रेणुका शहाणे हे नाव उच्चारताच समोर येते, ‘सुरभिची ती सुहास्यवदना. सलमानची भाभीम्हणून प्रचंड लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीच्या इतर कलागुणांपासून आपण अनभिज्ञ असतो. रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱ्या या अभिनेत्रीचा एक निवेदक, लेखक, दिग्दर्शिक आणि तितकीच मुलांमध्ये रमणारी आई असा प्रवास लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या व्यासपीठावरून उलगडला.

अरुंधती जोशी आणि स्वाती केतकरपंडित यांनी रेणुका शहाणे यांना बोलतं केलं. प्रसन्न हास्यानं मनं जिंकणाऱ्या नि तितक्याच प्रभावीपणे स्वत:चं मत जगासमोर ठेवणाऱ्या अभिनेत्रीचा गप्पांतून उलगडलेला प्रवास तिच्याच शब्दांत..

सुरभिची ओळख

सुरभि हा माहिती आणि मनोरंजन- इन्फोटेन्मेंट प्रकारचा दूरदर्शनवरचा पहिलाच कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. आम्ही सलग दहा र्वष ‘सुरभि’ केलं. सर्व वयोगटांतल्या प्रेक्षकांकडून त्याला प्रतिसाद मिळत असे. हा कार्यक्रम मला मिळाला त्याचा गमतीदार किस्सा आहे. मी त्याअगोदर सर्कस ही मालिका केलेली होती. ती बघूनच ‘सुरभि’साठी सिद्धार्थ काक यांचा मला फोन आला आणि त्यांनी सहनिवेदकासाठी ऑडिशन्स घेताहेत असं सांगितलं. ‘सर्कस’च्या अझिझ मिर्झा यांना मी या क्षेत्रातली गुरू मानते. त्यांना फोन केला. त्यांनी सिद्धार्थ काक ही प्रतिभावंत व्यक्ती असल्याचं सांगितलं. खरं सुरभिपूर्वी दूरदर्शनवर बातम्या देणारे अँकर्स खूप लोकप्रिय होते. पण त्यांची बातम्या देण्याची शैली वेगळी होती, धीरगंभीर होती. सुरभिच्या ऑडिशनसाठी मला आदल्या दिवशी साडेतीन पानांचं स्क्रिप्ट देण्यात आलं. बृहदेश्वर मंदिराची त्यामध्ये माहिती होती आणि क्लिष्ट हिंदीमध्ये ती संहिता होती. दुसऱ्या दिवशी ती पाठ करून मला ऑडिशन द्यायची होती. तसं हिंदी थिएटर मी केलं होतं. पण या पद्धतीचं हिंदी मी पहिल्यांदा वाचत होते. शुभा खोटय़ांच्या स्टुडिओमध्ये माझं ऑडिशन झालं. सिद्धार्थजींच्या पत्नी गीता काक ऑडिशन्सला होत्या. ऑडिशनला सुरुवात झाल्या झाल्या- दुसऱ्या-तिसऱ्या ओळीलाच मी अडखळले. चुकले. जाऊ दे.. तरीही मी कम्प्लिट करते, असं म्हणत मी हसून तसंच पुढे पुढे बोलत राहिले. हे बघून कुणीही निर्माता अशा अडखळणाऱ्या अँकरला बादच करेल. पण गीताजींना याची कमाल वाटली. ही विसरतेय आणि तरीही हसतेय, हे बघून त्यांनी हिलाच घेऊ या.. हे निश्चित केलं.

अभिनयाच्या क्षेत्रात योगायोगानेच

सत्यदेव दुबे माझ्या आईचे फार चांगले मित्र होते. बाकीच्यांसाठी दुबेजी असणारे आमच्यासाठी फक्त दुबे होते. ते सतत मला नाटकात काम करशील का म्हणून विचारणा करायचे पण मला अ‍ॅक्टिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये, असं म्हणत मी नेहमी धुडकावून लावायचे. मी कॉलेजमध्ये असताना नाटकाने वेड लावलं. सेंट झेविअर्स कॉलेजमधून सायकॉलॉजी करत होते. मला तेव्हा सायकॉलॉजिस्टच व्हायचं होतं. अभ्यासात मला खूप रस होता. फर्स्ट इअरला असताना कॉलेजचं हिंदी साहित्य-संगीत मंडळ १३ गाणी असलेलं एक नाटक प्लॅन करत होते – ‘अंधेर नगरी, चौपट राजा’.  माझी मैत्रीण गीतिका वर्दे आणि मी यामध्ये आवाज द्यायला म्हणून सहभागी झालो. या नाटकाच्या तालमी व्हायच्या त्या वेळी मला प्रचंड काही घडतंय असं वाटायचं. तो अनुभव खूप आवडला. लिखित संहितेपासून त्या नाटकाचं जिवंत होणं मला भावलं. ते नाटक पुढे झालं नाहीच, पण नाटकाची रुची मात्र निर्माण झाली. पुढच्या वेळी दुबेंनी पुन्हा विचारणा केल्यावर मी हो म्हटलं. ‘बम्बई के कौवें’ नावाचं नाटक ते करत होते आणि त्यात ‘कावळ्या’ची भूमिका त्यांनी मला दिली. काव काव करण्यापलीकडे मला फार करण्यासारखं नव्हतं त्या नाटकात. पण ‘बम्बई के कौवें’ बघायला आलेल्या राजीव नाईक यांनी मला त्यांच्या ‘ऑथेल्लो’साठी विचारलं आणि माझा ‘आंतरनाटय़’बरोबर रंगभूमीचा प्रवास सुरू झाला. पुढे ‘आविष्कार’साठी नाटक केलं.

