जसजसे नवीन चित्रपट, अल्बम, वेब सिरीज, टीव्ही मालिका, अगदी जाहिरातीही येतात तशी ट्रेंडिंग गाणी बदलतात. असाच काहीसा बोलबाला सध्या पंजाबी गाण्यांचा झाला आहे. अर्थात, या पंजाबी गायकांचं प्रस्थही तरुणाईच्याच प्लेलिस्टमधून वाढतं आहे. सध्ये बादशहा, दलजितपासून यो यो हनी सिंगपर्यंत सगळे पंजाबी गायक तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाले आहेत..

आता तुम्ही टीव्ही लावला, एफएम लावला किंवा एखाद्या सेलिब्रेशनच्या ठिकाणी गेलात तरी तुम्हाला हमखास ऐकू येतात ती पंजाबी गाणी. तरुण मुला-मुलींच्या प्लेलिस्टमध्ये अग्रस्थानावर ही पंजाबी गाणीच आहेत. काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये यो यो हनी सिंग आला आणि त्याच्यासोबत बॉलीवूडच्या हिंदी गाण्यांमध्ये पंजाबी तडका आला. हिंदी भाषिक गाण्यामध्ये इंग्रजी शब्दांचा वापर होत होताच पण हनी सिंगने सुरू केलेल्या पंजाबी रॅपने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. आणि मग तिथूनच पंजाबी रॅपची चलती वाढली. प्रेक्षकांना पंजाबी आवडतंय म्हटल्यावर बाजारात पूर्णपणे पंजाबी गाणीसुद्धा येऊ  लागली. बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये किमान प्रसिद्धीसाठी का होईना एक तरी पंजाबी गाणं येऊ लागलं. या एकेक पंजाबी गाण्यांबरोबर पंजाबी गायकही वाढत गेले. या गायकांमध्येही कोण जास्त प्रसिद्ध, कोणाची गाणी जास्त लोकांना आवडतात, हे लक्षात घेण्यासारखं आहे. यासाठी आम्ही काही तरुणांना बोलत केलं. आता पंजाबी गाण्यांमुळे  प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला गुरू रंधावा की गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये पाय रोवून बसलेले रॅपर बादशाहा आणि गायक रफ्तार? संपूर्ण पंजाबी गाणी आवडतात की पंजाबी-हिंदी मिक्स?, अशा प्रश्नांना उत्तरं देत या तरुणाईने आपलं पंजाबी गाण्यांवरचं प्रेम व्हिवाकडे व्यक्त केलं आहे.

पुण्याच्या अपूर्वा कुंभारला बॉलीवूडच्या हिंदी गाण्यांपेक्षा पूर्ण पंजाबी गाणी आवडतात. ती सांगते, ‘मला हिंदी गाण्यांत मध्ये-मध्ये वापरलं जाणाऱ्या पंजाबीपेक्षा पूर्णपणे पंजाबी गाणी जास्त आवडतात. मी पंजाबी अल्बमची गाणी तर हमखास ऐकते, कारण ती जास्त रिलेट होतात. माझा आवडता पंजाबी गायक दलजित दोसैन आहे. मी गुरू रंधावा आणि दलजितचीच गाणी ऐकते. मला पंजाबी गाण्यांचा अर्थ जरी समजत नसला तरी ती भाषा जास्त सुंदर आहे असं वाटतं. म्हणून मला हिंदीपेक्षा पंजाबी गाणीच जास्त आवडतात’. अपूर्वाप्रमाणे मुंबईच्या केतकीलाही पूर्ण पंजाबी गाणीच आवडतात. ‘मला पंजाबी अल्बमची गाणी खूप आवडतात. गुरू रंधावा, कमल कहलों, परम सिंग, एमी विर्क आणि बादशहा हे आताचे ट्रेंिडग पंजाबी गायक आहेत. मला त्यातले गुरू, कमल आणि परम सिंग जास्त आवडतात’, असं सांगणारी केतकी ही गाणी आवडण्यामागचं कारणही स्पष्ट करते. पंजाबी गाण्यांच्या चाली सुंदर असतात त्यामुळे भाषा समजत नसली तरी छान ठेका धरता येतो आणि मजा येते, असं ती सांगते. सध्या हिंदी चित्रपटांमध्ये जुनीच गाणी थोडाफार बदल करून परत येत आहेत त्यामुळे आता हिंदी गाणी बोअर झाली आहेत, असाही एक सूर निघतो आहे. आहारतज्ज्ञ आणि ब्लॉगर आयेशा घाडीगावकरला पंजाबी गायक माहिती नाहीत, पण पंजाबी अल्बमची गाणी तिला आवडतात. त्याबद्दल ती म्हणते, ‘एमी विर्कचं ‘किस्मत’ हे पंजाबी गाणं माझ्या आवडीचं आहे. पूर्ण पंजाबी गाणीही आवडतात पण त्यासोबत मला हिंदी पंजाबी अशी मिक्स गाणी आवडतात. काही अंशी जास्त पंजाबी गाणी आवडण्याचं कारण म्हणजे त्याची ओरिजिनॅलिटी आणि अप्रतिम संगीत’, असल्याचंही आयेशा सांगते.

