ओजस करंदीकर, नीस, फ्रान्स

आयुष्यातला कुठलाही बदल भरपूर अनुभव आणि उत्कंठावर्धक गोष्टींनी भरलेला असतो. असे अनुभव येतात, ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही. माझ्या आयुष्यात बदलांची सुरुवात झाली ती फायनल इयर इंजिनीअरिंगचा निकाल लागला आणि माझं नाव कॉलेजच्या टॉपर्सच्या यादीत आलं तेव्हा. त्या दिवशी आनंद साजरा करायला माझ्या दोन्ही बहिणींच्या (डॉ. रश्मी करंदीकर व दिप्ती दळवी) घरी पेढे द्यायला गेलो. त्या आनंदी वातावरणात मी मनातला विचार त्यांना सांगितला. मास्टर्ससाठी परदेशी जायचं स्वप्न त्यांना सांगितलं. मी आम्हा तिघा भावंडांमध्ये लहान. बहिणी आणि माझ्यामध्ये १५ ते १६ वर्षांचं अंतर. सुदैवाने देवाने दोन्ही मोठय़ा बहिणींच्या रूपाने आईच जणू माझ्यासाठी पाठवली. त्या दिवशी दोघींनी परदेशी शिक्षणासाठी जाण्याच्या स्वप्नाला पाठिंबा दिला आणि खंबीरपणे माझ्यामागे उभ्या राहिल्या.

मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे स्कॉलरशिप मिळाली असती, तरच आंतरराष्ट्रीय स्तरावरचं शिक्षण घेता येणं शक्य होणार होतं. मी विविध युनिव्हर्सिटीची माहिती काढून काही ठिकाणी अर्ज केले. ESSEC  बिझनेस स्कूल आणि गव्हर्नमेंट ऑफ फ्रान्स या दोन्ही ठिकाणी माझे प्रयत्न फळास आले. त्यामुळे युरोपमधल्या दुसऱ्या श्रेणीच्या बिझनेस स्कूलमध्ये स्कॉलरशिपसहित मला प्रवेश मिळाला. पहिली स्कॉलरशिप ESSEC  बिझनेस स्कूलकडून टय़ुशन फी रिडक्शनसाठी मिळाली. दुसऱ्या स्कॉलरशिपअंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ फ्रान्सकडून राहणं आणि जेवणासाठी दर महिन्याचा स्टायपेंड मिळायचा.

त्यानंतर ‘पहिल्यांदाच केले’ अशा कोष्टकात मोडू शकतील, अशा कितीतरी गोष्टींची रांगच जणू लागली. पहिल्यांदाच विमानात बसलो. शेजारच्या अनोळखी व्यक्तींचा हात विमान टेक ऑफ करताना भीती वाटल्याने घट्ट पकडला होता. पहिल्यांदाच घरच्यांपासून दूर जात होतो. आशियातून युरोपला जात असताना माहिती होतं की तिथलं आयुष्य खूप वेगळं असणार आहे. त्याबद्दल मनात खूप काही प्रश्न होते, शंकाकुशंकाही होत्या. तरीही एक एक्साईटमेंटही वाटत होतीच. आजवर स्वप्नातच पाहिलेला आयुष्यातला एक नवा टप्पा प्रत्यक्षात सुरू होतो आहे याची जाणीव होत होती.

पॅरिस विमानतळावरून बाहेर आल्यावर सर्वप्रथम जाणवली ती कडाक्याची थंडी. नंतर हॉस्टेलच्या रूमवर आल्यावर बघतो तर काय, छताला पंखाच नाही. थेट हॉस्टेल व्यवस्थापनाच्या ऑफिसमध्ये गेलो आणि भांडायला लागलो. त्यांना म्हटलं की, ‘आमच्या मुंबईत प्रत्येक घरात पंखा असतोच. मला कृपया पंखा असलेली रूम द्यावी.’ तिथल्या बाईंना माझं बोलणं कळेना. कारण फ्रान्समध्ये असताना फ्रेंचच बोलावं लागतं हा नियम मला तेव्हा माहिती नव्हता. फ्रेंच लोकांचं त्यांच्या भाषेवर अतोनात प्रेम आहे. भारतात आपल्याला सध्याच्या जगात टिकून राहण्याच्या दृष्टीने इंग्रजीचं महत्त्व अधिक वाटतं. पण त्या बाईंना माझा इंग्रजीमध्ये मांडलेला ‘फॅन’चा मुद्दा कळेचना. शेवटी कसंतरी गुगल ट्रान्सलेटरच्या साहाय्याने आणि फोटो दाखवून मी या फॅ नच्या चाचणी परीक्षेत काठावर पास झालो, असं वाटत असतानाच त्या बाईंनीसुद्धा गुगल ट्रान्सलेशनच्या साहाय्यानं लिहिलं की, ‘इथे फॅनची गरज लागणार नाही’. सुरुवातीला सुपरमार्केटमध्ये जाणं म्हणजे जणू एक भलीमोठी बौद्धिक कसरतच असायची. त्यावेळी गुगल ट्रान्सलेटर आणि कॅ ल्क्युलेटर हे मित्र साथीला असायचे.