हसणाऱ्या लोकांची सवय नव्हती

‘सुरभि’ला मिळणाऱ्या सुरुवातीच्या प्रतिसादांमध्ये थोडय़ा वेगळ्या प्रतिक्रियादेखील होत्या. खरं तर टीव्हीवर हसणाऱ्या लोकांची.. हसणाऱ्या अँकर्सची सवयच नव्हती. त्यातून कला-संस्कृतीसारख्या गंभीर विषयाला वाहिलेल्या कार्यक्रमाचं निवेदन असं हसत-खिदळत करणं अनेकांना पसंत नव्हतं. माहितीपटातलं निवेदनही धीरगंभीर आवाजात ऐकायची सवय. अमिता मलिक म्हणून मोठय़ा समीक्षक होत्या. इंग्रजी नियतकालिकांमध्ये त्यांच्या लिखाणाला प्रचंड लोकमान्यता होती. त्यांनी आपल्या स्तंभात माझ्या निवेदनाचे अक्षरश: वाभाडे काढले होते. कला आणि संस्कृतीबद्दल असं हसून का बोलणार, हा काय थिल्लरपणा या अर्थाचं त्यांचं लिखाण बघून माझ्यावर प्रभाव पडला आणि पुढच्या शूटिंगच्या वेळी मी चेहऱ्यावर गंभीर भाव आणून निवेदन करायला लागले. तेव्हा सिद्धार्थ काकनी सांगितलं की, माझ्या गंभीर स्वभावाच्या विरुद्ध तुझं हसणं आहे आणि त्यासाठीच तुला घेतलंय. कार्यक्रम हलकाफुलका करण्यासाठी ते आवश्यक आहे, त्यामुळे हसणं सोडू नको आणि लकब बदलू नकोस. खरोखरच कार्यक्रमाला तुफान लोकप्रियता मिळत गेली. आमच्याकडे येणाऱ्या पत्रांच्या विक्रमी संख्येमुळे टपाल खात्याने दोन रुपयांचं कॉम्पिटिशन पोस्टकार्ड सुरू केलं, असा आरोप आमच्यावर होतो.  गंमत म्हणजे ‘सुरभि’च्या २०० व्या भागानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी चक्क अमिताजींनी येऊन माझ्या सूत्रसंचालनाला पसंतीची पावती दिली.

सून म्हणून सन्मान

आशुतोष राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर सासर अमराठी असल्यामुळे आमच्यात सांस्कृतिक फरक नक्कीच आहेत. तिकडे पदर संस्कृती आहे, जी आमच्याकडे नाहीये. उलट पुरोगामी असल्याने ती अमान्य आहे. तरीही लग्नाचा निर्णय माझा होता. ती माझी निवड होती. मी मुंबईहून आलेली एक अभिनेत्री आहे असं माझ्या  परिवाराला वाटायला नको, म्हणून त्यांची संस्कृती आहे तशी मी समजून घेतली. तरच ते मला चांगल्या रीतीने स्वीकारू शकतील, याची मला जाणीव होती.सगळी सासरची माणसं प्रेमळ आहेत आणि आता दोन संस्कृतींचा मेळ झालाय. संस्कारामध्ये फरक असतो पण आपण एकमेकांचा सन्मान करायला हवा. माझ्या परिवाराने अभिनेत्री म्हणूनच नाही तर सून म्हणून मला सन्मान दिला.

नाटक माझ्यासाठी व्यावसायिकनाहीच

नाटक हे माझ्या मनाच्या फार जवळचं आहे आणि मी त्याकडे ‘व्यावसायिक’ दृष्टीने कधीच पाहिलं नाही. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीवरच माझा वावर जास्त राहिला. आमच्याच खिशातले पैसे ओतून आम्ही प्रेमाने नाटकं करायचो. व्यवसाय म्हणून मी नाटकाकडे बघितलंच नाही. पण नाटकामुळेच मी अभिनयाच्या व्यवसायाकडे वळले. ‘सर्कस’ मालिकेबद्दल मला अमोल गुप्तेंनी सुचवलं. वास्तविक तेव्हा मी अमोलला ओळखत नव्हते. ‘शांता गोखलेंची मुलगी नाटकात काम करते आणि ती आपल्या कॅरॅक्टरला शोभेल अशा वयाची आहे’ इतक्या माहितीवर मला ‘सर्कस’साठी विचारण्यात आलं. अझीझ मिर्झा या मालिकेचं दिग्दर्शन करत होते. मी ऑडिशनला गेले तेव्हा तेव्हा माझ्या पात्रासाठीचं स्क्रिप्ट नसल्याने कुठल्याही पात्राचं वाचून दाखव असं ते म्हणाले. मी मारिया नावाच्या पात्रासाठीचे संवाद म्हणत ऑडिशन दिली. माझं ते वाचन बघून अझीझ अंकलनी ‘तूच माझी मारिया’ असं म्हणत मला मारियाचीच भूमिका दिली. या मालिकेच्या शूटसाठी आम्ही ‘अपोलो सर्कस’बरोबर गावोगावी फिरलो.

