News Flash

कॅफे कल्चर : जुन्या मुंबईचा साक्षीदार रिगल रेस्टॉरंट अँड बेकरी

‘पॅलेस सिनेमा’च्या जागेत १९३२ साली सुरू झालं ‘रिगल रेस्टॉरंट अँड बेकरी’.

रिगल रेस्टॉरंट अँड बेकरी

प्रशांत ननावरे

भायखळा परिसरातील सार्वजनिक वापरातील सर्वात जुनी वास्तू म्हणजे ‘द भायखळा क्लब’. १८३३ साली हा क्लब सुरू झाला. क्लबच्या स्थापनेनंतर मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाआधीचे महत्त्वाचे स्थानक म्हणून इंग्रजांकरवी १८५७ साली भायखळा रेल्वे स्थानक बांधण्यात आले. रेल्वे स्थानकाच्या निर्मितीनंतर या परिसरातील वस्ती हळूहळू वाढू लागली. खरंतर भायखळा रेल्वे स्थानकामुळेच माझगावचा एक दुर्लक्षित भाग म्हणून गणला जाणारा भायखळा नंतर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करू शकला.  याच भायखळा रेल्वे स्थानक इमारतीच्या साक्षीने आजूबाजूच्या परिसरात अनेक वास्तू उभ्या राहिल्या. त्यातील महत्त्वाची वास्तू म्हणजे ‘पॅलेस सिनेमा’. याच ‘पॅलेस सिनेमा’च्या जागेत १९३२ साली सुरू झालं ‘रिगल रेस्टॉरंट अँड बेकरी’.

भायखळा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सीएसएमटीच्या दिशेने बाहेर पडल्यावर लगेचच उजव्या हाताला ‘रिगल रेस्टॉरंट अँड बेकरी’ आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इराणवरून भारतात आलेल्या स्थलांतरितांमध्ये दारब शाहसुद्धा होते. सुरुवातीला मोगल इराणी शॉपमध्ये काम केल्यानंतर त्यांनी आपले बंधू कैकाश्रू शाह यांच्यासोबत सध्याच्या पॅलेस सिनेमाच्या दोन गाळ्यांमध्ये ‘रिगल’ला सुरुवात केली. उरलेल्या दोन गाळ्यांमध्ये ब्रिटिशांची दुकानं होती. कालांतराने ब्रिटिश गेले आणि रिगलने ते गाळेसुद्धा आपल्या कवेत घेतले.

ऐंशी वर्षांपूर्वी भायखळ्याची महत्त्वाच्या स्थानकांमध्ये गणती होत असे. परगावाहून येणाऱ्या अनेक गाडय़ाही भायखळा स्थानकात थांबत असत आणि नंतर सीएसएमटी स्थानक किंवा थेट यार्डात जात. त्या काळी स्टेशनच्या बाहेर प्रवाशांसाठी घोडय़ांच्या बग्ग्या उभ्या असत आणि मालाची ने-आण करण्यासाठी बैलगाडय़ा. परगावाहून आलेला पाहुणा ‘रिगल’मध्ये चहापाण्याला हमखास जात असे. त्यामुळे दिवसभर इथे लोकांचा राबता असायचा. पहाटे साडेचार वाजता ‘रिगल’चा दिवस सुरू व्हायचा. बेकरीचे पदार्थ आणि चहा बनवल्यानंतर बरोबर साडेपाच वाजता शटर वर केलं जात असे. मुंबईतील सर्वात पहिला भाजी बाजार म्हणून भायखळ्याच्या ‘मेहेर मंडई’चे म्हणजेच ‘भायखळा मार्केट’चे नाव घेतले जाते. पहाटे चार वाजताच्या सुमारास शहराच्या बाहेरून भाजीपाल्याच्या गाडय़ा या मंडईत येत असत. आणि माल उतरवून झाल्यानंतर या मंडळींची पावले ‘रिगल’कडे वळत. त्यामुळे बरोबर साडेपाचच्या ठोक्याला रेस्टॉरंट सुरू करावेच लागे अन्यथा गहजब होई, अशी माहिती दारब यांचे नातू पोरस देतात. सकाळी पहिला चहा झाला की ही मंडळी आपापल्या कामाला जात आणि नऊ -साडेनऊच्या सुमारास न्याहरीसाठी पुन्हा गर्दी करत. त्यानंतर दुपारी तीन-चार वाजता परत चहानाश्त्यासाठी त्यांचे पाय ‘रिगल’च्या दिशेने वळत.

मुंबईतली ट्राम सुरुवातीला व्यापारी विभागांमध्ये सुरू केली गेली.१९४० च्या दशकात ‘रिगल’समोरून ट्राम चालत असे. हा परिसर त्या काळी फार दाटीवाटीचा नव्हता. ख्रिश्चन, मुसलमान आणि हिंदू गुण्यागोविंदाने राहत असले तरी एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश लोकसंख्या ही ख्रिश्चनधर्मीय होती. भायखळ्यात फिनिक्स, इंडियन, गार्डन, ब्रॅडबरी, सिंप्लेक्स, शक्ती या कापड गिरण्या होत्या. या परिसरात राहणारा मुस्लीम आणि हिंदू या गिरण्यांमध्ये कामाला होता. सुशिक्षित ख्रिश्चन बँका, शाळा वगैरे कार्यालयांत काम करत होता. या सर्वाचं ‘रिगल’ हे हक्काचं ठिकाण होतं.

