20 November 2017

News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : पीडीए !

‘पीडीए’ किंवा ‘पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन’ याचा शब्दश: अर्थ म्हणजे प्रेमाचं जाहीर प्रदर्शन!

डॉ. वैशाली देशमुख | Updated: July 14, 2017 12:32 AM

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं?

स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

शहराच्या शांत भागातली ती सोसायटी. अनेक इमारती आणि आजूबाजूला भरपूर मोकळी जागा. त्यात स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, क्लब हाऊस, घसरगुंडय़ा, झोपाळे असं सगळं. संध्याकाळी सगळीकडे गजबजाट असायचा, लहान मुलं, टीनएजर्स खेळत नाही तर गप्पा मारत असायचे. पण दुपारच्या वेळी मात्र सगळा शुकशुकाट असायचा. एका अशाच शांत दुपारी आठव्या मजल्यावरच्या आजींना जिन्यात काही तरी आवाज ऐकू आला. त्यांनी सिक्युरिटीला फोन करून बोलावलं. तर तिथे कॉलेजला जाणारी दोन मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी बसलेले दिसले काहीशा ऑकवर्ड स्थितीमध्ये. ‘काय रे, लाजा नाही वाटत तुम्हाला? काही स्थळ-काळ बघाल की नाही? आई-वडिलांना सांगायला पाहिजे तुमच्या. ही आजकालची मुलं म्हणजे वाट्टेल ते चाळे करत असतात.’ जमलेल्या प्रत्येकानं आपलं काही ना काही मत व्यक्त केलं. यावर त्यातली मुलगी म्हणाली, ‘तुम्हीच सांगा मग आम्ही कुठं बसायचं ते!’

प्रेमात पडलेल्यांनी कुठे बसावं हा एक प्रॉब्लेमच झालाय. बागेत, झाडामागे, बीचवर असे भेटतात मग ते कुठेकुठे. शाळा-कॉलेजमधले जिने, मैदानं, कँ टीन, रिकामे वर्ग.. सगळ्या जागा एक्स्प्लोअर करून होतात. पूर्वी पार्क म्हटलं की खेळणारी, इकडून तिकडे पळणारी मुलं डोळ्यासमोर यायची. आता मात्र वेगळंच चित्र उभं राहतं.

‘पीडीए’ किंवा ‘पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन’ याचा शब्दश: अर्थ म्हणजे प्रेमाचं जाहीर प्रदर्शन! हे आपण सिनेमात पाहतो, आजूबाजूला पाहतो. ‘व्हॅलेन्टाइन डे’च्या दिवशी बाजारातही पहातो. शिवाय आजच्या टेक्नो युगात व्हच्र्युअल जग यात तरी मागे कसं राहील? फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर, इतर सोशल मीडियावर किती तरी लोक सतत एकमेकांबद्दल लिहितात, फोटो टाकतात. रिलेशनशिपच्या स्टेटसप्रमाणे त्याचं स्टेटस बदलत राहतं. इतकं की ब्रेकअप झालं आहे हे पार्टनरलाही या स्टेट्सवरून पहिल्यांदा कळतं. तुम्ही जर प्रेमात पडला असाल आणि तुमचं फेसबुक स्टेटस बदललं नाहीत तर लोक ‘तुम्ही प्रेमात नाहीच आहात’ असं म्हणायलाही कमी करणार नाहीत.

प्रेमाची ही जाहिरात काही वेळा बाकीच्यांना खिजवण्यासाठी किंवा मिरवण्यासाठीही केली जाते. आणि काही जण तर आपलं प्रेम दाखवण्याऐवजी यातून आपला अधिकारच दाखवत असतात. इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला हा वापर अगदी नकोसा, केविलवाणा वाटतो.