नाहीम्हणायला लवकर शिकले

मी माझ्या करिअरमध्ये फार लवकर ‘नाही’ म्हणायला शिकले. अभिनयाच्या क्षेत्रात येणाऱ्या मुली एक तर खूप तरुण असतात आणि त्यांच्याबरोबर आई-वडील कुणी तरी असतं. मी एकटी होते. स्वत:चे निर्णय स्वत: घेत होते. माझ्या कामाच्या सेटवर येऊन बसेल, अशी आई नव्हतीच. ‘ऑन द स्पॉट’ निर्णय घेण्याची तयारी मला करावी लागली. काही अत्यंत विलक्षण आणि विचित्र लोकांबरोबर आपला संबंध येतो या क्षेत्रात. त्यामुळे मला काय करायचं नाहीये हे पक्कं ठरवलं होतं. उदाहरणार्थ मी माझ्या वेशाबाबत खूप पारंपरिक आहे.. लहानपणापासून. आई आणि मावशी माझ्यापेक्षा वेशामध्ये जास्त मॉडर्न आहेत. लहानपणापासून तोकडे कपडे मला चालतच नाहीत. ‘तुला हिरोइन व्हायचं असेल तर हे करावंच लागेल. नाहीतर तू भाभी आणि बहीण म्हणूनच राहशील,’ असं सांगणारे भेटले. पण मला हिरोइन होण्यात इंटरेस्टच नव्हता. माझ्यासाठी अभिनय महत्त्वाचा होता. रोल कोणताही असला तरी तो चांगला आणि माझ्या पसंतीचा असेल तर तो करण्यासाठी माझी कधीच हरकत नसते.

एक्सपरिमेंटलचं समीकरण बदलायला हवं

चित्रपटांमध्ये आता प्रायोगिक आणि व्यावसायिक असा भेद फारसा राहिलेला नसला, तरी नाटकात अजून आहे, कारण नाटकासाठी वेळ द्यावा लागतो तेवढा. प्रायोगिक नाटक म्हणजे हौशी आणि म्हणून कमी पैसे हे समीकरण बदलायला हवं. खरं तर आशय-विषय यात आता काहीच भेदभाव नसतो. पण हे समीकरण बदललं नाही तर प्रायोगिकचे प्रयोग कसे वाढणार? कॉलेजच्या वयातच असे प्रयोग करू शकतो. त्यानंतर काय? पोटापाण्याचा प्रश्न आहेच. एक्सपरिमेंट आणि व्यवसाय यांचा मेळ बसला तर किती चांगली गोष्ट आहे! सध्या ती घडतेय. पूर्वी कुठलाही कलाकार फार लवकर स्टिरिओटाइप केला जायचा. रीमा ही अभिनेत्री त्याचं उत्तम उदाहरण. रंगभूमीवर ज्या ताकदीचं काम त्या करत होत्या, त्या ताकदीचं काम त्यांना सिनेमात मिळालंच नाही. एखाद्या ‘वास्तव’चा अपवाद सोडता त्यांना ‘स्टिरिओटाइप’ केलं गेलं.

दिग्दर्शनासाठी लेखक झाले

मला असा वाटतं, जे रक्तात असतं ते कधीच कुठे जात नाही. माझी आई लेखिका आहे. आजी कविता करायची. माझे आजोबा तर पत्रकार होतेच, माझा भाऊदेखील लेखक आहे. त्यामुळे वारसा असा असल्याने लिखाणाची आवड असणं साहजिक आहे. पण मी खरं तर दिग्दर्शिका व्हायचं होतं म्हणून लेखिका झाले असं म्हणेन. माझं लग्न होऊन लगेच मुलं झाल्यावर मला परिवाराकडे लक्ष द्यायचं होतं. तशी माझी स्वत:चीच इच्छा होती. माझा मोठा मुलगा पाच वर्षांचा असताना राणाजींनी प्रोत्साहन दिलं. ‘तुला दिग्दर्शनाची आवड आहे तर एखादी पटकथा तूच का नाही लिहीत? काय हरकत आहे?’ असा सल्ला त्यांनी दिला. त्याअगोदर १९९८ मध्ये ‘रिश्तें’ या मालिकेसाठी क्रॉस कनेक्शन नावाची एक कथा लिहिली आणि दिग्दर्शितही केली होती.

सलमानची भाभी

सगळ्या चित्रपटांपेक्षा जास्त प्रेम मिळालं माझ्या ‘हम आप के है कौन’मधील सलमानच्या भाभीला! सूरज बडजात्यांनी त्यांच्या आईच्या प्रतिमेप्रमाणे हे भाभीचं पात्र रचलं होतं. त्या पद्धतीचा मान त्या पात्राला होता. सुधाजी- सूरजजींच्या आई प्रचंड ग्रेसफूल होत्या. माझी या भूमिकेसाठीची ऑडिशन, निवड या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या होत्या. साधी आणि आपलीशी वाटावी अशी ही व्यक्तिरेखा होती. सूरजजींनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत ही व्यक्तिरेखा निभावली आणि म्हणूनच ती हिट झाली. माधुरी, सलमानपासून ‘टफी’पर्यंत सगळ्यांनी सूरजजींना फॉलो केलं. कारण हा चित्रपट त्यांचं कन्व्हिक्शन होतं. म्हणून तो यशस्वी झाला. कारण सुरुवातीला लग्नाची कॅसेट, चौदा गाणी म्हणून त्यावर टीका होत होती. पण सूरज बडजात्यांचं कन्व्हिक्शन जबरदस्त होते आणि तेच यशस्वी झालं.

