13 August 2020

News Flash

वेग नात्यांचा

या वेगवान जगण्यात नाती जुळण्याचा, तुटण्याचा आणि परत जुळण्याचा वेगही बदलला आहे. त्यासाठीची माध्यमंही बदलली आहेत. आजच्या काळात मैत्रीपासून त्या पलीकडे जाणाऱ्या नात्यांबद्दल तरुण पिढीतल्या

या वेगवान जगण्यात नाती जुळण्याचा, तुटण्याचा आणि परत जुळण्याचा वेगही बदलला आहे. त्यासाठीची माध्यमंही बदलली आहेत. आजच्या काळात मैत्रीपासून त्या पलीकडे जाणाऱ्या नात्यांबद्दल तरुण पिढीतल्या लेखकांना, सेलेब्रिटींना काय वाटतं?

3काळ कितीही बदलला तरी नातं जोडण्याची गरज संपत नाही.. मात्र काळाप्रमाणे नात्याच्या स्वरूपात, रचनेत आणि टिकून राहण्याच्या क्षमतेत बदल होत असतात. सध्याचा काळ अति वेगवान आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी आणि कर्मचाऱ्यांना, कलावंतांना विक्रीसाठी तयार केलं जातंय. विज्ञान, तंत्रज्ञानाने गाठलेली उंची आणि मूलभूत सुविधांची गोची हे विकसनशील आणि अविकसित देशांमधलं सध्याचं चित्र! समस्या आणि विकास गळ्यात गळे घालून उभे असताना व्यक्ती संभ्रमित न झाली तर नवल.. आणि या संभ्रमावस्थेत माणूस नात्यांच्या बाबतीत पझेसिव्ह वाढत जातो. नात्यांकडून त्याच्या अपेक्षा वाढतात, नात्यातल्या स्वत:च्या जबाबदारीपेक्षा नात्यातून मिळणारा आधार महत्त्वाचा वाटू लागतो. तो मिळाला नाही तर नवीन नातं जोडलं जातं. रक्ताच्या, बिनरक्ताच्या सगळ्याच नात्यांना हे लागू होतं.

भारतातल्या शहरात आता विभक्त कुटुंब पद्धतीचं प्राबल्य वाढतंय. विभक्त राहाणं म्हणजे नातं तोडणं नव्हे, परंतु दूर राहिल्यामुळे प्रत्यक्ष भेटीच्या शक्यता कमी होतात आणि संवादाची जबाबदारी येऊन पडते फोन, मेल यांसारख्या नव्या माध्यमांवर.. या माध्यमांद्वारे एकदा संवादाची सवय लागली की, प्रत्यक्ष भेटीची आस आपसूकच कमी होते आणि नातं दृढ करणारं ‘स्पर्श’ हे माध्यमच बाद होतं.

आजची जनरेशन ही फास्ट खरी! मुलं अत्यंत लहान वयात आईवडिलांना ‘जज’ करतात आणि पालकांच्या अपेक्षासुद्धा मुलं लहान असल्यापासूनच तयार होतात. पालक- मुलांचं आजच्या काळातलं नातं अत्यंत नाजूक बनून गेलेलं आहे. भवतालच्या अनेक गोष्टी पालकांशी कशा शेअर कराव्यात या पेचात मुलं, तर मुलानं अनावश्यक भवतालापासून वेगळं होऊन फक्त करिअर फोकस करावं या प्रयत्नात पालक, अशी दुहेरी रस्सीखेच आहे.

बिनरक्ताच्या नात्यांचा तर महापूर आलेला आहे. ‘एफबी’वर लाइक करणारा मित्र वाटायला लागतो, नंतर त्याने आपल्याला न पटणारी कमेण्ट केल्यावर तो दुश्मन वाटायला लागतो. प्रत्यक्षात त्याच्याशी नीट ओळखही नसते..सगळं व्हच्र्युअल. प्रेमसंबंधात तर विलक्षण मोकळेपणा आलाय. पूर्वीसारखं मनातलं सांगायला आता वर्षांनुर्वष लागत नाहीत. प्रपोज ते ब्रेकअप हा प्रवास दोन्ही बाजूंनी लीलया केला जातोय. हा अर्थातच वेगवान काळाचा इफेक्ट आहे. प्रत्येकाला नातं हवंच आहे, पण नाही पटलं तर त्यातून एस्केपही हवाय. व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने ते योग्यच आहे; परंतु टिकणाऱ्या नात्याचे र्सवकष फायदे लक्षात घेता नातं टिकवायला हवं. त्यासाठी अपेक्षेसोबत नात्यातल्या जबाबदारीचंसुद्धा भान ठेवायला हवं. काळ अजून वेगवान होत जाईल आणि सरावाचासुद्धा.. तेव्हा पुन्हा एकदा नात्यांची रचना बदलेल. पण नातं जोडणं कमी होणार नाही. कुठल्याही काळात नात्याला पर्याय नाही.

