‘फ्रेंड्स, वी हॅव टू डु इट.. स्पॉन्सरशिप आणा, क्रिएटिव्हिटी दाखवा..अरे एऽऽऽ एच.ओ.डी.ची पर्मिशन राहिलीच की! जर ती नसेल तर मग ‘महापुरात त्सुनामी’ असं व्हायचं. चला मीटिंग घ्या, टीम्स करा, कामाला लागा यार. थंडीला मारा गोळी..’ वातावरणाच्या या पीचवर थंडी, गरमी अशी गुगली पडत असतानाच ‘फेस्टिवल’ नावाचा पाऊस येतो आणि मग कसली गुगली आणि कसलं काय.. सारं काही आरपार. डोक्यावर फक्त आणि फक्त फेस्टिवलचेच घोडेस्वार; कॉलेज फेस्टिवल्स म्हटलं की असंख्य कॉलेजियन्सची काहीशी अशीच स्थिती होते.
कधी नव्हे ते फेस्टची थीम शोधण्यासाठी डोक्याला दिला जाणारा ताण, सहसा ज्युनिअर्ससमोर बेधडकपणे फेकली जाणारी लांबलचक, इन्स्पिरेशनल वाक्य अगदी ‘बॉर्डर’मधला सनी देओल देतो तशी आवाजाची फेक सध्या अनेक कॉलेजेसमध्ये कट्टय़ांवर, क्लासरूम्समध्ये, नाहीच तर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर हमखास वाचायला व ऐकायला मिळते. कारण विषयच काहीसा तसा असतो. ‘इज्जत का सवाल है बॉस..’ अस्सं म्हणत कॉलेजच्या फेस्टिवल्सचा हा गाडा अगदी नेटानं पुढे ढकलण्यासाठी इगो, अ‍ॅटिटय़ुड काही प्रमाणात बाजूला सारत आणि बरंच कसब लावत अनेक जण घाम गाळतात.
वाढता गारवा, सुट्टी आणि पिकनिक्सचा हँगओवर यामुळे आलेली ‘चिलॅक्स’ भूमिका काहीशा दूर सारत बऱ्याच कॉलेजेसच्या फेस्टिवल्सची तयारी जोमाने सुरू आहे. एखाद्या मोठय़ा इव्हेंटची आखणी करावी, अशी वातावरणनिर्मिती करून चेअर पर्सन, कोअर कमिटी, मार्केटिंग, पीआर, क्रिएटिव्ह, इव्हेंट हेड – सब हेड, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी अशा प्रोफेशनल टीम्सचा घाट सध्या घातला जात आहे आणि तोही ‘टम्र्स अ‍ॅण्ड कंडिशन्स अप्लाय’ करत.
फॉर्मल्स अटायर, स्पॉन्सर्सना पीच करण्याचे स्किल्स, नवनवीन आयडियाज् देणारे खुरापाती डोक्याचे कलाकार, विद्यार्थ्यांच्याच लेव्हलवर येऊन काम करणारे प्रोफेसर्स आणि ‘बडी चुनौती’ समजले जाणारे एच.ओ.डी. यांचे खरे तालरंग पाहायचे असतील तर ‘पधारो’ असं म्हणत उभ्या ठाकलेल्या कॉलेज फेस्टिवल्स शिवाय दुसरी जागा नाही. फेस्टिवल्सचं बजेट उभा करताना कोणा एका कोपऱ्यात दडून बसलेले पर्सनल कॉन्टॅक्ट्स तारणहार ठरून जातात. एखादी मीटिंग फिक्स करण्यापासून ते अगदी बॅनर, पोस्टर्स, सहभागी होणाऱ्या कॉलेजेसची गर्दी वाढवण्यासाठी सुरू असणाऱ्या या गोंधळात हीच ‘कधीच्या काळी’ भेटलेली, बहुधा फक्त तोंडओळख असलेली मंडळी मग ‘खास’ बनून जातात. एकमेकांना बघून तोंड फिरवणाऱ्या अनेक जणांचा ‘भरतमिलाप’ही हे फेस्टिवल्स घडवून आणतात. फेस्टिवल्सची ही लाट सोबत आणखी एक गंमत आणते, ती म्हणजे देवाणघेवाणीच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीतून. ‘तुम्ही आमच्या फेस्टला या.. आमचाही सर्वात जास्त सहभाग तुमच्याच फेस्टला देऊ..’ हा सरळ हिशेब ठेवून कॉलेजच्याच पातळीवर हे ‘फेस्टिव डिल्स’ केले जातातच. त्यातही मित्रा, भावा, भाई, डुड.. असं म्हणत ज्या मैत्रीच्या ज्या आणाभाका घेतल्या जातात त्याची तर धम्मालच!
थंडीच्या दिवसांत ऊर्जा देणारे हे फेस्टिवल्स आणि त्यांच्या थीमही तितक्याच दिमाखदार व कलात्मक असतात. अशाच काही हटके थीम्ससह यंदाही फेस्टची ही धूम कॉलेज कॅम्पसमध्ये अनुभवायला मिळणार आहे. मुंबईच्या सोमय्या कॉलेजचा ‘मीडियाटेक’, खालसा कॉलेजच्या ‘मंथन’ या फेस्ट्सची धम्माल यंदाही आहेच. परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाचा ‘कार्पेदिअम’ हा यापैकीच एक फेस्ट. ‘बॅक टू स्कूल’, ‘अनइन्वेंट’ या धम्माल थीम्सनंतर या वर्षी ‘कार्पेदिएम’ची ही सेना वळली आहे ग्रीक मायथोलॉजीच्या वाटेवर. ‘सिझ द मोमेंट’ असं म्हणत पुन्हा एकदा ग्रीक मायथोलॉजीची सफर घडवणार आहे यंदाचा कार्पेदिएम २०१६. जानेवारी २०१६ च्या २३ व २५ तारखेला हा फेस्टिवल पार पडणार आहे. ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाचा ‘स्वदेशी’ ही थीम असणारा फेस्टिवल म्हणजे ‘गंधर्व’. १९ व २० जानेवारीला होणाऱ्या या फेस्टिवल्सचा पाया अर्थात थीमच अत्यंत जवळची. ‘गंधर्व’ च्या तयारीसाठी झटणारे चेहरे अतिशय उत्सुक आणि उत्साही आहेत.
कलाकार मंडळींचं लक्ष फेब्रुवारीत मुंबईत होणाऱ्या काळा घोडा फेस्टिवल्सकडे लागलंय. त्याची तयारी सुरू झाली आहे. ही झाली मुंबईची बाजू. पुण्यातही कॉलेज कॅम्पसमध्ये फेस्टिवल्सची ही लाट आता पोहोचू पाहत आहे. पुण्यातल्या काही इंजिनीअिरग कॉलेजच्या फेस्टिवल्सची तयारी सुरू होण्याच्या बेतात आहे, तर काही ठिकाणी फेस्टिवल्सची थीम आत्ता कुठे ठरू लागली आहे. त्यामुळे ‘ये तो बस शुरुवात ह’ असं म्हणत पुणेकरांचा हा उत्साह मात्र गुलदस्त्यातच आहे. तेव्हा गॉसिप्स, पॉलिटिक्स, व फेस्टिवल्सची दुनिया अनुभवण्यास सज्ज व्हा.