मुलींप्रमाणे मुलांनाही पंजाबी गाणी आवडतात. आणि यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे गाण्यामध्ये असणारे बिट्स. याविषयी ऋषभ सावंत म्हणतो, पंजाबी गाणी वाजली की जोश येतो आणि बेधुंदपणे नाचता येतं. माझा आवडता पंजाबी गायक हा मिक्का सिंग आहे. मला हिंदी-पंजाबी मिक्स गाणीही आवडतात. तर सोलापूरच्या तुषार गाडेकरलाही  पूर्ण पंजाबी गाणी आवडत नाहीत त्याबद्दल सांगताना आपल्याला हिंदी गाण्यांमध्ये वापरलं जाणारं पंजाबी आवडतं. आणि हनी सिंग, बादशाहा, रफ्तार हे ट्रेंडमध्ये असलेले गायकच आपल्याला आवडतात असं तो सांगतो. पंजाबी गाण्यामध्ये एक वेगळाच स्वॅग असतो, असंही तुषारचं म्हणणं आहे. मुंबईच्या रिषी देठेला मात्र पूर्ण पंजाबी गाणी फार आवडतात. रिषी सांगतो, ‘दलजित, हनी सिंग आणि बादशहा हे माझे आवडते पंजाबी गायक. मला पंजाबी गाण्यांचा अर्थ समजत नाही पण ती ऐकायला खूप मज्जा येते. आणि या गाण्यांवरचा डान्सही खूप सोप्पा असतो’.  अशाच प्रकारे अनेक मुलामुलींना ही पंजाबी गाणी आणि त्यावरती केलेला वर्कआउटही खूप आवडतो. झुम्बासाठी आणि जिम करताना तर ही पंजाबी गाणी हमखास वाजवली जातात.

बॉलीवूडच्या गायकांनी कितीही पंजाबी गाणी गाण्याचा प्रयत्न केला तरीही आताच्या घडीला मूळचे पंजाबी गायकच प्रसिद्ध आहेत. २०१६ साली रिलीज झालेलं ‘दारू बदनाम’ हे कमल आणि परम सिंगचं गाणं आता दोन वर्षांनंतर ट्रेंिडगमध्ये आलं आहे. २०१५ सालचं इंदर आणि बादशाहाचं ‘वखरा स्वॅग’ हे पंजाबी गाणं आजही कोणीही विसरलेलं नाही. तर दलजितचं ‘डू यू नो’ हे गाणं म्हणजे पंजाबी गाण्यांचे फॅन असणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे. लोकांची आवड बघून मोठमोठे गायक आणि कंपन्यांनीही पंजाबी गाणी बनवायला सुरुवात केली. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘टी-सीरिज’. टी-सीरिजने ‘मेड इन इंडिया’, ‘गल सून’, ‘रात कमाल है’, ‘लाहोर’ अशी अनेक पंजाबी गाणी बाजारात आणली आहेत. आणि ही गाणी हमखास अनेक ठिकाणी वाजवली जातात तर अनेकदा म्युझिकलीसारख्या अ‍ॅपवरती ट्रेंिडगही होतात. या हिंदी गाण्यांचा मोह सध्या कोणालाच आवरत नाहीये मग तो गायक असू दे किंवा अभिनेता. प्रिन्स नरूला या टीव्ही अभिनेत्यानेही त्याची ‘हॅलो हॅलो’ आणि ‘झिरो फिगर तेरा’ ही पंजाबी गाणी नुकतीच बाजारात आणली. तर अनेकांची चाहती गायक नेहा कक्कर आणि अर्जुन कानूनगोचं ‘ला ला ला ‘ हे गाणं काही महिन्यापूर्वीच प्रसिद्ध झालं आहे जे अजूनही ट्रेंडिंग आहे. सहज ठेका धरायला लावणारी ही पंजाबी गाणी आधीही लोकप्रिय होती, मात्र सध्या तरुण पंजाबी गायकांची एक लाटच आली असून या लाटेने देशभरातील नव्हे जगभरातील तरुणाईला वेड लावलं आहे.

viva@expressindia.com