तेजल चांदगुडे

कोणताही खेळ म्हटलं की, सर्वात महत्त्वाचे असते ते खेळाडूंची खिलाडूवृत्ती, आत्मविश्वास, खेळाची तयारी आणि खेळ जिंकण्याची जिद्द; पण या सगळ्यांच्या जोडीला खेळाडू ऑन फिल्ड त्यांच्या फॅशनकडेही तितकंच लक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे आपसूकच त्यांच्या खेळाबरोबरच त्यांची फॅशनही तितक्याच आवडीने तरुण वर्गात फॉलो होताना दिसते आहे. ‘फिफा’ आणि ‘विम्बल्डन’चा फीवर जोरात असताना खेळजगतातील फॅशन स्टेटमेंट्सचा घेतलेला आढावा..

फॅशन.. ही एक अशी गोष्ट जिच्या सीमा कुठून कुठे जातील आणि कुठे संपतील हे कधीच निश्चित सांगता येत नाही. एखादी गोष्ट चांगली दिसली की मग ती ‘फॅशन ट्रेंड’ म्हणून लगेच ‘इन’ होते आणि मग चहूकडे दिसू लागते. भारत किंवा बाहेरच्या देशातली रॅम्पवरची फॅशन असो, चित्रपटांमधून तरुण पिढीवर संस्कार करणारी फॅशन असो वा टीव्हीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणारी फॅशन असो, असं एकही क्षेत्र नाही जिथे फॅशन केली जात नाही. ‘प्रेझेन्टेबल’ राहणीमानाच्या पलीकडे जाऊ न काही तरी नवीन आणि आकर्षक करायला भाग पाडायला लावणारी फॅशन आता सगळ्यांनाच आवडू लागली आहे.

फॅशन मग ती कोणत्याही प्रकारची असो, लोकांपर्यंत पोहोचण्याचा मुख्य स्रोत म्हणजे मनोरंजन विश्व. ज्याचे पडसाद कॉलेजच्या कट्टय़ांपासून ऑफिसमधल्या क्युबिकल्सपर्यंत सगळीकडे उमटलेले पाहायला मिळतात. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या काही खेळाडूंनीदेखील  खेळासोबतच ‘स्टाइल आणि फॅशन’च्या बाबतीत आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. फुटबॉल असो, क्रिकेट असो वा टेनिस किंवा मग आणखी कोणताही खेळ, त्यातल्या खेळाडूंच्या वैयक्तिक स्टाइल आणि फॅशनमुळे त्या खेळाची पसंती वाढीस लागायला मदत होताना दिसते आहे. मुळात हल्लीचा जमाना ग्लॅमरचा असल्याने देशासाठी खेळता खेळता खेळाडू या गोष्टींना आत्मसात करताना दिसत आहेत आणि त्यांच्या या फॅशनचा अर्थातच तरुणाईवर प्रभाव पडतो आहे. एकंदरीतच काय, तर खेळाडूंची फॅशन आता अधिकाधिक लोकप्रिय होते आहे आणि तितक्याच आवडीने त्याचे अनुकरणही होताना दिसते आहे.

सध्या सगळीकडेच फुटबॉल फीव्हर असल्याने ज्यांच्या फॅशनचं अनुकरण होताना दिसतं अशा खेळाडूंमध्ये ओघाने येणारी नावं म्हणजे क्रिस्टीआनो रोनाल्डो, डेव्हिड बेकहम, रोनाल्डो त्यांच्या विविधढंगी हेअर स्टाइल्समुळे नेहमीच चर्चेत राहिले आहते आणि विशेष म्हणजे त्याची हेअर स्टाइल बदलली की, त्यांच्या चाहत्यांची हेअरस्टाइलसुद्धा काही प्रमाणात बदलताना दिसते. एव्हरग्रीन डेव्हिड बेकहॅमदेखील (पान २ वर) (पान १ वरून) त्याच्या कपडय़ांच्या स्टाइलमुळे सतत तरुणाईला भुरळ घालताना दिसतो. हेअरस्टाइलप्रमाणेच फुटबॉलर्ससाठी त्यांचे शूज हा जिव्हाळ्याचा विषय असतो, त्यामुळे आवडत्या फुटबॉल टीमची शूजची स्टाइल किंवा रंग बदलला, की मग तरुणाई आपसूकच आपले शूज आणि त्याची स्टाइल बदलण्याच्या मागे लागते. बाजारातील निऑन रंगाचे शूज हादेखील याच फॅशन स्टेटमेंटचा परिणाम आहे.

