News Flash

धोकादायक पांढरे पाच

नैसर्गिकरीत्या समुद्रातून काढलं जाणाऱ्या मिठात ८४ घटक सामावलेले असतात.

vv18पाच पांढरे पदार्थ असे आहेत, जे आपल्या रोजच्या जेवणात हमखास असतात. पण त्यांचं अतिसेवन आरोग्याला हानिकारक असतं. कोणते आहेत हे पांढरे पाच आणि त्याला पर्याय कोणते?

रिफाइण्ड टेबल सॉल्ट – एक खारट सत्य
नैसर्गिकरीत्या समुद्रातून काढलं जाणाऱ्या मिठात ८४ घटक सामावलेले असतात. ते शरीराला आवश्यक असतात आणि त्यांचे प्रमाण नैसर्गिकदृष्टय़ा योग्य असते. पण आजकाल बाजारात जे रिफाइण्ड टेबल सॉल्ट मिळतं ते ब्लीच करून चकचकीत केलेलं असतं. त्यामुळे त्यातील सगळी नैसर्गिक खनिजद्रव्ये संपुष्टात येतात. आपल्या शरीराला आवश्यकता असते सेंद्रिय स्वरूपातील सोडियमची. टेबल सॉल्टमध्ये सोडियम क्लोराइड स्वरूपात असतं जे शरीरासाठी विषारी मानलं गेलंय. सोडियमच्या अतिरेकी सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात आणि किडनीच्या आजारांचीही शक्यता वाढते. उच्च रक्तदाब हल्ली तरुण वयातही होतो.
सोडियमचा वापर कमी कसा कराल? – गरजेपुरतेच मीठ वापरा.
– फळे खाताना किंवा त्यांचं सरबत करून पिताना प्रत्येक वेळी त्यावर मीठ टाकू नका.
– प्रोसेस्ड फूड म्हणजे- वेफर्स, पॅकबंद रेडीमेड सूप्स, रेडी टू इट किंवा रेडी टू कूक पदार्थ, चीज यांचा वापर कमी करा.
– हॉटेलमध्ये जेवायला गेल्यास पदार्थावर अतिरिक्त मीठ टाकू नये असे वेटरला आधीच सांगा आणि तुम्हीसुद्धा बाहेर जेवताना वरून मीठ टाकू नका

रिफाइण्ड साखर
रिफाइण्ड साखरेत कोणतीही प्रथिने, व्हिटॅमिन, खनिज द्रव्य, फायबर नसतात. त्या साखरेचा माणसाच्या शरीराला कोणताही फायदा होत नाही. साखरेवर प्रक्रिया केल्यामुळे त्यातील नैसर्गिक घटकांचा ऱ्हास होतो. बहुतांशी पिशवीबंद इन्स्टंट पदार्थामध्ये, बाहेर मिळणाऱ्या आकर्षक सलाडमध्ये, केचपमध्ये, मफिन्समध्ये ही रिफाइण्ड साखर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात टाकलेली असते. प्रोसेस्ड फूडमध्ये १६ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण रिफाइण्ड शुगरचे असते. त्यामुळे असे तयार अन्नपदार्थ आरोग्याला घातक ठरू शकतात. साखर ही पाचक, उत्तेजक आणि उर्जावर्धक मानली जाते. हे खरे असले तरी त्याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यास हानिकारक ठरू शकते.

साखरेला इतर पर्याय काय ?

– साखरेऐवजी रासायनिक प्रक्रिया न केलेल्या सेंद्रिय गुळाचा वापर करा. त्यात खनिज द्रव्य, व्हिटामिन असतात.
– मध हा साखरेला एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय असून त्यात अनेक नैसर्गिक घटक असतात जे हृदय आणि मेंदूचे कार्य नीट चालावे यासाठी आवश्यक असतात.

