19 October 2018

News Flash

‘जग’ते रहो : स्वावलंबी रुसी!

मॉस्कोला मुंबई मानलं तर मध्ये असलेल्या अंतरामुळे त्वेरमध्ये येता येता पुण्याचा फील येऊन जातो.

निरंजन नेने त्वेर, रशिया

लोकल ते ग्लोबल ही उक्ती सध्या सहजगत्या बोलली जाते आहे. आपल्याकडील तरुणाई शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने विदेशात राहते आहे. या तरुणाईच्या दृष्टिकोनातून तो तो देश, त्यांचा भोवताल, तिथली संस्कृती, साहित्य-कला, आहार-विहार, शिक्षण-करिअर आणि तिथल्या तरुणाईचा सामाजिक-राजकीय सहभाग आदी अनेक मुद्दय़ांचं प्रतिबिंब ठरणारं हे सदर.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि देशाचे तरुणाईत. ज्याप्रमाणे पर्यावरणाच्या स्वास्थ्यासाठी वनराई जरुरी असते, तसेच देशाच्या स्वास्थ्यासाठी तरुणाई. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियातील तरुणाई डबघाईला गेलेली. प्रत्येक स्त्रीमागील पुरुषी संख्या रसातळाला गेलेली. दुसऱ्या महायुद्धामुळे रशियातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती हादरलेली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोक प्रयत्न करत होते. पण तारुण्याची ऊर्जा कमी पडत होती. हळूहळू परिस्थिती बदलली. आत्ताच्या या नव्या जोमाच्या तरुणाईवर एक नजर टाकून बघू!

मी राहतो त्या शहराचं नाव त्वेर. मॉस्कोपासून साधारण १८० किमी अंतरावर, वोल्गा नदीच्या काठी वसलेलं छोटंसं आणि शांत शहर. दुसरं महायुद्ध डोळ्यांनी पाहिलेलं आणि युद्धाचे विपरीत परिणाम भोगणारं असं एक शहर. मुळात लहान असलेलं शहर, पण शिस्तबद्ध रचनेमुळे आल्हाददायक वाटणारं. नागरी सुविधा, शिक्षण, कला, खेळ यांबाबतीत विकसित असं हे शहर. मॉस्कोला मुंबई मानलं तर मध्ये असलेल्या अंतरामुळे त्वेरमध्ये येता येता पुण्याचा फील येऊन जातो.

कुठल्याही देशाची प्रगती होते, तिकडच्या साक्षर नागरिकांमुळे. सरकारी शाळा गल्लोगल्ली असल्यामुळे येथील तरुणांना मोफत आणि इतर खर्च पकडून बऱ्यापैकी कमी खर्चात शालेय शिक्षण पूर्ण करता येतं. वयाच्या अठराव्या वर्षांच्या आसपास येथील मुलांना एक वर्षांचा लष्करी उपक्रम पूर्ण करावा लागतो. हा उपक्रम अनिवार्य नसला तरीही राष्ट्रप्रेमापोटी बहुतांश लोक तो पूर्ण करतात. नैसर्गिक गोरा रंग, काळे, निळे किंवा घारे डोळे, ब्लॉन्ड किंवा काळे केस, हेवा वाटावा अशी उंची या सगळ्यांमुळे इथली तरुणाई वयाच्या मानाने जास्त परिपक्व भासते. शाळेत असल्यापासून फुटबॉल, बास्के टबॉल, टेबल टेनिस, बर्फावरील खेळ (आइस हॉकी, स्केटिंग), बॉक्सिंगसारखे खेळ खेळत हे लहानाचे मोठे होतात. प्रत्येकजण स्वत:च्या स्वास्थ्याबद्दल जागरूक आहे. व्यायामशाळेत नियमित जाणे, योग्य आहार खाणे, चालणे यांसारख्या गोष्टी इथल्या तरुणाईला खऱ्या अर्थाने सक्षम बनवतात.

महाराष्ट्रात राज ठाकरे मराठी भाषा आलीच पाहिजे, या विचाराचे पुरस्कर्ता आहेत, तसेच इथे रशियन अध्यक्ष व्लादिमिर व्लादिमीरोविच पुतिन. सगळ्यांचं शिक्षण रशियन भाषेत झालेलं असलं तरीही येथील बऱ्याच तरुणांना इंग्रजी भाषेची ओढ आहे. बहुभाषिक असणं ही इथे गरज नसून सवय आहे. जर्मन, स्पॅनिश, स्वीडिश, इंग्रजी, चिनी काही अंशी हिंदी भाषा येणारी तरुण पिढी इथे मोठय़ा तसेच छोटय़ा शहरांमध्येही आढळते.