कुणा एकाची तडजोड नसावी

शहरी जीवनात एकत्र कुटुंबपद्धती कमी होत असल्याने काम करणाऱ्या स्त्रियांची तारांबळ मी पाहते. मुलांना कुठे ठेवायचं हा त्यांचा प्रश्न असतो. मुलं सांभाळायची तर करिअर सोडायचं कसं, हा प्रश्न त्यांच्या समोर असतो. तंत्रज्ञानाने आपण जसे पुढे जात आहोत तसं विचारांनीपण जायला हवं. समाजात असं वातावरण निर्माण करायला हवं की, स्त्री आणि पुरुष यांना समान वागणूक, सुखद अनुभव मिळायला हवा. कुणा एकाची तडजोड नसावी.

निर्भीडपणे व्यक्त व्हायचं माध्यम

राणाजी नि मी स्वत:ला बॉलीवूडचा भाग मानतच नाही. त्यामुळे आमची वैचारिक बैठक आणि ते विचार समाजमाध्यमांतून ठामपणे मांडल्यामुळे चित्रपट क्षेत्रातील इतर कलाकारांना काय वाटतं याचा विचार आम्ही करत नाही. कारण हे कलाकार लोक अनेकदा गप्पच असतात. ते आपल्या सोयीने आणि गरजेपुरतं बोलतात. राजकारणी तर कधीच खरं बोलत नाहीत आणि अनेकदा त्यांच्या दृष्टिकोनातूनच गोष्टी आपल्यासमोर येतात. तेव्हा एखाद्या गोष्टीविषयी मत बनवताना सर्वागीण विचार करून ते बनवावं आणि पडताळूनच ते व्यक्त करावं. समाजमाध्यमं हे  स्वतंत्र विचार व्यक्त करण्याचं सेन्सॉरशिप नसलेलं प्रभावी माध्यम आहे. पण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येतेच. आपल्या विचारांवर उमटणाऱ्या बऱ्या-वाईट प्रतिक्रियांना सामोरं जाण्याची ताकद हवी.  कारण निगेटिव्ह कॉमेंट्स लवकर येतात आणि त्याआधारे तुम्हाला ‘ट्रोल’ केलं जातं. सोशल मीडियाने ट्रोलिंगसारखा नवा शब्द, संकल्पना आपल्याला दिली आहे. पण तरीही मी म्हणेन की, जे स्वातंत्र्य सोशल मीडियामध्ये आहे तेवढं दुसऱ्या कोणत्या माध्यमात नाही.

स्त्री आहे म्हणून..

कोणत्याही समाजात स्त्री-पुरुष हा भेदभाव जाणवतोच. अगदी विकसित समाजांमध्येही समानता नाही. स्त्रियांना मत असतं हेच आपल्याकडच्या काही लोकांना मान्य नसतं. आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून आपल्याला ते फारसं जाणवत नाही. पण बाहेरच्या राज्यात जिथे पुरोगामी विचारच नाहीत, तिथून मला प्रतिक्रिया येतात तेव्हा ‘आप चूप ही बैठीये’, ‘घर बैठीये’ असं अनेकांचं म्हणणं असतं. मी कलाकार आहे तर घर का बैठीये, हा प्रश्न मला पडतो. स्त्रियांना या अशा वक्तव्यांची सवय झालेली असते नि त्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं. सगळ्याच बाबतीत तलवार काढायची नसते आणि आपलं म्हणणंही सोडायचं नसतं.

भाषा हे संवादाचं माध्यम, जपून वापरा

अनेकांना ऑब्जेक्टिव्ह मतं नसतात. जर तुमच्याकडे ती असतील तर तुम्ही ती सातत्याने मांडावीत. आपण आपली मतं बाजूला ठेवावी असे आमचे संस्कार नाहीत. लोकांनी आम्हाला जसं आहे तसं स्वीकारायला हवं. तरीही विचार व्यक्त करण्याची भाषा आक्रस्ताळी आणि विचार एकांगी नसावा. प्रत्येक वेळी आक्रमक होऊन चालत नाही. भाषा हे संवादाचं माध्यम आहे. आपण ते नीट वापरायला हवं. सलमान खानच्या चिंकारा शिकारप्रकरणी मी सोशल मीडियावर लिहिलं होतं. सलमानच्या विरोधात मी नाही, पण कोणीही या सगळ्याकडे ऑब्जेक्टिव्हली बघितलं तर जे प्रश्न पडतील तेच मी मांडले. सलमानचे चाहते मोठय़ा संख्येने असल्याने मला काही फारच निगेटिव्ह, खालच्या थराच्या प्रतिक्रिया आल्या. त्याबद्दल मी रीतसर तक्रार केली. आपण अशा प्रकारांनी दबकून जाता कामा नये. रिपोर्ट, ब्लॉक हे पर्याय या सोशल साइट्सनीच दिलेले आहेत. त्याचा वापर करायला हवा. संवाद घडतो, तेव्हा टोकाची विरुद्ध मतंही येणारच. पण आपला मुद्दा चांगल्या रीतीने समजावून देण्याची आपली जबाबदारी असते.  विचार मांडायचं स्वातंत्र्य तिथे आहे, पण सारासार विचार करून जबाबदारीनेच व्यक्त व्हायला हवं.