मैदा
कुठल्याही धान्यापासून पीठ तयार करताना ते रिफाइण्ड केलं तर धान्यातली सगळी पोषक द्रव्ये निघून जातात. मैदा हे असंच रिफाईंड पीठ आहे. मैदा तयार करण्याच्या प्रक्रियेत पीठात अ‍ॅलोक्झन नावाचा पदार्थ घातलेला असतो. तो मधुमेहाला कारणीभूत ठरतो. व्हाईट ब्रेड, पेस्ट्रीज मैद्यापासून बनतात. त्यात कोणतेही पौष्टिक मूल्य त्यात शिल्लक राहात नाही.

व्हाइट फ्लोरला पर्याय

– होल ग्रेन म्हणजे मूळ स्वरूपातील धान्य. गहू, ओट्स, सातू, नाचणी, बाजरी, मका यांचा वापर करावा. या सगळ्या धान्यांमध्ये व्हिटॅमिन, खनिज द्रव्ये आणि पौष्टिक द्रव्य भरपूर असतात. या धान्याचं पीठ न चाळता वापरावं, तरच त्यातील फायबर टिकून राहातं. प्रथिनं आणि आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करतात.

पाश्चराईज्ड दूध
हे दूध मोठय़ा माणसांना पचायला जड असते. केवळ वयाच्या तीन वर्षांपर्यंतच दूध पचवण्यासाठी आवश्यक पाचक प्रथिन (एन्झाइम्स) मानवी शरीरात असतात. त्यामुळे लहान मुलांनाच हे दूध व्यवस्थित पचू शकतं. पाश्चरायझेशनच्या प्रक्रियेत दुधातील उपयुक्त जिवाणूंचादेखील नाश होतो. हे जिवाणू दुधातील कॅल्शिअम शोषून घेण्यासाठीदेखील उपयुक्त असतात. न पचलेले दूध म्युकस बनून (घट्ट व चिकट) जठर आणि आतडय़ांमध्ये साचून राहातं. त्यामुळे माणसाला सारखी सुस्ती येते आणि आळस वाढतो.

डेअरी पदार्थाना पर्याय –
सर्व प्रकारच्या डाळी, तृणधान्य, कडधान्य, अक्रोड हे कॅल्शिअमचा चांगला स्रोत आहेत. याशिवाय काजू, बदाम यांचाही तुम्ही आहारात समावेश करू शकता. हे पदार्थ म्हणजे डेअरी पदार्थाना एक उत्कृष्ट पर्याय असून त्यातून भरपूर कॅल्शियम मिळते.

व्हाइट रिफाइण्ड राइस
प्रक्रिया केल्यामुळे तांदूळ पांढरा स्वच्छ आणि चकचकीत दिसतो, पण त्या पांढऱ्या तांदळातून कोंडा, फोलपटे काढून टाकलेला असतात. हा कोंडा फायबरने युक्त असतो आणि आरोग्यासाठी आवश्यक असतो. प्रक्रिया केल्यामुळे पॉलिश्ड राईसमधील पौष्टिक फायदे संपतात आणि त्याची चव बदलून गेलेली असते. असा तांदूळ केवळ देखावा केल्याप्रमाणे पांढरा शुभ्र दिसतो पण पौष्टिक मूल्य मात्र शून्य असते. त्यामुळे आतडय़ांची हालचाल कालांतराने मंदावू शकते. टाईप टू डायबेटिसचा धोका यामुळे वाढतो.

पर्याय काय?

तांबूस रंगाचा अनपॉलिश्ड राईस वापरावा. हातसडीच्या तांदूळात पोषक मूल्यांचे प्रमाण अधिक असते आणि ते आरोग्याला हितकारक ठरते. हातसडीच्या तांदूळात मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंक आणि इतर महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात.
संजना मोटवानी – viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 1:28 am

Web Title: sanjana motwani talk about healthy diet
टॅग : Diet
Next Stories
1 जयपुरी मस्तानी
2 क्रूझवरचा ‘गोडवा’
3 क्लिक : महेश यादव, गोरेंगाव, मुंबई
Just Now!
X