राजपथावरची ती परेड बघून आपल्यालाही कधी तरी त्या परेडचा हिस्सा व्हावंसं वाटतं. ती तालासुरात पडणारी पावलं, आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारं ते नृत्य किंवा एखादा कार्यक्रम आपलाही असावा, असं वाटत राहतं. कधी तरी तिथे परेड करणारी आपल्यासारखी मुलं तिथे कशी पोहोचतात, त्यांची निवड कशी होते, असे प्रश्नही पडतात.

प्रजासत्ताक दिनी सकाळचं नियोजन म्हणजे सकाळी सकाळी उठून, छान पांढरे कपडे घालून, छातीवर तिरंगा लावायचा आणि आजूबाजूच्या परिसरात, शाळेत किंवा अन्य ठिकाणी जाऊन ध्वजारोहण करायचं. राष्ट्रगीत गायचं. आणि घरी येऊन टीव्हीसमोर बसून दिल्लीच्या राजपथावर चालेली परेड बघायची, असं नियोजन हमखास अनेकांचं असतं. राजपथावर चालेल्या त्या परेडमधली लेफ्ट.. राइट.. लेफ्ट अशी बरोबर तालात पडणारी पावलं, वेगवेगळे मानवी मनोरे, नृत्याचे, गायनाचे किंवा अन्य कार्यक्रम बघून आपल्याला आपल्या देशाचा काही वेगळाच अभिमान वाटतो. आणि यामध्ये जर आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारे चित्ररथ, परेड समोर आली की त्या आनंदाची मात्रा जास्त वाढते. राजपथावर चालेली ती परेड म्हणजे भारताची सांस्कृतिक परंपरा आणि सीमेवर लढणारे वीर जवान यांची ताकद, प्रतिभा दाखवणारी वारीच असते. राजपथावरची ती परेड बघून आपल्यालाही कधी तरी त्या परेडचा हिस्सा व्हावंसं वाटतं. ती तालासुरात पडणारी पावलं, आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारं ते नृत्य किंवा एखादा कार्यक्रम आपलाही असावा, असं वाटत राहतं. कधी तरी तिथे परेड करणारी आपल्यासारखी मुलं तिथे कशी पोहोचतात, त्यांची निवड कशी होते, असे प्रश्नही पडतात. राजपथावरच्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेल्या दोन तरुणींशी बोलून त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’ टीमने केला..

राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये राज्यांराज्यांमधून कोणाला भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी काही अटी असतात. ज्यांना भाग घायचा आहे त्या तरुणांना एन.एस.एस. (राष्ट्रीय सेवा योजना)मध्ये दोन वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक असते, यासोबतच एन.एस.एस.ने आयोजित केलेल्या स्पेशल कॅम्प्समधेही त्यांनी सहभाग घेतलेला असावा, ही मूलभूत अट असते. या निवड प्रक्रियेची सुरुवात कॉलेजच्या निवड प्रक्रियेतून होते. शारीरिकरीत्या फिट असणारे आणि सांस्कृतिक गुण असणारे अर्थात नृत्य किंवा गायन असे काही कलागुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड कॉलेजच्या स्तरावर होते. त्यानंतर विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या निवड प्रक्रियेतून त्यांना जावं लागतं. त्यानंतर येते ती ‘वेस्ट झोन प्री आर.डी.’ निवड प्रक्रिया. आणि निवडीचा अंतिम टप्पा म्हणजे दिल्ली. अशा चार वेगवेगळ्या प्रक्रियांमधून गेल्यावर सर्वोत्तम मुलांमधूनही सर्वोत्तम असलेल्या मुलांची निवड या अंतिम टप्प्यात होते. यंदा आपल्या महाराष्ट्राच्या टीममध्ये सात मुली, गोव्यातून एक मुलगी तर मुलांमध्येही सात मुलं आणि गोव्यातून एक मुलगा अशी १६ तरुण मुलं मुली आणि एक प्रोग्रॅम मॅनेजर या सर्वाची निवड झाली आहे. निवड झालेल्या मुलांचं वय साधारणपणे १९ ते २२ वर्षांमधलं आहे. अर्थात निवडल्या जाणाऱ्या टीमचा कोटा हा प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळा असतो. आपल्या महाराष्ट्राच्या टीममध्ये अख्ख्या मुंबईमधून एकटीच दिव्या पोंगडे या १९ वर्षांच्या तरुणीची निवड झाली आहे. दिव्या सध्या ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या ‘डॉ. बी. एम. एन. कॉलेज ऑफ होम सायन्स’ या कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षांत शिकते आहे. दिव्याने तिचा हा खास मुंबई ते दिल्लीपर्यंतचा अनोखा प्रवास मांडला. ‘मी एनएसएसचे दोन स्पेशल कॅम्प केले. या कॅम्पमुळे मी खूप काही शिकले. मुलांना वाटतं की एनएसएस म्हणजे फक्त सामाजिक काम पण अशा कॅम्पमुळे मला एनएसएसचा खरा अर्थ समजला. आणि म्हणूनच मी राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये भाग घेण्याचं ठरवलं.  निवड प्रक्रि येला काही महिने आधी सुरुवात होते. माझी आधी कॉलेजपातळीवर निवड झाली. पुढची निवड प्रक्रिया ही ‘एसएनडीटी’च्या पुणे कॅम्पसमध्ये होणार होती. आणि याची माहिती आम्हाला अगदी आदल्या दिवशी समजली,’ असं दिव्या सांगते. अचानक कसं जायचं सांगतेस तू असं म्हणून पालकांनी आधी तिला जायला नकार दिला. पण मला संधी सोडायची नव्हती. अखेर माझ्या आई-वडिलांनी मला समजून घेतलं आणि मी पुण्याला पोहोचले, असं सांगणाऱ्या दिव्याला तिथल्याही प्रवेश प्रक्रियेतून निवड झाल्यावर एकच आनंद झाला होता. त्यानंतरची निवड प्रकिया हैदराबादमध्ये झाली तीसुद्धा तिने पार केली आणि शेवटी दिल्लीत झालेली प्रक्रियाही मोठय़ा मेहनतीने पार केल्याची माहिती तिने दिली.