फुटबॉलचं प्रस्थ भारतात तितकंसं नसलं तरी बायचुंग भूतियाने तो खेळत असतानाच्या काळात भारतातील तरुण पिढीला आणि विशेष करून फुटबॉलप्रेमींना त्याच्या ‘स्पाइक’ करण्याच्या स्टाइलने बरंच प्रभावित केलं होतं. आता ती हेअरस्टाइल तितकीशी प्रकाशझोतात नसली तरी सगळीकडे तीच हेअरस्टाइल दिसण्याचा एक काळ होऊ न गेला.

भारतात क्रिकेटचं वेड आणि त्यामुळे साहजिकच क्रिकेटर्सची फॅशन आणि ते आपसूक आत्मसात करणाऱ्या तरुणाईचं एक घट्ट नातं आहे. उमेदीच्या काळात सचिन तेंडुलकर खेळायला येताना त्याच्या गळ्यात एका विशिष्ट डिझाईनची साखळी (चेन) असायची जी पुढे जाऊन ‘तेंडुलकर चेन’ म्हणून प्रसिद्ध झाली आणि रस्त्यावरून अगदी तशीच किंवा मग अगदी ज्वेलर्सकडे जाऊन तशीच चेन बनवून घेणाऱ्यांची संख्या वाढीस लागली होती. तेंडुलकर चेनसोबतच सचिनच्या फ्रेंच दाढीचंही त्या काळात मोठय़ा प्रमाणात अनुकरण केलं गेलं होतं. अलीकडच्या काळातसुद्धा क्रिकेटखेळाडूंच्या हेअरस्टाइल्सचं आणि साधारण दाढी, मिशी ठेवण्याच्या पद्धतीचं मोठय़ा प्रमाणात अनुकरण होतंच..

विराट कोहली तर याबाबतीत सगळ्यांचाच लाडका आहे. त्याचे टॅटू बघून अनेकांनी त्यांच्या शरीरावर टॅटू करून घेतले आहेत. कॅप्टन कूल धोनीने तर क्रिकेटविश्वात प्रवेश केल्यापासून अनेक हेअरस्टाइल्स करून तरुणाईला प्रेरित केलं आहे. त्याने क्रिकेट ग्राऊंडवर बांधलेली ‘पोनी टेल’ आजही फॅशनमध्ये आहे. अर्थात मुलांनी असे केस बांधणं नवीन नसलं तरी महेंद्रसिंगने हीच हेअरस्टाइल म्हणून ठेवल्यावर या स्टाइलचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला. ‘बाजीराव मस्तानी’मधील रणवीरची मिशा ठेवण्याची पद्धत किंवा फरहान अख्तराच्या ‘मर्द’ मोहिमेचा परिणाम म्हणून ‘मिशा’ म्हणजे पुरुषत्व असा साधारण संबंध लावत शिखर धवनला मोठय़ा प्रमाणात फॉलो केलं जातं. कॉलेजला जाणाऱ्या मुलांमध्ये या गोष्टीचं विशेष आकर्षण दिसून येतं आहे. केशरचना आणि त्याचे प्रकार या सगळ्यात हार्दिक पंडय़ाचं फॅन फॉलोइंग वाढताना दिसत आहे. रंगीबेरंगी केस करून त्यांच्यावर विविध प्रयोग करणं यासाठी हार्दिकच्या स्टाइल्सना पसंती मिळते आहे.

फुटबॉल, क्रिकेटप्रमाणेच टेनिसजगतात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलेला रॉजर फेडरर टेनिसमधल्या उत्कृष्ट कामगिरीइतकाच त्याच्या हेअरस्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. मुलींच्या बॉबकटपेक्षा थोडेसे मोठे पण तरीही खेळताना त्रास होणार नाही इतपत मोठे केस ही रॉजरची खासियत. खेळ करत असताना हेडबँडवरून सतत उडत राहणाऱ्या केसांची त्याची स्टाइल अनेकांच्या पसंतीस पडली. खेळाडूंच्या अ‍ॅक्सेसरीज म्हणजे त्यांच्या हातातला एखादा बँड किंवा ब्रेसलेट यांच्यावरही फॅशनप्रेमींचं खास लक्ष असतं.