सतर्क पालक

दोन मुलांचे पालक म्हणून आम्ही सतर्क आहोत. आता दुर्दैवाने भोवतालच्या वातावरणात एक अविश्वास आहे. आम्ही अनुभवलेले वातावरण, निसर्गसौंदर्य, मोकळेपणा आता मुलांना देता येत नाही. आपण मुलांना काय संस्कार देता ते महत्वाचं आहे, कारण तेच संस्कार ते आयुष्यात पुढे घेऊन जातात. मुलींना जसे आपण संस्काराचे, शिस्तीचे नियम शिकवतो तसंच मुलांनाही सांगायला हवं तरच समानता येईल.

माझी आयडल

लहानपणापासून आईच माझा आदर्श आहे. तिने प्रामाणिकपणा आणि शिस्तप्रियता या दोन गोष्टींवर भर दिला. तो माझ्या संस्काराचा पाया आहे. कोणतंही काम मन लावून, अभ्यास करून करायचं ही तिचीच शिकवण. मोकळ्या वातावरणाची सवय आईमुळे झाली आहे. मी लिबरल वातावरणात वाढले नसते तर आज इतकी ‘ओपन’ झाले नसते.

परफेक्शनिस्ट माधुरी

माधुरी दीक्षितसोबत काम करताना धमाल यायची. ती परफेक्शनिस्ट आहे. ती चटकन मोकळी होत नाही, पण तिच्याशी ओळख झाल्यानंतर मात्र ती खूप दिलखुलास आहे. नकला करणं वगैरे फारच छान करते. ‘हम आपके..’च्या वेळी ती माझ्याबाबत खूप प्रोटेक्टिव्ह होती. ‘ए शहाणी’ अशी ती हाक मारायची. ‘लो चली मैं’ गाण्यावर डान्स करताना तिने खूप सांभाळून घेतलं. ‘दीदी तेरा तेवर दीवाना’ या गाण्याच्या वेळी आपलं बेस्ट देत नाही, तोपर्यंत ती रिटेक मागत होती  ‘झलक दिखला जा’च्या वेळी ती परीक्षक नि मी स्पर्धक होते. पण ती असल्यामुळे मी कम्फर्टेबल होते. तिच्याकडून कुणाबद्दल काही निगेटिव्ह ऐकलेलंच नाही.

..यू आर हिस्ट्री

वेबसीरिज हे नवं माध्यम  करायला आवडेल. कलाकाराला ताजं राहायला हवं नाही तर यू आर हिस्ट्री!

काहे दिया परदेस 🙂

आशुतोष राणा यांच्याशी लग्न करायचं ठरवल्यानंतर ते अगदी साधेपणाने करायचं ठरलं. आमचे आध्यात्मिक गुरू दद्दाजी यांच्या हस्ते हा सोहळा करायचा ठरला. आमचं लग्न दमोह , बांधकपूर येथील गावातल्या शंकरजींच्या मंदिरात झालं. मुंबईहून माझे आई-वडील आणि अगदी मोजकी माणसं लग्नाला आली होती. तिथे जाताना ट्रेनमध्ये आमच्यासोबत राणाजींचे काही कॉलेजचे मित्र होते. ते राणाजींचे कॉलेजमधले न सांगण्याजोगे किस्से अभिमानाने सांगू लागले. ते किस्से इतके भयंकर होते की ते ऐकून मला माझ्या आई-बाबांसमोर ओशाळल्यागत झालं होतं, पण मला ते माहीत आहे असं दाखवून मी त्यांना आश्वासन देत होते. ज्या हॉटेलमध्ये आम्ही पोहोचलो त्याची रिबीन कापून आम्ही उद्घाटन केलं नि आत गेलो. तिथे नेमकी इलेक्ट्रिसिटी नव्हती, तसेच तिथे तयार झालो. मला वाटतं आमच्या लग्नावर एखादा चित्रपट होऊ शकेल.

..म्हणून डेली सोप्समध्ये रमले नाही

पूर्वी आम्ही मालिकांचं शूटिंग ‘ऑन लोकेशन’ करायचो. त्यामुळे काही संवादांचं डबिंग नंतर करावं लागायचं. सर्कस मालिकेच्या वेळी आम्ही अझीझ मिर्झाच्या ऑफिसमध्ये सगळे कलाकार जमून एकाच माइकवर एकाचं झालं की दुसरा असं डब करत असू. हल्ली डबिंग व्हॉट्सअ‍ॅपवर होतं. अमुक एक लाइन करायची आहे, असा निरोप येतो. ती पाच पद्धतीने रेकॉर्ड करून पाठवायची आणि तिच्यावर संस्कार होऊन तीच टेलिकास्ट होते. डेली सोपमध्ये मी रमले नाही, कारण हेच आहे. तिथे क्रिएटिव्हिटीला कुठे संधी आहे? ‘जीते है जिसके लिए’ नावाची एक दैनंदिन मालिका मी करत होते. पण चौथ्या भागाच्या प्रसारणानंतर त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीए, असं आम्हाला सांगत माझ्या भूमिकेचा ढाचाच बदलला पूर्ण. फार गंभीरपणे एखाद्या भूमिकेचा विचार केल्यानंतर अचानक ‘आज तू व्हिलन आहेस,’ असं कसं करता येईल? यात लेखकांची क्रिएटिव्हिटी तर मरतेच. दिग्दर्शकसुद्धा फार कल्पकता वापरू शकत नाही. मालिकेचा दिग्दर्शकच एपिसोडनुसार बदलतो. पूर्वी हे दिग्दर्शकाचं माध्यम समजलं जायचं आणि मालिकांचे लेखक-दिग्दर्शक बदलत नसत. पण आताच्या परिस्थितीत हेदेखील मान्य करायला हवं. जे सातत्याने या पद्धतीतही चांगलं काम करताहेत त्यांच्यात खरंच ते कसब आहे, कला आहे, असं मला वाटतं. हॅट्स ऑफ टू देम. ते खरंच खूप कठीण आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत एका सेटवर- कुठलाही सीन असला तरीही प्रचंड मेकअप लावून बसायचं सोपं निश्चित नाही.