इथली शिक्षणपद्धती फारच चांगली आहे. आपल्यापेक्षा प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांच्या नात्यात लक्षणीय फरक आहे. हे नातं मनमोकळं आणि मैत्रीपूर्ण आहे. मी बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचं शिक्षण घेतलं आहे. फ्रान्सला येण्यापूर्वी असं वाटायचं की या अनोळखी लोकांच्या समुद्रात जणू मी हरवूनच जाईन. पण तसं काही झालं नाही. इथे वेगवेगळ्या देशांमधले विद्यार्थी शिकायला येतात. त्यामुळे कुणाला वाटू शकतं की त्यांच्यात काही ताणतणाव किंवा भांडणं होत असतील. त्याउलट सगळेजण एकमेकांसोबत मिळूनमिसळून आणि एकोप्याने राहातात. कॉलेजमध्ये वीकएण्डला विद्यार्थ्यांमधला सुसंवाद व मैत्री वाढण्याच्या दृष्टीने काही कार्यक्रम आयोजले जातात. त्यायोगे एकमेकांविषयी आणि एकमेकांच्या संस्कृतीविषयी जाणून घ्यायला मदत होते. शिक्षणानंतर आणखी एक नवा टप्पा आयुष्यात आला, तो म्हणजे मला नोकरी लागली. इथलं वर्ककल्चर वेगळं आहे. पहिल्यांदा कंपनीच्या कॅफेटेरियात वाईन आणि बीअरच्या बाटल्या बघितल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला होता. पण स्थानिकांसाठी ही गोष्ट नेहमीचीच होती. फ्रान्समध्ये उत्पादकता अर्थात प्रॉडक्टिव्हिटीला खूप महत्त्व आहे. तुम्ही ओव्हरटाइम केला म्हणजे तुम्ही हार्डवर्कर आहात असं नव्हे. तर त्याचा अर्थ तुम्ही वेळेत काम संपवू शकत नाही, तुम्ही प्रॉडक्टिव्ह नाही, असा घेतला जातो. वर्क-लाईफ बॅलन्स खऱ्या अर्थाने इथे साधला जातो. लोक वैयक्तिक जीवन आणि त्यासाठीच्या वेळेचं भान ठेवतात.

प्रसिद्ध अमेरिकन लेखक स्कॉट फिट्झगर्ल्ड यांनी फ्रेंच रिव्हिएराला ‘प्लेग्राऊंड विथ फेअरी ब्ल्यू सी अँण्ड माऊंटन्स’ असं म्हटलं आहे. फ्रेंच रिव्हिएरा हा फ्रान्सच्या आग्नेय भागातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एक भौगोलिक प्रदेश आहे. डोळे बंद करून फ्रेंच रिव्हिएराचा विचार केला तर डोळ्यांसमोर येतात पाल्म ट्रीज, सुंदर बीचेस. या बीचवर लोक त्यांची स्किन टॅन करतात. अप्रतिम सूर्यास्ताचा नजारा इथे न्याहाळायला मिळतो. चांगलं हवामान आणि नजर खिळवून टाकणारं निसर्गसौंदर्य, प्राचीन इतिहास अशा अनेकविध कारणांमुळे इकडच्या जीवनशैलीची गुणवत्ता उत्कृष्ट आहे. इथे पर्यटन, विरंगुळा आणि मनोरंजनाच्या अनेक सोयी विकसित केलेल्या आहेत. जगभरातील लोकांना इकडच्या या जीवनशैलीचं आकर्षण वाटतं. पाब्लो पिकासो, हेन्री मॅटिस, एल्टन जॉन, बोनो अशा अनेक कलावंत आणि कलाकार मंडळींचं वास्तव्य इथे होतं. फ्रेंच रिव्हिएरा हा युरोपमधला एकमेव भाग आहे, जिथे वर्षांतले ३०० दिवस सूर्य तळपत असतो. त्यामुळे इकडे आऊटडोअर स्पोर्ट्स खेळण्याला लोकांची पसंती असते. समरमध्ये बीच स्पोर्ट्स, स्विमिंग, बागेत मनसोक्त विहरतात. तर विंटरमध्ये स्नो स्की करतात. स्की करण्याचा प्रयत्न मीसुद्धा या मोसमात केला, पण जोरात पडल्यामुळे कानाला खडा लावून घेतला. दरवर्षी मे महिन्यात इथे कान फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला जातो. हॉलीवूडमधील अनेक कलावंत, दिग्दर्शक, तसंच बॉलीवूडमधले काही कलाकारही इथे आवर्जून हजेरी लावतात. हा महोत्सव बघण्यासाठी जगभरातून रसिक प्रेक्षक येतात. मला स्वत:ला या महोत्सवामुळे ऐश्वर्या राय, सोनम कपूर, इरफान खान यांना जवळून बघण्याची संधी मिळाली.