अमेरिकन चालीरीतींचा त्यांच्यावर पगडा दिसत असला तरीही, आपल्या जुन्या शत्रूंना ही पिढी पूर्णत: विसरलेली नाही. त्यामुळे हॅलोविनसारखे दिवस साजरा करणारा तरुणवर्ग, देशाचा विजयी दिवस साजरा करताना जास्त भावुक होतो. आपल्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानाची त्यांना जाण आहे. मॉस्कोसारख्या मोठय़ा शहरातून फिरताना कात्युशाचं गाणं (प्रसिद्ध रशियन युद्धगीत) गायला या तरुणांना अभिमान वाटतो तो याच देशप्रेमापोटी.

आपल्याकडे नाक्यानाक्यावर तरुणवर्ग आपलं तारुण्य चैतन्यकांडी ओढून, ओवाळून टाकत असलेला दिसतो, तसाच तो इथंही आहे. पण त्यांच्याकडे ‘आमच्याकडे ना मरणाचा हिवाळा असतो’, हे वाक्य कमरेला लटकवलेलं असतं. ‘पान’ नावाचं प्रकरण नाक्याच्या गादीवर मिळत नसल्यामुळे, शहरं रंगवलेली दिसत नाहीत. त्याऐवजी इथली तरुण-तरुणी स्प्रे पेंटिंगने भिंती रंगवतात. ‘चलो मॉस्को’ वगैरेचे संदेश न लिहिता, एखादा आधुनिक कलेचा नमुना किंवा निसर्ग, सामाजिक संदेश असे प्रकार भिंतीवर दिसतात. कधी कधी प्रेमही व्यक्त करतात भिंतीवर. प्रेम व्यक्त करण्यात आपल्यापेक्षा जास्त प्रगत आणि लाज बाजूला ठेवलेले, असं म्हणायला हरकत नाही. रस्त्यात, मेट्रोमध्ये, बसमध्ये कुठेही हे प्रेम व्यक्त होतं आणि बाजूचे लोक त्यात काडीचाही रस घेत नाहीत हे विशेष. बदलापूर-कर्जतला राहणारा माणूस सरासरी दिवसाला जेवढे डास मारतो, त्या सरासरीला लाजवेल इतक्या वेळा तर ते गालगुच्चे घेतात. मुलींची संख्या अजूनही मुलांपेक्षा जास्त आहे.

स्वावलंबीपणा हा गुण या तरुणांकडून शिकण्यासारखा आहे. वयाच्या १६-१७व्या वर्षांपासून हे मिळेल ते काम करतात. शिक्षण चालू असतंच, पण त्याबरोबर फास्ट फूडच्या दुकानात किंवा इकडच्या अपना बाजारमध्ये (सुपरमार्केट) काम कर, अनुवादक म्हणून पर्यटकांबरोबर फीर, टॅक्सी चालव असे बरेच उद्योग इकडची तरुणाई करते, लोक काय म्हणतील? म्हणून घरी बसत नाही. डीटी, पब, हुक्काह पार्लर, विविध मनोरंजक खेळाची ठिकाणं (पेंट बॉल, बोलिंग) या जागी काम करणारा नोकरवर्ग हा पॉकेटमनीसाठी काम करणारा तरुणच आहे. तरुणाई म्हटली की वेग हा ओघाने आलाच. त्याला नत्थूही (रशियन लोकांना या नावानं संबोधलं जातं) अपवाद नाहीत. गाडय़ा सुसाट चालव, ड्रिफ्ट मार, स्पर्धा लाव यासारखे खेळ चालू असतात. हिवाळा कडक असल्यामुळे मोटरबाइक्स फक्त उन्हाळ्यात मिरवल्या जातात. गाडय़ांचा शौक असला तरीही प्रवास सुखद आणि जलद होण्यासाठी तरुणवर्ग मोठय़ा प्रमाणात मेट्रोचा वापर करतो.