सर्कसची सीरिअल शिकवण

टेलिव्हिजनवरच्या अभिनयाचं काय प्रशिक्षण असेल तर ते मला अझीझ मिर्झानीच दिलं. थिएटरची एक सवय असते की, सगळीच वाक्यं, सगळी इमोशन्स सगळं वजन देऊन आपण व्यक्त करतो. पण ती सवय टेलिव्हिजनवर मोडायला लागते. कॅमेरा लांब अंतरावर आहे, तुम्ही अंधारात आहात की प्रकाशात आहात याचा विचार करून भाव व्यक्त करावे लागतात. हे अझीझ अंकलनी शिकवलं. पूर्वीच्या मालिकांमध्ये लोकेशनवर जाऊन शूटिंग करण्यावर भर होता. आता मालिकांचे सेट असतात. पूर्वीच्या मालिकांची लांबीही कमी असायची. अझीझ मिर्झाना तर ‘नुक्कड’ चांगली झाली म्हणून ‘सर्कस’साठी १३ ऐवजी १९ एपिसोड्स मिळाले याचं तेव्हा फार अप्रूप वाटलं होतं. त्या वेळी दूरदर्शन हे एकच चॅनल होतं आणि त्यात संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व असायचं. भारत म्हणजे काय- तर केवळ आपली भाषा आणि आपली संस्कृती नाही, इतर भाषा आणि इतर संस्कृतीदेखील या देशात आहेत, हे घरबसल्या टीव्हीमुळे लहानपणापासून आम्हाला कळलं. आता दूरचित्रवाणीच्या कक्षा, वाहिन्यांची संख्या इतकी वाढली आहे तरी त्याचा स्कोप सीमित झालाय असं मला वाटतं.

विजयाबाई गुरू

‘लाइफलाइन’ करत होते, तेव्हा विजया मेहतांना असिस्ट केलं. तो अनुभव आजतागायत लक्षात आहे. अशी दिग्दर्शिका मी पाहिली नाही. त्यांचं डिटेलिंग, त्यांची कामाची पद्धत जाणून घेतली. शिस्तप्रिय, काटेकोर आणि नेमकं काय हवंय याची जाण असणाऱ्या बाईंकडून मी खूप काही शिकले. जर कुणा अभिनेत्याला बाईंनी आठ वाजता बोलावलं असेल तर त्या साडेसातला हजर असत. खरं तर मी विजयाबाईंची चौथी असिस्टंट होते. त्यामुळे माझ्याकडे कपडेपट होता. प्रतिमा कुलकर्णीताई फर्स्ट असिस्टंट होत्या. पण तरीही मला निरीक्षणातून खूप शिकता आलं. माणसं काम करतात तेव्हा त्यांचं निरीक्षण करायला मला आवडतं. अभिनय करतानासुद्धा कॅमेरामन कुठली लेन्स लावतोय, लायटिंग कसं होतंय याचं निरीक्षण सुरू असायचं. सर्कस मालिका संपल्यानंतर मी एक फिल्म मेकिंगचा कोर्सही केला होता. दिग्दर्शनाची आवड तेव्हापासून. या सगळ्या निरीक्षणातून शिकण्याचा फायदा ‘रीटा’ करताना झाला.

कादंबरीचा चित्रपट घडताना..

‘रीटा’ माझ्या मनात फार वर्षांपासून होतीच. त्या कादंबरीचा प्रभाव माझ्यावर अजून आहे. आईने लिहिली म्हणून नाही, पण ती व्यक्तिरेखा जी आपल्या समाजात नायिका म्हणून मानली जाणारच नाही अशा व्यक्तिरेखेच्या अनेक छटा या रीटामध्ये होत्या. मी प्रयोग करायला आईला गृहीत धरू शकत होते. त्यामुळे पहिली पटकथा ‘रीटा वेिलगकर’ या कादंबरीवरूनच लिहिली. आईला दाखवली आणि ती चांगली झालीये असं म्हटल्यानंतर आत्मविश्वास वाढला. मग दिग्दर्शनही करायचं ठरवलं. मनमोहन शेट्टींच्या मुलींनी त्यांचं प्रॉडक्शन हाऊस नुकतंच सुरू केलं होतं. त्यांच्याकडे कथा दिली आणि नंतर नॅरेशन द्यायलाही गेलं. स्क्रिप्ट ऐकून चक्क पहिल्याच मीटिंगमध्ये चित्रपट बनवायचं त्यांनी पक्कं केलं. माध्यमांतर करताना मला कथेतील बऱ्याचशा गोष्टी, प्रसंग काढून टाकावे लागले. कारण कादंबरीचा चित्रपट करताना सगळंच संदर्भासहित घेण्याचा मोह होतो, पण फीचर फिल्ममध्ये वेळेच्या गणितात ते बसत नाही. मी रीटाच्या नातेसंबंधांवर भर दिला. माझी रीटा मवाळ आहे थोडी. पण अनेकांना चित्रपट बघून कादंबरी वाचावीशी वाटली. वाचन घडवणारा हा प्रवासपण चांगला आहे. कादंबरीवर अनेक चित्रपट घडू शकतात.

