19 September 2020

News Flash

Watchलेले काही : मैफलीतला दु:खोत्सव!

मागच्या पिढीतील संगीताभिमानी दर्दीनीही या नजरेतून गाण्यांकडे पाहावे.

गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण.

तुमच्या घरात सणसोहळा असला, शुभकार्य असले आणि कुणी रडगाणी गायली, तर तुम्ही कसे व्यक्त व्हाल? रडगायकाला गप्प कराल किंवा घरातून पिटाळून लावाल. काळ बदलतो, पिढय़ा बदलतात आणि त्यानुसार जगण्याची मूल्येही बदलतात. हिंदूी सिनेमा किंवा भारतीय सिनेमा मात्र हे मान्य करायला तयार नाही. मानवाच्या मूलभूत गरजा या शतको-हजारो वर्षे बदललेल्या नाहीत; पण त्याच्या मेंदूची उत्क्रांती त्याच्या प्रगतीस कारणीभूत ठरली आहे. भारतीय व्यावसायिक चित्रपटांनी कायम त्याच्या प्रेक्षकांना वास्तव जगाच्या कल्पनेपासून दूर दूर नेत बेअक्कलीच्या पठारावर नेऊन ठेवले.

अवगुणवैशिष्टय़े अनेक काढता येतील, पण मैफलीत दु:खद गाणी आळवणाऱ्या भारतीय चित्रपट नायकांची पिढीगणिक साचलेपण दाखविणारी अवस्था गमतीशीर वाटेल. हे आधीच स्पष्ट करावे लागेल की, यात आपल्या चित्रपटांविषयी उगाच द्वेष्टेपण नाही, हेटाळणी नाही, सदसद्विवेकबुद्धीचा आव नाही; पण एका वास्तवादी विचारपिढीचा प्रतिनिधी या साऱ्याकडे कसे पाहतो, याची माहिती आहे. एका पिढीला प्रेमदु:ख आवळण्यासाठी या गीतांचा आधार घ्यावा लागत होता हेच आजच्या पिढीला गमतीशीर वाटू शकते. यातील अनेक प्रॅक्टिकल मुद्दय़ांचा विचार करून या व्हिडीओजचे आकलन करणे आवश्यक आहे. मागच्या पिढीतील संगीताभिमानी दर्दीनीही या नजरेतून गाण्यांकडे पाहावे.

परिस्थिती नायिकेच्या लग्नाची वा लग्न ठरलेल्या व्यक्तीशी बागडण्याची. मैफलीत वा पार्टीत नायिका त्या व्यक्तीसोबत चार शब्द बोलत असताना नायकही तेथे उदासोत्तम चेहऱ्यानी दाखल होणार. आता त्या मैफलीमध्ये पाच-पन्नास माणसं दाखल झालेली असणार, तर त्यांनी काय ऐकावं? नायकाचं रडगाणं?

नायकाच्या जवळ पियानो असला, तर त्याच्यात ‘बिथोविन’च संचारणार आणि शेजारी गिटार असली तर ‘संताना’चे आजोबा असल्याच्या थाटात कशाही तारा खाजवून अचूक सूरपट्टी खेचण्याची कला नायक साधणार.

पहिले गाणे मनोजकुमार यांनी त्यांच्या ‘पत्थर के सनम’ (१९६७) या चित्रपटातले आहे. यात त्यांनी वाद्यमेळाचा गिनेस बुकाच्या हातून दुर्लक्षित राहिलेला विक्रम केला आहे. गाण्यात पियानोच्या एकाही ‘की’कडे न पाहता निव्वळ हातांचा व्यायाम करीत अचूक कॉर्ड आणि नोटेशन यांचा संगम साधला आहे. इतकेच नव्हे तर पियानोमधून व्हायोलिन वाद्यवृंदाचा आणि तबल्याच्या ठेक्याचाही आवाज काढला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, शब्दांतील जहरी बाणांनी नायिका हतबल आणि श्रोतेगण ‘हे सॅड साँग का बरे?’ असा प्रश्न विचारायचे सोडून तल्लीनतेने मान डोलावताना दिसतात.

