रेड वाइन ही काळ्या द्राक्षांपासून बनवली जाते, पण आपण जेव्हा काळ्या द्राक्ष्यांचा रस काढतो तेव्हा तो लाल नसतो. प्रश्न मग हा आहे की ती वाइन लाल कशी होते? वाइन बनवायच्या कायद्यांच्या अनुसार त्यात रंग घालता येत नाही. निसर्गाची किमया ही कशी असते हे आपल्यलाला रेड वाइन बनवताना दिसून येते. वाइनचा तो लाल रंग काळ्या द्राक्षांच्या सालांमध्ये असतो!

अँथोसायानिन (anthocyanin) नावाचे लाल रंगद्रव्य या सालांमध्ये असतं आणि जेव्हा सालं रसात बुडून राहतात तेंव्हा त्यांच्यातला लाल रंग रसात उतरतो. हा लाल रंग एखाद्या विटेसारखा मातकट- तपकिरी लाल ते अगदी माणिकरंगी लाल असू शकतो. अगदी गडद लाल रंगांच्या वाइन्समध्ये जांभळट छटाही दिसून येतात. अनेक रेड वाइन्सची नावं त्यांच्या द्राक्षांपासून येतात. उदाहरणार्थ – शिराझ ( ‘झ’ – झबल्यातला), मरलो (Merlot), कॅबरने सोविन्याँ (Cabernet Sauvignon), पिनो नुआर (Pinot Noir). फ्रान्समधल्या काही प्रसिद्ध रेड वाइन्सची नावं, ती ज्या वाइनरीमध्ये बनतात, त्या वाइनरींवरून ठेवली जातात  उदाहरणार्थ शातो मुतोन रॉथ्शिल्ड (Chateau Mouton Rothschild), शातो पेत्रूस (Chateau Petrus) इत्यादी.

रेड वाइन ही १७ ते १८ अंश सेल्शिअसला सव्‍‌र्ह केली जाते. अनेक पुस्तकांत ‘रूम टेम्परेचर’ असं रेड वाइन सव्‍‌र्हिससाठी लिहिलं असतं. पण ते त्यांचं रूम टेम्परेचर, आपलं नव्हे! फार थंड सव्‍‌र्ह केली तर त्यातला अरोमा दरवळून येत नाही आणि १७ ते १८ अंशांच्या वर तापमानाला सव्‍‌र्ह केली तर उग्र दर्प येतो आणि चवीलाही फ्लॅट लागते.

रेड वाइनचे ग्लासही अगदी खास असतात. ग्लासचं ‘बोल’ बऱ्यापैकी मोठं असतं आणि त्यात फक्त अध्र्याहून थोडी अधिक वाइन ओतली जाते. कारण ‘स्वर्ल’ करताना ग्लासमधून बाहेर पडू नये. स्वर्ल केल्याने वाइनच्या अनेक आरोमांना उभारी येते. रेड वाइनच्या अनेक श्रेण्या आहेत. बरगंडी, बोजोले    (ज- जिभेतला  – Beaujolais)  इत्यादी त्यांची नावं आहेत. प्रत्येक श्रेणीचा वेगळ्या प्रकारचा ग्लास असतो. हल्ली अर्थात सगळे A.P (All Purpose) वाइन ग्लास वापरतात.

रोझे (Rose’ वाइनला ब्लश किंवा पिंक वाइन पण म्हणतात. अतिशय नाजूक वाइन असते ही. ती बनवायलाही खास कौशल्य लागत. काळ्या द्राक्षांचा चोथा रसात फक्त गुलाबी रंग उतरेपर्यंत भिजवला जातो. त्यामुळे या वाइनची गणना रेड वाइनमध्ये होत नाही आणि नाजूक असल्यामुळे ती अगदी थंड म्हणजे ५ ते ७ अंश से. एवढय़ा तापामानाला सव्‍‌र्ह केली जाते.