’मध्ये आम्ही माइकशिवाय प्रयोग केला होता. सुरुवातीला जरा ‘ऐकू येत नाही’चा गोंधळ झाला; मात्र नंतर प्रेक्षकांनी संपूर्ण लक्ष रंगमंचावर केंद्रित करून ऐकायला सुरुवात केली आणि प्रयोग रंगत गेला. अनारकलीची भूमिका साकारायला सुरुवात केल्यानंतर एकदा एक आजोबा येऊ न भेटले. ते म्हणाले की, मी दर वेळी पाचशे रुपयांचंच तिकीट काढतो. पण इतक्या लांबून तुझ्या चेहऱ्यावरचे भाव दिसत नाहीत म्हणून मी दुर्बीण घेऊ न तुझे प्रवेश, गाणी आणि अभिनय बघतो. ‘मुघल-ए-आझम’चे आता दोन संच आहेत आणि दुसऱ्या संचात अनारकली ‘नेहा सरगम’ साकारते. अनेकदा मला स्टेजवर बघायला येणारे लोक तिला पाहून खट्टू होतात. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे की कोणत्या शोमध्ये मी असणार आहे हे आधी प्रेक्षकांना कळावं यासाठी आमच्या टीमचे उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

व्हिवा लाऊंजची ही गप्पांची मैफल खऱ्या अर्थाने प्रियांकाच्या गाण्यांनी सूरमयी झाली..

प्रियांकाला इथे येऊन अधिक समजू शकले

प्रियांका बर्वे आणि माझी पहिल्यापासून ओळख आहे, आम्ही एकत्र काम करतो. पण इथे येऊन मी तिला अधिक समजू शकले, शिवाय एक कलाकार अनेक गोष्टी सांभाळून स्वत:ची कला जोपासत खूप चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो हे शिकायला मिळालं.

सानिका गाडगीळ

तिचा प्रवास प्रोत्साहित करणारा

एका मराठी मुलीचा इतका मोठय़ा टप्प्यापर्यंतचा प्रवास हा खूप प्रोत्साहित करणारा होता. तिचा सौम्यपणा, उत्तम गायकी सगळंच खूप मनाला भावणारं होतं. मी तिचा आदर्श नक्कीच ठेवीन.

श्रुती कानिटकर

नाटय़संगीतातली मजा कळली

खरं तर मला गाण्यांची म्हणावी तितकी आवड नाही, पण आजचा कार्यक्रम बघून, ऐकून नाटय़संगीतातली मजा कळली. एक वेगळा अनुभव घेता आला.     ’

प्रसाद आवळे

आदर्श समोर ठेवणारा कार्यक्रम

‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमाचे नेहमीच अप्रुप वाटते. या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे दर्शन होतेच आणि त्यातून आदर्शही मिळत जातात. एक गायक व त्याचबरोबर अभिनेत्री असा प्रवास पाहायला मिळला. एक गायिका अभिनेत्री असूनही त्यातील आव्हानात्मक गोष्टी, प्रत्येक टप्प्यावरच्या अडचणी यांना सामोरे जाण्याचे भान तसेच त्यातून आपल्या कामातून मिळणारे समाधान त्यांनी व्यक्त केले ही बाब खास आवडली.

चैतन्य गुरव, रुईया कॉलेज

प्रियांकाचं गाणंही अनुभवता आलं

आम्ही मित्र एकत्र ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमाला येतो. आजचा कार्यक्रम माझ्या आयुष्यभर लक्षात राहील, कारण याआधीच्या कार्यक्रमांमधून प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून रंगलेल्या गप्पा ऐकताना वेगवेळ्या व्यक्तिमत्त्वांकडून त्यांचे अनुभव कळत गेले. प्रियांका बर्वे यांचे केवळ अनुभवच नाहीत तर त्यांचे गाणेही जवळून ऐकायला मिळाले. त्यांच्याबद्दल आधी फारशी माहिती नव्हती, पण आज त्यांचं गाणं ऐकूनच त्यांची या क्षेत्रातील भरारी लक्षात आली.

प्रतीक जगताप, रुईया कॉलेज

लहान वयात मोठं कर्तृत्व

मला हा कार्यक्रम खूपच आवडला. मी पहिल्यांदा जेव्हा ‘व्हिवा लाऊंज’ला आलो होतो तेव्हाच मला या कार्यक्रमाची संकल्पना खूप आवडली होती. आमची बारावी परीक्षा सुरू असतानाही आम्ही खास आलो. मला प्रियांका बर्वेचा सकारात्मक दृष्टिकोन खूप आवडला. आपण कितीही मोठी गगनभरारी घेतली तरी आपले पाय हे नेहमी जमिनीवर असले पाहिजेत, हा भाव मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसला. त्यामुळे एवढय़ा कमी वयात त्यांनी मिळवलेल्या यशाचं कौतूक करावं तेवढं कमीच आहे.

साईश मोरे, रुईया कॉलेज

करिअरसाठी खंबीर दृष्टिकोन हवा

मला प्रियांकाचं व्यक्तिमत्त्व फार शांत व मनमिळाऊ  वाटलं. स्त्रीने किती खंबीरपणे आपल्या करिअरकडे पाहिलं पाहिजे, किती मेहनत व कामात चिकाटी असली पाहिजे हे मला त्यांच्या मनस्वी स्वभावातून जाणवलं. फार सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या आयुष्यातील घडामोडींवरून आपण जे काही करत असून त्यातही आपण सतत नवीन काही तरी शोधलं पाहिजे हे लक्षात आलं.

वैभवी माडे, रुईया कॉलेज

प्रेरणादायी कार्यक्रम

कार्यक्रम खूप प्रेरणादायी होता. कुठलंही क्षेत्र असलं तरी कष्ट व मेहनत याशिवाय पर्याय नाही हे उमजलं. कोणत्याही क्षेत्रात ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने पुढे जायला हवं आणि सगळ्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात.

शारदा चिपळूणकर

अविस्मरणीय अनुभव

‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ची मी फार फॅन आहे. आजच्या कार्यक्रमातून प्रियांकाने जे काही सांगितले त्यावरून ती माझी आदर्श झाली आहे. तिने जे अनुभव सांगितले ते अविस्मरणीय आहेत.

ज्योती चव्हाण

संकलन : गायत्री हसबनीस, श्रुती जोशी