तेजश्री गायकवाड 

मोठमोठे फॅशन डिझायनर, फॅशन ब्रॅण्ड आणि सरकारचा ‘मेक इन इंडिया’ आग्रह यांच्यामुळे ‘खादी इज न्यू फॅशन’ झाली आहे.

‘खादी फॉर नेशन’, ‘खादी फॉर फॅशन’, ‘खादी फॉर न्यू जनरेशन’, ‘खादी इज न्यू फॅशन’ असे एक ना अनेक हॅशटॅग सोशल मीडियावरती ट्रेंडिंग आहेत. महात्मा गांधींच्या अफाट प्रयत्नांमुळे खादी कपडाबद्दल भारतात जनजागृती झाली. पण मध्ये अनेक वर्ष खादी आणि त्यापासून बनवलेले प्रॉडक्ट्स बाजारात दिसतही नव्हते. गेल्या दोन वर्षांत मात्र ही परिस्थिती बदललेली दिसते आहे. खादी म्हटलं की त्याग, ब्रिटिशांविरुद्धच्या लढय़ात वापरलेलं शस्त्र, राजकारणी मंडळी किंवा अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींच्या अंगावरचे कोट एवढंच डोळ्यासमोर येत होतं. पण आता मोठमोठे फॅशन डिझायनर, फॅ शन ब्रॅण्ड आणि सरकारचा ‘मेक इन इंडिया’ आग्रह यांच्यामुळे ‘खादी इज न्यू फॅशन’ झाली आहे.

खादीचे काहीएक कपडे घायचे म्हटले तरी कुर्ता, शर्ट कधी तरी बॅग याशिवाय अजून काही विकत घायचा विचारही येत नाही. पण यालाच फाटा देत अनेक तरुण फॅशन  डिझायनर, फॅशन ब्रॅण्ड त्यांच्या कलेक्शनमध्ये खादी वापरताना दिसत आहेत. याच बदलाबाबत आणि यंदा कोणती खादी फॅशन ट्रेंडमध्ये असणार आहे हे जाणून घेण्यासाठी ‘व्हिवा’ने थेट सध्या फॅ शन विश्वात कार्यरत असणाऱ्या नामांकितफॅशन डिझायनर्सनाच बोलत केलं. नेहमीच भारतीय कापडाचा वापर करीत साधे पण मॉडर्न डिझाईन करणारा तरुण फॅशन डिझायनर नूशद अली सांगतो, ‘खादी हे भारताचं ओरिजिनल कापड आहे, त्यामुळे अनेक फॅब्रिक आले आणि गेलेही, पण खादी अजूनही आहे. खादीमध्ये कापडाच्या दृष्टीने काही नवीन इनोवेशन व्हावेत असं मला मुळीच वाटत नाही. ओरिजिनल खादीच बेस्ट आहे. खादी कधीच आऊट ऑफ फॅशन जाईल असं मला वाटत नाही. खादी हे मुळातच खूप कम्फर्ट देणारं कापड आहे, त्यामुळे यापासून अनेक डिझायनर इंडोवेस्टर्न, वेगवेगळे कट्स देऊन कपडे डिझाईन करीत आहेत.’ भारतीय कापड आणि वेस्टर्न सिल्हाऊट्सचा वापर करून कन्टेम्पररी कलेक्शन बनवणाऱ्या तरुण फॅ शनडिझायनर सुनीता शंकरच्या मते खादी हे भारताचं स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचं प्रतीक आहे. माझ्या मते खादी कापड म्हणजे फ्रीडम, अस्सल देशी ओळख. असमान टेक्स्चर, सस्टेनेबल तरीही दिसायला रॉयल असं आहे आणि म्हणूनच खादी हे बाकीच्या कापडांपासून वेगळं ठरतं, असं ती म्हणते. सुरुवातीच्या काळात फक्त चरख्यावर तयार होणारं खादी कापड आता सोलर पॉवर चरख्यावरती तयार होऊ  लागलं आहे. त्यामुळे खादी हे फॅशन फॅब्रिक म्हणून ट्रेंडमध्ये येतं आहे. खरं तर खादी हे सुरुवातीपासूनच फॅ शन फॅब्रिक होतं, पण सध्या सोशल मीडिया, डिझायनर आणि वेगवेगळ्या संस्थांमुळे याबद्दल जनजागृती वाढली आहे. शिवाय आताचे फॅशन डिझायनर खादीकडे वळण्याचं म्हत्त्वाचं कारण म्हणजे हातमागावरचे कापड, इकोफ्रेंडली कापड, सस्टेनेबल कापड असे अनेक गुण एकाच कापडात असणं हे म्हणता येईल. हळूहळू सगळ्याच गोष्टी इकोफ्रेंडली होण्याच्या मार्गावर असताना फॅ शनविश्व तरी त्यापासून दूर कसं राहील, असं सुनीता म्हणते. खादी हे फॅशनेबल कापड आहे हे ठामपणे मानणारी सुनीता खादीचे ब्लेझर, पँट, लाँग जॅकेट्स, डिझायनर शर्ट, कुर्ते, शेरवानी, क्लासिक जॅकेट्स, प्रिंटेड शर्ट, स्कार्फ ,बंदगला जॅकेट्स, फिट बंडी हे मुलांसाठी, तर मुलींसाठी इंडोवेस्टर्न वनपीस, शर्ट ड्रेस, खादी पलाझो, खादी ब्लाऊज असं खादीचं कलेक्शनच ट्रेंडमध्ये असल्याचं स्पष्ट करते.