रशियन युथनं त्यांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपला आहे. वास्तुसंग्रहालये, किल्ले यांची टूर घडवणारे वाटाडे हे बऱ्याचदा तरुण असतात, त्यातही तरुण मुलींची संख्या अधिक आहे. रशियन पारंपरिक नृत्यप्रकार प्रत्येकाला अवगत असतो. ऑपेरा आणि थिएटर हे दोन विकसित कलाप्रकार आहेत. सिनेमाही आहे पण, तेवढा प्रसिद्ध नाही. तरुणवर्ग अनुवादित केलेले हॉलीवूड आणि बॉलीवूडचे चित्रपट आवडीनं बघतो. रशियन तरुण रस्त्यावर कुठलीही लाज न बाळगता प्रेम व्यक्त करू शकतो म्हणूनच कदाचित, त्याला ऐतिहासिक वास्तूंवर प्रेम व्यक्त करण्याची गरज भासत नाही. कचरा, कचरापेटीतच टाकणारा तरुण, बस पकडायची असेल तर मात्र सिगरेट खाली फेकून ती विझवायचीही तसदी घेत नाही.

इकडचा तरुणवर्ग मांसाहार करणारा असला तरीही भाज्यांचे लाड करतच नाही, असं काही नाही. आहार हा कमी तिखट असतो आणि संध्याकाळी सातनंतर शक्यतो हलका आहार घेतो. रशियन आहार आवडत असला तरीही, मोठय़ा मनानं भारतीय, स्पॅनिश आहारही तेवढाच आपला समजून खातो. भारतीय मसाल्यांबद्दल खास आकर्षण. बटर चिकन, मासे, चहा, गाजर हलवा, मसाले हे आवडते भारतीय पदार्थ आहेत. गोवा ही त्यांची भारतातली आवडती जागा आहे. तर साडी, उदबत्ती या आवडत्या भारतीय गोष्टी आहेत. आहार हा कमी तिखट असल्यामुळे की काय, बोलायला खूप सौम्य आणि ऐकायला खूप गोड अशी त्यांची वाणी आहे. भारतीयांबद्दल जाणून घ्यायची त्यांची विजिगीषू वृत्तीच आपल्याला बरेच रशियन मित्र आणि जरा जास्त मैत्रिणी देऊन जाते. (मुलींचे प्रमाण जास्त असल्यामुळे..). ‘सातच्या आत घरात’, ‘शुभंकरोती’सारखी काही बंधनं नसली तरीही सगळेच काही नास्तिक नाहीत. देवळाच्या बाहेरून देवाला नमस्कार करणारे जसे आपल्याकडे असतात तसेच रशियात चर्चच्या बाहेरून क्रॉस करणारेही महभाग आहेत. मुलगी वयात आली की, रशियन पारंपरिक पदार्थ ‘ब्लिनी’ हा प्रत्येक मुलीला येतोच. उकडलेले जिन्नस आहारात खूप असतात आणि पाणी जरी पीत असले तरीही शरीरात रक्त कमी आणि बिअर जास्त, अशी परिस्थिती.

स्वातंत्र्य नसानसांत भिनलेली ही तरुणाई, पंख फुटताच घरटय़ातून उडून जाते. फार कमी तरुण इथे पालकांबरोबर राहतात. अगदी एक बिल्डिंग सोडून का होईना, पण स्वत:चा, बायकोविना तर बायकोविना वेगळा संसार थाटतात. पालकांचा त्यांना विसर नसतो पडलेला, पण त्यांची साथ आपल्याला कमकुवत करेल, प्रगती खुंटेल म्हणून ते वेगळं राहणं पसंत करतात. मेडिकल विम्याच्याबाबतीत जागृत असलेली ही तरुणाई, मेडिकलमध्ये जाऊन कुठलीच गोष्ट मागण्यास घाबरत नाही. रंगांची आवड असणारी ही तरुणाई, फॅशनच्या बाबतीत खूप अप टू डेट आहे. हिवाळ्यात पूर्ण अंग झाकणारी ही पोरंपोरी उन्हाळ्यात आपल्याला वरदान म्हणून मिळालेल्या आणि मेहनतीनं कमावलेल्या शरीराची झलक दाखवताना, हाती काहीच राखून धरत नाहीत.

वर्षांतील पाच महिने आजूबाजूला असलेल्या बर्फामुळे आयुष्यात आलेला शुष्कपणा कमी करण्यासाठी ते उन्हाळ्यात खूप धमाल करतात. तलावात पोहायला जा, फुलबाग फुलव, बारबेक्यूला जा, समुद्रकिनारी टॅन होत बस, असे बरेच उद्योग ते करत असतात. स्वावलंबन आणि आरोग्याबद्दल जागरूकता या त्यांच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

(वरील वर्णनाला खोटे पाडणारे नमुनेही भेटतील, पण त्या अपवादांमुळेच वरील माहिती चिरतरुण राहील).

viva@expressindia.com

First Published on January 5, 2018 1:16 am

Web Title: russian city from youth point of view