या चित्रपटाच्या दुसऱ्या वर्षी ‘ब्रह्मचारी’(१९६८) नावाच्या सिनेमात शम्मी कपूर ब्रह्मचारी कोणत्याही हावभावातून वाटत नाहीत. ‘दिल के झरोके में तुझको बिठाकर’ या गाण्यातील त्यांची पियानोला टाइपरायटरसारखे बडविण्याची हुकमत निव्वळ अनुभवण्यासारखी. हे गाणे संपल्यानंतर त्यांचा ब्रह्मचारी होण्याचा पवित्रा मात्र लक्षात येतो. आजूबाजूला नर्तक-नृत्यांगनांचा ताफाही या गाण्यावर अचूक थिरकतात. नायिका इमोशनली नायकाकडूनच पीडित होते. चित्रपटाच्या प्रेक्षकांना पुढे सुखान्त माहिती असल्याने हे चित्रपटातील (मुंबई-पुणे प्रवासातल्या घाटाप्रमाणे) अत्यावश्यक वळण असते. संजीवकुमार यांनी अशा मैफलीतल्या सॅड साँगची मालिकाच दिली आहे. अनामिका (१९७३) या चित्रपटातील ‘मेरी भिगीभिगीसी’ या गाण्याचे निरूपण फक्त नायिकेलाच कळते. इतर सारा श्रोतृवर्ग ते हॅपी साँग असल्यासारखाच टाळ्या पिटत असतो. नायकाची खदखद आणि त्याच्या शब्दांतील कोब्रासदृश डंखांनी नायिका बादलीभर पाणी केवळ रडून तयार करू शकते, अशी परिस्थिती तयार होते. याहून अधिक अश्रुपूर राजेश खन्ना यांनी सादर केलेल्या ‘दिवाना लेके आयाँ है दिल का तराना’ (मेरे जीवनसाथी, १९७२) गाण्यात नायिकेकडून काढून दाखविला आहे. बरे ऐंशी-नव्वदोत्तरी काळातही हा प्रकार थांबला नाही. भाषा बदलली, टपोरी झाली. ‘जान तेरे नाम’नामक चित्रपटात नायिकेच्या लग्नात वाद्य आणि नर्तकांचा ताफा घेऊन नायक ‘तेरेसे मॅरिज करनेको मै बंबईसे गोवा आया, पन मेरे को तेरे डॅडने रेड सिग्नल दिखलायाँ’ म्हणू लागला. याहून थोर अक्षयकुमार कुण्या एका खिलाडीपटात ‘जहर है के प्यार है तेरा चुम्मा’ हे गीत ऐकवून मैफलीत अभिनव हिंदूी सुधारणेच्या कामासोबत नायिकेला शाब्दिक डंखांनी रडवतो.

सलमान खान ‘कही प्यार ना हो जाए’नामक चित्रपटात सूटबुटात ‘ओ प्रिया’ हे गाणे कण्हतो आणि इलेक्ट्रिक गिटार नक्की कशी वाजवतात याचे प्रात्याक्षिक ऐकवत सोज्वळतेचा कळस गाठतो. भारतीय चित्रपटांचा चाहतावर्ग सहिष्णूपणात कधीही हरू शकत नाही. मैफलीतली रडगाणीही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा एक भाग म्हणून तो स्वीकारतो. नवी पिढी वेगाने अमेरिकी-ब्रिटिश चित्रपटांकडे, टीव्ही मालिकांकडे का आकृष्ट होते, याचे कोडे आदल्या पिढीला सुटू म्हणता सुटत नाही, तरी त्याची पर्वा कुणाला असते?

दु:खोत्सव साजऱ्या करणाऱ्या काही व्हिडीओ लिंक्स

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 4:28 am

Web Title: sad songs in party youtube must watch video
Next Stories
1 व्हायरलची साथ : बाहुबली चिंतनसैर
2 ‘ताण’लेल्या गोष्टी : कल्चर शॉक
3 कॅलरी मीटर : प्रोटिन्सबद्दल बरंच काही
Just Now!
X