फुटबॉल, क्रिकेट किंवा टेनिस हे खेळ जगाच्या पाठीवर मोठय़ा प्रमाणात पाहिले जात असले तरीही या खेळांसोबतच बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, स्विमिंग, बॅडमिंटन अशा अनेक खेळांतील खेळाडूंना त्यांच्या फॅशनमुळे पसंत करणाऱ्या नि त्यांच्या फॅशनचं अनुकरण करणाऱ्या तरुण पिढीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. खरं तर देशासाठी खेळताना या सगळ्या गोष्टींमुळे या खेळांना एक वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर मिळतंय ज्यामुळे खेळांची लोकप्रियता वाढायला मदत होते आहे. फॅशनमुळे खेळाचं महत्त्व कमी झालंय असं अजिबात नाही. मात्र खेळाडूंना केवळ त्यांच्या खेळामुळे पसंती न मिळता त्यांच्या फॅशन आणि बाह्य़रूपामुळेही एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

खरं तर आजच्या काळात कोणत्याच क्षेत्रात पुरुष किंवा स्त्रिया असा भेद करणं योग्य ठरणार नाही. मात्र फॅशन आणि स्त्रिया यांचं अतूट नातं असूनही मुली तितक्याशा प्रमाणात महिला खेळाडूंचं त्यांच्या फॅशनच्या बाबतीत अनुकरण करताना दिसत नाहीत. सानिया मिर्झाने टेनिस खेळायला सुरुवात केली तेव्हा तिच्या उत्तम खेळासोबतच तिच्या ‘नोज रिंग’ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सानियाच्या या स्टाइल स्टेटमेंटला मुलींनी बराच प्रतिसाद दिला आणि मग या नोज रिंगचे अनेक प्रकार बाजारात दिसू लागले. सानिया वगळता दुसऱ्या कोणत्याही महिला खेळाडूकडून ‘फॅशन’च्या बाबतीत तितकेसे प्रयोग होताना दिसले नाहीत. त्यामुळे भारतीय महिला खेळाडूंच्या फॅशनचं अनुकरण होण्याबाबत उदासीनता दिसून येते.

पाश्चिमात्य देशांमध्येदेखील साधारण हेच चित्र पाहायला मिळत असलं तरी हेअरस्टाइल्सचं थोडय़ाफार प्रमाणात अनुकरण होताना दिसून येतं. जगभरातील कृष्णवर्णीय लोकांची खासियत म्हणजे त्यांचे कुरळे केस आणि त्यामुळे या खेळाडूंच्या केशरचना विविधढंगी आणि अतिरंजक असतात. सबंध केसांच्या वेण्या, डोक्यावरील बाजूचे केस अगदी बारीक करून कोंबडय़ासारखं तुऱ्याचा केवळ एक पट्टा ठेवणं असे बरेच प्रकार केले जातात ज्यांचे पडसाद जनमानसात उमटताना दिसतात. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर घाना देशाकडून खेळणारा सॉकर खेळाडू जॉन बॉये. मुळात हे त्यांच्यासाठी फॅशन ट्रेंड नसले तरी भारतासारख्या ठिकाणी कुरळे केस असणारी तरुणाई या केशरचनेला फॉलो करताना दिसते.

खरं तर हेअरस्टाइल, अ‍ॅक्सेसरीज या गोष्टी बाह्य़रूप खुलवण्यासाठी उपयोगी ठरतात आणि खेळाडूदेखील त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे फॅशन करत असतात. इंटरनेटमुळे जग छोटं होत चाललं असल्याने हे फॅशन स्टेटमेंट अगदी चटकन दूरवर पसरत आहेत आणि त्याचं अनुकरण तरुणाई करते आहे. मुळात मुद्दा खेळाडूंच्या फॅशनचं अनुकरण हा असला तरी प्रत्येक जण त्या फॅशनला स्वत:चा एक पर्सनल टच देत त्या फॅशनला खुलवतो आहे. एकंदरीतच काय, खेळ, देशप्रेम, खिलाडूवृत्ती आणि करमणूक यासोबतच आता तरुणाईला ‘ऑन फिल्ड’ वावरणाऱ्या या खेळाडूंकडून फॅशनचे धडे शिकायला मिळतायेत.