(आशीष पाथरे प्रसिद्ध संवादलेखक आहे.)

 

4वेगातली शांतता

आजकाल सगळ्याच गोष्टींमध्ये वेग आहे. एका क्लिकने आपल्याला हव्या त्या गोष्टी लगेच समोर येतात. आपल्यावर सगळ्याच गोष्टींचा भडिमार होतोय खासकरून इन्स्टंट माहितीचा, पण त्यातून मोजक्या कोणत्या गोष्टी आपण घ्यायला हव्यात, ज्याचा उपयोग होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं. तसा रिलेशनशिपमधला वेगही अपरिहार्य आहे. रिलेशनशिपमध्ये पडणं आणि त्यातून बाहेर येणं याचा जो वेग आहे तो सुद्धा या सिस्टीमचा भाग आहे. तो वेग आपण नियंत्रित करू शकत नाही आणि त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. मात्र आपण त्यातून आपल्याला हवी असलेली शांतता मिळवू शकतो. ते आपल्या हातात निश्चितच आहे.. मग ती शांतता रिलेशनशिपमधली असो किंवा आयुष्यातली! आजूबाजूच्या लाइफमध्ये वेग असला तरी मला त्यात धावायची गरज आहे का? हे पाहायला हवं. आपण आजूबाजूचा वेग थांबवू शकत नाही, पण त्यात आपली शांतता नक्कीच शोधू शकतो. जेणेकरून या मार्गाने आपण आयुष्याला एक ठेहराव आणू शकू.

– अमेय वाघ (अभिनेता)

 

5साचलेपण वाईटच

नाती जुळण्यासाठी आणि तुटण्यासाठीचा वेळ हा काही नवीन नाही. आधीसुद्धा रिलेशनशिप त्याच वेगाने जुळायच्या आणि तुटायच्याही. पण कदाचित ते लक्षात येत नव्हतं. पण हा वेग आपल्या आयुष्यात होताच. कदाचित आपण तो ओळखला नव्हता. आता शेअरिंग वाढलं, त्यामुळे आपल्याला ते जाणवतंय. पण मला या जगण्याच्या वेगात काहीच गैर वाटत नाही. एखादं नातं जर टिकत नसेल आणि त्या दोन व्यक्तींना असं वाटत असेल की ते नातं पुढे ढकलत नेण्यापेक्षा संपवलेलं बरं, तर त्यात काही चुकीच नाही. कारण शेवटी समाधान महत्त्वाचं आहे. ते नसेल तर त्या वेगाचा मुद्दा येत नाही. उदाहरणार्थ मी करत असलेली रेश्मा ही व्यक्तिरेखा. माझ्यासाठी ही रेश्मा खूप नवीन आहे. कारण मी अशी कधीच नव्हते किंवा नसेनही. रेश्माने एकच प्रेम केलंय. अनेक अडचणीतून जाऊनही तिचं त्याच माणसावर प्रेम आहे. त्यामुळे तिच्या रिलेशनशिपमध्ये वेग नाहीये. ती एका ठिकाणी थांबलेली आहे, असं मला वाटतं. आपण त्या वेगाकडे कसं पाहतो यावरसुद्धा ते अवलंबून आहे.

– सखी गोखले (अभिनेत्री)

 

(शब्दांकन : कोमल आचरेकर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2016 8:48 am

Web Title: relationship and friendship in today world
Next Stories
1 वेगे वेगे धावू..
2 विदेशिनी: हॅपनिंग लाइफ..
3 रफ्तार-ए-जिंदगी
Just Now!
X