खरं तर, एकापेक्षा एक कठीण अशा या निवड प्रक्रियेतून जाताना पालकांची साथ खूप महत्त्वाची ठरल्याचे तिने सांगितले. एकीकडे या सगळ्या प्रकियेतून जात असताना अनेक मित्रमैत्रिणीही बनतात आणि मग शेवटचा टप्पा पार झाला की तुम्ही एक टीम म्हणून तयार होता जशी आमची महाराष्ट्राची टीम तयार झाली होती. एक टीम म्हणून तुम्हाला भारतीय सैन्यदलासोबत सराव करायला मिळतो. इथे तुमच्या राज्याची एकटी टीम नसते. अनेक राज्यांच्या टीम एकत्र येतात आणि तुमचा मैत्रिचा परीघही वाढतो, हा अनुभव खूप अनोखा होता. विविधतेत एकता असं आपण ऐकून असतो पण अनेक संस्कृतींची खरी ओळख त्या त्या राज्यांमधून आलेल्या मुलामुलींशी बोलताना होते आणि त्याच वेळी इतक्या वेगवेगळ्या भागांतून एकत्र आलेलो आम्ही एका देशाचं प्रतिनिधित्व करत असतो, असं दिव्याने सांगितलं. प्रजासत्ताक दिनाचा हा कार्यक्रम चोख पार पडावा यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील अनेक मुलंमुली एकत्र मिळून दिवसभर खूप मेहनत घेतात. प्रत्येक जण आपल्या राज्यासोबत आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतो. याविषयी दिव्या म्हणते, ‘हा कॅम्प म्हणजे स्वत:मध्येच एक नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प आहे. पूर्ण भारतातून आलेल्या मुलामुलींमुळे एक ‘मिनी इंडिया’ तयार झाल्यासारखा वाटतो.’ या सगळ्या प्रक्रियेतून तू काय शिकलीस?, यावर ‘नॉट मी बट यू’ हे एनएसएसचं ब्रीद वाक्य मी तिथे वास्तवात अनुभवलं. नेतृत्वाचा गुण माझ्यात होताच मात्र इथे नेतृत्व करण्यासाठी खूप मोठा मंच मला मिळाला, असं सांगणाऱ्या दिव्याच्या शब्दांशब्दांतून देशासाठी काही करण्याची सुवर्णसंधी मिळाल्याचा अभिमान आणि आनंद एकाच वेळी ओसंडून वाहताना दिसतो.

दिव्याला जसा या परेडने अविस्मरणीय अनुभव दिला तशीच काहीशी भावना हैदराबाद राज्याच्या टीममधून या परेडसाठी निवड झालेल्या शिरीषा बॉम्मेनोला या २१ वर्षीय तरुणीचा आहे. शिरीषा तेलंगणा विद्यापीठात शिकतेय. तिच्या निवड प्रक्रियेबद्दल आणि अनुभवाबद्दल सांगताना, शेवटच्या निवड प्रक्रियेमध्ये २०० मुलं-मुली होती, त्यातून अवघ्या ४४ जणांची निवड झाली. त्या ४४ मध्ये मी आहे याचा मला खूप अभिमान वाटतो, असं ती म्हणाली. हैदराबाद ते प्रजासत्ताक दिनाची परेड इथपर्यंतच्या प्रवासात वेगळं काही जाणवलं असेल तर ते म्हणजे विविध प्रांतातील मुला-मुलींसोबत राहणं, त्यांची संस्कृती, त्यांचे विचार जाणून घेणं. राज्यांच्याही सीमा ओलांडून नवीन नाती जोडणं.. असं शिरीषा सांगते. आमच्या टीममध्ये ९९ मुली आणि ९९ मुलं आहेत. यात काही जण सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी आहेत तर काही परेडमध्ये आहेत. प्रजासत्ताक दिनाचा राजपथावरचा अनुभव म्हणजे लाइफ टाइम मोमेंट आहे, असं ती सांगते.

पूर्ण कॅम्पच्या दरम्यान रोज सरावासोबत संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो.  यात दर दिवशी एकेका राज्याला संधी दिली जाते. राष्ट्रपती भवनामधेही कार्यक्रम करायची संधी काहींना मिळते. देशाच्या एवढय़ा जवळ नेणारा हा अनुभव इतक्या तरुण वयात मिळणं हीच गोष्ट त्यांना पर्वणी वाटते आहे. हा अनुभव घ्यायचा असेल तर थोडं जागरूकतेने आपल्या कॉलेजमधून शिकत असतानाच एनएसएससारख्या उपक्रमांमध्येही भाग घ्यायला हवा, असं या दोघी जणी आवर्जून सांगतात. या वर्षीही इंडिया गेटच्या परिसरात प्रजासत्ताक दिनाचा भव्यदिव्य सोहळा साकार होणार आहे. यात आपल्या राज्यांतून लावणी, गोंधळ, लेझीम, मंगळागौर आणि गणेश वंदन सादर होणार आहे. या परेडमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये असाच एक चेहरा दिव्यासारख्या आपल्या मैत्रिणीचा किंवा शिरीषासारख्या दुसऱ्या राज्यांतून आलेल्या आपल्याच सखीचा असेल आणि त्यांना बघून आपलाही ऊर अभिमानाने भरून येईल!

viva@expressindia.com