इथले खाद्यपदार्थ आरोग्यदायी आणि स्वादिष्ट असतात. नीसमध्ये आठवडी बाजारात विविध भागांतले शेतकरी त्यांचं उत्पादन घेऊन येतात. त्यात ऑलिव्ह ऑईल, भाज्या-फळं, चीज, सी फुड इत्यादींचा समावेश असतो. इकडे रस्त्यावरील छोटे स्टॉल्स आणि रेस्तराँपासून ते स्टारडम असणाऱ्या रेस्तराँपर्यंत सगळे पर्याय उपलब्ध आहेत. सोका, रातातुइ, सालाद निसवाझ हे स्थानिक पदार्थ आपल्या जिभेचे चोचले हमखास पुरवतात. फ्रेंच वाईन जगभर प्रसिद्ध असून त्यात फ्रेंच रिव्हिएराचं खूप मोठं योगदान आहे. कारण इकडचं अनुकूल हवामान आणि मातीचा गुणधर्म यांचा या वाईन उद्योगात खूप मोलाटा वाटा आहे. बेस्ट रोझे वाईन ही फ्रेंच रिव्हिएरामध्ये तयार केली जाते. ग्रीक व रोमन काळात वाईन करायचे, त्या काळात सांगितल्या गेलेल्या कृतीनुसार वाईन्स तयार केल्या जातात.

अलीकडेच मी ग्रास आणि इझ या शहरांमध्ये गेलो होतो. ही दोन्ही शहरं जगाला सुगंध बहाल करतात. इथली फर्गोनार्ड परफ्युमरी १८ व्या शतकातली अर्थात जगातील सर्वात जुनी परफ्युमरी आहे. या फॅक्टरीची गाईडेड टूर केली तेव्हा त्यांनी परफ्युम बनवण्याची जुनी पद्धत दाखवली. त्यांच्या मोठय़ा मोठय़ा मशिनरीज दाखवल्या. तो अगदी अविस्मरणीय अनुभव होता. याव्यतिरिक्त इथे मोलिनार्ड आणि गाल्लिमार्ड या प्रसिद्ध ब्रँण्डसच्या परफ्युम फॅक्टरीज आहेत.

मुंबई शहर कधी झोपत नाही म्हणतात. मुंबईकर असल्यामुळे सगळ्या गोष्टी रात्रंदिवस मिळण्याची सोय आणि सवय होती. त्याउलट नीसमध्ये शनिवार-रविवार सगळं बंद असतं. त्यामुळे आवश्यक गोष्टी आधीच घेऊ न ठेवायची सवय लावून घ्यावी लागली. मला मुंबई खूप आवडते. तिथलं गतिमान जीवन, कामाचा ताणतणाव या गोष्टी असल्या तरीही.. याउलट इकडची जीवनशैली संथ आणि साधीसुधी, शांत आणि निवांत असून कामाचा ताणतणाव नसतो. पण आताशा हळूहळू मला इथली जीवनशैली भावू लागली आहे. इथे आणखी काही काळ व्यतीत करायला मला आवडेल काय माहिती, आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर कोणतं नवं वळण येणार आहे, तेही आतापर्यंतच्या वळणांसारखंच अनुभवसमृद्ध करणारं आणि उत्कंठावर्धक असेल, यात शंका नाही. आणि हो, तुमच्या शुभेच्छा हव्या आहेतच पाठीशी. धन्यवाद.

संकलन : राधिका कुंटे

viva@expressindia.com