त्रिभंगची गोष्ट

‘त्रिभंग’ या लघुपटाची राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) कोप्रॉडक्शन मार्केटसाठी निवड झाली आहे. हा लघुपट इंग्रजी आणि  मराठी भाषेत आहे. एनएफडीसीच्या कोप्रोडक्शन मार्केटमध्ये १८ पटकथा निवडल्या गेल्या त्यातली ही माझी एक आहे. एकाच घरातल्या ८०, ६० आणि ३७ वय असणाऱ्या तीन ताकदवान स्त्रियांची ही गोष्ट आहे. त्यामुळे त्याला निर्माता मिळवणं कठीण होतं. त्याचं दिग्दर्शन करायचं तर निर्माता हवा म्हणून मी तिथे गेले आणि माझ्या पटकथेची निवड झाली.

हास्यामागचं रहस्य

मूड बूस्टर एक्सरसाइज म्हणून आरशासमोर उभं राहून स्माइल करा. त्याचा नक्की उपयोग होईल.  माझ्या हास्याचं रहस्य काय, असा प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो. याचं श्रेय मी माझ्या ऑर्थोडोन्टिस्ट डॉ. जयकर यांना देते. लहानपणीच त्यांनी माझ्या दातांना तारा लावल्या होत्या.

खलनायक केवळ चित्रपटात!

राणाजी खलभूमिका करतात पण तसे ते घरी नसतात. तो अभिनय असतो. ‘हम आप के है कौन’मध्ये मी जितकी चांगली आहे तितकी चांगली मी प्रत्यक्षात नाहीये. मीदेखील अभिनय करते. चित्रपटात दाखवतात तेवढे वाईट ते नाहीत आणि तेवढी चांगली मीदेखील नाही. त्यामुळे आम्ही समान आहोत. आयुष्यातही स्टिरीओटाइपिंग नकोच स्टिरीओटाइपिंग मला मान्य नाही.

प्रत्येक जण वेगळा असतो. त्यामुळे असे ठोकताळे नसावेतच. म्हणजे गळ्यात मंगळसूत्र वगैरे घातलेली स्त्री चांगली, सोज्ज्वळ किंवा काहींच्या मते प्रतिगामी.. असं का असावं? अनेक जण मला विचारतात की, तू घरी काय बसलीयेस? पण ते फक्त घरी बसणं नाहीये. त्यात पण खूप काम आहे आणि ते कमी प्रतीचं नाहीच. तुमची घराप्रतीदेखील जबाबदारी असतेच. मुलं होतात, ती काय दुसऱ्यांनी सांभाळावी म्हणून? खरं तर पुरुषांनादेखील स्टिरीओटाइपिंगचा त्रास

होतो. पूर्वी तो जास्त होत असेल. एखाद्याला मुलांना सांभाळावंसं वाटलं, त्यांचं करावंसं वाटलं तर, काय बायकांसारखा करतोस म्हणून त्याच्यावर टीका होत असे. पुरुषाने बाहेरून कमावून आणावं आणि वडिलांचा धाक असलाच पाहिजे असे आपले ठोकताळे असायचे, पण आता काळ बदलला आहे. सीमा धूसर होतेय असं वाटतं. दोघांनी मिळून कोणती घरची गोष्ट केली तर त्यात कमी लेखण्याचं काही कारण नाही.

‘केसरी’चे केसरीभाऊ पाटील आणि सुनीता पाटील यांनी रेणुका शहाणे यांचे स्वागत केले. शांता गोखले आणि आशुतोष राणा हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘केसरी’चे केसरीभाऊ पाटील आणि सुनीता पाटील यांनी रेणुका शहाणे यांचे स्वागत केले. शांता गोखले आणि आशुतोष राणा हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

..तर भरकटणं फार सोपं

मी आजही होतकरू मुला-मुलींना हेच सांगेन की, महत्त्वाकांक्षा असलीच पाहिजे, पण काय करायचं, काय करायचं नाही हे माहिती नसेल तर ‘नाही’ म्हणण्याचा निर्णय घेता येत नाही. तुमची मूल्यं हरवणार नसतील तर कामासाठी तडजोड करायला हरकत नाही, पण जर तुमच्या तडजोडीमुळे  तुमची मूल्यं आणि विचार मागे ठेवावे लागत असतील तर मग मात्र त्या कामाला मोल राहत नाही. आपले विचार फार स्पष्ट असावेत. नाहीतर भरकटणे फार सोपे असते.

