भगवा, पांढरा, हिरवा हे रंग भारताच्या तिरंग्यातले रंग. रंग म्हणून त्यांना बाकी रंगांप्रमाणे स्वत:चं महत्त्व असूनही त्यांचं अस्तित्व स्वातंत्र्यदिवस आणि प्रजासत्ताकदिनी खुलून येतं. दररोजच्या जीवनात कपडय़ांच्या खणात हरवलेले हे रंग या दिवशी मात्र बाहेर अभिमानाने मिरवलेले जातात, पण मग बाकी दिवशी हे रंग लुप्त असण्यामागचं नेमकं गुपित काय?

तुम्हाला शाळेतली प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिनाची आठवण विचारली तर तुम्हाला शाळेतल्या अनेक गोष्टी आठवतील. झेंडावंदन, कवायत आशा अनेक गोष्टी मनात घर करून जातील. पण सगळ्यांच्या आठवणी वेगवेगळ्या असूनही त्यात एक गोष्ट सामाईक असेल. कोणती माहितीये? शिक्षकांचे पांढरा कपडे. खरंतर, आता सगळेच या दोन दिवसांना शक्यतो पांढरा किंवा भगवा, हिरवा आणि पांढरा यांचा मिलाफ करून कपडे घालतात, पण शाळेत असताना मात्र शिक्षकांकडून पांढरेशुभ्र कपडे, राष्ट्रगीत, त्या निमित्ताने करायची भाषणं असं बाळकडू आपल्याला सर्वानाच मिळालेलं असतं यात शंका नाही.

आपल्या वाढत्या वयानुसार आता कदाचित या दिवसांत केल्या जाणाऱ्या आपल्या पोशाखात बदल घडला असेल पण आजही हे तीन रंग घालणं म्हणजे तिरंग्याचा आणि देशाचा मान राखण्याचं, प्रेम दाखवण्याचं प्रतीक मानलं जातं. त्यातही पांढरा रंग सगळ्यांच्या जरा जास्तच जिव्हाळ्याचा..

आपल्या तिरंग्यातल्या तीन रंगांना विशेष महत्त्व आहे. आणि आपणही त्याच भावनांचा आदर राखत या दोन दिवशी हे तिरंगी किंवा पांढरा कपडे घालतो. पण हे दोन दिवस वगळता हे तीन रंग कपडय़ांमध्ये एकत्र फार कमी पाहायला मिळतात किंवा पाहायला मिळतच नाहीत, असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही. अर्थात एखाद्या सोहळ्यासाठी देशभक्ती अशी संकल्पना असलेल्या कार्यक्रमांसाठी किंवा आपलं देशप्रेम दाखवण्यासाठी आवर्जून ते तिरंगी कपडे घातले जातात मात्र रोजच्या जीवनात कार्यालयात जाताना, कॉलेजला किंवा फिरायला जातानाही आपण हे टाळण्याचा प्रयत्न करतो. पांढरा रंग आपण इतर वेळी शांतता आणि सद्भावना दर्शवण्यासाठी घालतो, पण मग भगवा आणि हिरवा (धर्म आणि राजकारण वगळता) कधी कोणत्या विशेष कारणासाठी वापरला जातो असं ऐकिवात नाही. मुळात कोणता रंग कशासाठी घालावा आणि घालावा की नाही हा वैयक्तिक प्रश्न असला तरी आपले राष्ट्रीय दिन वगळता या रंगांचं महत्त्व काय आणि हे रंग एकत्र सर्रास घातलेले का दिसत नाहीत हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच संदर्भात फॅशन डिझायनर वैशाली शदांगुळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की, ‘प्रत्येक रंगाला स्वत:चं महत्त्व आहे. पांढरा रंग शांतता दर्शवणारा आहे जो डोळ्यांनादेखील भावतो. फॅशनच्या जगातदेखील या रंगांना गरजेप्रमाणे वापरलं जातं. हिरव्या रंगाच्या छटा अनेक अर्थ दर्शवतात पण निसर्ग किंवा निसर्गाची पुनरावृत्ती हा अर्थ प्रामुख्याने घेतला जातो. भगवा सत्य आणि अध्यात्मिकतेचं प्रतीक मानला जातो’. फॅ शनच्या जगात अनेक संस्कृतींचा मिलाफ होत असल्याने रंगाच्या छटा आणि त्यांचा कमी जास्त प्रमाणात वापर होत असला तरी साधारणपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर या रंगांच्या अर्थामध्ये साधम्र्य जाणवतं.

‘आपल्या तिरंग्यातले तीन रंग एकत्र परिधान केले की आपसूकच त्याचा संबंध देशभक्तीशी जोडला जातो. किंवा नुसते हे तिन्ही रंग एकत्र आले तरी आपल्याला आपल्या झेंडय़ाची आठवण होते. त्यामुळे हे रंग आम्ही कपडय़ांमध्ये शक्यतो तितकेसे एकत्र वापरत नाही. मात्र एक डिझायनर असल्याने मी हे नक्कीच सांगू शकते की हेच तीन रंग त्यांच्या वेगवेगळ्या छटा आणि आकार वापरून एकाच कापडय़ामध्ये वापरले तर निव्वळ ‘तिरंगा’ न दिसता ते कपडे वेगळे, सुंदरही दिसतील यात शंका नाही,’ असं वैशाली आत्मविश्वासाने सांगतात.

फॅशन डिझायनर्सचं असं म्हणणं असलं तरी आपणही राष्ट्रीय दिन वगळता हे तीन रंग एकाच कपडय़ात घालायला काचकूच करतो. ‘झेंडा दिसतेय मी..’ असं म्हणून या रंगांना एकत्र घालणं प्रामुख्याने टाळतो. तिरंग्यातले रंग म्हणून आपल्याला या रंगांविषयी अशी भावना निर्माण होणं साहजिक आहे पण ही भावना या रंगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलून टाकते हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. आजही १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला कोणते कपडे घालायचे हे ठरवताना तीन रंगांच्या कपडय़ांचा पहिले शोध घेतला जातो. किंवा नवीन विकत घेतले जातात कारण दररोजच्या वापरात आपण हे रंग एकत्र घालणं जाणूनबुजून टाळतो. लाल, निळा, काळा, गुलाबी आणि पांढरा असे रंग आवर्जून घेतले जातात मात्र तेच प्रेम हिरवा किंवा भगव्यासाठी तितक्याशा प्रमाणात दिसत नाही. कारण काहीही असो पण तिरंग्यातले हे रंग आपण या दोन दिवसांसाठीच राखून ठेवतो हे सत्य आपण नाकारू शकत नाही. या रंगाचे तिरंग्याव्यतिरिक्त असणारे अर्थ आणि आपली आवड काहीही असो पण आजच्या दिवशी जसे तुम्ही हे तिरंगी कपडे घालून अभिमानाने वावरताय तितक्याच विश्वासाने रोजच्या फॅशनमध्येही या रंगांचे कपडे घालून पाहा!

viva@expressindia.com