त्या काळी पॅलेस सिनेमात इंग्रजी चित्रपट दाखवले जात. सिनेमागृहाच्या आवारातच ‘रिगल’ असल्यामुळे चित्रपट सुरू होण्यापूर्वी आणि नंतर प्रेक्षकांची चहानाश्त्यासाठी येथे गर्दी होत असे. चित्रपटाच्या मध्यांतरातही अनेक प्रेक्षक रेस्टॉरंटच्या मागच्या दरवाजाने येऊन चहा, कोल्ड्रिंग आणि बेकरीचे पदार्थ खात असत. तेव्हा कुणी पैसे न देता जाऊ  नये म्हणून मागच्या दरवाजावर एक माणूस उभा करावा लागत असे, असं पोरस सांगतात.

पोर्तुगिजांनी गॉथिक स्टाइलमध्ये १६३२ साली बांधलेले मुंबईतील सर्वात जुने चर्च भायखळा परिसरातच आहे. ‘रिगल’पासून काही पावलांच्या अंतरावर. त्यामुळे नाताळच्या काळात मिडनाइट मासपर्यंत रेस्टॉरंट सुरू असे. मिडनाइट मास झाला की ख्रिश्चन बांधव ‘रिगल’मध्ये येऊन प्लम केकची खरेदी करत असत. आजही वर्षभर अर्धा किलो आणि केवळ नाताळच्या काळात एक किलोचे प्लम केक ‘रिगल’च्या बेकरीत तयार होतात. पाव, बन, ब्रून, खारी, मावा केक, मावा समोसा, व्हेज पॅटीस, मटण पॅटीस, ऑम्लेट पाव या गोष्टी सुरुवातीपासून येथे मिळतात. मटण पॅटीस ‘रिगल’ची खासीयत आहे. काही वर्षांपूर्वी चिकन पॅटीस आणि मटण खिमा सुरू करण्यात आला. इथल्या चिकन पॅटीसचं वैशिष्टय़ म्हणजे त्यात खिमा नव्हे तर सॉसेजेस असतात. इराणी कॅफे म्हटलं की सर्वाना इराणी चहाच आठवतो. पण ‘रिगल’मध्ये सुरुवातीपासून फिल्टर कॉफीसुद्धा मिळत असे. १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी उद्घाटन केलेला ‘राणीचा बाग’ म्हणजेच आत्ताचे ‘वीर जिजाबाई भोसले उद्यान’ ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग. क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स म्हणूनही ही ओळखली जात असे. एकेकाळी राणीचा बाग मुंबईकरांचं आकर्षणाचं ठिकाण होतं. त्यामुळे तिथे येणारी मंडळी बागेला भेट देण्यापूर्वी किंवा नंतर भायखळा स्थानकाच्या शेजारीच असलेल्या ‘रिगल’लाही जरूर भेट देत. तेव्हा रेस्टॉरंटमध्ये कुटुंबाला बसण्यासाठी वरच्या बाजूला वेगळी व्यवस्था होती.

भिंतींवरील लाकडी कपाटं आता पूर्वीसारखी सामानांनी भरलेली नसली तरी ब्रिटिशांच्या काळातील रेस्टॉरंटची आठवण म्हणून ती रिकामी कपाटं तशीच ठेवण्यात आली आहेत. आजही रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताच समोरच्या लाकडी मांडणीवर मोठमोठय़ा काचेच्या बरण्यांमध्ये रावळगाव, पारले आणि वेगवेगळ्या गोळ्यांच्या मोठाल्या काचेच्या बरण्या दिसतात. इराणी बावा लोक रेस्टॉरंटमध्ये वडिलांचा हात पकडून येणाऱ्या पोरांना याच बरण्यांतील चॉकलेट्स देऊन खूश करत असत. ‘रिगल’च्या तिसऱ्या पिढीचे वारस पोरस मेरवान झैनाबादी यांनीही ती परंपरा सुरू ठेवली आहे. पण आता पूर्वीसारखी लोकांची गर्दी येथे होत नाही, याची त्यांना खंत वाटते. काळासोबत बदलता न आल्याचा परिणाम व्यवसायावर झाल्याची जाणीव त्यांना आहे. पण त्या बदलाने मूळ इराणी रेस्टॉरंटची ओळख पुसून टाकली असती, असं त्यांना वाटतं. आजूबाजूला वाढलेली स्पर्धा, व्यवसायाचे बदललेले नियम आणि लोकांच्या आवडीनिवडी यामध्ये टिकून राहण्याची कसरत ‘रिगल’ करतोय, पण पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याची ऊर्मीही मनात असल्याची आशा पोरस यांच्या बोलण्यातून जाणवते.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:02 am

Web Title: regal restaurant and bakery reviews
Next Stories
1 चटकदार भजी
2 फॅशन कट्टा
3 कट्टय़ावरची खवय्येगिरी
Just Now!
X