रिअॅलिटी शोचा अनुभव

रिअ‍ॅलिटी शो हा एक वेगळा प्रकार आहे. आम्ही जेव्हा अंताक्षरी करायचो तेव्हा त्यात नैसर्गिकता होती. प्रेक्षकांचा जल्लोश पाहिलेला आहे. आता टाळ्या वाजवा, असं सांगायला लागायचं नाही तेव्हा. पण आता प्रेक्षक म्हणून थोडे लोक बाहेरचे असतात, बाकी ज्युनिअर आर्टिस्टनाच बसवतात. मीदेखील काही रिअ‍ॅलिटी शो केलेत. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’चा अनुभव चांगला होता. काही गंभीर गोष्टी कॉमेडीच्या माध्यमातून पोहोचवल्यावर त्या मार्मिक वाटतात. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न त्यातून हाताळले होते. मकरंद अनासपुरे सहपरीक्षक असल्याने त्याच्या सोबत छान टय़ुनिंग जमलं होतं. पण सातत्याने दोन र्वष काम केल्यावर सांगण्यासारखं आहे ते किती वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार, हा प्रश्न होता म्हणून ब्रेक घेतला.

बाबूजींचा मंत्र

माझे सासरे – म्हणजे बाबूजी मला जवळचे होते. ते वयाने माझ्या आजोबांसारखे होते, कारण राणाजी त्यांच्या घरात बारावे अपत्य आहेत. मी बाबूजींची सगळ्यात धाकटी  लाडकी सून होते. त्यांनी मला एक मंत्र दिला होता की, संसारात ‘फस्ट ओबे, देन आग्र्यू’. तुम्ही आधीच आक्रमकता दाखवू नका. आधी ऐकून, समजून घ्या आणि नंतर आपलं मत सांगा आणि मन वळवायचा प्रयत्न करा. लग्नाच्याच नाही तर कोणत्याही नातेसंबंधात हा सल्ला उपयुक्त ठरतो.

आवडीचं माध्यम

अभिनेत्री म्हणून नाटक, दिग्दर्शक म्हणून चित्रपट आणि लेखिका म्हणून टेलिव्हिजन ही माझी आवडती माध्यमं आहेत. त्या क्षेत्रांची, कलांची ती गरज असते. मला नाटकाबद्दल आस्था नि श्रद्धा आहे. त्यातल्या व्यावसायिकतेमुळे आणि त्यातून येणाऱ्या तडजोडींमुळे मी त्यापासून दूर गेले, पण नाटक केव्हाही करायला आवडेल. लघुपट या माध्यमाला चांगले दिवस आलेत सध्या. यूटय़ूब हे सशक्त डिजिटल माध्यम म्हणून पुढे येतंय. काही लघुपट महोत्सव चॅनलवरही दाखवले जातात. भविष्यात वेबसीरिजसाठी काम करायला नक्कीच आवडेल. ते नवं माध्यम आहे आणि भविष्यातील माध्यम आहे.

मराठी सिनेमा व्हाया गुजराती, तेलुगू

माझा पहिला चित्रपट पूर्ण प्रायोगिक. एक्सपरिमेंटल या शब्दाचंच मला आकर्षण असल्यामुळे मी संदीप शाहने एका प्रायोगिक गुजराती चित्रपटाबद्दल विचारल्यावर लगेच हो म्हटले. माझ्याबरोबर दिलीप जोशी आणि मनोज जोशी या चित्रपटात होते. या चित्रपटादरम्यान मी त्या दोघांकडून गुजराती शिकण्याचा प्रयत्न केला, मात्र फार यश आलं नाही. नंतर मात्र एका गुजराती नाटकासाठी रीतसर ती भाषा शिकले, तेव्हा त्या पहिल्या चित्रपटात भाषा माहिती नसल्यामुळे चुकीची एक्स्प्रेशन्स दिली होती, हे समजलं. गुजरातीनंतर राम गोपाल वर्माच्या प्रॉडक्शनचे दोन तेलुगू चित्रपट केले आणि मग ‘हाच सूनबाईचा भाऊ’ नावाचा पहिला मराठी चित्रपट लक्ष्मीकांत बेर्डेसोबत केला.

 

  • कोणतीही भूमिका करण्यासाठी तटस्थ वृत्ती लागते, ती मला मानसशास्त्राच्या अभ्यासातून मिळाली. आपण स्वत:ला ओळखतो तेव्हा आयुष्यात भरकटण्याची वेळ कमी येते. कुठल्याही क्षेत्रात काम करताना आपल्याला काय करायचं नाही, यावर ठाम असलं पाहिजे. कोणावर अवलंबून न राहता केलेल्या आत्मपरीक्षणाचा फायदा स्वतला ओळखण्यासाठी होतो.  आत्मनिरीक्षणाशिवाय आत्मविश्वास शक्य नाही.
  • मुलं होतात तेव्हा प्राधान्यक्रम बदलतात. आता हेच करणार का, असं वाटतं. कारण आई कधीच रिटायर होत नाही. इंद्रा नूयी म्हणाल्या होत्या तसं, तुम्हाला ‘हॅव इट ऑल’चा ध्यास असेल तर घुसमट होणारच. थोडं बदलायला हवंच आपण. मी म्हणेन की, ‘डोण्ट डू इट ऑल’. इतरांना आपल्या कामात हातभार लावायला सांगितलं पाहिजे.

शब्दांकन : अरुंधती जोशी, कोमल आचरेकर, तेजल चांदगुडे