मीडियामध्ये दाखवलेलं प्रेम, मूव्ही स्टार्सचा पीडीए आपण सहजपणे खपवून घेतो. प्रत्यक्षातही बहुतेकांचं एकमत असतं की पब्लिकमध्ये हात धरणे, एकमेकांकडे प्रेमाने पाहणे, हग करणे इथपर्यंत ठीक आहे. फक्त त्याला काही मर्यादा हवी. काही जणांना मात्र अजिबात नाही पटत हे असं खासगी गोष्टी सगळ्यांसमोर करणं. चूक-बरोबर म्हणण्यापेक्षा हा ज्याच्या त्याच्या कम्फर्ट लेव्हलचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी, ज्या जनरेशनमध्ये, ज्या कल्चरमध्ये आपण वाढतो, त्याप्रमाणे आपली सहनशक्ती ठरते. पाश्चिमात्य देशांमध्ये सार्वजनिक स्पर्श सर्वमान्य आहे. रस्त्यात एकमेकांचा हात धरणं, एकमेकांना स्पर्श करणं हे अगदी सहजपणे केलं जातं. कुणी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यांचं लग्न नवरा-नवरीनं एकमेकांना किस केल्याशिवाय पूर्णच होत नाही. आपल्या देशात मात्र नियम वेगळे आहेत. एकवेळ दोन मुलं किंवा दोन मुली गळ्यात गळे घालून फिरले तर ते चालतं. पण मुलगा-मुलगी असतील तर त्यांनी अंतर ठेऊन राहावं अशी अपेक्षा असते. कदाचित कोणताही स्पर्श हा सेक्शुअल असतो असं काहीसं आपल्याला वाटत असावं.

पीडीएचेही काही नियम असतात. जोडप्यामधील दोघांची त्याला मान्यता असायला हवी. तुमच्या दोघांबरोबर आणखी एखादा मित्र किंवा मैत्रीण असेल आणि तुम्ही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत बसलात तर त्या तिसऱ्या व्यक्तीला किती ऑकवर्ड वाटेल याचाही विचार करायला हवा. आजूबाजूला वयस्क लोक किंवा लहान मुलं असतील तर मनाला आणि हातांना थोडा लगाम घालायला हवा. थोडक्यात तुमच्या अ‍ॅक्शनमुळे तुम्हाला कसं वाटतं याचबरोबर त्याचा इतरांवर काय परिणाम होतो हे महत्त्वाचं आहेच की..

आणि कायदा काय म्हणतो? कायदा काहीसा व्हेग आहे याबाबतीत. यासाठी ‘इंडियन पिनल कोड’चं कलम २९४ आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करायला यानुसार बंदी आहे. पण अश्लील चाळे म्हणजे नेमके  कोणते हे स्पष्ट केलेलं नाहीये. अनेक तरुणांना असा काही कायदा आहे हीच कल्पना नसते. म्हणजे आपण कशापासून जपून राहायला हवं हेही माहिती नसतं. आणि कुणी मनाविरुद्ध असा त्रास दिला तर आपण पोलिसांकडे तक्रार करू शकतो हेही. क्वचित कधी या कायद्याचा गैरवापर होऊ न एखाद्याला विनाकारण त्रास होतो. काही तथाकथित समाजसुधारक ही समाज ‘स्वच्छ’ करायची जबाबदारी गांभीर्याने पार पाडत असतात.

एक नक्की की आजची तरुणाई या जवळिकीकडे सहजपणे पाहतेय. भेटल्यावर एकमेकांच्या गळ्यात पडणं, खांद्यावर हात टाकणं, टाळ्या देणं यात तुम्हाला वावगं वाटत नाही. फक्त प्रेमाचा हा डिस्प्ले सेक्शुअल होत नाहीये ना आणि त्यातून प्रेम दिसण्याऐवजी प्रेमाचं ओंगळ प्रदर्शन होत नाहीये ना याविषयी सावध नक्कीच राहायला हवं, हो ना?

viva@expressindia.com

First Published on July 14, 2017 12:32 am

Web Title: public display of affection love relationship stress management