लंडनमध्ये राहणाऱ्या पण मूळ भारतीय असणाऱ्या लार्स अँडरसन या फॅशन डिझायनरने नुकत्याच पार पडलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग समितीशी हातमिळवणी करीत ‘अ खादी मटका लव्ह स्टोरी’ नावाचं कलेक्शन सादर केलं. ‘कारागिरांनी हाताने कताई के लेली खादी म्हणजे पूर्ण आयुष्य असलेलं कापड,’ असं तो म्हणतो. खरं तर मी खादीला कधीही फॅशन फॅब्रिक म्हणणार नाही, असं स्पष्ट मत लार्सने व्यक्त केलं. त्याच्या मते सध्या फॅ शन डिझायनर्स सातत्याने खादीचा डिझायनिंगसाठी वापर करीत असल्यानेच खादीला फॅशन फॅब्रिक म्हणून ओळख मिळते आहे, पण ही खादीची मूळ ओळख नाही, असं त्याला वाटतं. भारत सरकार, डिझायनर यांच्यामुळे खादीविषयी झालेली जनजागृती आणि इकोफ्रेंडली गोष्टी वापरण्याचा आग्रह, गरज यामुळे आजचा ग्राहक खादीकडे वळला आहे हे खरं आहे, पण तुम्ही एकदा खादी वापरायला सुरुवात केली की तुम्ही त्याच्या प्रेमातच पडता. त्यामुळेच अनेक ग्राहक एकदा खादीपासून बनवलेल्या गोष्टी वापरल्या की पुन्हा त्याकडेच वळतात. याच कारणाने खादीपासून बनवलेले इंडियन एथनिक कपडे या फेस्टिव्ह सीझनमध्येही ट्रेंडमध्ये आहेत आणि पुढेही असतील, असा विश्वास लार्स अँडरसनने व्यक्त केला.

अशा प्रकारे मोठमोठे डिझायनर्स, ब्रँड्सकडून खादी नवीन रूपात लोकांसमोर आल्यामुळे आपसूकच ग्राहक खादीकडे वळू लागले आहेत. खादी वापरणाऱ्यांचे प्रमाण हे सतत वाढतेच राहणार आहे. त्यामुळे खादी विणणाऱ्या कामगारांनाही फायदा होईल. सोबतच खादी हे एक इकोफ्रेंडली, सस्टेनेबल कापड असल्याने त्याच्या वापरामुळे पर्यावरणावरही काही वाईट परिणाम होणार नाही. या सगळ्या गोष्टींमुळे खादीने पुन्हा बाजारात योग्य वेळी, योग्य पद्धतीने पाऊ ल टाकलं आहे हे खरं.. आता पुन्हा एकदा खादीला आपलंसं करायला हवं!